Tuesday, April 21, 2015

“कोर्ट”मार्शल

         “कोर्ट”मार्शल

कोर्ट” चित्रपट बघितला. राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित असल्यामुळे खूप उत्सुकता होती. कथा चांगलीच आहे. आशय चांगला आहे. जे सांगायचं आहे ते लोकांपर्यंत पोचलं आहे. पोवाडे तर मस्तच. चित्रपटानं चांगला परिणाम साधला आहे. पण.............

जेव्हा आपण लोकांना कोर्ट दाखवत आहोत, तेव्हा इतकं casually दाखवायला नको होतं. “कोर्ट” मधील न्यायालयीन कामकाजात चुकाच चुका दिसतात. फौजदारी खटल्यांसंदर्भात न्यायालयाच्या कामकाजाची पद्धत कशी असते, ते आपण थोडक्यात बघू. खटल्यात सुरुवातीला सरकारी (पोलीस) पक्षाचे साक्षीदार तपासले जातात. सुरुवातीला सरकारी साक्षीदारांची सरतपासणी सरकारी वकील घेतात आणि उलटतपासणी आरोपीचे वकील घेतात. त्यानंतर न्यायाधीश आरोपीचे बयाण (statement of accused) घेतात. त्यातच त्याला तुला साक्ष द्यायची आहे का? पुरावा द्यायचा आहे का? असे विचारतात. त्याने हो म्हटल्यावर त्याची आणि त्याच्या साक्षीदारांची साक्ष घेतली जाते. ज्याला बचाव पक्षाचा पुरावा म्हणतात. त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश निर्णय देतात.

“कोर्ट” मधील नारायण कांबळे च्या प्रकरणात खटला सुरु झाल्याबरोबर न्यायाधीश सरकारी वकिलाला तुम्हाला त्याला क्रॉस कारायचे आहे का विचारतात आणि त्या नारायणला प्रश्न विचारतात. फौजदारी प्रक्रिया कायद्यानुसार हा प्रकार चुकीचा झालाय. सुरुवातीला सरकारी साक्षीदार तपासायला हवे होते. साक्षीदार तपासले जात असताना चौकशी अधिकारी (पोलीस निरीक्षक) जो स्वत: एक साक्षीदार असतो, त्याने न्यायालयात हजर राहता येत नाही. चित्रपटात तो प्रत्येक वेळी हजर असतो, असे दाखवले आहे.

न्यायाधीश साक्ष नोंदवून घेतात तेव्हा साक्षीदार जे जे सांगतो ते ते नोंदवून घेतात. पण या चित्रपटात काही विशिष्ट बाबीच नोंदवून घेताना दाखवले आहे. साक्षीदारानं सांगितलेलं सगळंच नोंदवलं आहे असं दाखवायला हवं होतं. काहीच भाग का नोंदवलेला दाखवला ते कळलं नाही. न्यायाधीश जमानत (Bail) अर्जावर सुनावणी करताना उन्हाळ्यात सेशन कोर्टाला सुट्ट्या आहेत हाय कोर्ट सुरु आहे तिथे बेल साठी अर्ज करा असं आरोपीच्या वकिलाला सांगतात. वास्तविक सेशन कोर्टाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहत नाहीत. सेशन कोर्ट हे फौजदारी खटल्यांसाठी असते. फौजदारी न्यायालयांना सुट्टी नसते. उलट हाय कोर्टाला आणि दिवाणी न्यायालयांना उन्हाळ्यात सुट्ट्या असतात. हे ही न समजणारा न्यायाधीश दाखवायला नको होता. खटल्याचे कामकाज सुरु असताना मधेच बेल प्रकरण घुसडण्याची गरज नव्हती. ते वेगळं दाखवता आलं असतं. आरोपीला जमानत मिळावी म्हणून लाख रुपये आरोपीचा वकील भरतो, हे दाखवून वकील किती चांगले असतात हे दाखवायचा प्रयत्न झालाय का? हे कळलं नाही. वास्तवात असे वकील असतीलही. असो.

