Tuesday, September 17, 2019

प्रिय, नूतन राष्ट्रपिता महोदय

प्रिय,

नूतन राष्ट्रपिता महोदय,

कालच आपल्या वाढदिवशी या देशाचे राष्ट्रपिता म्हणून आपली नियुक्ती करण्यात आली, याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.

आपण आजपर्यंत मला वाहिलेली सर्व फुले मी या पत्रासोबत परत पाठवीत आहे, त्यांचा स्वीकार करावा. ही सर्व फुले आपण मी राष्ट्रपिता म्हणून गणला जात असताना माझ्यावरील अतीव प्रेमापोटी अर्पण केलेली आहेत. आणि आता आपण नवनियुक्त राष्ट्रपिता असल्यामुळे समस्त भारतीय जनतेतर्फे ही फुले आपणांस अर्पण करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे.

आपण २०१४ पासून ज्या पद्धतीने या देशातील सर्व प्रश्न सोडवून टाकले आहेत त्याचा विचार करता आपल्याला एका बँकेच्या उपाध्यक्षांनी राष्ट्रपिता म्हणून नियुक्त करणे गरजेचे होतेच. तसे तर आपण २०१६ साली ५००-१००० च्या जुन्या नोटा रद्द करून नव्या ५००-२००० च्या नव्या नोटा छापल्या तेव्हाच आपल्याला राष्ट्रपिता म्हणून नियुक्त करून नव्या नोटांवर आपले छायाचित्र डकवायला हवे होते अशी इथल्या सर्वसामान्य जनतेची इच्छा होती. पण असो. आपणास  प्रसिद्धीचे फारच वावडे असल्यामुळे आपण तसे केले नाहीत हा आपल्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.

आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना एक विनंती करावीशी वाटते. राष्ट्रपिता म्हणून या देशाला आपण विश्वगुरु बनवणारच याबाबत माझ्या मनात काहीच शंका नाही फक्त गोभक्त आणि एकूणच सर्व भक्तांना आपण सुबुद्धी प्रदान कराल अशी आशा आहे. काश्मीरवरील आपला मास्टरस्ट्रोक लगावून दीड महिना उलटूनही आपण तेथील निर्बंध  उठवले नाहीत त्याबद्दल वाईट वाटते. तिथली जनता आपली च लेकरे समजून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. ही विनंती.
तसेच पुढे या देशाचे सर्वात सक्षम आणि ताकदवान गृहमंत्री आणि भावी पंतप्रधान आपल्या जिवंतपणीच वडनगरला आपला जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभारतील अशी येणाऱ्या कॅबिनेट मीटिंग मध्ये मागणी करवून घेऊन तसा ठराव करण्यात यावा.

माझे या देशातील औचित्य नष्टच झालेले असल्यामुळे माझ्या नावावर असलेल्या सर्व संस्था, संघटना यांची नावे बदलून टाकावीत, माझ्या नावावरचे देशभरातील सर्व रस्ते दुसऱ्यांच्या किंवा तुमच्या नावे करण्यात यावेत.  माझे पुतळे येत्या २ ऑक्टोबर ला हिंद महासागरात विसर्जित करावेत. या कार्यक्रमास आदरणीय प.पू. सरसंघचालकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावे. तसेच संघाच्या प्रातःस्मरणीय व्यक्तींच्या यादीतून माझे नाव वगळून आपले किंवा अमित शहांचे नाव टाकण्यात यावे. जमल्यास संसदेच्या आवारातील माझा पुतळा काढल्यानंतर त्या जागी आसाराम बापू किंवा स्वामी चिन्मयानंद यांचा पुतळा उभारावा जेणे करून त्यांची प्रेरणा या देशातील जनतेला मिळत राहील. आणखी एक इच्छा राहिली आहे. "वैष्णव जन तो....." ही माझी आवडती प्रार्थना आपल्याला राष्ट्रपिता म्हणून नियुक्त करणाऱ्या आणि गायनाच्या क्षेत्रात उंच भरारी मारणाऱ्या नव्या गानकोकिळेच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून जुने राष्ट्रगीत बदलून त्याजागी ही प्रार्थना राष्ट्रगीत म्हणून वाजवली जावी.
आणखी काय लिहू. तुम्ही इकडे आलात की भेटूच. बाकी भेटी अंती.....

आपला आणि भारतातील काही (फक्त काहीच) लोकांचा
बापू (मोहनदास करमचंद गांधी)