Sunday, August 4, 2013

क्रूरतेची परिसीमा


क्रूरतेची परिसीमा


मित्राचा पैशांसाठी खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या नराधमांची कहाणी……….
मानवी मन इतके निष्ठूर होवू शकते का? असा प्रश्न मला हे लिहिताना पडला आहे. २००१ सालची घटना आहे. कुमार गौरव, संतोषकुमार रॉय आणि संजीवकुमार रॉय हे तिघे मित्र मुंबईला कामाधंद्याच्या, नोकरीच्या शोधात आले. नोकरी किंवा कामधंदाही मिळत नव्हता आणि रहायला जागाही मिळत नव्हती. अशातच त्यांची ओळख संतोषकुमार सतीशभूषण बरियार याच्याशी झाली. तो त्यावेळी पुण्याला राहत होता. त्याने या तिघांची राहण्याची तात्पुरती  व्यवस्था पुण्यातील "कुडाळे पाटील आंगण सोसायटी" येथे केली. कामधंदा किंवा नोकरी मिळत नसल्यामुळे संतोषकुमारने या तिघांशी चर्चा करून त्याच्याच दोन मित्रांना (अभिजीत कोठारी आणि कार्तिकराज) पळवून नेवून त्यांच्या कुटुंबीयांकडून दहा ते पंधरा लाख खंडणी उकळायची योजना आखली. अभिजीतचे वडील डॉक्टर होते तर कार्तिकराजचे वडील नाबार्ड मध्ये हैदराबादला व्यवस्थापक होते. दोन्ही परिवार श्रीमंत असल्यामुळे ते खंडणी द्यायला लवकर तयार होतील असा संतोषचा होरा होता.
अभिजीत कोठारीला पळवणे जमले नाही पण कार्तिकराजला या चौकडीला पळवता आले. ठरल्याप्रमाणे सर्व व्यवस्थित झाले तर ठीक नाही तर कार्तिकराजच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या प्लास्टिक पिशव्यांमधे टाकून फेकून देवू असे संतोषने तिघांनाही सांगितले. तिघेही हा सर्व प्रकार करायला तयार आहेत का असे विचारल्यावर त्या तिघांनीही संमती दिली. सगळे तयार झाल्यावर संतोषने कुमार गौरवला त्यांची योजना अंमलात आणण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी बनवायला सांगितली. दोर, करवत, विळा, प्लास्टिक पिशव्या, रेग्झीनचे पोते, डेटोल, निरनिराळे सीम कार्ड्स,अशी यादी बनवण्यात आली. दुसऱ्या दिवशी संतोषने मृतदेहाचे तुकडे जिथे फेकता येतील ती जागाही दाखवली. आणि सर्व जण आम्रपाली सोसायटीतील एका गाळ्यात शिफ्ट झाले. ही जागा संतोक्षच्याच एका एजंटने जमवून दिली होती. याच ठिकाणी सर्व योजना अंमलात आणायचे त्यांनी ठरवले  होते.  संपूर्ण दिवसभर सर्वांनी यादीप्रमाणे साहित्य खरेदी केले.

