Thursday, March 5, 2015

कसला बाप अन कसले पोलीस?

कसला बाप अन कसले पोलीस?

लक्ष्मी बहल (नाव बदलले आहे), या उत्तर प्रदेशातील एका २२ वर्षीय तरुणीचा चक्क तिच्या बापाकडून, त्याच्या मित्रांकडून, कुटुंबियांकडून आणि पोलिसांकडून लैंगिक छळ होतो........... पोलीस संबंधितांवर काहीच कारवाई करीत नाहीत. आपल्या न्याय्य आणि मूलभूत अधिकारांसाठी तिला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. तिची कर्मकहाणी ऐकून सर्वोच्च न्यायालय काय करते बघा..........

२०१० साली ती वयात आल्याबरोबर लक्ष्मीने आपला खानदानी वेश्याव्यवसाय सुरु करावा म्हणून तिचा बाप सतत तिच्यावर दबाव आणायचा. हा व्यवसाय करण्याची तिची इच्छा नसल्यामुळे आणि ती काही केल्या तयार होत नसल्यामुळे त्याने तिला पंजाब मधील एका ६५-७० वर्षे वयाच्या इसमास विकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच लक्ष्मी आपल्या मीरत येथील घरून हरिद्वारला पळून गेली. तिथून काही सद्गृहस्थांनी तिला मीरत येथील डी.आय.जी. (पोलीस) कार्यालयात आणले. तिने आपली कर्मकहाणी डी.आय.जी.ना सांगितली. त्यांनी तिच्या बापाला आणि कुटुंबीयांना दम दिला आणि भविष्यात असे करायचे नाही अशी ताकीद देत तिला त्यांच्या हवाली केले. पण त्या लोकांनी डी.आय.जी.च्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा त्रास सुरु केला. त्यामुळे तिला श्रीमती आशा माधो (लक्ष्मीच्या जुन्या शिक्षिका) यांच्या ताब्यात देण्यात आले.

दि.१ आणि २ सप्टेंबर २०११ च्या मध्यरात्री आशा माधो घरी नसताना लक्ष्मीला तिच्या कुटुंबीयांनी काही पोलिसांच्या मदतीने उचलून नेले आणि पुन्हा त्यांच्या घरी डांबून ठेवले. तिने कसेबसे जवळच्या पोलीस ठाण्यात पत्र पाठवून सांगितले की तिला घरात डांबून ठेवण्यात आले आहे आणि काहीही विपरीत घडू शकते. तिथल्या ठाणेदाराने तिला शहर न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात हजर केले. तिने न्यायालयात सांगितले की ती सज्ञान असून तिला त्या घरात राहायचे नाही आणि तिला पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्यात येवू नये. तिच्या बापानेही न्यायालयात अर्ज केला की लक्ष्मी मनोरुग्ण असून तिला त्याच्याच ताब्यात देण्यात यावे. न्यायदंडाधिकाऱ्याने लक्ष्मीची मनोरुग्णालयाच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. तपासणीत ती मानसिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे न्यायदंडाधिकाऱ्याने तिला पुन्हा आशा माधोच्या ताब्यात दिले आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश दिले.

न्यायदंडाधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाला लक्ष्मीच्या पित्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात पुनरीक्षण अर्ज दाखल करून आव्हान दिले. पुन्हा लक्ष्मी न्यायालयात हजर झाली. त्याचवेळी आशा माधो यांनी स्वत:च्या प्रकृतीचे कारण देत तसेच लक्ष्मीच्या कुटुंबीयांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कारण देत तिला आपल्या घरी आश्रय देण्यास असमर्थता दर्शवली. लक्ष्मीने आशा माधोची वहिनी श्रीमती अपर्णा गौतम हिच्याकडे राहायला जायची तयारी दर्शवली. दि.१५.०९.२०११ रोजी सत्र न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा आदेश बदलवत आणि लक्ष्मी सज्ञान असल्यामुळे बापाला तिचा ताबा नाकारत तिला जिथे जायचे/राहायचे असेल त्याला मोकळीक दिली. सत्र न्यायाधीश उठून आपल्या कक्षात गेल्यावर सर्व जण न्यायालयातून बाहेर पडत असताना लक्ष्मीला तिच्या बापाने आणि त्याच्या साथीदारांनी जबरदस्तीने पळवून नेले आणि मीरतला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले तसेच पंजाबमधील लुधियानालाही नेले एवढेच नव्हे तर बापासकट सर्वांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. धन्य तो बाप अन त्याचे साथीदार.......

