Thursday, March 5, 2015

रूम नंबर ४५९

  रूम नंबर ४५९

तीन इटालियन पर्यटक भारतात येतात. गंगानगरी वाराणसीतील एका हॉटेलात त्या पैकी एकाचा खून होतो. उर्वरीत दोघांवर खुनाचा आरोप ठेवल्या जातो. सत्र आणि उच्च न्यायालयात त्यांना दोषी मानून जन्मठेपेची सजा सुनावली जाते. सर्वोच्च न्यायालयात काय होते आणि का होते? बघा..............

तोमासो ब्रुनो, एलिसा बेत्ता बॉन आणि फ्रान्सिस्को मॉन्तीस हे तीन इटालियन भारतभ्रमणासाठी दि. २८.१२.२००९ रोजी लंडनहून मुंबईत येतात. भारतात अनेक पर्यटनस्थळे बघितल्यावर हे तिघेही दि. ३१.०१.२०१० रोजी वाराणसीला येतात. राम कटोरा, वाराणसी येथील “हॉटेल बुद्धा” ते उतरतात. हॉटेल व्यवस्थापनातर्फे तिघांचीही ओळखपत्रे तपासल्यावर त्यांना हॉटेलमधील ४५९ क्रमांकाची खोली देण्यात येते. दोन दिवस ते तिघेही वाराणसी शहराचा फेरफटका मारतात. दि.३.०२.२०१० रोजी फ्रान्सिस्कोला जरा डोके दुखत असल्यामुळे बरे वाटत नसल्यामुळे ते उशिरा बाहेर पडतात आणि लवकर खोलीवर परत येतात आणि खोलीतच राहतात. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना “सुबहे बनारस” या सुप्रसिद्ध कार्यक्रमास जायचे असते.

दि.४.०२.२०१० रोजी सकाळी आठ वाजता एलिसा हॉटेल मॅनेजर रामसिंगकडे गेली आणि त्याला फ्रान्सिस्कोची तब्येत बिघडल्याचे सांगितले. रामसिंग, एलिसा आणि तोमासो फ्रान्सिस्कोला उपचारासाठी एस.एस.पी.जी.हॉस्पिटलमधे घेवून जातात. तिथले डॉक्टर फ्रान्सिस्कोला तपासून “brought dead”  म्हणून मृत घोषित करतात. रामसिंग लगेच पोलीस ठाण्यात या अकस्मात मृत्यूची माहिती कळवतो. हॉस्पिटलमधे उपस्थित असणारा अवधेशकुमार चौबे हा होमगार्ड सुद्धा फ्रान्सिस्कोच्या मृत्यूबाबत चेतगंज पोलीस ठाण्याला माहिती देतो. सब-इन्स्पेक्टर सागीर अहमद हॉस्पिटलला पोहचतात. इंक्वेस्ट पंचनामा केला जातो नंतर फ्रान्सिस्कोचा मृतदेह शव-विच्छेदनासाठी पाठवला जातो. डॉ. आर. के. सिंग यांनी दिलेल्या शव-विच्छेदन अहवालानुसार फ्रान्सिस्कोचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झालेला असतो. जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार पुन्हा एकदा दि.६.०२.२०१० रोजी शव-विच्छेदन केले जाते. डॉ. ए.के. प्रधान यांच्या नेतृत्वातील चमूही फ्रान्सिस्कोचा मृत्यू गळा आवळल्यामुळेच झाल्याचे सांगते.

शव-विच्छेदन अहवालानुसार फ्रान्सिस्कोच्या खुनाचा गुन्हा नोंदल्या जातो आणि पोलीस तपास सुरु होतो. रूम नं. ४५९ मधून चादर, उशी, टॉवेल, तसेच इतर बरेच काही जप्त केल्या जाते. चादरीवर मलमूत्राचे डाग असतात तर उशीवर लिपस्टिकचे डाग असतात. पोलीस निरीक्षक धरमवीर सिंग पुढील तपास करतात. हॉटेलचे वेटर्स आणि तोमासो तसेच एलिसाची बयाणे नोंदवली जातात. तोमासो आणि एलिसाने सांगितले की “सुबहे बनारस” या कार्यक्रमाला पहाटे चार वाजता जायला ते निघाले तेव्हा फ्रान्सिस्कोला बरे नसल्यामुळे तो झोपूनच होता. ते कार्यक्रम आटोपून हॉटेलवर परत आले तेव्हा त्याची तब्येत जास्तच बिघडलेली दिसली म्हणून ताबडतोब राम सिंगला कळवून त्याला हॉस्पिटलमधे नेण्यात आले. एकंदरीत परिस्थिती बघता, तोमासो आणि एलिसा हेच सकृतदर्शनी आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न होत असल्यामुळे त्यांना फ्रान्सिस्कोच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. नंतर संपूर्ण तपास झाल्यावर त्यांचेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सत्र न्यायालयात सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींचा बचाव हाच होता की संध्याकाळी त्यांनी हॉटेल च्या खोलीवरच दोन प्लेट फ्राईड राईस मागवला होता, ते तिघेही जेवले  आणि झोपी गेले. पहाटे चार वाजता “सुबहे बनारस” बघण्यासाठी हे दोघे गेले तेव्हा फ्रान्सिस्कोला बरे वाटत नसल्यामुळे तो आला नाही आणि खोलीतच झोपून राहिला. आठ वाजता हे दोघे परत आले तेव्हा तो बेशुद्धावस्थेत पलंगावर पडलेला आढळला. त्यामुळे लगेच राम सिंगला सांगून त्याला हॉस्पिटलला नेण्यात आले. बाकी त्यांना काही माहित नाही.

