Thursday, October 10, 2013

गुन्हेमुक्त व्यवस्था शक्य आहे काय?


गुन्हेमुक्त व्यवस्था शक्य आहे काय?

.भा.चे प्रबंध संचालक विश्वास पाठक यांच्या "स्त्री अत्याचाराचे खरे दोषी कोण?" या लेखावर चर्चा पुढे नेणारा "गुन्हेमुक्त व्यवस्था निर्मिती व्हावी" हा ॲड. सुनील खरे यांचा विचार प्रवर्तक आणि एका चांगल्या व्यवस्था निर्मितीसाठी उपाय सुचवणारा लेख वाचला. खरे यांनी सुचवलेले उपाय चांगलेच आहेत, विचारांच्या पातळीवर योग्यच आहेत पण ते व्यवहार्य नाहीत. ते विचार वास्तवात कधीच येणार नाहीत.

मी व्यक्त केलेले मत एकांगी आणि निराशावादी वाटेल पण ते तसे नाही. आपल्या इथे चांगल्या संकल्पना, चांगले विचार रुजवताना फार त्रास होतो, संकल्पना रुजवणारा समाजाच्या भल्याचा विचार करून काही तरी सुचवतो, त्यासाठी आयुष्य वेचतो, घाम गाळतो, रक्त आटवतो आणि तो हे सर्व ज्या समाजासाठी करतो, तो समाज काय करतो? त्या महामानवाला देवळात बंद करून ठेवतो किंवा चौकात पुतळा  उभारतो. त्याचे विचार पुस्तकात, पुतळा चौकात किंवा मूर्ती देवळात आणि समाज जसाच्या तसा. आपल्याला ढोंग चांगले जमते. जे आहे ते लपवण्यात आणि  जे नाही ते दाखवण्यात आपल्याइतके कोणीच पटाईत आही. असो.

खरे साहेबांनी जे विचार सुचवले आहेत त्या सर्वांचा आपण विचार करू या. व्यवस्थापन कौशल्य पारंगत  लोकांचा एक अभ्यास गट स्थापन करायचा आणि गुन्हा करण्याची संधीच दुर्जन घटकास मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी हा अभ्यास गट उपाय योजना सुचवेल आणि शासन त्याची अंमलबजावणी करेल. या साठी सज्जन शक्तींनी प्रशासनास, माया बाप सरकारला भाग पाडावे.........हे वाटते तितके सोपे आहे काय हो? सज्जन शक्ती आहे का आपल्याकडे? मुळात सज्जन आहेत काय? आणि असतील तर त्यांना शक्ती असते काय? दोनच वर्षांपूर्वी अण्णांच्या तथाकथित जन-आंदोलनाचा फज्जा उडालेला आपण पाहिला, बाबा रामदेव यांच्या आंदोलनाचा फुसका बारही आपण पाहिला. वोरा समिती किंवा इतर अनेक समित्यांनी सुचवलेले उपाय, तसेच सर्वोच्च न्यायालयाने निरनिराळ्या प्रकरणात दिलेले निर्देश शासन, प्रशासन आणि तुम्ही आम्ही कसे पायदळी तुडवत असतो त्यावर अधिक भाष्य करायची गरज नाही. आणि गुन्हे करणारे परिस्थिती पाहून गुन्हे करायचे की नाही ते ठरवत नाहीत. दोन व्यक्तींचे क्षुल्लक कारणावरून भांडण होते आणि एक रागाच्या भरात दुसऱ्याचा मुडदा पाडतो. याबाबतीत अभ्यास गट काय करेल? हुंडा बळी, कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अत्याचार, ऑनर किलींग, निरनिराळ्या प्रकारचे बलात्कार (बापाने मुलीवर, भावाने बहिणीवर, नात्यातल्या मुलीवर), आत्महत्येला प्रवृत्त करणे, विनयभंग, लैगिक शोषण, आर्थिक घोटाळे, .  अनेक प्रकारचे गुन्हे रोकण्यासाठी व्यवस्थापन कौशल्य पारंगत व्यक्तिंचा अभ्यासगट कसल्या उपाय योजना सुचवणार?

