Thursday, March 5, 2015

बच्चा है, जाने दो

बच्चा है, जाने दो
               (कायद्याचा फायदा)


सात वर्षे वयाच्या “कमला’’ वर बलात्कार करून तिचा खून करणारा आणि तिचा कोवळा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करणारा दुर्गा राम आज कायद्याच्या कचाट्यातून मोकळा झालाय, का? कसा? बघा..........    

दुर्गा राम उर्फ गुंगा याच्यावर राजस्थानच्या बाली येथील सत्र न्यायालयात लहानग्या कमलावर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी खटला चालला. सत्र न्यायालयाने दि.२७.०१.२००४ च्या आदेशान्वये त्याला या दोन्ही गुन्ह्यांसाठी दोषी मानले आणि त्याला बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल १० वर्षे सश्रम कारावास आणि १००० रुपये दंड (दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावास) आणि खुनाच्या गुन्ह्यासाठी त्याला आजन्म कारावास आणि ३००० रुपये दंड (दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास) अशी शिक्षा ठोठावण्यात आली. दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या होत्या. घटना १९९८ सालची होती. सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यावर दुर्गा रामने राजस्थान उच्च न्यायालयात २००४ साली अपील दाखल केले. राजस्थान उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत त्याचे अपील फेटाळले. त्यानंतर दुर्गा राम सर्वोच्च न्यायालयात पोहचला. २००८ साली त्याने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. सर्वोच्च न्यायालयानेही दुर्गा राम ला बलात्कार आणि खुनासाठी दोषी मानले...........पण............तरीही त्याला सोडले. का? सर्वोच्च न्यायालयात नेमके काय घडले ते बघण्यापूर्वी घटना कशी घडली ते बघू..........
दि.९.०४.१९९८ रोजी रानी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कमलाच्या वडिलांनी “जागरण” (रात्रभर चालणारा भजन कीर्तनाचा कार्यक्रम) आयोजित केले होते. मग्गा रामच्या विहिरीजवळ हा कार्यक्रम सुरु होता आणि मोहल्ल्यातील पन्नासेक लोक त्यावेळी हजर होते. सात वर्षीय कमला आणि इतर मुलेमुली कंटाळून जवळच एका ठिकाणी झोपी गेली. घरी आल्यावर कमला दिसली नाही म्हणून तिच्या वडिलांनी नातेवाईक आणि शेजाऱ्यांना विचारपूस केली. परंतु ती कुठेच आढळून आली नाही. मग शोध मोहीम सुरु झाली. काही अंतरावर मग्गा राम आणि पुरा राम यांना कमला चा मृतदेह सापडला. मृतदेहाची अवस्था बघून कमलावर बलात्कार करून तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता हे स्पष्ट दिसत होते. तिच्या वडिलांना कळवण्यात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी भा.दं.वि.च्या ३०२ आणि ३७६ कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. तपास पूर्ण झाल्यावर आरोपी दुर्गा राम यानेच हा सर्व प्रकार केला असल्याचे उघड झाले, त्याला अटक करून त्याचेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

बाली सत्र न्यायालायासमोर सरकार पक्षातर्फे एकूण १९ साक्षीदार तपासण्यात आले. शव-विच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय अहवालावरून तसेच साक्षीदारांच्या बयाणांवरून बलात्कार आणि खून दुर्गा राम यानेच केल्याचे निष्पन्न झाले. दुर्गा रामनेच दाखवल्यावरून त्याचे रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले होते. त्यावरील रक्ताचा गट कमलाचा रक्त गट एकच होता. कमलाच्या शरीरावर खूप जखमा होत्या. दगडाने ठेचून तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता. दुर्गा रामच्या शरीरावर आणि गुप्तांगावरही खूप जखमा होत्या. त्याबाबतचे कुठलेही स्पष्टीकरण तो देवू शकला नाही. कमलाच्या वडिलांनी आयोजित केलेला जागरणाचा कार्यक्रम, त्याला दुर्गा राम इतर अनेक लोकांबरोबर उपस्थित असणे, त्या कार्यक्रमातून कमला गायब होणे, नंतर तिचा मृतदेह सापडणे, दुर्गा रामचे रक्ताने माखलेले कपडे सापडणे, त्यावरील रक्त गट कमलाच्या रक्त गटाशी जुळणे, दुर्गा रामच्या शरीरावर एवढेच नव्हे तर लिंगावरही जखमा आढळणे, दुर्गावर बलात्कार झाल्याच्या खुणा आढळणे, या सर्व बाबींमुळे दुर्गा रामवरील दोन्ही आरोप (बलात्कार आणि खून) सिद्ध झाले आणि त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयातही कायम ठेवण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयात अपिलाची सुनावणी न्या.टी.एस.ठाकूर आणि न्या. आर. बानुमथी यांच्या खंडपीठासमोर सुरु झाली. सुनावणीदरम्यान दुर्गा राम तर्फे एक अर्ज करण्यात आला. बाल न्याय कायदा, २००० (Juvenile Justice (Care and Protection of Children) Act, 2000) यातील तरतुदीचा फायदा घेवून तो अर्ज करण्यात आला होता. अर्जात असे म्हटले होते की घटनेच्या दिवशी तो बालक होता, त्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी होते. तो मुका-बहिरा होता. तो कधीच शाळेत गेलेला नव्हता त्यामुळे त्याचे जन्मतारखेबाबत कुठलेही प्रमाणपत्र नव्हते. तसेच इतर कुठलाही दाखला नव्हता. जन्मतारखेबाबत कुठलाही कागदोपत्री पुरावा नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जोधपूरच्या प्राचार्यांना एक “बोर्ड ऑफ डॉक्टर्स” गठीत करून दुर्गा रामच्या वयाची शहानिशा करण्याचे निर्देश दिले. त्याची वैद्याकीय तपासणी करून तो एप्रिल १९९८ ला किती वर्षांचा असावा ते स्पष्ट करण्यास सांगितले.