दि.६ ऑगस्ट २००१ रोजी संतोषने अभिजीत आणि कार्तिकराजला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. कार्तिकशी संपर्क झाला. त्याला संतोषने ७ तारखेला त्याच्या लग्नाची पार्टी आहे असे खोटे कारण सांगून आम्रपाली सोसायटीतील त्यांच्या घरी जेवायला बोलावले. ७ तारखेला कार्तिकराजला संध्याकाळी त्यांच्या घरी आणण्यात आले. लग्नाची पार्टी आहे असे समजून कार्तिकराजने इतरांबरोबर मध्यरात्रीपर्यंत टीव्हीवर सिनेमा बघितला. मध्यरात्रीच्या सुमारास संतोषने इशारा केल्याबरोबर सर्व तयार झाले, संतोष कार्तिकराजच्या पाठीमागे गेला आणि त्याने त्याच्या गळ्यावर विळा ठेवला. काय होते आहे हे कळायच्या आताच बाकिच्यांनी कार्तिकराजचे हात धरले आणि ते दोराने बांधण्यात आले तसेच तो ओरडू नये म्हणून त्याच्या तोंडावर छोटा टॉवेल गुंडाळण्यात आला. नंतर कार्तिकराजला ओढत ओढत संडासमधे नेवून टाकण्यात आले आणि तिथे त्याला सगळ्यांनी लाथाबुक्क्यांनी यथेच्छ मारहाण केली. त्यानंतर कार्तिकराजच्या घरी फोन करून त्याला जिवंत बघायचे असेल तर दहा लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी काहीतरी संषयास्पद वाटल्यामुळे घरमालक येवून पाहून गेला पण त्याला काहीही आढळले नाही आणि त्याने कुठे काही वाच्यताही केली नाही. घरमालक येवून गेल्यामुळे चोरांच्या मनात चांदणे आले आणि आपण पकडले जावू या भितीने संतोष आणि कुमार यांनी ठरवले की कार्तिकराजला जिवंत ठेवणे योग्य होणार नाही त्याला मारून टाकणेच बरे. आणि निर्णय पक्का झाला. संतोष आणि संजीवने कार्तिकराजच्या गळ्याभोवती दोर आवळला आणि संतोषने एकीकडून आणि संजीवने दुसरीकडून ओढला. कार्तिकराज काही वेळ संघर्ष करीत होता पण त्याच्या प्रयत्नांना यश येण्यापूर्वीच तडफडत तडफडत तो निष्प्राण झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह संडासमधे नेण्यात आला. तिथे संतोषने कार्तिकराजचे शीर करवत आणि विळ्याचा  वापर करून धडावेगळे केले आणि एका प्लास्टिक पिशवीत टाकले. त्यानंतर कार्तिकराजचे दोन्ही हात कापून तोडण्यात आले आणि तेही वेगळ्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकण्यात आले, नंतर संतोषने  संजीवला कार्तिकराजचे दोन्ही पाय कापायला सांगितले आणि संजीवने तसे केल्यावर दोन्ही पाय एका वेगळ्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकण्यात आले. साधारणपणे दोन तासात हा सर्व घृणास्पद प्रकार पार पाडण्यात आला. नंतर कार्तिकराजच्या निरनिराळ्या अवयवांनी भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आल्या. त्याचे कपडे आणि त्याच्या जवळचे इतर साहित्यही वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले. हा घाणेरडा प्रकार करण्यासाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्य फेकून देवून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