नारायण कांबळे विरुद्ध तक्रार कोणी केली? सरकारला त्याला आणि त्यालाच का फसवायचं होतं? त्याचे इतर साथीदार आरोपी का केले गेले नाहीत? या प्रश्नांची उत्तरे चित्रपटात मिळत नाहीत. असे बिनबुडाचे किंवा बिनपुराव्याचे खटले असतात, नाही असं नाही, परंतु हा ही प्रकार योग्य प्रकारे दाखवता आला असता. त्यातून थोडी विनोद निर्मितीही करता आली असती.

दोन्ही वकिलांचे कौटुंबिक जीवन आणि न्यायाधीशांचे पिकनिकला जाणे यात वावगे काय? तीही माणसेच आहेत. कोर्टाच्या बाहेर, आवडीनिवडी, श्रद्धा, अंधश्रद्धा त्यांनाही असणारच. राहतातच. खटले रखडत ठेवून हे लोक मजा करतात असे दाखवायचे असेल तर ते चुकलं आहे. तसं दाखवायचं होतं तर जरा वेगळ्या पद्धतीनं आणि परिणामकारकरित्या दाखवता आलं असतं.

मागे भारताचे सरन्यायाधीश लोढा यांनी सुट्ट्या बंदच करण्याबाबत वकील संघटनांची मतं मागवली होती, सर्वांनीच साफ नकार दिला होता. सुट्ट्या लागल्यावर न्यायाधीश पिकनिकला नाही जाणार तर काय? त्याने जावू नये का? जीवनाचा आनंद लुटू नये काय? पगाराबद्दल बोलू नये काय? उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींनी भरमसाठ पगारवाढ आणि निवृत्तीनंतरच्या सुविधांची मागणी नुकतीच केली आहे. त्यांना ती मिळावी, नाही मिळावी हा वादाचा विषय होवू शकतो. कार्पोरेट क्षेत्रातील पगार, इतर क्षेत्रातील जसे चित्रपट कलावंतांचे मानधन, जमिनीचे वाढते भाव, त्यातील उलाढाली, महागाई, या सर्व बाबींचा विचार करता न्यायाधीशांचे पगार कमीच असावेत. पण चित्रपटात न्यायाधीशाला एन्जॉय करताना दाखवून काय सांगायचं होतं ते कळलं नाही. न्यायालयाचं कामकाज संपल्यानंतर त्यांनी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हां, अंधश्रद्धाळू न्यायाधीश असू नये हे मान्य. यात चक्क तो एकाला त्याच्या मुलाच्या नावात बदल करायला आणि गोमेद खडा घालायला सांगतो. पण याचा अर्थ तो चुकीचे न्यायदान करत असेल असाही होत नाही. शिवाय ते काही अंतिम न्यायालय नसते. आपल्यावर अन्याय झालाय असे वाटत असल्यास वरच्या, आणखी वरच्या न्यायालयात दाद मागता येते. हो, रस्ता अडचणींचा आहे, खर्चिक आहे, सोपा नाही, हेही तितकेच खरे. पण लोकशाही असल्यामुळे त्यालाही आपण सर्वच जबाबदार नाही का? आपण या देशाचे मालक सुदृढ न्यायपालिका निर्माण करणारे शासक का निवडून देवू शकत नाही. वकील आणि न्यायाधीश असो की कुठलीही व्यवस्था असो, समाजाचेच प्रतिबिंब त्यात दिसतं. नाही का? असो. चित्रपटापासून प्रेरणा घेवून न्यायव्यवस्था सुधारेल याची मुळीच शक्यता नाही. मला “कोर्ट” चित्रपटात ज्या चुका ढोबळ मानाने आढळल्या, त्या मी मांडल्या. कायदेतज्ज्ञ सल्लागाराला चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी दाखवला असता तर ह्या चुका नक्कीच सुधारता  आल्या असत्या. तरीही राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल “कोर्ट” चमूचे आणि तरुण दिग्दर्शकाचे हार्दिक अभिनंदन !!!!!!

