Tuesday, May 26, 2020

कोरोना आणि विश्वगुरू मोदीजी


कोरोना आणि विश्वगुरू मोदीजी

सन्माननीय व्यासपीठ,

आज या ठिकाणी भारत कोरोनमुक्त झाल्याबद्दल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. “अखिल भारतीय फील गुड संघटना” या जगातल्या सगळ्यात मोठ्या संघटनेनं हा कार्यक्रम आयोजित करून मला या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा अत्यंत आभारी आहे.

अहो तुम्ही, हो तुम्हीच जरा सेल बंद करता का तुमचा, सारखा वाजतोय “मेरे रूहका परिन्दा फडफडाये” चला बंद करा ती फडफड, नाही तर मी जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून भाषण बंद करीन.

हं, आज आपणा सर्वांच्या वतीनं मी माननीय मोदीजींचे हृदयपूर्वक आभार मानतो. ते नसते तर या देशाचे काय हाल झाले असते……. कल्पनाही करवत नाही. उगीच नाही त्यांना ‘globally acclaimed versatile genius’ म्हटलं जात. तेही कोण्या ऐर्‍या गैर्‍या चड्डीछाप नेत्याकडून नाही. सुप्रीम कोर्टाचे एक न्यायमूर्ती म्हणाले तसे. ते असो. कोणी म्हटलं म्हणून ते मोठे होतात असं मुळीच नाही, त्यांनी आपल्या नियोजनाची, व्यवस्थापनाची चुणूक २००२ पासून सातत्याने दाखवली आहे. कोरोनाला आळा घालताना त्यांनी तेच केलं. पूर्वी ते अठरा अठरा तास काम करायचे आणि त्यांनी भारताची अर्थव्यवस्था एक नंबरवर नेऊन ठेवली. कोरोना संकट आलं तर त्यांनी देशासाठी तेवीस तेवीस तास काम करणं सुरू केलं. उरलेल्या एक तासात ते त्यांची वैयक्तिक कामं उरकत.

भारतात कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वात पहिले त्यांनी एक समिती नेमली. तेच त्या समितीचे अध्यक्ष, इतर सदस्य नेमायला वेळच मिळाला नाही एवढ्यात कोरोना देशात येऊन ठेपला. मग काय त्यांनाच सर्व निस्तरावं लागलं. पण गड्यानं हिंमत हारली नाही.

जस्सा भारतात पहिला कोरोना रुग्ण आढळला, मोदीजींनी भारताच्या सर्व एंट्री पॉईंट्सवर स्क्रीनिंगची व्यवस्था केली. आला माणूस की तपासला. अहमदाबादच्या नमस्ते ट्रंप कार्यक्रमात तर एक एक माणूस तपासला. ट्रंप आणि त्याच्या बायकोला सुद्धा तपासलं म्हणे. त्यानंतर मध्यप्रदेश सरकार उलथवताना पूर्ण काळजी घ्यायचे निर्देश दिले. दिल्लीला तबलीगी मरकजला रातोरात जाऊन स्वत: सगळ्यांना बाहेर काढलं. त्यांची सगळी व्यवस्था केली. जनता कर्फ्यूचा अभिनव प्रयोग केला त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दिल्लीतली दंगल थांबवली.
   
आपल्या देशात राज्याराज्यात विखुरलेल्या कोट्यावधी मजूरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सुखरूप पोचवण्याची व्यवस्था केली. भारतातील सर्व कुटुंबांना सहा महीने पुरेल इतका किराणा पुरवला. तब्बल वीस लाख कोटी रुपये फुटाण्यासारखे वाटून टाकले. कोणाला काही कमी पडू दिलं नाही. अंबानी-अडानी सारखे अनेक उद्योगपती नको नको म्हणत होते तरी त्यांना सुद्धा पैसे दिले. सध्या परदेशात असलेल्या नीरव मोदी, मेहुल चोकसी, विजय माल्या यांच्यासारख्या अनेक भारतीयांना पैसे पाठवले एवढंच नाही तर पाकिस्तानची खराब परिस्थिती बघता दाऊद इब्राहीमला सुद्धा पैसे पाठवू का म्हणून विचारलं. भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रमुखांना बोलावून सर्व व्यवस्था नीट लावून दिली. सगळी व्यवस्था नीट झाल्यावर मग लॉकडाउन घोषित केला. लॉकडाउन दरम्यान डॉक्टर आणि इतर सर्व कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य टाळी महोत्सव, थाळी महोत्सव, दिवे महोत्सव आयोजित केले. या सर्व महोत्सवांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सर्व योद्ध्यांना लाखो PPE किट्स पुरवल्या. या सर्व उपक्रमांनी कोरोनाची पंचाईत न होती तरच नवल. त्यांच्या versatile genius असण्याचा आणखी एक फायदा झाला. ही गोष्ट मला एका वैज्ञानिकानं सांगितली. कोरोनाविरुद्ध लस तयार करण्यात एका संस्थेत वैज्ञानिक लोकांना एका ठिकाणी अडचण आली. मोदीजींनी लगेच चरक संहितेतील एक संदर्भ देत वैज्ञानिकांना सल्ला दिला आणि प्रश्न सुटला. 
     
एवढं सगळं करूनही काही लोक शहाणपणा करायला सुप्रीम कोर्टात गेलेच तर तिथेही त्यांच्याबाजूनेच निर्णय झाला. जगभरात त्यांची वाहवा होऊ लागली. भारतात तर एका सर्वेमध्ये तब्बल ९७ टक्के लोकांनी मोदीजींनी परिस्थिती उत्तम हाताळली अशी पावती दिली. आज प्रधानसेवक म्हणून आपल्या कारकिर्दीची सहा वर्षे पूर्ण करणार्‍या आमच्या आदरणीय, प्रेरणास्थान, आशास्थान, परमेश्वरी अवतार, महामानव मोदीजींना पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद.    

अतुल सोनक, २६.०५.२०२०