खरे साहेबांनी सुचविल्याप्रमाणे गस्ती पथके मनुष्यबळाच्या किमान आणि कमाल मर्यादेसह नेमली तरी प्रश्न सुटणार नाहीत कारण गुन्हे करणारा कशाचीही तमा बाळगत नाही गस्ती पथकाच्या नाकावर टिच्चून गुन्हे घडतील. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात फिरणारे नेते आपल्याकडे मारल्या गेले आहेत. पोलीस ठाण्यातही बलात्कार होतात. गस्ती पथकातील सदस्यही गुन्हे करणार नाहीत कशावरून? चौकाचौकावर वाहतूक नियम मोडणाऱ्या लोकांकडून पैसे खाणारे पोलिस गस्तीपथकात आणखी जोमाने पैसे खातील.

दारूची दुकाने, बार याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे, वेब कामेरे लावणे, अशा उपाय योजना केल्या तरीही गुन्हे घडणारच शुद्धीत नसणारा माणूस सुरक्षा रक्षकाला किंवा  कशालाही घाबरण्याची शक्यता नाही. अंमली पदार्थांच्या नशेत किंवा रागाच्या भरात किंवा धार्मिक भावना दुखावल्यामुळे आपल्या मनावर ताबा राहात नाही त्यावेळी गुन्हे घडू शकतात कितीही प्रिवेण्टीव मेझर्स केले तरी.

पोलिसांची संख्या वाढवण्याने गुन्हे थांबतील आणि प्रश्न सुटतील असे ठामपणे म्हणता येणार नाही पण खाणारी तोंडे वाढतील हे नक्की. जे पोलीस न्यायालयात प्रलंबित इतर खटल्यांमध्ये साक्षीदार आणून उभे करतात/ करू शकतात तेच पोलीस सलमान खानच्या प्रकरणात का दिरंगाई करतात? मोठमोठ्या नेत्यांना त्यांनी गुन्हे केलेले असले तरी अटक करायला पोलीस का घाबरतात? मुळात ज्यांना गुन्हा करायचाच आहे त्यांना कोणी कितीही रोकायचा प्रयत्न केला तरी ते गुन्हा करणारच. आतंकवादाचेच बघा ना. कितीही कायदेशीर उपाय योजना केल्या तरी आतंकवाद थांबायचे नाव घेतो आहे काय?

 खरे साहेबांनी सुचवलेल्या लोक सहभागाचे बाबतीत तर न बोललेलेच बरे. आपल्या इथे "मला काय त्याचे" ही वृत्ती फार आहे. चांगल्या कामासाठी लोक एकत्र येणे ही फारच दूरची गोष्ट आहे. कशाला कोणाच्या फंदात पडायचे? असे आपले सगळ्यांचे मत असते. ज्येष्ठ पण सक्षम नागरिक चौकात किंवा निर्मनुष्य रस्त्यावर पहाटे फेऱ्या मारतील, त्यांना एक केन पुरवावा, असे खरे साहेब म्हणतात पण अत्याधुनिक शस्त्रे किंवा गेला बाजार चाकू घेवून आलेल्या गुन्हेगारांना हे ज्येष्ठ नागरिक कसे काय रोखू शकतील? आणि खरेंनी ज्येष्ठ नागरिकांवरच ही जबाबदारी का ढकलली? तरुणांना चिडीमारी करण्यापासून फुरसत मिळत नाही म्हणून? आपली युवा शक्ती ज्या कामांमध्ये खर्च होते आहे तिचा सदुपयोग करायचे ठरवले तर खूप काही करता येईल पण कोणाला काही करावेसेच वाटत नाही. कोणाला काही करायला सांगायची ताकद ही आज कोणाही मध्ये नाही. एखादा सांगणारा मिळाला तर  ऐकणाऱ्या लोकांची वानवा !!!!!!महात्मा गांधींच्या एका हाकेने लाखो लोक धावून यायचे आज आहे असा एखादा नेता. प्रत्येक जाती, धर्म, पंथाचे वेगवेगळे नेते, त्यांच्यातही गटतट. मुद्दा हा की आपण लोक धड एक गणपती बसवू शकत नाही म्हणजे गल्लोगल्ली, रस्तोरस्ती चौकाचौकात वेगवेगळे गणपती बसवतो. "एक गाव एक गणपती" साठी आंदोलन करणाऱ्या दाभोलकरांचा नुकताच खून झाला. समाजाच्या भल्यासाठी झटणारे मारले जातात आणि आणि समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत लोटणारे आनंदात जगात आहेत हा विरोधाभास समजून घेतला पाहिजे.

