Friday, May 25, 2012

जोशींना अग्निदिव्य करायला भाग पाडणाऱ्यांचे काय?


 गुरुवारी दिवसभर भाजपा, मुंबई येथील पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, नरेंद्र मोदी, संजय जोशी आणि नितीन गडकरी यांच्यासंबंधीच्या प्रसारमाध्यमातील बातम्या बघितल्यानंतर आणि दूरचित्रवाहिन्यांवरील त्याच संबंधीच्या चर्चा ऐकल्यानंतर "तरुण भारत" याबाबत काय भूमिका घेईल आणि त्या संबंधीचे संपादकीय कसे असेल याची माझ्या मनात प्रचंड उत्कंठा होती. गेली तीस-पस्तीस वर्षे मी न चुकता त.भा.चे संपादकीय वाचत आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक, प्रश्नांवरील त.भा.च्या भूमिकांची नेहमीच तारीफ करावीशी वाटते. वेळेअभावी प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही. परंतु या वेळच्या " समर्पित नेत्याचे अग्निदिव्य!" या संपादकीयावर प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहावले नाही.

त.भा.ने आपल्या
संपादकीयात  संजय जोशींची मुक्त कंठाने प्रशंसा केली तशी ती व्हायलाच पाहिजे परंतु त्यांच्या राजीनाम्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जबाबदार असणाऱ्या प्रत्येक नेत्याचा यथेच्छ समाचार संपादकियात घ्यायला हवा होता, असे माझे प्रांजळ मत आहे.

"व्यक्तिगत रागलोभापायी पक्षाला, देशहिताला आणि विचारांच्या चळवळीला वेठीस धरणाऱ्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन होत असताना संजय जोशी यांनी केलेली कृती झणझणीत अंजन घालणारी आहे". हे आणि यासारखी दोनचार वाक्ये टाकून संपादकीयात नरेंद्र मोदी किंवा तत्सम नेत्यांबद्दलची नाराजी दर्शविण्यात आली आहे. परंतु एखादी व्यक्ती (नरेंद्र मोदी) इतका आडमुठेपणा का करते? किंवा एखाद्या प्रकरणाबाबत किंवा एखाद्या व्यक्तीविरुद्ध इतकी टोकाची भूमिका का घेते? हे माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला किंवा राजकीय अभ्यासकाला समजायला नको काय? संजय जोशी यांनी मोदींचे असे काय घोडे मारले होते की त्यांनी त्यांचा एवढा दु:स्वास करावा? जोशींनी जे केले, ते उत्तमच केले, त्यांची स्तुती ही व्हायलाच पाहिजे आणि तशी त.भा.ने केलीही परंतु ज्यांनी त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले, आणि ते राजीनामा देत असताना जे नेते मुकाट्याने चूप बसले, मोदी बैठकीत भाग घेणार असे सांगताना जणू काही लोकसभेच्या निवडणुका जिंकल्यागत चेहरा खुलवणारे गडकरी, यांचा समाचार घेतला गेला असता तर संपादकीय अधिक चांगले आणि संतुलित झाले असते. उगाचाच कोणावर टीका करायची गरज नाही परंतु जे उघड उघड दिसते आहे त्याबद्दल लिहायला काय हरकत आहे?

संपूर्ण देशाच्या तुलनेत एका छ्टाकभर राज्याचा मुख्यमंत्री संपूर्ण पक्षाला वेठीस धरतो, जोशी गेल्याशिवाय कार्यकारिणीत येणार नाही म्हणतो, विधानसभांच्या निवडणुकीच्या प्रचाराला दांडी मारतो, ही कसली पक्षशिस्त? एवढीच मग्रुरी असेल तर आपला स्वत:चा प्रादेशिक पक्षच स्थापन करावा की त्यांनी. बरे मोदींचे कृत्य समर्थनीय तर नाहीच पण जे त्यांच्या दबावतंत्राला बळी पडले त्या ताकदवान, सामर्थ्यवान तथाकथित हायकमांड आणि हेवीवेट नेत्यांचे काय? मोदींना इतके डोक्यावर चढवायची खरोखरच गरज होती काय? एक चांगला राजकीय पक्ष, "पार्टी विथ अ डिफरन्स", शिस्तबद्ध राजकीय संघटना, दर्जेदार, अभ्यासू, प्रतिभावान नेत्यांचा पक्ष, या सगळ्या भ्रामक कल्पना ठराव्यात अशा काही घडामोडी गेल्या काही दिवसांत--वर्षांत घडत आहेत. दहा टक्के जनाधार वाढवण्याची इच्छा पक्षाध्यक्ष गडकरींनी बोलून दाखवली पण असेच जर चालत राहिले तर जनाधार दहा टक्के कमी होण्याचीच जास्त शक्यता आहे, असे वाटते. "व्यक्तीपेक्षा पक्ष आणि पक्षापेक्षा देश मोठा" असे मानणाऱ्या पक्षात ’इंडीया इस मोदी अ‍ेंड मोदी इस इंडीया’ अशा इंदिराजीच्या धर्तीवर घोषणा सुरु व्हायला वेळ लागणार नाही. लोकाभिमुख, सांघिक राजकारण करणाऱ्या भाजपाला असा व्यक्तीकेंद्री बदल चालतो का, पचनी पडतो का आणि असा बदल जनतेला चालतो का हे पुढे दिसेलच. भारतीय राजकारणातील उत्तुंग नेत्यांपैकी एक असलेल्या अटलजींच्या पक्षात उण्यापुऱ्या तीन दशकातच असले घाणेरडे राजकारण सुरु होईल असे पक्षस्थापनेच्या वेळी कोणालाच वाटले नव्हते. पक्षनेतृत्वाने असे व्यक्तीकेंद्री राजकारण खपवून घेणे बंद केले नाही तर पक्षाची वाताहात व्हायला वेळ लागणार नाही. संजय जोशींच्या कृतीची जाणीव भाजपाच्या नेत्यांना झाली तर त्यातूनच भविष्यातील उज्ज्वल यशाची वाट कोरली जाईल, हे त.भा.चे मत योग्यच आहे पण नेते-कार्यकर्ते जोशींच्या कृतीचे अनुकरण करण्याची शक्यता कमी आहे कारण तसे करणे कठीण आहे. चांगल्याचे अनुकरण कमी होते वाईटाचे जास्त. मॅकियाव्हेली मॉडेलने चाललेल्या भारतीय राजकारणात जोशींचे अनुकरण कठीणच. उलट, जोशींसारख्यांचे खच्चीकरण होण्याचीच जास्त शक्यता आहे. मोदी-जोशी-गडकरी प्रकरणाचा हाच अन्वयार्थ आहे.

धन्यवाद,

अ‍ॅड. अतुल सोनक,
३४९, शंकर नगर, नागपूर-१०
९८६०१११३००, ९४०४७०००५७