Sunday, June 30, 2013

“ऑनर किलींग”


                    ऑनर किलींग”
आपल्या पोटच्या मुलीला बापाने तिच्या गळ्याभोवती इलेक्ट्रीक वायर गुंडाळून मारून टाकले. भारताच्या राजधानीत......दिल्लीत घडलेली ही एक ऑनर किलींगची” कहाणी..........

भगवानदासची मुलगी सीमा हिचे लग्न राजू नावाच्या तरुणाशी झाले. परंतु काही कारणास्तव तिचे राजूशी   पटल्यामुळे तिने त्याला सोडले आणि ती तिच्या काकाबरोबर (श्रीनिवास) राहू लागली. श्रीनिवास हा भगवानदासच्या मावशीचा मुलगा होता. सीमा नवऱ्याला सोडून तिच्या काकाबरोबर राहू लागली आणि त्यांच्यात लैंगिक संबंधही प्रस्थापित झाले. सीमाने केलेला हा व्यभिचारी आणि अनैतिक प्रकार समजल्यावर भगवानदासला खूप राग आला. सीमाच्या अशा व्यभिचारी वागण्यामुळे आपली तसेच आपल्या कुटुंबियांची समाजात तसेच गावात खूप बदनामी होतेय ही भावना त्याच्या मनात घर करू लागली. सीमाला तिच्या दुष्कृत्याची शिक्षा द्यायचीच असे त्याने मनोमन ठरवले. भगवानदास संधीची वाट बघत होता आणि संधी त्याच्या घरीच चालून आली. सीमा त्याच्या घरी काही दिवसांसाठी रहायला आली.

दि.१४ मे आणि १५ मे २००६ च्या मध्यरात्री भगवानदासने संधी साधली. त्याने सीमाच्या गळ्याभोवती इलेक्ट्रिक वायर गुंडाळून तिचा गळा आवळला आणि तिचा खून केला. दुसऱ्या दिवशी दुपारी सीमाच्या अंत्यविधीची तयारी सुद्धा सुरू झाली. आजूबाजूचे लोकही जमले होते. अशातच कुठूनतरी बातमी फुटली. कुणातरी अज्ञात इसमाने पोलिसांना फोन करून सांगितले की भगवानदासने त्याच्या मुलीचा खून केलेला आहे. पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहचले. सीमाचा मृतदेह घराच्या मागच्या खोलीत जमिनीवर ठेवला होता. पोलिसांनी सीमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि उपस्थितांची चौकशी सुरू केली.

सीमाच्या आजीने (धिल्लो देवी ) पोलिसांना सांगितले की तिच्या मुलाने सीमाचा गळ्याभोवती वायर आवळून खून केल्याचे तिला सांगितले. न्यायालयात साक्ष देताना मात्र तिने हे बयाण फिरवले. तिला तिच्या मुलाला वाचवायचे होते हे स्पष्ट होते. तिच्या मुलाने जे काही केले होते ते कुटुंबाच्या इभ्रतीसाठीच केले होते असां तिचा समाज असावा. न्यायालयाने तिला फितूर घोषित केले पण तिचे पोलिसांसमोर दिलेले बयाण ग्राह्य धरले.घडल्या घटनेचा कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असण्याचा प्रश्नच नव्हता. असला तरी कुटुंबातीलच असणार आणि तो पोलिसांना मदत कशी करणार? उपविभागीय दंडाधिकारी यांच्या समोर भगवानदासचे बयाण नोंदवण्यात आले. गळा आवळण्यासाठी वापरलेली आणि पलंगाखाली ठेवलेली इलेक्ट्रीक वायर त्यानेच दाखवली आणि ती जप्त करण्यात आली. 