शेवटी खरे साहेब न्यायव्यवस्थेकडे येतात. न्यायव्यवस्थेत अपर्याप्त मनुष्यबळ तर आहेच पण इतर ही अनेक मुद्दे आहेत, त्याबद्दल भरपूर बोलण्यालिहिण्यासारखे आहे. तिथेही आपल्या समाजातीलच लोक असतात, त्यामुळे जसा समाज तशी न्यायव्यवस्था. जोपर्यंत समाज सुधारत नाही तोपर्यंत न्यायव्यवस्था सुधारण्याची शक्यता नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक सरन्यायाधीशांवर जर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील तर बाकी कल्पनाच केलेली बरी. समाजाचेच प्रतिबिंब न्यायव्यवस्थेत पडणार नाही काय?

अभ्यासगटाने सुचवलेले उपाय शासनाच्या निदर्शनास आणून देवून त्यांची अंमलबजावणी शासनाकडून करवून घेण्याची जबाबदारी संबंधित सज्जनशक्ती पार पाडतील, ही अपेक्षा खरे साहेब व्यक्त करीत आहेत. एक तर मी आधी म्हटल्याप्रमाणे आपल्या देशात सज्जनशक्ती नाहीच. आणि सज्जन असले तरी त्यांच्यात  काहीही करण्याची शक्ती नाही. आताही अस्तित्त्वात असलेल्या कायदे आणि नियमांना  अनुसरून  सज्जनशक्तीने वागायचे ठरवले तरी सज्जनशक्ती भरपूर काही करू शकते. भ्रष्टाचार करायचा नाही आणि कोणालाही करू द्यायचा नाही हे तरी आपली तथाकथित सज्जनशक्ती ठरवते काय? रस्त्यावर मुले मुलींना छेडतात किती सज्जन विरोध करतात? निरनिराळ्या कार्यालयात अनेक गैरप्रकार चालतात,  किती सज्जन विरोध करतात? आश्रमशाळा, वसतीगृहे, अनाथाश्रम, अशा ठिकाणी होणाऱ्या अन्याय अत्याचारांबाबत किती सज्जन आवाज उठवतात?
साहित्यिक, कलाकार, यांना मारहाण करणे, धमक्या देणे, त्यांचे साहित्य जाळणे असे प्रकार वारंवार घडता असतात किती सज्जन धावून येतात कलेच्या संरक्षण, संवर्धनासाठी ? धार्मिक उन्मादाविरुद्ध किती सज्जन आवाज उठवतात? भरपूर मोठी यादी होईल. प्रश्न सज्जन दुर्जनांचा नाही प्रश्न आपल्या सर्वांचा आहे. सज्जन आणि दुर्जन हे आपल्यातलेच असतात. म्हणतात ना "आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे " आपल्या मुलाने किंवा मुलीने एखादे दुष्कृत्य केले, किंवा गुन्हा केला तर आपण त्याला किंवा तिला शिक्षा होवू देवू की सोडवायचा प्रयत्न करू? माझ्या मते तरी बहुतांश लोक सोडवायचाच प्रयत्न करतील त्यासाठी सर्व काही (समजताय ना?) करतील. सज्जनांच्या निष्क्रीयतेमुळेच गुन्हेगारी फोफावते आणि दुर्जनांचे फावते असे कुणीतरी म्हटले आहे. जो कोणी कुठल्याही गैरप्रकाराबद्दल आवाज उठवतो त्याला वेड्यात काढले जाते.

आतापर्यंत आपण वास्तव तपासले आता आपण हे वास्तव असे का असते, ते बघू.
एका फेंच समाजशास्त्रज्ञाच्या  मते गुन्हेमुक्त समाज कुठेही कधीच अस्तित्त्वात असू शकत नाही. “There is no society known where a more or less developed criminality is not found under different forms.”  महाराष्ट्र शासनाची "तंटामुक्त गाव समिती योजना" काय उपयोगाची आहे हे एव्हाना आपल्याला  समजलेच आहे. योजना कागदोपत्री यशस्वी दाखवण्यासाठी आपण वाट्टेल ते करू शकतो. घरोघरी तंटे असतात, गाव कसे तंटामुक्त राहील? आपण फक्त गुन्हेगारीचा ताळेबंद मांडू शकतो. शून्य गुन्हेगारी कधीच राहणार नाही.