कार्तिकराजची निर्घृण हत्या केल्यानंतरही या चांडाळ चौकडीची हाव सुटली नाही आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कार्तिकराजच्या घरी फोन करून खंडणीची मागणी करण्यात आली. कार्तिकराजच्या कुटुंबीयांनी पैसे द्यायचे कबूल केले पण पैशाची जुळवाजुळव करायला जरा वेळ लागेल असे सांगून थोडा वेळ मागून घेतला. घटनेच्या वेळी कार्तिकराज पुणे येथे मध्य रेल्वेत क्लर्क म्हणून कामावर होता. त्याचे वडील आणि इतर कुटुंबीय हैदराबाद येथे वास्तव्यास होते. खंडणी साठी तीन चार फोन झाल्यावर कार्तिकराजच्या वडीलांनी त्यांचे पुण्यातील मित्र दत्तात्रय भंडांगे यांना  त्यांच्या कार्यालयात तक्रार पाठवून संबंधीत पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला लावली, कार्तिकराजचा फोटो ही पाठवला. भंडांगे यांनी पुण्यात भरपूर शोधाशोध केली परंतु कार्तिकराज काही आढळला नाही.
पैशाची हाव न सुटल्यामुळे संतोष कार्तिकराजच्या वडीलांना सारखा फोन करीत होता. इकडे पुण्याला गुन्हा नोंदवून तपास सुरू झाला होता. चौकशी अधिकारी लोटलीकर यांना कार्तिकराजच्या वडीलांनी सांगितले की सारखा खंडणीसाठी फोन येतोय. लोटलीकरांनी त्यांना हे सांगायला लावले की आम्ही पैसे मुंबईला पाठवतो आहे आणि त्यांचा शाम नायडू नावाचा मित्र पैसे घेवून मुंबईला येत आहे. त्याचा नंबर ९८२२XXXXXX असा आहे त्याच्याशी संपर्क करून पैसे घ्यावे आणि कार्तिकराजला त्याच्या हवाली करावे. अपहरणकर्त्यांना तसेच सांगण्यात आले. हा नंबर लोटलीकरांचा होता. शाम नायडू समजून अपहरणकर्ते त्यांच्याशी बोलत होते. बोलता बोलता त्यांना लोटलीकरांच्या पोलीस टीमने जाळ्यात अडकवले आणि दि.१२ ऑगस्ट २००१ रोजी जुहू येथे कुमार, संजीव आणि संतोषकुमार रॉय यांना अटक केली. मुख्य गुन्हेगार संतोष बरियार मात्र सापडला नाही. परंतु नंतर अंधेरी रेल्वे स्टेशनजवळ तोही सापडला. या सर्वांना पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या समोर दि.१३.०८.२००१ रोजी हजर करण्यात आले. कार्तिकराजचा काही पत्ताच नव्हता आणि कोणी काही सांगतही नव्हते. कार्तिकराजचा छडा काही केल्या लागत नव्हता. अशातच २९. ऑक्टोबर २००१ रोजी कुमार गौरवने पुण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून गुन्ह्याची कबुली दिली. कार्तिकराजचा खून दि ८ ऑगस्ट २००१ रोजीच करण्यात आल्याचे आणि केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झाल्याचे नमूद करून त्याने माफी मागितली. दि.३१.०१.२००१ आणि १.११.२००१ रोजी कुमार गौरवला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, पुणे यांच्यासमोर उभे करण्यार आले, त्यांच्यासमोर त्याचा कबुलीजबाब झाला. नंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास झाला आणि आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आणि शेवटी दि.३.०१.२००२ रोजी प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले.

सत्र न्यायालयात दि.२१.०३.२००२ रोजी  पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी अर्ज करून कुमार गौरव याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तरतुदीनुसार माफी देवून त्याला माफीचा साक्षीदार करण्यात यावे अशी मागणी केली. सत्र न्यायालयाने ती मागणी दि. ३.०४.२००२ रोजी आदेश पारित करून मान्य केली. त्यानंतर सत्र न्यायालयात खटला चालला आणि ५४ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व परिस्थितीजन्य पुराव्याचा विचार करून सत्र न्यायालयाने  तिघांनाही कार्तिकराजच्या खुनाचे दोषी ठरवून संतोष बरियार याला फाशीची शिक्षा ठोठावली. तर संजीव आणि संतोष रॉय यांना जन्पठेपेची सजा सुनावली. इतर कलमांखालीही तिघांना निरनिराळी सजा ठोठावण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयात शासनातर्फे इतर आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी म्हणून अपील करण्यात आली आणि संतोस बरियारने फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील केली. परंतु उच्च न्यायालयात सर्व आरोपींची सजा कायम ठेवण्यात आली. संतोष बरियार हा संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार (मास्टर माईंड) असल्यामुळे त्याला ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा योग्यच आहे असे  उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले. तसेच इतर दोघांचे कमी वय बघता त्यांना जन्मठेपेची शिक्षा योग्य राहील असेही नमूद केले.

१२ ऑगस्ट २००५ रोजी उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर संतोष बरियार याने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली. तर महाराष्ट्र शासनाने संजीव आणि संतोष रॉय याच्या सजेत वाढ करण्यासाठी अपील दाखल केली. दि.१३ मे २००९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ( न्या. एस.बी. सिन्हा आणि न्या सिरियाक जोसेफ) संतोष बरियारची फाशीची सजा कमी करून त्याला जन्मठेपेची सजा सुनावली आणि महाराष्ट्र शासनाची अपील फेटाळली. संतोष ची सजा कमी करताना हे "दुर्मिळातले दुर्मिळ" प्रकरण वाटत नसून वयाचा विचार करता संजीव आणि संतोष रॉय पेक्षा संतोष बरियार फक्त दोन वर्षांनी मोठा आहे. त्याच्या सुधारण्याची काही शक्यता नाही असे म्हणता येणार नाही  सबब त्याची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली.

