Sunday, August 4, 2013

छुमछुमवर एवढा गहजब कशासाठी?

छुमछुमवर एवढा गहजब कशासाठी?

तभाच्या आकांक्षा पुरवणीत माधुरी साकुळकर यांचा ‘छुमछुम नकोच’ हा लेख वाचला. सामाजिक विषयांवर त्यांचे लेखन नेहमीच वाचनीय असते. नैतिक काय?, अनैतिक काय? मुला-मुलींवर, तरुण पिढीवर कसे संस्कार करायला हवेत?, स्त्री-पुरुष संबंध, इत्यादी अनेक विषयांवर त्यांचे मोलाचे मार्गदर्शन नेहमीच तभामध्ये वाचायला मिळते. या वेळचा त्यांचा ‘छुमछुम नकोच’ हा लेख मात्र रुचला नाही आणि पटलाही नाही. मला त्यांच्या लेखाचा प्रतिवाद करायचा नाही. तशी गरजही नाही. फक्त वस्तुस्थिती मांडावी म्हणून हा लेखनप्रपंच.

ज्या कुटुंबातून आपण येतो, ज्या संस्कारात वाढतो, घडतो, त्याचे परिणाम निश्‍चितच आपल्या वागणुकीवर होतात.एक माणूस घडायला किंवा बिघडायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. छुमछुम नकोच असे वाटणे तुमच्या आमच्या सारख्या सर्वांनाच शक्य आहे, त्यात वावगे काही नाही. अर्धनग्न पोरी वाट्टेल तशा नाचून राहिल्यात. आंबटशौकिन लोक दारूचे पेगवर पेग रिचवीत,सिगारेटचे झुरके मारीत, नोटा उडवीत निरनिराळे चाळे करताना पाहणे कोणत्याही सभ्य व्यक्तीला आवडणार नाही. महाराष्ट्र विधिमंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनाही हा प्रकार घृणास्पद वाटला म्हणून २००५ साली त्यांनी एकमताने ठराव करून महाराष्ट्रात डान्स बार बंद केले. बंद केले म्हणजे, कागदोपत्री बंद केले. तसे ते सुरूच होते. हे दरवर्षी पडणार्‍या दहा पंधरा धाडी आणि धरपकड यावरून सिद्धच होते. पहिले मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात डान्स बारवरील बंदी चुकीची आणि घटनाविरोधी होती हे ठरविण्यात आले. न्यायालयीन निर्णय बरोबर की चूक, सरकारने योग्य बाजू मांडली की नाही, कायद्याचा मसुदा योग्य होता की अयोग्य, इत्यादी बाबींवर अनेक लोकांचे भरपूर लिखाण तभा आणि अन्य वृत्तपत्रात येवून गेलेले आहे. त्यावर अजून शाई खर्च करण्याची काही गरज नाही. आपण छुमछुम प्रकरणाचा वेगळ्या दृष्टीने विचार करू.

आपण सर्वप्रथम बंदीवर विचार करू. आपल्या देशात कुठल्याही बंदीची योग्य प्रकारे, काटेकोरपणे अंमलबजावणी झाली आहे का?

१) दारूबंदी... महाराष्ट्रात वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी आहे. अंमलबजावणी आहे का? जी पाहिजे ती दारू सगळीकडे मिळते. थोडे पैसे जास्त द्यावे लागतात एवढेच. संपूर्ण गुजरात राज्यात दारूबंदी आहे. तिथे दारू मिळते की नाही?

२) सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी, तंबाखू खावून थुंकण्यावर बंदी, गुटखा बंदी... आहे का अंमलबजावणी? रेल्वेगाडीत, रस्त्यावर, हॉटेलमध्ये, न्यायालयाच्या आवारात सर्रास धूम्रपान सुरू असते. या सर्व ठिकाणी तंबाखू आणि पानाच्या पिचकार्‍याही मोठ्या प्रमाणात आढळतात. सार्वजनिक शौचालयांचे तर बोलायलाच नको.

३) प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी... काही विशिष्ट जाडीच्या खालील प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी आहे. आहे का अंमलबजावणी? सर्व प्रकारच्या,जाडीच्या प्लास्टिक पिशव्या सगळीकडे उपलब्ध आहेत.

४) सार्वजनिक ठिकाणी अश्‍लील चाळे करण्यावर बंदी... कोण मानतो? कुठलाही बगिचा बघा, तलावपाळी बघा, उदाहरणार्थ फुटाळा तलाव आणि बोटॅनिकल गार्डन बघा, प्रेमी युगुलांचे थवेच्या थवे दिसतील. हे लोक काही परदेशातून किंवा परग्रहावरून येवून पडलेले नाहीत. आपलेच भाऊ-बहिणी आहेत. संस्कार कुठे कमी पडले?

५) बीअर शॉपीमध्ये बसून बीअर पिऊ देण्यास बंदी... नागपुरातील कुठलीही बीअर शॉपी बघा,तरुण मुलामुलींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण शॉपीच्या आवारात बीअरचा आस्वाद घेताना दिसतील.

६) दारू पिऊन वाहन चालवण्यावर बंदी... आहे का अंमलबजावणी? नागपूरसारख्या शहरात एखादा आयुक्त नव्याने येतो कडक अंमलबजावणी सुरू करतो, कधी कडक कधी शिथिल, मन मानेल तशी अंमलबजावणी. इतर ठिकाणी (खेडोपाडी) मात्र दारू पिऊन सर्रास गाडी चालवली जाते.कोणी म्हणणारे नाही आणि काही करणारे नाही.

