Tuesday, October 15, 2013

सुपारी शॉपी


सुपारी शॉपी
               

(येथे सर्व प्रकारच्या सुपाऱ्या घेतल्या जातील)

काल बाजारात खरेदीला गेलो होतो. अनेक वर्षांत बाजार ओळीत झालेले बदल स्पष्ट जाणवत होते. पान ठेल्यांची संख्या कमी झालेली दिसत होती, दोन-चार दुकानं सोडली की मोबाईलची दुकानं दिसत होती. लॅपटॉप कंप्यूटर्स, टॅब्ज, टी.व्ही फ्रीज, वॉशिंग मशीन्स,आणि इतर वस्तूंच्या दुकानांची संख्या गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढलेली दिसत होती. बुडलेल्या  बॅंका, फायनांस कंपन्या, सोसायट्यांची बंद पडलेली कार्यालयं अधून मधून दिसत होती. पारंपारिक किराणा दुकानं, कपड्याची दुकानं, मॉल्स, पाहता पाहता अचानक एका दुकानावर नजर खिळली. "सुपारी शॉपी".

निरनिराळ्या प्रकारची सुपारी विकण्याचं दुकान असावं असा समज होवून मी पाहिलं पण तिथे कुठल्याही प्रकारची सुपारी नव्हती. माझे बाबा सुपारी तंबाखूचे खूप शौकीन होते. त्यांचे ब्रॅंड ठरलेले असायचे. त्यांना पाहिजे असणारी सुपारी तंबाखू शोधण्यासाठी दुकानंच्या दुकानं पालथी घालावी लागायची. असो. तर या "सुपारी शॉपी" कडे मी सुपारी शोधत असताना एका काळ्या कभिन्न व्यक्तीची माझ्याकडे नजर गेली. त्यानं माझ्याकडे पाहताच मीही त्याच्याकडे पाहिलं. हातात सोन्याचं भलं मोठं कडं, गळ्यात सोन्याचीच जाडीभरडी साखळी, एका कानात सोन्याचीच बाळी अशा अवतारात त्याला पाहिल्यावर मला काही समजेना. तो माझ्याकडेच बघत होता. "ए भिडू, क्या मंगता?", मी काहीच बोललो नाही. अनोळखी माणसांशी एकदम बोलायची इच्छाच होत नाही माझी. " ए  बहरा है क्या? तेरेको  पूछ रहा मै". त्यानं पुन्हा एकदा विचारलं. " अं, काही नाही, कुछ नई, मै ऐसेही जा रहा था." मी चाचरत चाचरत बोललो. "अबे आ अंदर तेरेको कुछ दिखाता हूं" असं म्हणत माझा होकार नकार न ऐकता त्यानं मला दुकानात---सुपारी शॉपीत ओढलंच.

दुकानात गेल्यावर जवळजवळ सात आठ पोरं कानाला फोन लावून बोलताना दिसले. एक काळे कपडे घातलेला काळाच माणूस एका भल्या मोठ्या काळ्याच खुर्चीत काळाच गॉगल लावून बसला होता. मला आत आणणाऱ्या माणसानं मला सरळ नेवून त्याच्या समोरच्या खुर्चीत बसवलं. मला काही सुचेना. मी काही बोलावं की नाही, या विचारात असतानाच समोरच्या खुर्चीमधल्या माणसाचा खर्जातला आवाज माझ्या कानावर आला. "काय म्हणता साहेब, काय हवंय तुम्हाला? काय सेवा करू?" मी चाटच पडलो. मला कुठे काय हवं होतं. "मेरकू कुछ नई होना" मी आपलं तोडक्या मोडक्या हिंदीत म्हणालो. अनोळखी माणसाशी हिंदीत (राष्ट्रभाषेत ?) बोलायची पद्धत असते आपल्याकडं. समोरचा माणूस डोळे मोठे करीत म्हणाला, "ओ सायेब, हितं मराठीत बोलायचं, कळलं काय, मराठीतच बोलायचं, येत नसंल तर शिकून यायचं, कळलं काय?" मला काही समजेचना, सुचेचना.

"थोडं पाणी मिळेल का?" मी काही तरी विचारायचं म्हणून विचारलं. "सायबांना पाणी द्या, असं खूप दिवसांनी गिऱ्हाईक आल्यासारखं काय बघताय? बिसलेरी  घे रे" समोरून आदेश आला. "आणि च्या सांग काळी" पुन्हा आवाज आला. "नाही मी च्या घेत नाही" मी म्हणालो, ", कॉपी सांग सायबासाठी", "मी कॉपी पण घेत नाही" मी ही तसंच म्हणालो. "जाऊ दे रे, सायबांना सांग आपल्या इथे काय काय करून मिळतं ते", तो म्हणाला. "तुम्हीच सांगा नं सायेब," मी म्हटलं, एव्हाना माझीही जरा भीड चेपली होती.

"सायेब, आपल्या इथं सर्व प्रकारच्या सुपाऱ्या घेतल्या जातात."  तो बोलला. "सुपाऱ्या, कसल्या सुपाऱ्या ?" मी विचारलं. माझा मूर्खासारखा प्रश्न ऐकून तो मोठ्ठ्यानं हसला, "ह्या ह्या ह्या, सायबांना सुपारी माहित नाही, ह्या ह्या ह्या "  मी ही खजील झालो. मला सुपारी माहित नाही.अशी कशी माहित नाही. सुपारी माझे बाबा खायचे. मीही खायचो. आता सोडलीय. हा सुपाऱ्या घेतो म्हणतोय, पण सुपाऱ्या तर कुठे दिसत नाहीयेत, गोडाऊनमध्ये असतील का?..........मी विचारांच्या गटांगळ्यात खोल खोल जात असताना समोरून एकदम आवाज आला. "ओ सायेब, कसला विचार करताय? सुपारी माहित नाही तुम्हाला.सिनमे पाहात नाही कि काय?" आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला.