रॉबर्ट केनेडी म्हणतात, " Every society gets the kind of criminal it deserves. What is equally true is that every community gets the kind of law enforcement it insists on.” म्हणजे काय तर सगळे समाजावरच अवलंबून आहे. आणि समाज हा जात, उपजात, धर्म, पंथ, रंग, आर्थिक क्षमता यांनी ठरत असतो. १९४७ साली आपल्याला स्वातंत्य्र मिळाले, १९५० साली आपण भारतीय घटना स्वीकारली पण २०१३ संपत आले तरीही "समान नागरी कायदा" आपण अजून आणू शकलो नाही. फौजदारी कायदा सर्वांसाठी सारखा असला तरीही कारवाई होताना किंवा न्याय मिळताना, मिळवताना भेदभाव, पक्षपात होतोच हे आपल्याला माहित आहेच. याची भरपूर उदाहरणे देता येतील.
प्रख्यात साहित्यिक मार्क ट्वेन म्हणतात, " A crime persevered in a thousand centuries ceases to be a crime, and becomes a virtue. This is the law of custom, and custom supersedes all other forms of law.” आपण गुन्हे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि गुन्हेगार शतकानुशतके जोपासले आहेत, आपल्याला त्यांची सवय झाली आहे. वर्तमानपत्र उघडताच पाच-दहा बलात्कार, पंधरा-वीस चोऱ्या-दरोडे, चार-पाच घोटाळे-फसवणुकीचे मामले, दोन-चार भ्रष्टाचार, सात-आठ खून, याबाबत बातम्या वाचायला मिळतात. एखाद्याच निर्भयाला सिंगापूरला नेले जाते बाकीच्या सडतात ग्रामीण रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि मरतात. काही दिवसातच आपण निर्भयाला विसरून जातो....एखाद्या सराईताप्रमाणे.....दुसऱ्या निर्भयावर बलात्कार होईपर्यंत. सर्व गुन्ह्यांचे तसेच, घोटाळ्यांचे तसेच. दस्तुरखुद्द सुशीलकुमार शिंदेच म्हणतात की लोक घोटाळे विसरतात. काय चूक म्हणतात. आपल्याला कशाचेच काही वाटत नाही.

प्लेटोच्या "रिपब्लिक" या ग्रंथात त्याचा भाऊ ग्लॉकॉन म्हणतो......"न्यायाने जगण्यापेक्षा अन्यायाने जगणे जास्त श्रेयस्कर आहे कारण जे न्यायाने वागतात त्यांना जगात सतत त्रास सोसावा लागतो. न्यायाने वागा असे सांगणे सोपे असते. पण संधी मिळताच लोक अन्यायाने वागावयास मागे पुढे पाहत नाहीत. अन्याय्य वर्तन करून त्याबद्दल दंड  भोगणे ही चांगली आणि प्रतिकार न करता आल्यामुळे अन्याय सहन करणे ही वाईट गोष्ट होय. आपण सत्प्रवृत्त व दुष्प्रवृत्त लोकांना त्यांना हवे तसे वागू दिले तर अन्यायी माणसाचे अनुकरण न्यायी माणूस करीत आहे असे आपणास दिसेल. कारण माणसाच्या वर्तनामागे स्वार्थ महत्त्वाचा ठरतो. फक्त कायदा आणि रुढी व परंपरा यांच्या दडपणामुळे तो आपल्या वर्तनास मुरड घालतो." हजारो संतमहात्मे (आसारामसारखे नाही) होवून गेले, त्यांचे करोडो भक्त आहेत तरी सुद्धा समाजात विषमता, गैरप्रकार, गुन्हेगारी, लांडीलबाडी, फसवणूक आदि प्रकार घडतातच यामागे काही तरी तर गोम असेल? हा सर्व विचार करता मला नाही वाटत "गुन्हेमुक्त व्यवस्था शक्य आहे काय?" या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी होवू शकेल. बरोबर?

ॲड. अतुल सोनक
९८६०१११३००









No comments:

Post a Comment