एका मित्राचा योजनाबद्धरित्या निर्घृण खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केलेले असतानाही ते प्रकरण "दुर्मिळातले दुर्मिळ" ठरले नाही. कार्तिकराजचा एक पाय काही तुटत नव्हता तेव्हा संतोषने तो पिळून कापून काढला. अशा राक्षसी वृत्तीच्या नराधमाला सुधारण्याची संधी आपले सर्वोच्च न्यायालय देते,  याला काय म्हणावे ?  बाकी आपण सुज्ञ आहात.
अ‍ॅड. अतुल सोनक,
९८६०१११३००


छुमछुमवर एवढा गहजब कशासाठी?

छुमछुमवर एवढा गहजब कशासाठी?

तभाच्या आकांक्षा पुरवणीत माधुरी साकुळकर यांचा ‘छुमछुम नकोच’ हा लेख वाचला. सामाजिक विषयांवर त्यांचे लेखन नेहमीच वाचनीय असते. नैतिक काय?, अनैतिक काय? मुला-मुलींवर, तरुण पिढीवर कसे संस्कार करायला हवेत?, स्त्री-पुरुष संबंध, इत्यादी अनेक विषयांवर त्यांचे मोलाचे मार्गदर्शन नेहमीच तभामध्ये वाचायला मिळते. या वेळचा त्यांचा ‘छुमछुम नकोच’ हा लेख मात्र रुचला नाही आणि पटलाही नाही. मला त्यांच्या लेखाचा प्रतिवाद करायचा नाही. तशी गरजही नाही. फक्त वस्तुस्थिती मांडावी म्हणून हा लेखनप्रपंच.

ज्या कुटुंबातून आपण येतो, ज्या संस्कारात वाढतो, घडतो, त्याचे परिणाम निश्‍चितच आपल्या वागणुकीवर होतात.एक माणूस घडायला किंवा बिघडायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. छुमछुम नकोच असे वाटणे तुमच्या आमच्या सारख्या सर्वांनाच शक्य आहे, त्यात वावगे काही नाही. अर्धनग्न पोरी वाट्टेल तशा नाचून राहिल्यात. आंबटशौकिन लोक दारूचे पेगवर पेग रिचवीत,सिगारेटचे झुरके मारीत, नोटा उडवीत निरनिराळे चाळे करताना पाहणे कोणत्याही सभ्य व्यक्तीला आवडणार नाही. महाराष्ट्र विधिमंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनाही हा प्रकार घृणास्पद वाटला म्हणून २००५ साली त्यांनी एकमताने ठराव करून महाराष्ट्रात डान्स बार बंद केले. बंद केले म्हणजे, कागदोपत्री बंद केले. तसे ते सुरूच होते. हे दरवर्षी पडणार्‍या दहा पंधरा धाडी आणि धरपकड यावरून सिद्धच होते. पहिले मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात डान्स बारवरील बंदी चुकीची आणि घटनाविरोधी होती हे ठरविण्यात आले. न्यायालयीन निर्णय बरोबर की चूक, सरकारने योग्य बाजू मांडली की नाही, कायद्याचा मसुदा योग्य होता की अयोग्य, इत्यादी बाबींवर अनेक लोकांचे भरपूर लिखाण तभा आणि अन्य वृत्तपत्रात येवून गेलेले आहे. त्यावर अजून शाई खर्च करण्याची काही गरज नाही. आपण छुमछुम प्रकरणाचा वेगळ्या दृष्टीने विचार करू.