मला एकदम सुपारीचा अर्थ उमगला. मी न राहवून म्हणालो, "माहिताय, माहिताय, माहिताय......", "ओ सायेब थांबा. कितीदा सांगाल? " समोरून आवाज आला. "बरं जाऊ द्या, तुम्हाला द्यायचीय का सुपारी आम्हाला? कसलीही द्या, ए रेट सांग रे सायबांना." तो म्हणाला. आता मला बाहेरून आत आणणारा समोर आला. त्यानं माझ्या हातात एक लॅमिनेटेड  कागद दिला. हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड असतं तसं.

मी मेन्यू कार्ड वाचायला सुरुवात केली. १) मडर .....पाच हजारापासून पाच खोक्यापर्यंत (माणूस पाहून), २) हाप मडर....एका हजारापासून दोन खोक्यापर्यंत(माणूस पाहून), ३) विनयभंग......पाचशे रुपयापासून एक खोक्यापर्यंत ( बाई पाहून), ४) बलात्कार........दोन हजारापासून दोन खोक्यापर्यंत (बाई पाहून), विशेष सूचना: सामुहिक करायचा असेल तर बलात्कारी लोकांच्या संख्येच्या पटीत रक्कम मोजावी लागेल, ५) पाकिट मारणे.......फुकट. विशेष सूचना: पाकिटातील पैसे किंवा इतर काहीही मिळणार नाही, ६) चोरी, जबरी चोरी किंवा दरोडा.....दहा हजारापासून एक खोक्यापर्यंत (घर किंवा बंगला पाहून) विशेष सूचना: चोरी किंवा दरोड्यातील मिळालेला माल अर्धा अर्धा वाटल्या जाईल त्यात सुपारीच्या रकमेचा समावेश राहणार नाही, ७) आंदोलन, जातीय दंगा.......एक खोक्यापासून दहा खोक्यापर्यंत (जागा आणि गाव शहर पाहून) विशेष सूचना:  दिल्ली मुंबई सारख्या शहरात २० टक्के सरचार्ज, ८) अण्णा, रामदेव, मेधा, यांच्यासारख्यांवर खोटेनाटे आरोप करणे...... एक खोक्यापासून दहा खोक्यापर्यंत, विशेष सूचना: वाहिन्यांवर बाईट दाखवण्यासाठी ४० टक्के सरचार्ज, ९) कुठल्याही निवडणुकीत कोणालाही पाडणे....... एक लाखापासून पन्नास खोक्यापर्यंत (उमेदवार आणि निवडणूक पाहून, एक लाखाचा रेट ग्राम पंचायतसाठी), १०) मनमोहन, सोनिया, राहुल, मोदी, आडवाणी, तसेच मंत्री, मुख्यमंत्री, राज्यमंत्री यासारख्या लोकांच्या मडरच्या सुपारीची सूचना तीन महिने अगोदर द्यावी लागेल त्याचे रेट वेळेवर सांगण्यात येतील (त्यावेळचं त्यांचं राजकीय वजन पाहून).
विशेष सूचना: वरील सर्व रेट कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय कमी जास्त करण्याचे सर्वाधिकार संचालक मा. खोकासिंग सुपारीवाला यांचेकडे सुरक्षित आहेत. त्यावर कोणाचाही उजर ऐकला जाणार नाही. कुठलाही वाद करण्याची कोणीही हिंमत केल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी त्याची राहील. सुपारी मागे घेतल्यास पैसे परत मिळणार नाहीत.    

मेन्यू कार्ड वाचता वाचता मी थकून गेलेला पाहून समोरचा माणूस म्हणाला, " अरे सायबांना पाणी द्या." एकानं आणलेली बिसलेरीची अख्खी बाटली मी पिऊन टाकली. "आता सांगा सायेब, काय सेवा करू तुमची, सुपारी वाया जाणार नाही, एकदा देवून तर बघा, फुल ग्यारंटी आपली" समोरून आवाज आला. मी काही बोलूच शकलो नाही. मला कशाचीही सुपारी द्यायची नव्हती. मला खरं तर काही सुचतच नव्हतं. मी उगीचच काही तरी बोलायचं म्हणून म्हटलं, " खोकासिंग सुपारीवाला म्हणजे तुम्हीच का?", लगेच समोरचा खेकसला, " , ज्यास्त श्यानपत्ती नकोय, तुला काय करायचं बे कोण हाय त्यो, तू आपली सुपारी दे नं मोकळा हो", आतापर्यंत सायेब म्हणणारा तू म्हणायला लागला होता. मी उद्या येतो सुपारी द्यायला असं म्हणून काढता पाय घेतला...........................

आणि मला एकदम जाग आली. मी झोपेतून खडबडून जागा झालो. म्हणजे. हो मी आतापर्यंत जे बघत होतो ते चक्क स्वप्न होतं माझं. आणि स्वप्नं खरीही होतात बरं का.......उद्या अशी सुपारी शॉपी तुम्हाला दिसलीच तर आश्चर्य वाटून घेवू नका. कारण आपले कायद्याचे रक्षक फक्त घोषणाच करीत आहेत आणि सुपारीवाले सुपाऱ्या घेत आहेत, खात आहेत आणि आपण चर्चा करीत बसतोय, दाभोलकरांचे खुनी केव्हा सापडणार म्हणून..................

अ‍ॅड. अतुल सोनक
९८६०१११३००

No comments:

Post a Comment