अॅड. अतुल सोनक, नागपूर

९८६०१११३००  

Tuesday, April 14, 2015

घुमानचे पाच अनाहूत पाहुणे

घुमानचे पाच अनाहूत पाहुणे

स्थळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मुख्य मंडप, घुमान, पंजाब

तारीख: ४.४.२०१५ 

वेळ: दुपारी ३.३०

ज्यांच्याशिवाय कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम यशस्वी होवूच शकत नाही असे प्रख्यात सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ मंचावरील माईकमधून ओरडू लागले, (कारण माईक सारखा बंद पडत होता) “सर्व साहित्यरसिकांना नम्र विनंती. या सत्रातील सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यांच्या वेळा नंतर जाहीर करण्यात येतील. आज आत्ता ताबडतोब एक अभूतपूर्व न भूतो न भविष्यति असा कार्यक्रम आपण बघणार आहात. आजवर भरवण्यात आलेल्या एकाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात  असा कार्यक्रम आपल्याला अनुभवायला मिळालेला नाही. कार्यक्रम काय आहे हे मलाही माहित नाही.”

गाडगीळ बोलत असतानाच सदानंद मोरे, शरद पवार, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस लगबगीने मंचावर आले. आल्याबरोबर आपापल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. खुर्च्यांची व्यवस्था मोठी मजेशीर होती. डावीकडच्या दोन खुर्च्यांवर मोरे आणि फडणवीस तर उजवीकडच्या दोन खुर्च्यांवर पवार आणि गडकरी बसलेले होते आणि त्यांच्या मधोमध पाच रिकाम्या खुर्च्या होत्या. फडणवीसांनी इशारा केल्याबरोबर गाडगीळ त्यांच्याजवळ गेले. फडणवीस त्यांना काहीतरी कानात सांगू लागले. “धन्य भाग सेवा का अवसर पाया” हे गाणे मंचाच्या मागून ऐकू येत होते. गाडगीळ पुन्हा माईकवर आले. म्हणाले. “ आत्ताच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यंत नाट्यमयरित्या आणि अनाहूतपणे पाच पाहुणे इथे आलेले आहेत. त्या पाचही लोकांना मीच काय आपण कोणीही ओळखत नाही. हे पाच लोक इथे आल्याचे त्यांच्या गृहखात्याकडून कळल्यावर माननीय सीएमसाहेबांनी इतर सर्व कार्यक्रम पुढे ढकलून हा कार्यक्रम करायचे ठरवले. कार्यक्रम नक्की काय आहे ते मला अजूनही सांगण्यात आलेले नाही.” गाडगीळ बोलत असतानाच फडणवीस उठले. त्यांनी गाडगीळांना बाजूला सारून माईकचा ताबा घेतला. ते बोलू लागले.