सत्र न्यायालयाने सर्व साक्षीपुरावे तपासून आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून दोन्ही आरोपींना फ्रान्सिस्कोच्या खुनासाठी दोषी धरले आणि त्यांना जन्मठेपेची सजा सुनावली. तसेच २५००० रुपये दंडाचीही सजा सुनावली. दोन्ही आरोपींनी अलाहाबाद उच्च न्यायालयात या  निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले. परंतु उच्च न्यायालयानेही दि.४.१०.२०१२ चे आदेशान्वये सत्र न्यायालयाचा निर्णय ग्राह्य धरला आणि अपील फेटाळले. सत्र न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवण्यासाठी ग्राह्य धरलेले परिस्थितीजन्य पुरावे असे........
१)    ३ तारखेच्या रात्रीपासून ४ तारखेच्या सकाळपर्यंत आरोपी आणि मयत व्यक्तीशिवाय कोणीच रूम नं.४५९ मधे गेले नव्हते. त्यामुळे फक्त आरोपींनाच खून करण्याची संधी उपलब्ध होती.
२)    आरोपींनी मयत फ्रान्सिस्कोच्या शरीरावरील जखमांबद्दल कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही.
३)    ४ तारखेला पहाटे ४ वाजता आरोपी बाहेर गेले होते आणि खुनाच्या तथाकथित घटनेच्या वेळी ते खोलीत नव्हतेच असा बचाव त्यांनी घेतला.
४)    आरोपींमधील जवळीकीमुळे एक प्रेमत्रिकोण निर्माण झाला होता आणि फ्रान्सिस्कोचा कायमचा काटा काढण्याचे उद्देशाने त्याचा गळा  दाबून खून करण्यात आला.
५)    फ्रान्सिस्कोचा खून गळा दाबून/आवळून करण्यात आला हे वैद्यकीय पुराव्यावरून स्पष्ट होते.
या सर्व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे सत्र न्यायालयाने आरोपींनीच खून केल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्यामुळे त्यांना गुन्हेगार मानून जन्मठेपेची सजा सुनावली आणि उच्च न्यायालयानेही तोच निर्णय कायम ठेवला. आरोपींना दोन्ही निर्णय मान्य नसल्यामुळे त्यांनी विशेष अनुमती याचिकेद्वारे या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी न्या. अनिल आर. दवे, न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. आर. बानुमथी यांच्या खंडपीठासमोर झाली. 

सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तिवाद करताना आरोपींचे वकील अॅड. हरीन पी. रावल यांनी दोन महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. एक म्हणजे खुनाचा हेतू सरकार पक्ष सिद्ध करू शकला नाही. प्रेमत्रिकोण वगैरे हा फक्त खयाली पुलाव होता. दोन्ही आरोपींची जवळीक होती आणि त्यामुळे त्यांनी फ्रान्सिस्कोचा काटा काढला, हे सिद्ध करण्यासाठी काहीही पुरावा नाही. तिन्ही पर्यटक हे इटालियन होते, त्यांची संस्कृती आपल्यासारखी नाही. सरकार पक्षाने खुनासाठी काहीतरी हेतू (motive) सांगायचा म्हणून प्रेमत्रिकोण हा हेतू सांगितला परंतु तो कुठल्याही साक्षी पुराव्यावरून सिद्ध झालेला नाही. दुसरा आणि महत्वाचा मुद्दा हा की हॉटेलमधे क्लोज सर्किट टी.व्ही. बसवण्यात आलेले होते. हॉटेल च्या रूम बाहेरील लाउंज, जिना, प्रवेशद्वार, स्वागतकक्ष, इत्यादी ठिकाणच्या हालचाली यात टिपल्या जातात. त्यामुळे ३ तारखेच्या संध्याकाळपासून ४ तारखेच्या सकाळपर्यंत रूम नं. ४५९ मधे कोण आले, कोण गेले, काही संशयास्पद घडले काय? अशा प्रश्नांची उत्तरे सीसीटीव्ही फुटेज तपासून मिळू शकतात. परंतु सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी पुरावा म्हणून सत्र न्यायालयासमोर आणलेच नाही. तंत्रज्ञान इतके पुढे गेले असताना आणि पुरावा कायद्यानुसार योग्य आणि स्वीकार्य पुरावा असताना तसे न केल्यामुळे पोलिसांचीच भूमिका संशयास्पद ठरते. सर्वात चांगला उपलब्ध पुरावा न्यायालयापुढे न आणणे अयोग्य आहे आणि सरकार पक्षासाठी घातक आहे.

