Thursday, July 31, 2014

बलात्कारांचे वास्तव

बलात्कारांचे वास्तव

सध्या आपल्या देशात बलात्कार किंवा लैंगिक अत्याचारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आकडेवारी तर असे सांगते की दर तीस मिनिटांना आपल्या देशात एक बलात्कार होतो. मध्य प्रदेश हे राज्य बलात्कारांच्या संख्येत सगळ्यात आघाडीवर आहे. भारतातील २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमधे २००१ ते २०१३ या वर्षांत २,७२,८४४ बलात्काराच्या तक्रारी करण्यात आल्या. २००१ साली भारतात १६०४५ बलात्काराच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या तर २०१३ साली ३३७०७ तक्रारी करण्यात आल्या.  काही अभ्यासकांच्या मते निरनिराळ्या कारणांस्तव ५४% बलात्काराच्या तक्रारीच केल्या जात नाहीत तर काहींच्या मते हे प्रमाण ९०% इतके आहे. वेगवेगळया संस्था उपलब्ध आकडेवारीनुसार आपापले निष्कर्ष काढत असतात, मांडत असतात. तसे पाहिले तर भारतात बलात्कारांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेने कमी आहे. पश्चिम युरोप, अमेरिका, दक्षिण आफ्रिका या देशांत बलात्कारांचे प्रमाण कितीतरी जास्त आहे. याचा अर्थ आपल्या इथे बलात्काराच्या गुन्ह्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही असे मात्र नाही.

आकडेवारी कमी जास्त असू शकते त्यामुळे प्रमाण/टक्केवारी कमी जास्त असू शकते. तसेच निष्कर्ष ही वेगवेगळे असू शकतात. पण या सर्व आकडेवारीत एक अत्यंत आश्चर्यजनक, चिंताजनक आणि खेदजनक बाब अशी दिसली की बहुतांश बलात्कार हे परिचितांकडूनच केले जातात. २०१२ सालच्या आकडेवारीनुसार (National Crime Record Bureau….Annual Report 2013) भारतभर बलात्काराची तक्रार झालेल्या २४,९२३ प्रकरणांपैकी २४,४७० बलात्कार पीडितेचे नातेवाईक किंवा शेजारी किंवा परिचित यांनी केलेले होते. याचा सरळ सरळ अर्थ असा की ९८% बलात्कारी परिचित असतात तर फक्त २% अपरिचित लोक बलात्कार करण्यास धजावतात.
आजकाल दूरचित्रवाहिन्या, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांना जगायचे असेल तर सतत काही ना काही सनसनाटी दाखवायचे असते, छापायचे असते त्यामुळे एखादी बलात्काराची घटना घडली की वार्ताहर/प्रतिनिधी राजकीय नेते (सत्ताधारी आणि विरोधक), सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, संत, समाज सुधारक यांच्याजवळ जावून त्यांच्या प्रतिक्रिया गोळा करतात आणि २४X७ दाखवत बसतात किंवा त्यावर चर्चा करीत बसतात. वर्तमानपत्रात त्यावर लेख लिहिले जातात. एखादा विषय चावून चावून चोथा झाला की दुसरे विषय हाताळले जातात किंवा दुसरा सनसनाटी विषय मिळेपर्यंत पहिला विषय चघळला जातो. प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या अकलेचे तारे तोडतो. यात तथाकथित संस्कृतीचे पाईक असतात, समाजवादी विचारवंत असतात, ज्यांच्या मताला कोणी हिंग लावून विचारीत नाहीत (म्हणजे लोकशाहीच्या अंगाने) असे साहित्यिक असतात, मुलायमसिंहांसारखे राजकारणी असतात, साधूसंत असतात. प्रत्येकाची आपापली मते असतात. सर्वांच्या मताचा आदर करायलाच हवा. समाजहितास पोषक नसणाऱ्या विचारांचे खंडनही करायलाच हवे. प्रत्येक जण  आपापल्या बुद्धीप्रमाणे आपले मत मांडतो. परंतु ९८% बलात्कार हे परिचितांकडूनच केले जातात यावर पाहिजे तसे विचारमंथन झालेले दिसत नाही.

कोणी स्त्रियांच्या कपडे घालण्यावर बोलतात, कोणी वाढत्या दूरचित्रवाहिन्या, चित्रपटातील अश्लील हावभाव, इंटरनेट, मोबाईलचे वाढते  प्रस्थ याला बलात्कारासाठी दोषी मानतात. कोणी पोलिसांच्या आणि न्यायपालिकेच्या अकार्यक्षमतेला जबाबदार धरतात. कोणी तरुणांकडून अशा चुका होतीलच असे मानतात. असो. जवळचे नातेवाईक, मित्र आणि परिचितांकडूनच बहुतांश बलात्कार होत असतील तर आपल्या कुटुंबव्यवस्थेलाच जबाबदार धरावे लागेल. आपली कुटुंबव्यवस्था कुठे तरी कमी पडतेय. आपल्या मुलामुलींचे पालनपोषण, संगोपन यात आपणच कुठे तरी कमी पडतोय असे मानायची वेळ आली आहे.