आपण सर्वप्रथम बंदीवर विचार करू. आपल्या देशात कुठल्याही बंदीची योग्य प्रकारे, काटेकोरपणे अंमलबजावणी झाली आहे का?

१) दारूबंदी... महाराष्ट्रात वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी आहे. अंमलबजावणी आहे का? जी पाहिजे ती दारू सगळीकडे मिळते. थोडे पैसे जास्त द्यावे लागतात एवढेच. संपूर्ण गुजरात राज्यात दारूबंदी आहे. तिथे दारू मिळते की नाही?

२) सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी, तंबाखू खावून थुंकण्यावर बंदी, गुटखा बंदी... आहे का अंमलबजावणी? रेल्वेगाडीत, रस्त्यावर, हॉटेलमध्ये, न्यायालयाच्या आवारात सर्रास धूम्रपान सुरू असते. या सर्व ठिकाणी तंबाखू आणि पानाच्या पिचकार्‍याही मोठ्या प्रमाणात आढळतात. सार्वजनिक शौचालयांचे तर बोलायलाच नको.

३) प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी... काही विशिष्ट जाडीच्या खालील प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी आहे. आहे का अंमलबजावणी? सर्व प्रकारच्या,जाडीच्या प्लास्टिक पिशव्या सगळीकडे उपलब्ध आहेत.

४) सार्वजनिक ठिकाणी अश्‍लील चाळे करण्यावर बंदी... कोण मानतो? कुठलाही बगिचा बघा, तलावपाळी बघा, उदाहरणार्थ फुटाळा तलाव आणि बोटॅनिकल गार्डन बघा, प्रेमी युगुलांचे थवेच्या थवे दिसतील. हे लोक काही परदेशातून किंवा परग्रहावरून येवून पडलेले नाहीत. आपलेच भाऊ-बहिणी आहेत. संस्कार कुठे कमी पडले?

५) बीअर शॉपीमध्ये बसून बीअर पिऊ देण्यास बंदी... नागपुरातील कुठलीही बीअर शॉपी बघा,तरुण मुलामुलींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण शॉपीच्या आवारात बीअरचा आस्वाद घेताना दिसतील.

६) दारू पिऊन वाहन चालवण्यावर बंदी... आहे का अंमलबजावणी? नागपूरसारख्या शहरात एखादा आयुक्त नव्याने येतो कडक अंमलबजावणी सुरू करतो, कधी कडक कधी शिथिल, मन मानेल तशी अंमलबजावणी. इतर ठिकाणी (खेडोपाडी) मात्र दारू पिऊन सर्रास गाडी चालवली जाते.कोणी म्हणणारे नाही आणि काही करणारे नाही.

असो. अशा अनेक प्रकारच्या बंदी आणि त्यांचे सर्रास उल्लंघन असे अनेक दाखले देता येतील. बंदी आदेशाचे उल्लंघन होते म्हणून बंदी टाकूच नये, असे माझे म्हणणे नाही. पण बंदी खरोखरच आवश्यक आहे का? त्याचे परिणाम, दुष्परिणाम काय होतील? न्यायालयात बंदी टिकेल का? बंदीमुळे फायदा होईल की नुकसान? बंदी सरसकट असावी की अर्धवट?या सर्व बाबींचा विचार करणे मला गरजेचे वाटते. जो डान्स-बार बंदीबाबत मुळीच केला गेला नाही. डान्स-बार मध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळते, खुनाच्या सुपारी देण्याघेण्याचे प्रकार तिथे होतात. अंडरवर्ल्ड डॉन तिथे बैठका घेतात, मुलींना वेश्यावृत्तीला प्रवृत्त केले जाते, भरपूर प्रमाणात काळा पैसा निर्माण होतो, चांगल्या घरची मुले-मुली बिघडतात, अफू, गांजा, चरस, हेरोईन आणि इतर अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पण हे सर्व प्रकार इतरत्रही होतात. होतात की नाही?