फडणवीस: मंचावरील आणि समोरील सर्व आदरणीय बंधू भगिनींनो. वेळ कमी असल्यामुळे सर्वांची नावं घेत नाही, मी सर्वांची नावं नेहमी घेतो हे तुम्हाला माहित आहे. त्यामुळे राग नसावा. या ठिकाणी आज आपल्याला पाच लोक पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तसं तर साहित्याचा आणि यांचा काहीही संबंध नाही. परंतु उद्घाटनाच्या कार्यक्रमात हे पाच पाहुणे मागच्या रांगेत बसून सर्व कार्यक्रम बघत होते तेव्हा माझ्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखले. त्यांनी मला सूचना दिल्याबरोबर मी घाईगर्दीत हा कार्यकम आयोजित करायला सांगितला. तर हे पाहुणे फार महत्वाचे आहेत. मी फार लांबवत नाही, मला मुंबईला जायचं आहे. हे जे पाच पाहुणे आहेत ते फार मोठे पराक्रमी वीर आहेत. साहित्य संमेलन याची देही याची डोळा बघावं म्हणून हे नागपूरहून हजार किलोमीटर दूर घुमानला आले. मराठी प्रेमी उद्धव ठाकरे नाही आले, राज ठाकरे नाही आले पण हे पाच लोक आले. यांना मराठीचं इतकं प्रेम का? हे मला काही कळलं नाही. पण ते आले. त्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या महान देशकार्यासाठी त्यांचा सत्कार करायलाच पाहिजे. ते पाच ही जण आता आपल्यासमोर येतील. आणा रे त्यांना सन्मानानं. {पाच जण त्यांचे चेहरे झाकलेल्या अवस्थेत मंचावर येतात. मंचावरील रिकाम्या खुर्च्यांवर त्यांना बसवले जाते} आता आपल्या परंपरेप्रमाणे पाच सुवासिनी त्यांना ओवाळतील. त्यांचे चेहरे झाकलेले का आहेत याचं आपणास आश्चर्य वाटत असेल. ऐका. ते महाराष्ट्र शासनाच्या विशेष कामगिरीवर निघालेले आहेत. मी इकडे असल्यामुळे प्रशासकीय आदेश काढलेला नाही पण मुंबईला गेल्याबरोबर काढीन. आता तोंडी सूचना दिलेल्या आहेत. बिसनसिंग, मोहम्मद सुहेल, सत्येंद्र गुप्ता, प्रेम खत्री आणि आकाश ठाकूर असे हे पाच जण आहेत. हे नुकतेच नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून आले आहेत. धक्का बसला? मी थोडक्यात सांगतो. मला मुंबईला जायचंय. तुम्हाला वाटत असेल यांचा सत्कार कशासाठी? तो यासाठी की संधी असताना यांनी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात सजा झालेला कुख्यात याकुब मेमन आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी जे नागपूर कारागृहात आहेत, त्यांची सुटका केली नाही किंवा पळून जाण्यास मदत केली नाही. इतर ही काही कुख्यात गुंडांना ते पळवून लावू शकले असते पण त्यांनी तसे केले नाही. दुसरं असं की मघाशी यांच्याशी बोलताना हे फार हुशार लोक आहेत हे मला लक्षात आलं. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र पोलीस आपल्या कर्तव्यात कमी पडत असल्यामुळे, अनेक मोठ्या गुन्ह्यांचे तपास न लागल्यामुळे मी महाराष्ट्राचा मुख्यंमत्री आणि गृहमंत्री या नात्याने हा तपास यांच्याकडे सुपूर्द करतोय. एकूण ३७५४ खून, दरोडे, जबरी चोऱ्या, या आणि अशा मोठ्या गुन्ह्यांत अजून गुन्हेगार सापडलेले नाहीत. यातील जास्तीत जास्त प्रकरणांचा छडा लावायची यांनी शपथ घेतली आहे. तर बंधू भगिनींनो दाभोलकर, पानसरे, झालंच तर सतीश शेट्टी यांच्या खुनाच्या तपासाचे काम हे लोक लवकरच पूर्ण करतील अशी मला आशाच नव्हे खात्री आहे. दाभोलकर आणि पानसरे हे तसे पाहिले तर साहित्यिकच, त्यांचे खुनी या लोकांनी पकडून दिलेत तर घुमानच्या साहित्य संमेलनात या महापुरुषांचा केलेला सत्कार सार्थकी लागला असे म्हणावे लागेल. तर मंडळी आता मी आपली राजा घेतो. मला मुंबईला जायचंय, खूप कामं आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पंजाब.............{ फडणवीस आपल्या जावून बसले आणि पुन्हा उठून माईकजवळ आले.} म्हणाले, “आज या ठिकाणी या पाच सत्कारमूर्तींपैकी एक आकाश ठाकूर आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो.” आकाश ठाकूर यांनी माईकचा ताबा घेतला.