आपली मुले किंवा मुली दिवसभर किंवा बरेचदा रात्रीही कुठे जातात, काय करतात?, त्यांच्या मित्रमैत्रिणी कोण आहेत?, फोनवर किंवा सोशल मिडीयावर त्यांच्यात काय संभाषण चालते?, शाळा, कॉलेज किंवा शिकवणीवर्गाला नियमित जातात का? बगीच्यात किंवा तलावाच्या-नदीच्या-समुद्राच्या किनाऱ्यावर तोंडाला दुपट्टा बांधून प्रियकराच्या बाहुपाशात बसलेली मुलगी आपली आहे का? किंवा त्याच्या प्रियेला जवळ घेवून बसलेला मुलगा आपला आहे का?...........हे सर्व बघण्याची जबाबदारी कोणाची? आपलीच ना? त्यांना बंधनात-धाकात न ठेवता मित्र-मैत्रिणीप्रमाणे समजावयाची जबाबदारी कोणाची? आपण पालक म्हणून जबाबदारी घ्यायलाच हवी. योग्य काय अयोग्य काय? हे मुलामुलींना समजावून सांगण्याची जबाबदारी कोणाची. खाण्यापिण्याची, कपडालत्त्याची, शिक्षणाची सोय केली म्हणजे आपले कर्तव्य संपले काय?

मध्यंतरी “हायवे’ नावाचा एक हिंदी चित्रपट येवून गेला. त्यात नायिकेच्या लहानपणी तिच्या काकांनीच तिचे कसे लैंगिक शोषण केले होते आणि तिच्या कुटुंबीयांनीच ते प्रकरण बदनामीच्या भीतीपोटी कसे दाबले होते, याचे अत्यंत समर्पक चित्रण केले होते. ओळखीच्या म्हणजेच कुटुंबातल्या व्यक्तीने तिचा लैंगिक गैरफायदा घेतला पण तिचे अपहरण करणाऱ्या अनोळखी तरुणाने तिला कसलाही त्रास दिला नाही अशी कथा होती. कुटुंबात असे प्रकार घडत असतात पण बदनामीपोटी, खोट्या अस्मितेपोटी ते दाबले जातात. पीडित मुलगीही आपल्या आणि कुटुंबाच्या बदनामीच्या भीतीपोटी तक्रार करायला धजावत नाही. अशी अनेक प्रकरणे दाबली जात असतात. अशा प्रकरणात तक्रार करावी की नाही यावरही मतमतांतरे आढळतील. स्त्रीचे चारित्र्य आणि योनिशुचिता यांच्या नावाखाली पुरुषांनी केलेले गैरप्रकार आणि अत्याचार स्त्री-पुरुष पालकांकडून दाबले जातात. या प्रकरणात पुढे काय होईल, तक्रारीची योग्य दखल घेतली जाईल की नाही?,  आरोपीस सजा होईल की नाही? खटल्याला वेळ किती लागेल?, पीडित मुलीचे लग्न होईल की नाही? अशा अनेकानेक प्रश्नांच्या ओझ्याखाली लैंगिक अत्याचार दाबले जातात.

मागे मुंबईच्या शक्तीमिल परिसरात एका तरुणीवर तिच्या मित्रासमोर जो सामुहिक बलात्कार झाला त्यावर खूप चर्चा झडत होत्या. एका फेसबुक मित्राने बलात्काराच्या आरोपीचे लिंग ठेचण्याचा सोहळा भर चौकात आयोजित करावा असा उपदेश केला होता. त्यावर मी सध्याच्या प्रचलित कायदा आणि न्यायव्यवस्थेत हे करणे शक्य नाही, आरोप खोटेही असू शकतात त्यामुळे ते न्यायालयात सिद्ध होणेही गरजेचे असते, अशी  तार्किक आणि कायदेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताच अनेक मित्र मैत्रिणी माझ्यावर तुटून पडले आपल्या शब्द बाणांनी वकील, न्यायव्यवस्था, पोलीस यांना अक्षरश: झोडपून काढले. तक्रारी खोट्याही असू शकतात हे कोणी मानायलाच तयार नव्हते. आरोप सिद्ध झाल्यावरही कायद्यात नमूद शिक्षाच आरोपीला करता येईल याचेही भान ठेवल्या जात नाही आणि हे जे आकांडतांडव करणारे असतात ना तेच त्यांच्या घरात एखादी अशी घटना घडल्यावर बदनामीच्या भीतीपोटी प्रकरण दाबण्यात पुढाकार घेतात.