या प्रकरणातील चौकशी/ तपास अधिकाऱ्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले होते आणि आपल्या साक्षीत त्याने तसे सत्र न्यायालयात सांगितलेही होते. आरोपी घटनेच्या वेळी खरेच खोलीच्या बाहेर गेले होते की आताच होते हे सीसीटीव्ही फुटेज वरून लक्षात आले असते. आणखी कोणी खोलीत गेले होते का, हेही दिसले असते. राम सिंगने आपल्या जबानीत सांगितले की त्याने सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्या कालावधीत कोणीच रूम नं. ४५९ च्या आत किंवा बाहेर गेले नाही. तपास अधिकाऱ्यानेही आपल्या जबानीत सांगितले की त्याने पूर्ण फुटेज पाहिले. त्याला काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. सर्वोच्च न्यायालय म्हणते, असे असताना सत्र आणि उच्च न्यायालयाने राम सिंग आणि तपास अधिकाऱ्याच्या जबानीवर विश्वास ठेवणे योग्य नाही. “The trial court and the High Court, in  our view, erred in relying upon the oral evidence of PW-1 and  PW-13  who  claim to have seen the CCTV footage and they did not find anything  which  may  be of relevance in the case.” सत्र न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज, आरोपींचे जप्त केलेले सीम कार्ड डिटेल्स, मोबाईल फोन्स, इ. न्यायालयात दाखल न करणे हे चुकीच्या तपासाची निदर्शक आहेत पण त्यामुळे सरकार पक्षाच्या केसवर कुठलाही परिणाम होत नाही. पण सर्वोच्च न्यायालय म्हणते की सर्वात चांगला उपलब्ध पुरावा दडवण्याचा हा प्रकार आहे. पुरावा कायद्यानुसार जो पक्ष त्याचेजवळ उपलब्ध असलेला सर्वात चांगला पुरावा न्यायालयासमोर आणत नाही त्याचेविरुद्ध न्यायालय प्रतिकूल निष्कर्ष/अनुमान (adverse inference) काढू शकते. या प्रकरणात उच्च न्यायालय म्हणते की आरोपींनी सीसीटीव्ही फूटेज न्यायालयात दाखल करण्यासाठी अर्ज करायला हवा होता. पण सर्वोच्च न्यायालयाला ते पटले नाही आणि सरकार पक्षाची ते दाखल न करण्याची कृती सरकार पक्षाविरुद्ध प्रतिकूल अनुमान काढण्यायोग्य आहे असे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे. तसेच ज्या डॉक्टरने फ्रान्सिस्कोला सर्वात पहिले तपासले आणि मृत घोषित केले त्यालाही तपासण्यात आले नाही. त्याने दिलेले प्रमाणपत्र दाखल करण्यात आले नाही. असे अनेक महत्वाचे पुरावे न्यायालयासमोर आणण्यात आले नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाने आणखी एका महत्वाच्या बाबीवर लक्ष वेधले आहे. खालच्या दोन्ही न्यायालयांनी फ्रान्सिस्कोचा गळा आवळण्याची कुठलीही निशाणी किंवा पुरावा नसल्याच्या वैद्यकीय अहवालाकडे/ डॉक्टरच्या जबानीकडे साफ दुर्लक्ष केले. सबळ पुराव्यांची साखळी सिद्ध झालेली नसताना आणि अत्यंत महत्वाचा पुरावा न्यायालयासमोर आणलेला नसताना आरोपींना दोषी मानणे योग्य नाही असे मत व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही आरोपींचे अपील मंजूर केले आणि त्यांना संशयाचा फायदा देत निर्दोष सोडण्याचा निर्णय दि. २०.०१.२०१५ रोजी दिला.

अशा प्रकारे इटालियन नागरिकांना भारतीय न्यायव्यवस्थेची ओळख झाली. पाच वर्षात त्यांना कसल्या कसल्या अनुभवांना सामोरे जावे लागले असेल याची कल्पनाच केलेली बरी. भारतीय पोलीस ठाणे, न्यायालय आणि तुरुंग, याठिकाणी त्यांना आलेले अनुभव त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून नक्कीच शब्दबद्ध करण्यासारखे असतील. त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून पाच वर्षातच त्यांची सुटका झाली. आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी पुन्हा दुविधा हीच की त्यांनीच खून केला असेल तर ते सुटावे यासाठी पोलिसांनीच तर हे कच्चे दुवे ठेवले नसतील? पोलिसांनी हे जाणून बुजून केले नसेल तर अशा अक्षम्य चुका का केल्या जातात? आणि आरोपींनी खून केला नसेल तर खरे आरोपी कोण? खरे आरोपी समोर येवू नये म्हणून तर सीसीटीव्ही फुटेज न्यायालयासमोर आणण्यात आले नाही? अर्थात अशी दुविधा असली तर आरोपींना संशयाचा फायदा दिल्या जातो आणि तोच फायदा आरोपींना मिळाला. नाहीतर तथाकथित प्रेमत्रिकोणातील चौथा कोण उजेडात आला असता...........

अॅड. अतुल सोनक
९८६०१११३००              

     

No comments:

Post a Comment