सीमाच्या शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळा आवळल्यामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले. तिचा मृतदेह जमिनीवर होता, छताला लटकलेला नव्हता त्यामुळे आत्महत्येचाही प्रश्नच नव्हतां. घरात धिल्लो देवी आणि भगवानदासच्या भावाशिवाय कुणीही नव्हते त्यामुळे हा खून भगवानदासनेच केला असावा हे स्पष्ट होते.परिस्थितीजन्य पुरावा सगळा त्याच्याच विरोधात होता. उपविभागीय दंडाधिकारी, शवविच्छेदन करणारे डॉ. प्रविंद्र सिंग, तपास अधिकारी नंदकुमार या सर्वांनी न्यायालयासमोर आपापल्या साक्षी व्यवस्थितरित्या नोंदवल्या. त्यावरून भगवानदासशिवाय हा खून कोणीच करू शकत नाही हे सिद्ध झाले. आणि सत्र न्यायालयाने भगवानदासला सीमाच्या खूनाचा दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयानेसुद्धा फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.

भगवानदासने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेवून विशेष अनुमती याचिका दाखल करून आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण न्या. मार्कंडेय काटजू आणि न्या. ग्यानसुधा मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आले. दोन्ही न्यायमूर्तींनी सर्व बाजूंचा विचार करून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांचा संदर्भ देवून सत्र न्यायालय तसेच दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्णय कायम ठेवून ही "दुर्मिळातली दुर्मिळ" केस समजून भगवानदासला फाशीची शिक्षा ठोठावली. 

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल देताना "ऑनर किलींग" च्या वाढत्या प्रकारांबद्दल कठोर शब्दात टीका केली. हा प्रकार रानटी किंवा सरंजामशाही समाजात शोभून दिसतो, भारतासारख्या कायद्याचे राज्य असणारया देशात असले प्रकार शोभत नाहीत त्यामुळे समाज, पोलिस, राज्यकर्ते, न्यायालये या सर्वांनी अशा रानटी प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत असे मत व्यक्त केले. आपल्या घरातील, जातीतील, धर्मातील एखाद्या तरुण मुलाने किंवा मुलीने  परधर्मीय किंवा परजातीतील मुलीशी किंवा मुलाशी लग्न केले, किंवा त्यांच्या बरोबर पळून गेले किंवा सीमासारखा व्यभिचार केला  तर आपण त्यांना जास्तीत जास्त बहिष्कृत करावे, आपल्याला त्यांचे कृत्य आवडले नसेल तर त्यांच्याशी संबंध ठेवू नये पण कायदा हातात घेवू नये. असेही मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.  तसेच "ऑनर किलींग" सारखे प्रकार सर्वसंमतीने (जात, धर्म, कुटुंब) होत असतात  आणि गुप्तरीत्या पार पाडले जातात त्यामुळे अशा घटनांना प्रत्यक्षदर्शी साक्षदार मिळणे फारच कठीण असते. पण म्हणून असले रानटी गुन्हेगार निर्दोष सुटणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत नेमके काय म्हटले आहे ते प्रत्यक्ष पाहणे योग्य ठरेल........ Before parting with this case we would like to state that `honour' killings have become commonplace in many parts of the country, particularly in Haryana, western U.P., and Rajasthan. Often young couples who fall in love have to seek shelter in the police lines or protection homes, to avoid the wrath of kangaroo courts. We have held in Lata Singh's case (supra) that there is nothing `honourable' in `honour' killings, and they are nothing but barbaric and brutal murders by bigoted, persons with feudal minds. In our opinion honour killings, for whatever reason, come within the category of rarest of rare cases deserving death punishment. It is time to stamp out these barbaric, feudal practices which are a slur on our nation. This is necessary as a deterrent for such outrageous, uncivilized behaviour. All persons who are planning to perpetrate `honour' killings should know that the gallows await them.
अशा आणि यासारख्या कडक  शब्दात "ऑनर किलींग" वर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यावरही "ऑनर किलींग" सारखे रानटी प्रकार कितपत थांबतील हा प्रश्नच आहे. कारण जिथे भावना आणि श्रद्धा दुखावल्या जातात तिथे बुद्धीचा  दूरदूर पर्यंत संबंध नसतो हेच खरे. नाही का?

अ‍ॅड. अतुल सोनक,
9860111300