असो. अशा अनेक प्रकारच्या बंदी आणि त्यांचे सर्रास उल्लंघन असे अनेक दाखले देता येतील. बंदी आदेशाचे उल्लंघन होते म्हणून बंदी टाकूच नये, असे माझे म्हणणे नाही. पण बंदी खरोखरच आवश्यक आहे का? त्याचे परिणाम, दुष्परिणाम काय होतील? न्यायालयात बंदी टिकेल का? बंदीमुळे फायदा होईल की नुकसान? बंदी सरसकट असावी की अर्धवट?या सर्व बाबींचा विचार करणे मला गरजेचे वाटते. जो डान्स-बार बंदीबाबत मुळीच केला गेला नाही. डान्स-बार मध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळते, खुनाच्या सुपारी देण्याघेण्याचे प्रकार तिथे होतात. अंडरवर्ल्ड डॉन तिथे बैठका घेतात, मुलींना वेश्यावृत्तीला प्रवृत्त केले जाते, भरपूर प्रमाणात काळा पैसा निर्माण होतो, चांगल्या घरची मुले-मुली बिघडतात, अफू, गांजा, चरस, हेरोईन आणि इतर अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पण हे सर्व प्रकार इतरत्रही होतात. होतात की नाही?

अवैध धंदे करणारे फक्त डान्सबार मध्येच भेटतात काय? ते कुठेही भेटतात, भेटू शकतात. एवढेच नव्हे तर ते आपल्या घरीसुद्धा डान्स बार चालवू शकतात. अवैध धंदे करणारे लोक शासनाच्या परवानगीची वाट बघत नाहीत. मुद्दा हा की ज्या कारणांसाठी बंदी घालण्यात आली ती सगळी कारणे फुसकी होती. त्या कारणांसाठी डान्स-बारवर बंदी घालणे म्हणजे सासू सुनेवर अत्याचार करते म्हणून लग्न संस्थेवर बंदी घालणे किंवा काही ब्युटी पार्लरमधून वेश्याव्यवसाय चालतो म्हणून सर्व ब्युटी पार्लर्सवर बंदी घालण्यासारखा प्रकार होईल. नाही का?

डान्स-बारमध्ये जे लोक जातात, ते समजून उमजून जातात. अनावधानाने जात नाहीत. जे लोक जातात त्यांच्याजवळ मेहनतीचाच पैसा असेल असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. खाल्लेले पैसेच अशा ठिकाणी ओकले/वाटले जातात. एखादा सज्जन गृहस्थ मित्रांबरोबर कधी तरी डान्स-बारमध्ये गेलाच तर तो पुन्हा जाण्याची शक्यता नाही. ज्या मुली तिथे जबरदस्तीने आणल्या जातात त्यांचे आई वडील, नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी उपलब्ध कायद्यांचा आधार घेऊन त्यांची तिथून सुटका करू शकतात. आर. आर. आबांना किंवा संपूर्ण विधिमंडळाला जर या मुलींची एवढीच चिंता असेल तर एक विशेष शोध पथक तयार करून जिथे जिथे हे प्रकार चालतात तिथे तिथे दर आठवड्याला भेटी देवून तक्रारीची शहानिशा करता येईल. जी मुलगी स्वखुशीने नाचत असेल तिला अडवणे बेकायदेशीर/असंवैधानिक ठरेल. ज्या व्यक्तीला एखाद्या मुलीचा नाच स्वखुशीने बघायचा असेल त्याला अडवणे बेकायदेशीर/असंवैधानिक ठरेल. जी मुलगी नाखुशीने नाचत असेल तिच्यावर जबरदस्ती केली जात असेल तर तिची सोडवणूक करता येईल. कुठलाही प्रश्‍न सोडवला जाऊ शकतो हे नक्की. पंजाबात आतंकवाद समूळ नष्ट झाला की नाही? राजकीय इच्छाशक्ती असली तर सारे काही शक्य आहे. शासनाला किंवा जे छुमछुम विरोधक आहेत त्यांना मला एकाच सांगावेसे वाटते,बंदी आणण्यापेक्षा सध्या उपलब्ध असलेल्या कायद्यांच्या आधारेच ते डान्स-बारमध्ये चालणार्‍या गैरप्रकारांवर बंदी आणू शकतात. फक्त इच्छाशक्ती पाहिजे. नाहीतर मुलींना घराबाहेर पडण्यावरही बंदी घालावी लागेल. आणि हे शक्य आहे का?

जोपर्यंत आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती वाहतूक दिव्यांचे पालन करण्यापासून सर्व कायदे-नियम प्रयत्नपूर्वक पाळत नाही तोपर्यंत आपले काही खरे नाही.मग अशा डान्सबार सारख्या कितीही बंदी आल्या तरी त्यावर मात करणारे राहतीलच. बाय द वे गेल्या आठ वर्षांत डान्सबार बंदीचे उल्लंघन करणार्‍या किती लोकांना सजा झाली आहे? छुमछुम नकोच म्हणणार्‍या सर्वांनी याचा जरूर विचार करावा, उगाचच लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल म्हणून ‘छुमछुम नकोच’चे समर्थन करू नये. लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल याचा विचार करणारे लोक छुमछुम बघायला जातीलच कशाला? कायदे-नियम सभ्य लोकांसाठी असतात. असभ्यांसाठी त्यात पळवाटा असतात.

अतुल सोनक

९८६०१११३००

No comments:

Post a Comment