Thursday, October 10, 2013

सेनापतींचे शिरकाण


सेनापतींचे शिरकाण
जनरल वैद्य, भारतीय लष्कराचे माजी सेनापती आठवतात ना, की विसरलात ? भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिरात शीख आतंकवादी लपलेले आहेत अशी माहिती मिळताच "आपरेशन ब्ल्यू स्टार" ही योजना आखली आणि त्यावेळचे लष्कराचे सेनापती जनरल ए.एस. वैद्य यांना सुवर्णमंदिर अतिरेकीमुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जे काही घडले ते आपण सर्व जाणतोच. सुवर्णमंदिरात भारतीय सेनेचे जवान घुसल्यामुळे मंदिराचे पावित्र्य नष्ट झाल्याचा ग्रह करून घेवून त्यासाठी कारणीभूत असणारे इंदिराजी आणि सेनापती वैद्य यांना ठार करण्याचा कट आखण्यात आला. दि.३१.१०.१९८४ रोजी इंदिराजींची हत्या त्यांच्याच सुरक्षारक्षकांकरवी करण्यात अतिरेक्यांना यश मिळाले. सेनापतींपर्यंत मात्र ते पोहचू शकले नाहीत म्हणून ते सेनापती सेवानिवृत्त  होण्याची वाट बघत होते. दि.३१.०१.१९८६ रोजी सेनापती वैद्य सेवानिवृत्त  होऊन पुण्यात स्थायिक झाले. ते आणि त्यांच्या पत्नी भानुमती त्यांच्या पुणे येथील घराचे बांधकाम पूर्ण व्हावयाचे असल्यामुळे मेजर जनरल वाय.के. यादव यांच्या क्वीन्स गार्डन येथील बंगल्यात काही दिवस वास्तव्यास होते त्यानंतर (दि.२५.०५.१९८६ पासून) ते कोरेगाव पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी रहायला गेले.
दि.१०.०८.१९८६ रोजी सकाळी १० वाजता जनरल वैद्य आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या मारुती कारने बाजारात खरेदी करण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत रामचंद्र क्षिरसागर नावाचा एक पोलीस हवालदार सुरक्षा रक्षक होता. साडेअकराच्या सुमारास त्यांची खरेदी आटोपल्यावर ते घरी परत जायला निघाले. सेनापती गाडी चालवत होते. त्यांच्या पत्नी बाजूला बसल्या होत्या, रामचंद्र मागच्या सीटवर बसला होता. राजेंद्रसिंगजी रोड आणि अभिमन्यू रोडच्या वळणावर गाडीची गती हळू असताना लाल रंगाच्या इंड-सुझुकी मोटर सायकलवर दोघे जण सेनापतींच्या बाजूने अगदी जवळ आले आणि मोटर सायकलवर मागे बसलेल्या व्यक्तीने सेनापतींवर तीन गोळ्या झाडल्या. त्यांच्या पत्नी आणि सुरक्षा रक्षकाला काही कळायच्या आतच सर्व खेळ खलास झाला. सेनापती त्यांच्या पत्नीच्या खांद्यावर कलंडले, त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित गाडी एका सायकलस्वाराला जावून धडकली. सायकलस्वाराने सायकलवरून उडी मारुन पळ काढला त्यामुळे तो वाचला, सायकलवर आदळून सेनापतींची मारुती गाडी थांबली.