श्रीमती अपर्णा गौतम यांनी नोव्हेंबर २०११ मधे अलाहाबाद उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केल्यावर लक्ष्मीला उच्च न्यायालयासमोर दि.१६.०१.२०१२ रोजी हजर करण्यात आले. न्यायालयासमोर लक्ष्मीने  तिला कसे पळवून नेण्यात आले, कशी मारहाण केली जायची कसे बलात्कार केले जायचे याची सर्व कहाणी सांगितली. दि.३०.०१.२०१२ रोजी उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने लक्ष्मीला तिच्या बापाच्या तावडीतून सोडवले आणि जिथे जायचे असेल तिथे तिने जावे, अपर्णा गौतम यांच्याकडे सुद्धा ती जावू शकते, असा आदेश दिला.

त्यानंतर अनेकदा लक्ष्मीने तिच्यावर झालेल्या अन्याय-अत्याचाराबाबत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. शेवटी दि.१६.०१.२०१३ रोजी तिने वरिष्ठ पोलीस अधीक्षक, मीरत यांचेकडे लेखी तक्रार पाठवली आणि तिचा बाप आणि इतरांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची मागणी केली. दि.२१.०१.२०१३ रोजी सिविल लाईन्स पोलीस ठाण्याऐवजी लीसाडी गेट पोलीस ठाण्यात त्या लोकांविरुद्ध भा.दं.वि. च्या कलम ३६६, ३२३, ५०६, ३७६ अन्वये गुन्हे नोंदण्यात आले(एफ.आय.आर.नं.३१/२०१३). परंतु तिचे बयाण कधीही नोंदवण्यात आले नाही, तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. कोणाचेही बयाण नोंदवण्यात आले नाही, कसलाही तपास केला गेला नाही. तिच्या जीवाला धोका असताना तिला कुठलीही सुरक्षा प्रदान करण्यात आली नाही. सततच्या भीती आणि असुरक्षेमुळे अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर याचिका दाखल न करता तिने २०१३ सालीच सरळ दिल्ली गाठून  सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. घटनेच्या कलम ३२ आणि १४२ अन्वये तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात तिच्या याचिकेची सुनावणी न्या. एम. वाय. इक्बाल आणि न्या. शिवा कीर्ती सिंग यांच्या खंडपीठासमोर झाली.

तिचे वकील अॅड. पी.एच. पारेख यांनी लक्ष्मीच्या बाजूने युक्तिवाद करीत तिची कर्मकहाणी न्यायालयाला सांगितली. सर्वोच्च न्यायालयाने सर्व संबंधितांना नोटीसा बजावून प्रतिज्ञापत्रे दाखल करायला सांगितले. उत्तर प्रदेश सरकार, पोलीस महासंचालक, पोलीस उपमहानिरीक्षक, वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांच्यातर्फे असे सांगण्यात आले की तपास सुरु आहे, अमुक अमुक अधिकारी तपास करीत आहेत, अनेक चौकशी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, लक्ष्मीच बयाण नोंदवायला हजर राहत नाही, अशा प्रकारे थातूरमातुर कारणे देण्यात आलीत. सर्वोच्च न्यायालयाने लक्ष्मीला साकेत, नवी दिल्ली येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर दि.३१.०१.२०१५ रोजी हजर होवून आपले बयाण नोंदवावे असा आदेश दि.३०.०१.२०१५ रोजी दिला.