प्राचार्यांनी गठीत केलेल्या बोर्डातर्फे दुर्गा रामच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करून दि.४.०२.२०१४ रोजी बोर्डाने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. त्या अहवालानुसार दुर्गा राम चे त्या दिवशीचे वय कमीत कमी ३० वर्षे आणि जास्तीत जास्त ३६ वर्षे असावे, म्हणजे सरासरी ३३ वर्षे. त्याचे आजचे वय ३० वर्षे गृहीत धरले तर घटनेच्या दिवशी तो १४ वर्षे २ महिने आणि ७ दिवस वयाचा होता. आजचे वय ३३ वर्षे धरले तर तो घटनेच्या दिवशी १७ वर्षे २ महिने आणि ७ दिवस वयाचा होता. आजचे वय ३६ वर्षे धरले तर तो घटनेच्या दिवशी २० वर्षे २ महिने ७ दिवस वयाचा होता. याबाबतचा कायदा आणि वस्तुस्थितीचा भरपूर उहापोह सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात केला आहे.

बाल न्याय कायद्यातच असे म्हटले आहे की त्या बाल आरोपीच्या वयाबाबत संभ्रम असल्यास बोर्डाने प्रतिपादित केलेल्या वयापेक्षा एक वर्षाने कमी समजावे/गृहीत धरावे. (In case exact assessment of the age cannot be done, the Court or the Board or, as the case may be, the Committee, for the reasons to be recorded by them, may, if considered necessary, give benefit to the child or juvenile by considering his/her age on lower side within the margin of one year.) बोर्डाने प्रतिपादित केलेले सरासरी वय गृहीत धरले तरी घटनेच्या दिवशी तो १७ वर्षे वयाचाच होता आणि त्याला (एक वर्ष कमी धरण्याच्या तरतुदीचा) कायद्याच्या आधारे “बालक” समजायला हरकत नाही. सबब सर्वोच्च न्यायालयाने त्याला बलात्कार आणि खुनासाठी दोषी मानूनही तो १४ वर्षे तुरुंगात होता हीच समाधानाची बाब मानून त्याला तुरुंगातून सोडण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दि. ८.०१.२०१५ रोजी दिला. 16. In the totality of the circumstances, we have persuaded ourselves to go by the age estimate given by the Medical Board and to declare the appellant to be a juvenile as on the date of the occurrence no matter the offence committed by him is heinous and but for the protection available to him under the Act the appellant may have deserved the severest punishment permissible under law. The fact that the appellant has been in jail for nearly 14 years is the only cold comfort for us to let out of jail one who has been found guilty of rape and murder of an innocent young child.
17. In the result, this appeal succeeds but only in part and to the extent that while the conviction of the appellant for offences under Section 302 and 376 of IPC is affirmed the sentence awarded to him shall stand set aside with a direction that the appellant shall be set free from prison unless required in connection with any other case.

अशा प्रकारे एका चिमुकलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या मुक्या-बहिऱ्या मुलाला दोषी असूनही केवळ कायद्याच्या तरतुदीच्या आधारे सोडावे लागले. परंतु १४ वर्षे तो तुरुंगात होता हेच काय ते समाधान. या सर्व प्रकरणात प्रश्न असा उत्पन्न होतो की सत्र न्यायालयात खटला सुरु असताना दुर्गा राम च्या वकिलांनी तो सज्ञान नसल्याचा मुद्दा का उपस्थित केला नाही? की त्यांना माहीतच नव्हते? की त्यांना कायद्याची तरतूद माहीतच नव्हती? १४ वर्षे तुरुंगात राहिल्यावर अचानक हा मुद्दा कसा उपस्थित झाला? त्याच वेळी तो मुद्दा उपस्थित झाला असता तर दुर्गा रामला १४ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला नसता. त्याला बाल न्याय कायद्यातील तरतुदीनुसार बाल सुधारगृहात ठेवण्यात आले असते. त्याने केलेले कृत्य कितीही घृणास्पद असले तरी त्याला कायद्याच्या तरतुदीचा फायदा घेण्याचा अधिकारच आहे. त्यानुसार त्याने फायदा घेतला. “कायद्याचा फायदा” घेवून महाशय आज बाहेर आहेत. एक मुका बहिरा बालक अशा प्रकारे घृणित कृत्य करू शकतो यावर ही विश्वास बसणे कठीण आहे पण पुरावे त्यानेच हे सर्व केल्याचे सांगत होते. एका बालकाच्या मनात अशा प्रकारचे कृत्य करण्याची भावना येतेच कशी? खेळण्या-बागडण्याच्या वयात एवढा जघन्य अपराध? असो. ऐसा भी होता है.

अॅड. अतुल सोनक
९८६०१११३००    


     

  

No comments:

Post a Comment