सेनापतींना जवळच्या इस्पितळात घेवून जाण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. हल्लेखोर गोळ्या झाडून पळून जाण्यात यशस्वी झाले. बरेच दिवस उलटूनही हल्लेखोरांचा तपास लागला नाही. दि..०९.१९८६ रोजी एक लाल रंगाची इंड-सुझुकी मोटर सायकल एका ट्रकवर आदळली. त्यावर बसलेल्या दोन व्यक्ती खाली पडल्या, जखमी झाल्या. त्यांच्या जवळील वस्तू इतस्तत: फेकल्या गेल्या. आसपासच्या लोकांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यापैकी एकाने पिस्तूल काढली आणि गोळ्या मारण्याची धमकी दिली, उपस्थितांना शिवीगाळ केली. काही तरी भानगड आहे हे लक्षात आल्यामुळे गर्दीतील एक नारायण बजरंग पवार नावाची व्यक्ती सरळ पिंपरी पोलीस ठाण्यात जावून इंस्पेक्टर पठाण यांना माहिती देवून आली. पठाण यांनी हाताखालच्या स्टाफला लगेच कामगिरीवर धाडून दोघांचाही  शोध घ्यायला पाठवले. पोलिसांनी ताबडतोब शोध मोहीम राबवून दोघांनाही पकडले. दोघांनीही पळून जाण्याचा, पोलिसांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एक होता सुखदेव सिंग उर्फ "सुखा" आणि दुसरा होता निर्मल सिंग उर्फ "निमा". त्यांच्याजवळील वस्तू जप्त करण्यात आल्या. पिस्तूले, गोळ्या, लाल इंड-सुझुकीची कागदपत्रे, . साहित्य जप्त करण्यात आले. त्यांना पोलीस जीपमधे पोलीस ठाण्यात नेत असताना ते दोघेही "खलिस्तान जिंदाबाद" चे नारे लावत होते तसेच आम्हीच सेनपती वैद्यांची हत्या केली असेही ओरडत होते.
इंस्पेक्टर पठाण यांनी आरोपींकडून जप्त केलेले पिस्तूल आणि गोळ्या बॅलिस्टीक एक्स्पर्टकडे पाठवल्या. त्यांच्या रिपोर्टनुसार सेनापतींना याच पिस्तूलने गोळ्या मारण्यात आल्या होत्या. त्यानंतर इतर तपास पूर्ण करण्यात आला आणि दि.१४.०८.१९८७ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुखा आणि निमाव्यतिरिक्त यदविंदरसिंग, अवतारसिंग, हरजिंदरसिंग, सुखमिंदरसिंग, दलजीतसिंग, संजीव गुप्ता, जसविंदर कौर आणि बलजिंदरसिंग अशा इतर आरोपींनी कट रचून सेनापतींची हत्या केली होती असे तपासांती निष्पन्न झाले होते आणि म्हणून या सर्वांविरुद्ध टाडा कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या निरनिराळ्या कलमांखाली दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सर्व आरोपींपैकी पहिले पाच जण पकडण्यात आले होते आणि बाकीच्यांचा कधीच पत्ता लागला नाही त्यामुळे पुणे येथील विशेष सत्र न्यायालयात या पाच जणांविरुद्ध खटला चालला. घटनेच्या दिवशी हरजिंदरसिंग "जिंदा" मोटर सायकल चालवत होता आणि सुखाने मागे बसून सेनापतींवर गोळ्या झाडल्या. आरोपपत्र दाखल झाल्यावर पाचही आरोपींनी त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगून गुन्हा नाकबूल केला. परंतु नंतर दि.१९.०९.१९८८ रोजी न्यायालयासमोर सुखाने गुन्हा कबूल केला, विशेष न्यायाधीशांनी त्याला आठ दिवसांचा अवधी देवून त्याला जे काही सांगायचे आहे ते लेखी देण्यास सांगितले, दि.२६.०९.१९८८ रोजी सुखाने त्याचे लेखी बयाण पेश केले. खटल्यात दीडशेहून अधिक साक्षीदार तपासण्यात आले, इतर पुरावे आणि सर्व बाबींचा विचार करून विशेष न्यायाधीशांनी ३०० हून अधिक पानांचे निकालपत्र देवून सुखा आणि जिंदाला फाशीची सजा सुनावली तसेच सेनापतींच्या पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दहा वर्षे सक्तमजुरीची सजा सुनावली. बाकी तीन आरोपींविरुद्ध कुठलाही गुन्हा सिद्ध न झाल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

टाडा न्यायालयाने सुनावलेली फाशीची सजा सर्वोच्च न्यायालयात प्रमाणित/कायम (confirm) करण्यासाठी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यात आले. महाराष्ट्र शासनाने टाडा न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या तीन आरोपींना सजा मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली. दोन्ही प्रकरणांची संयुक्त सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली आणि न्या. .एम.अहमदी आणि न्या.के.रामस्वामी यांच्या खंडपीठाने दि.१५.०७.१९९२ रोजी आदेश पारित करून विशेष टाडा न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवीत शासनाची अपील फेटाळली तसेच सुखा आणि जिंदाला दिलेली सजा कायम केली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाचे मित्र (amicus curie) म्हणून पुण्याचे वकील श्री. एच.व्ही. निंबाळकर आणि त्यांचे सहकारी श्री. सावरकर यांची त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल खूप तारीफ केली. त्यांना शासनातर्फे एक महिन्याच्या आत मानधन आणि त्यांचा झालेला खर्च देण्यात यावा असे निर्देश दिले. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात त्यांच्या निवासाची सोय करण्यासाठी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला आदेश द्यावे लागले होते याचा उल्लेखही निकालपत्रात आहे. असो. शासनाची न्यायालये, न्यायालयीन खटले, सरकारी वकील यासंबंधीची उदासीनता यावरून दिसून येते. वैद्यांच्या खुनाचा कट रचणारे निर्दोष सुटले, कटातील काही जण तर सापडलेच नाहीत. फक्त दोघे ज्यांनी प्रत्यक्ष खून केला आणि ज्यांनी खुनाची कबुली दिली त्यांनाच सजा झाली. हे आपल्या तपास यंत्रणांचे अपयश म्हणायला हवे.

भारतासारख्या निधर्मी राज्यात धार्मिक मूलतत्त्ववाद कसा फोफावतो? त्याला कसे खतपाणी घातले जाते? लोकांच्या धार्मिक भावना कशा दुखावल्या जातात, भडकवल्या जातात यावर भरपूर लिखाण झालेले आहे. सामान्य माणसे तर कस्पटासमान लेखली जातात, मारली जातात, शासनातर्फे दहा पाच लाख मृतांच्या नातेवाईकांना दिले जातात. पण भारतीय सैन्याचा सेनापतीही असा बळी जावू शकतो. आपल्या देशात कोणीच सुरक्षित नाही. कोणाचाही दु:स्वास न करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकरही असेच मारले गेले. त्यावरुनच पुण्यातच हत्या झालेल्या वैद्यांची आठवण झाली. धार्मिक मूलतत्त्ववादाविरुद्ध लढणारे सेनापती वैद्य आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढणारे सेनापती दाभोलकर यांची हत्या पुण्यातच व्हावी हाही योगायोगच म्हणावा लागेल.

अ‍ॅड. अतुल सोनक,
९८६०१११३००



No comments:

Post a Comment