Thursday, March 5, 2015

कौन है अपना, कौन पराया?

कौन है अपना, कौन पराया?

आपल्या मृत्यूनंतर आपली सर्व स्थावर-जंगम मालमत्ता आपली सेवासुश्रुषा करणाऱ्या आपल्याच एका आवडत्या विद्यार्थ्याला देण्याबाबतचे मृत्यूपत्र करणाऱ्या वृद्ध शिक्षिकेचा मृत्यू होतो. शव-विच्छेदन अहवालात गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न होते. खुनाचा गुन्हा दाखल होतो आणि तिच्या खुनाच्या आरोपाखाली तोच विद्यार्थी गोवला जातो. सत्र आणि उच्च न्यायालयाने त्याला खुनाचा दोषी मानल्यामुळे जन्मठेपेची सजा भोगणाऱ्या या विद्यार्थ्याची सर्वोच्च न्यायालयात निर्दोष सुटका झाली. कशी ते बघा...........

कर्नाटकातील उडुपी जवळच्या नजारू, केलारकलाबेत्तू या खेड्यात डोरथी कुतिन्हो नावाची एक शिक्षिका राहत होती. तिच्यासोबत तिचा रूडॉल्फ कुतिन्हो नावाचा एक सख्खा भाऊ राहत असे. तो मनोरुग्ण होता. डोरथी एक सुखवस्तू स्त्री होती. तिच्याजवळ भरपूर दागदागिने, बँक आणि इतर वित्तीय संस्थांमधे मुदत ठेवी, राहते घर असे सगळे व्यवस्थित होते. तिला दोन सावत्र भाऊ होते, अंथोनी आणि सायमन. अंथोनी वेगळा रहायचा तर सायमन अमेरिकेत होता. आनंदा पुजारी हा डोरथीचा एक विद्यार्थी. उतारवयात आपली आणि आपल्या मनोरुग्ण भावाची काळजी घ्यायला आणि सेवासुश्रुषा करायला डोरथी आनंदाला तिच्या घरी घेवून आली. तो तिच्या मुलासारखाच वागू लागला. तिचा त्याच्यावर खूप विश्वास होता. आनंदा डोरथी आणि रूडॉल्फची भरपूर सेवा करीत असे. त्याच्या नि:स्वार्थ सेवेमुळे डोरथी त्याच्यावर खूप खुश होती. ती सुद्धा त्याच्यावर आईसारखी प्रेम करू लागली. आनंदा तिच्याच घराच्या आवारात एक सर्विस स्टेशन चालवू लागला.

डोरथीला रूडॉल्फ आणि आनंदाशिवाय कोणीच जवळचे नव्हते. तिची तब्येत म्हातारपणामुळे वारंवार बिघडू लागली आणि निरनिराळ्या व्याधी जडू लागल्या. आता आपले काही खरे नाही, मृत्यू केव्हाही येवू शकतो, हे कळल्यावर डोरथीने आपल्या मृत्यूनंतर आपली सर्व स्थावर-जंगम मालमत्ता आनंदाला मिळावी म्हणून मृत्यूपत्र लिहून ठेवले. फक्त त्यात एक अट होती. आनंदाने ख्रिश्चन मुलीशी लग्न केल्यासच त्याला डोरथीच्या मृत्यूनंतर ही सर्व स्थावर-जंगम मालमत्ता मिळणार होती. तिच्या आणि तिच्या भावाच्या मृत्यूनंतर दोघांवर अंत्यसंस्कार करण्याचे अधिकारही आनंदालाच देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पुढे बघा, काय होते ते.......

दि.१.०३.२००६ रोजी डोरथीला तिच्या छातीत दुखत असल्यामुळे आनंदा इस्पितळात घेवून गेला. तिथे पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तिथे हजर असलेल्या डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिचा मृत्यू झाला असे प्रमाणपत्र आनंदाला दिले. आनंदाने अंथोनीला फोन करून डोरथीच्या दु:खद मृत्यूची बातमी कळवली. त्याने सायमनला कळवले. तो अमेरिकेहून अंत्यसंस्कारासाठी निघाला. तो येईपर्यंत डोरथीचा मृतदेह शवागारात ठेवायचे ठरले. दि.५.०३.२००६ रोजी डोरथीच्या मृतदेहाचे शव-विच्छेदन करण्यात आले. शव-विच्छेदन अहवालात डोरथीचा मृत्यू तिचे नाक आणि गळा दाबल्यामुळे गुदमरून झाला होता असे म्हटले होते. या अहवालामुळे डोरथीचा अज्ञात आरोपीने खून केल्याबद्दल दि.७.०३.२००६ रोजी FIR  नोंदवण्यात आला. पोलिसांनी तपास करून आनंदानेच डोरथीचा खून केला असा निष्कर्ष काढला आणि त्याला अटक करून त्यांचेविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम ३०२ आणि २०१ अन्वये दोषारोपपत्र दाखल केले.