आकाश ठाकूर : मंचावर उपस्थित अजितदादाचे काका, आदरणीय शरद पवार साहेब, संमेलनाचे अध्यक्ष आणि संत तुकारामाचे जवळचे नातेवाईक मोरे साहेब, पूर्तीचे सर्वेसर्वा नितीन गडकरी साहेब, ज्यांच्या मतदारसंघातील जेल तोडून आम्ही पळालो असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यंमत्री फडणवीस साहेब आणि उपस्थित बंधू भगिनींनो......या ठिकाणी आपण जो आमचा सत्कार केलात त्यामुळे मला खूप भरून आलंय. खरं तर मीही मोठा कवी झालो असतो. शाळेत असताना मुलींकडे पाहून मी पाडगावकरांच्या कविता म्हणायचो. पुढे पुढे तर मी त्यांच्यापेक्षाही चांगल्या कविता करायला लागलो. हसू नका माझे मास्तरच तसं म्हणायचे. मी त्यांना कविता दाखवायचो. त्यांना माझ्या कविता खूप आवडायच्या. त्यांनी त्यांच्या नावावर त्याच कवितांचा एक संग्रह प्रकाशित केला. मला समजल्यावर मी शाळेत घुसून त्या मास्तरला बदड बदड बदडला आणि माझ्या तुरुंगवाऱ्या सुरु झाल्या. मी ही आकाश ठाकूर आहे, त्या मास्तरनं तसं केलं नसतं तर आज मी ही गुरु ठाकूरसारखा मोठा कवी आणि गीतकार झालो असतो. असो. या ठिकाणी पवार साहेब-गडकरी साहेब उपस्थित आहेत. खरं तर आम्ही यांनाच भेटायला इथे आलोय. आम्ही तुरुंग तोडून पळालो तेव्हा सरळ नेपाळला जाणार होतो. पण गुप्ता म्हणाला त्यांच्याविरुद्ध ट्रकभर पुरावे असूनही पवार साहेब मोकळे कसे राहतात हे आपण त्यांना विचारायलाच पाहिजे. आपल्याविरुद्ध तर पिशवीभरही पुरावे नाहीत तरी आपण तुरुंगात खितपत पडलोय. कोई सुनवाई नही. सजा नही. पडे है चुतीये जैसे. सॉरी मी शक्यतो चांगली भाषा वापरायचा प्रयत्न करतो. तर आम्ही पवार साहेबांना भेटायला मुंबईला जायचं की दिल्लीला की पुण्याला याचा विचार करत असताना नागपूरला झाशी राणी चौकात एक साहित्यकांचं टोळकं गप्पा करत असताना दिसलं तिथे समजलं की पवारसाहेब घुमानला हमखास सापडतील. म्हणून तडक इथे आलो. उद्घाटन कार्यक्रमात आम्ही पकडल्या गेलो. बाकी तुम्हाला सीएम साहेबांनी सांगितलंच आहे. या ठिकाणी या ठिकाणी भाषणात सत्तावन्न वेळा म्हटल्याशिवाय महाराष्ट्रात मोठा नेता होता येत नाही हे मला माहित आहे. मला कद्दावर नेता व्हायचंय. असो. या ठिकाणी मला पवार साहेबांना हेच गुपित विचारायचंय की ट्रकभर पुरावे असताना ते मोकळे कसे. तुमच्यावर आरोप करणारेच तुमच्या मांडीला मांडी लावून कसे बसतात, शिकवा की आम्हाला जरा. झालंच तर इतर अनेक नेते मोकळे कसे आणि आम्हीच का आत? ते ही सांगा. मी तुम्हाला तुरुंगाचे अंतरंग उलगडून दाखवू शकतो पण इथला भव्य दिव्य कार्यक्रम पाहून मी तुरुंगातील अनुभवांवर एक कादंबरीच लिहिणार आहे, नाही ज्ञानपीठ मिळवलं तर नावाचा आकाश ठाकूर नाही. असो. सांगा पवार साहेब गुपित सांगा. {पवार साहेब हळूच काही तरी पुटपुटतात.} धन्यवाद साहेब, ते म्हणताहेत पुढच्या संमेलनात सांगतो. तर मंडळी पुढच्या संमेलनात अवश्य भेटू. कोणी सांगावं पुढच्या संमेलनाचा अध्यक्ष नाहीतर स्वागताध्यक्ष मीही असू शकतो. हा हा हा. जय हिंद जय महाराष्ट्र.

सुधीर गाडगीळ माईकवरून कार्यक्रम संपला हे जाहीर करत असताना पवार आणि गडकरी फडणवीसांची पाठ थोपटत होते आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात कार्यक्रम संपन्न झाला.

अॅड. अतुल सोनक,
९८६०१११३००