अवैध धंदे करणारे फक्त डान्सबार मध्येच भेटतात काय? ते कुठेही भेटतात, भेटू शकतात. एवढेच नव्हे तर ते आपल्या घरीसुद्धा डान्स बार चालवू शकतात. अवैध धंदे करणारे लोक शासनाच्या परवानगीची वाट बघत नाहीत. मुद्दा हा की ज्या कारणांसाठी बंदी घालण्यात आली ती सगळी कारणे फुसकी होती. त्या कारणांसाठी डान्स-बारवर बंदी घालणे म्हणजे सासू सुनेवर अत्याचार करते म्हणून लग्न संस्थेवर बंदी घालणे किंवा काही ब्युटी पार्लरमधून वेश्याव्यवसाय चालतो म्हणून सर्व ब्युटी पार्लर्सवर बंदी घालण्यासारखा प्रकार होईल. नाही का?

डान्स-बारमध्ये जे लोक जातात, ते समजून उमजून जातात. अनावधानाने जात नाहीत. जे लोक जातात त्यांच्याजवळ मेहनतीचाच पैसा असेल असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. खाल्लेले पैसेच अशा ठिकाणी ओकले/वाटले जातात. एखादा सज्जन गृहस्थ मित्रांबरोबर कधी तरी डान्स-बारमध्ये गेलाच तर तो पुन्हा जाण्याची शक्यता नाही. ज्या मुली तिथे जबरदस्तीने आणल्या जातात त्यांचे आई वडील, नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी उपलब्ध कायद्यांचा आधार घेऊन त्यांची तिथून सुटका करू शकतात. आर. आर. आबांना किंवा संपूर्ण विधिमंडळाला जर या मुलींची एवढीच चिंता असेल तर एक विशेष शोध पथक तयार करून जिथे जिथे हे प्रकार चालतात तिथे तिथे दर आठवड्याला भेटी देवून तक्रारीची शहानिशा करता येईल. जी मुलगी स्वखुशीने नाचत असेल तिला अडवणे बेकायदेशीर/असंवैधानिक ठरेल. ज्या व्यक्तीला एखाद्या मुलीचा नाच स्वखुशीने बघायचा असेल त्याला अडवणे बेकायदेशीर/असंवैधानिक ठरेल. जी मुलगी नाखुशीने नाचत असेल तिच्यावर जबरदस्ती केली जात असेल तर तिची सोडवणूक करता येईल. कुठलाही प्रश्‍न सोडवला जाऊ शकतो हे नक्की. पंजाबात आतंकवाद समूळ नष्ट झाला की नाही? राजकीय इच्छाशक्ती असली तर सारे काही शक्य आहे. शासनाला किंवा जे छुमछुम विरोधक आहेत त्यांना मला एकाच सांगावेसे वाटते,बंदी आणण्यापेक्षा सध्या उपलब्ध असलेल्या कायद्यांच्या आधारेच ते डान्स-बारमध्ये चालणार्‍या गैरप्रकारांवर बंदी आणू शकतात. फक्त इच्छाशक्ती पाहिजे. नाहीतर मुलींना घराबाहेर पडण्यावरही बंदी घालावी लागेल. आणि हे शक्य आहे का?

जोपर्यंत आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती वाहतूक दिव्यांचे पालन करण्यापासून सर्व कायदे-नियम प्रयत्नपूर्वक पाळत नाही तोपर्यंत आपले काही खरे नाही.मग अशा डान्सबार सारख्या कितीही बंदी आल्या तरी त्यावर मात करणारे राहतीलच. बाय द वे गेल्या आठ वर्षांत डान्सबार बंदीचे उल्लंघन करणार्‍या किती लोकांना सजा झाली आहे? छुमछुम नकोच म्हणणार्‍या सर्वांनी याचा जरूर विचार करावा, उगाचच लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल म्हणून ‘छुमछुम नकोच’चे समर्थन करू नये. लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल याचा विचार करणारे लोक छुमछुम बघायला जातीलच कशाला? कायदे-नियम सभ्य लोकांसाठी असतात. असभ्यांसाठी त्यात पळवाटा असतात.

अतुल सोनक

९८६०१११३००