उडुपीच्या सत्र न्यायालयात आरोपी आनंदाविरुद्ध खटला चालला. १४ साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून सत्र न्यायाधीशांनी आरोपी आनंदाला डोरथीच्या खुनासाठी दोषी ठरवले आणि त्याला जन्मठेपेची सजा सुनावली. आनंदाने केलेल्या अपिलात कर्नाटक उच्च न्यायालयानेही दि. १४.०२.२०१३ रोजीच्या आदेशान्वये सत्र न्यायालयाचाच निकाल कायम ठेवला.

आनंदावर आरोप असा होता की त्याला डोरथीच्या मृत्यूनंतर तिची सगळी मालमत्ता मिळणार असली तरी तिच्या मृत्यूपर्यंत थांबायची त्याची तयारी नव्हती म्हणून त्याने त्या दिवशी सकाळी तिची नाक-तोंड-गळा दाबून हत्या केली आणि हृदयविकाराचा झटका आल्याचे कारण दाखवीत इस्पितळात घेवून गेला. साक्षी-पुरावे आनंदानेच खून केला असे दर्शवित होते, असे सत्र आणि उच्च न्यायालयाचे मत होते. त्याने जाणूनबुजून डोरथीला दूरच्या “आदर्श हॉस्पिटल” मधे नेले वास्तविक रिक्षावाला त्याला जवळच्या इस्पितळात ने म्हणून म्हणत होता. डोरथीची मुदत ठेवी प्रमाणपत्रे, मृत्यूपत्र, आम मुखत्यारपत्र, निरनिराळे दागदागिने हे सर्व आनंदाच्याच ताब्यात होते आणि त्यानेच दाखवलेल्या जागेवरून जप्त करण्यात आले होते.

उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यावर आनंदाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. या अपिलाची सुनावणी न्या. जे. चेलमेश्वर आणि न्या. ए.के. सिकरी यांच्या खंडपीठासमोर झाली. सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तिवाद करताना आनंदाच्या वकिलांनी सांगितले की आनंदानेच डोरथीचे शव तिचे सावत्र भाऊ येईपर्यंत ठेवायची इच्छा प्रगट केली होती. त्यानुसार ते कस्तुरबा मेडिकल हॉस्पिटल, मणिपाल येथे ठेवण्यात आले होते. त्याला मृत्युपत्रानुसार अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार असताना त्याने असे केले याचा अर्थ त्याच्या मनात कसलेही पाप नव्हते. तसेच त्याच्याच सांगण्यावरून अंथोनी ने पोलिसात तक्रार केली होती आणि शव-विच्छेदनही त्याच्याच म्हणण्यावरून करण्यात आले होते. हे सर्व डॉक्टरच्या साक्षीत आले आहे. ज्याच्या ताब्यात डोरथीचे सर्व काही होते, सर्व व्यवहार आम मुखत्यार पत्रामुळे ज्याच्या हातात होते, ज्याला तिच्या मृत्यूनंतर सर्व काही मिळणार होते, त्याने डोरथीचा खून करण्याची काहीच गरज नव्हती.

सर्वोच्च न्यायालयाने सर्व साक्षीपुरावे तपासले. सत्र आणि उच्च न्यायालयाचे निकालही बारकाईने तपासले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यावर सर्वोच्च न्यायालयाने दोन प्रश्न तयार केले? १) डोरथीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला की गुदमरून?, २) डोरथीचा खून झालेला असेल तर आनंदा खुनी आहे का?

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात साक्षी पुराव्याचा भरपूर उहापोह केला आहे. आनंदा डोरथीला नेहमी आदर्श हॉस्पिटल मधेच तपासणीसाठी न्यायचा म्हणून त्यादिवशीही तो तिला तिथेच घेवून गेला. डोरथी दारू प्यायची, तिला दारू सोडण्यास डॉक्टरांनी सांगितले होते. शव-विच्छेदन अहवालात तिच्या शरीरात अल्कोहोल सापडले होते. तिच्या शरीरावर काही जखमाही होत्या. घटनेच्या दिवशी दारुच्या नशेत ती पडली असावी, एखादी जड आणि कडक वस्तूवर ती आपटली असावी आणि त्यामुळे तिला जीवघेणी इजा झाली असावी या डॉक्टरांच्या मताचा विचार खालच्या न्यायालयांनी केलाच नाही त्यामुळे जेव्हा मृत्यूचे कारण निश्चित नव्हते (हृदयविकाराच्या झटक्यामुळे की गुदमरल्यामुळे) किंवा दोन दोन शक्यता होत्या, तेव्हा आरोपीला उच्च न्यायालयाने संशयाचा फायदा न देणे हे चूक झाले.

सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्या प्रश्नाचा विचार करताना आधीच्या प्रश्नात आरोपीला संशयाचा फायदा देवून त्याची सुटका करायला हवी होती असे मत व्यक्त केल्यामुळे या प्रश्नावर जास्त उहापोह करायची गरज नाही असे म्हटले तरीही आरोपी कसा निर्दोष आहे हे दर्शवणारी काही आणखी कारणे आमच्या नजरेस आली आहेत सबब त्याही प्रश्नावर चर्चा करणे उचित ठरेल. सर्वोच्च न्यायालय म्हणते, आनंदाचे नावाने डोरथीने ५.०७.२००५ रोजी मृत्यूपत्र करून ठेवले होते, तिचे सर्व दागदागिने आणि इतर मुदत ठेवी प्रमाणपत्रे वगैरे मौल्यवान वस्तू त्याचेच ताब्यात होते, सर्व व्यवहार त्याच्याच ताब्यात होते, तिच्या मृत्यूनंतर सगळे त्यालाच मिळणार होते, असे असताना सात महिन्यांनंतर त्याने तिचा खून का करावा? मृत्युपत्राप्रमाणे ख्रिश्चन मुलीशी लग्न केल्याशिवाय आनंदाला काहीही मिळणार नव्हते, त्यामुळे त्याने तिचा खून केला आणि त्या खुनामागे तोच हेतू होता, असा आरोप सरकार पक्षाचा होता पण खून केल्याने ख्रिश्चन मुलीशी लग्न करण्याची अट शिथिल होणार होती का? वास्तविक त्यांच्यात मुलगा आणि आई असे त्यांचे भावनिक नाते निर्माण झाले होते. तिने त्याला सांगून मृत्यूपत्र केले होते, सर्व काही त्याच्याच जवळ होते, असे असताना तो तिचा खून का करेल? डोरथीचे वय झालेले होते, तिला उच्च रक्तदाब, नैराश्य, वगैरे निरनिराळे आजार होते असे असताना तिला मारून त्याला काय मिळणार होते? साक्षी पुराव्यात असे आले की “आदर्श हॉस्पिटल” मधेच डोरोथी जेव्हा जेव्हा आजारी पडत होती तेव्हा तिच्यावर उपचार होत होते. असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीच आपल्या साक्षीत सांगितले त्यामुळे तिला त्याच दूरच्या इस्पितळात नेण्यात त्याचा काही वाईट हेतू होता असे वाटत नाही. युक्तिवादादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना विचारले की दागदागिने आणि इतर मालमत्ता कुठे आहे तर असे कळले की डोरथी चे सावत्र भाऊ अंथोनी आणि सायमन यांनी खटला सुरू असतानाच आणि आनंदा दोषी ठरण्यापूर्वीच तिची विल्हेवाट लावली. तसेच असेही विचारण्यात आले की डोरथी चा सख्खा भाऊ रूडॉल्फ जो तिच्याबरोबर राहायचा त्याचे काय झाले? उत्तर मिळाले की तिच्या मृत्यूनंतर काही महिन्यांतच त्याचाही मृत्यू झाला. आनंदा तुरुंगात होता, त्याचेकडे बघायला कोणी नव्हते. अंथोनी आणि सायमन यांनी त्याच्याकडे ढुंकूनही बघितले नाही.

सर्वोच्च न्यायालयाने साक्षीपुराव्यांचे योग्य रीतीने मूल्यमापन केले, खालच्या दोन्ही न्यायालयांनी आरोपीवर अन्याय केल्यासारखे आणि चुकीचे निष्कर्ष काढल्यासारखे वाटल्यामुळे खालच्या न्यायालयांच्या निर्णयात घटनेच्या १३६ कलमान्वये असलेल्या अधिकारांचा वापर करीत ढवळाढवळ केली आणि आरोपी आनंदाला डोरथीच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष सोडले. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दि.१४.१०.२०१४ रोजी पारित केला.

अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने साक्षीपुराव्याचे योग्य मूल्यमापन केल्यामुळे आनंदा दोषमुक्त झाला. आपल्या समोर आलेल्या साक्षी पुराव्यांचा योग्य अर्थ काढला आणि योग्य मूल्यमापन केले तर न्यायाधीशाने न्याय दिला/केला असे होते. प्रस्तुत प्रकरणात दोन न्यायालयांनी अयोग्य अर्थ काढल्यामुळे किंवा कायद्याला अभिप्रेत संशयाचा फायदा आरोपीला न दिल्यामुळे त्याला विनाकारण तुरुंगात खितपत पडावे लागले. त्याने खून का केला असावा याचे कुठलेही योग्य कारण/स्पष्टीकरण नसताना त्याला दोषी मानून सत्र न्यायालयाद्वारे सजा ठोठावली गेली आणि तो निर्णय उच्च न्यायालयाद्वारे कायम ठेवल्या गेला. कसे असते बघा, ज्याने डोरथी आणि मनोरुग्ण रूडॉल्फ ची मनोभावे सेवा केली त्याने डोरथीच्या खुनाच्या आरोपाखाली आठ वर्षे तुरुंगात काढली. जी स्थावर-जंगम मालमत्ता त्याला मिळणार होती, तिची विल्हेवाट अंथोनी आणि सायमन या डोरथीच्या सावत्र भावांनी लावून टाकली पण आपल्या सावत्र मनोरुग्ण भावाकडे ढुंकूनही बघितले नाही. म्हणतात ना.......कौन है अपना? कौन पराया?

अॅड. अतुल सोनक

९८६०१११३००      

No comments:

Post a Comment