       
मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर लक्ष्मी हजर झाली आणि तिने आपली संपूर्ण कर्मकहाणी सांगितली. तिने सांगितले कि २००७ सालापासूनच तिचा बाप तिच्यावर बलात्कार करायचा. तिला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जायचे, तिला कसे न्यायालयातून जबरदस्तीने पळवून नेले, कोणी कोणी आणि केव्हा केव्हा बलात्कार केले, सर्व तिने विस्तृत सांगितले. तिचा बाप म्हणायचा आमच्या धंद्यात एकदा विकलेला माल परत घेता येत नाही. तिच्यावर तिचा बाप, हर्ष बहल, धरमवीर नारंग, कॉन्स्टेबल दयाशंकर, डीआयजी प्रेमप्रकाश, सनी आहुजा, देशराज आहुजा, तिलक नारंग, तुफान उर्फ राजकुमार, डॉ.  बी.पी. अशोक, यांनी वेळोवेळी बलात्कार केले. दि.१७.१०.२०१० रोजी प्रीती खुराना आणि उर्मिला कथुरिया या दोन महिलांसमोर इंदरजीत, हरविंदर यांनी तिच्यावर बलात्कार केला, वारंवार विनंती करूनही त्या महिलांनी तिला वाचवले नाही. अपर्णा गौतम यांनी तिला मदत केल्यामुळे तिलाही तिच्या कुटुंबीयांनी तसेच पोलिसांनी त्रास दिला. डीआयजीने तर अपर्णाला मारहाण करून तिच्यावर खोटा गुन्हा नोंदवून अटक ही केली. धन्य तो बाप जो आपल्या पोटच्या पोरीवरच लैगिक अत्याचार करायला मागेपुढे पाहात नाही. पिता रक्षति कौमार्ये म्हणे............इथे तर पित्यानेच पोरीचा बाजार मांडलाय.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर हे लक्षात आले की बापच नाही तर त्याचे मित्र, नातेवाईक आणि पोलीस सुद्धा लक्ष्मीवरील लैंगिक अत्याचारात सक्रीय सहभागी होते, त्यामुळे पुन्हा उत्तर प्रदेश पोलिसांनाच प्रकरणाचा तपास करायला सांगणे उचित नव्हते, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्वोच्च आणि स्वतंत्र तपास यंत्रणा सीबीआयला या प्रकारणात तपास करण्याचे निर्देश दिले. दि.१७.०२.२०१५ रोजी या प्रकरणात आदेश पारित करताना सर्वोच्च न्यायालयाने  सीबीआय ही स्वतंत्र संस्था असल्याचे म्हटले आहे, बघा, “16.   Taking into consideration the  entire  facts  of  the  case  and  very serious allegations  made  against  all  the  respondents  including  police officers, it is a fit case where the investigation has to be handed over  to an independent agency  like  CBI  for  the  purpose  of  fair  and  unbiased investigation.
17.   We, therefore, allow this petition and direct the Central Bureau of Investigation to investigate the case independently and in an objective manner and to conclude the same in accordance with law.

तब्बल आठ वर्षे एका मुलीला चक्क आपल्या पित्याच्या हातून अन्याय सहन करावा लागतो, पोलीसही संधीचा फायदा उचलायला मागेपुढे पाहत नाहीत, ती ओरडून ओरडून आपल्यावरील अन्यायाची कहाणी सांगत असताना ऐकणारे इतके बधीर का झाले होते? तिचा बाप गुन्हेगारी प्रवृत्त्तीचा पण प्रभावशाली व्यक्ती आहे पण त्याला रोकायाला समाजातील कोणीही पुढे येवू नये? संपूर्ण प्रकरणात आशा आणि अपर्णा या दोनच महिला लक्ष्मीला साथ देताना दिसतात. बाकीचा समाज का झोपला असावा? उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिकेच्या सुनावणीच्या वेळी म्हणजे २०११ सालीच लक्ष्मीने तिच्यावरील लैंगिक अत्याचाराची कहाणी कथन केली होती. उच्च न्यायालयाला स्वत:हून प्रकरणाची दखल घेता आली नसती का? तिच्या तक्रारीची योग्य ती कायदेशीर दखल घ्या असे पोलिसांना बजावता आले नसते का? गुन्हा घडतोय, घडलाय हे समजले असताना न्यायालयाने का म्हणून झापडबंद पद्धतीने वागावे? नशीब त्या लक्ष्मीचे की दोनच वर्षांत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, नाही तर १०-१५ वर्षे लागली असती तर झालेच. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात काही विशिष्ट कालावधीत तपास पूर्ण करावा असे वेळेचे बंधन घालायला हवे होते असे मला वाटते. आता सीबीआय काय दिवे लावते ते काळच सांगेल.

अॅड. अतुल सोनक

९८६०१११३००   

No comments:

Post a Comment