स्त्री-पुरुष संबंध, लैंगिक अत्याचार वगैरे विषयाच्या अभ्यासक-विचारवंत-लेखिका मंगला सामंत यांच्या मते “ कामवासनेवरील संयम हा, विविध नियम-बंधनांनी मुला-मुलींना जखडून ठेवणे, त्यांच्या भेटण्यावर, पोशाखावर, बंदी घालणे यामुळे निर्माण होत नसतो. उलट अशा अडवणुकीमुळे कामवासना अधिक उफाळून अविचाराने बाहेर पडू पाहते, कारण शेवटी ती शारीरिक घडामोड आहे. त्याशिवाय टेस्टास्टेरोन हार्मोनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, माणसामध्ये ते आव्हान घेण्याची वृत्ती निर्माण करणारे हार्मोन आहे. अर्थात मुला-मुलींच्या भेटण्यामधे आणलेला अडथळा, मुलींवरचे पहारे, शिक्षा, संरक्षण वगैरे बंदोबस्त हे टेस्टास्टेरोन वाढलेल्या स्थितीमध्ये तारुण्यात त्यांना एक आव्हान वाटते. त्यात हे हार्मोन नेहमीच उच्च पातळीत असणाऱ्या पुरुषांमध्ये विविध आव्हाने स्वीकारण्याची वृत्ती आधीचीच वसलेली असते. म्हणून कामावासानेवरील बंदीचे आव्हान तरुण पुरुष सहज स्वीकारतो आणि पहारे तोडून, बंदी व  संभाव्य शिक्षेची पर्वा न करता बऱ्यावाईट मार्गांनी स्त्री-संबंध साधणे ही त्याची महत्त्वाकांक्षा बनते, ज्याला आपण गुन्हा मानतो.” (आजचा सुधारक मासिक, फेब्रुवारी २०१४ मधून साभार)

उपरोक्त अंगाने विचार केल्यास बलात्काराचा गुन्हा घडण्यास आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि संबंधिताची शारीरिक-मानसिक स्थिती ही कारणीभूत असते असे समजायला हरकत नाही. मंगला सामंत असेही म्हणतात की जोपर्यंत समाजामध्ये पुरुषांना आव्हान वाटण्याजोगे वातावरण तयार होत राहील तोपर्यंत पुरुष ते आव्हान घेत राहतील आणि गुन्हे घडत राहतील. कामेच्छेबाबत व्यक्त होण्याची पारंपारिक नकारात्मक भूमिका आणि बंधने रद्द करणे हा त्यावरील उपाय त्या सुचवितात.

बलात्काराची कारणमीमांसा आपण बघितली आता परिचितांमध्येच त्याचे प्रमाण जास्त का आढळत असावे? याचाही विचार करणे गरजेचे आहे. कुठलाही गुन्हेगार सहजसाध्य (easily accessible) ठिकाणीच गुन्हा करेल ना? दूर कशाला जाईल? तुटलेल्या लिव्ह-इन संबंधांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे असे नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने एका निकालपत्रात म्हटले. इतर नातेसंबंधांमध्येही बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. आधी संमतीने लैंगिक संबंध ठेवले जातात आणि कुठे उघड झाल्यास तक्रार केली जाते असेही प्रकार घडतात. प्रेमप्रकरणातही बरेचदा असे घडते. जाती, धर्म, पंथ, वर्ग असेही अनेक कंगोरे अशा बाबतीत असतात. ओळखीच्याच स्त्रीवर/मुलीवर बलात्कार का केला जातो, याचे एक महत्त्वाचे कारण सामंत यांनी दिलेलेच आहे........कामेच्छेबाबत नकारात्मक भूमिका आणि बंधने. जितके तिचे दमन केले जाईल तितकी कामभावना उचंबळून येईल आणि त्याला शरीर रचना आणि हार्मोन कारणीभूत आहे. आता याला गुन्हा मानायचे का एक प्रकारचा रोग?    

कायद्यातील “बलात्कार” किंवा “लैगिक अत्याचाराची” व्याख्या नुकतीच बदलण्यात आली. त्यामुळे वास्तव बदलणार नाही. फक्त आकडेवारी कमी जास्त होईल. मुलामुलींवर योग्य संस्कार करणे, त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ करणे, चारित्र्यनिर्माणावर भर देणे, दुष्कृत्य करायला कोणीही धजावणारच नाही असे वातावरण तयार करणे, सामाजिक भान शिकवणे, लैंगिक विषयांचा बाऊ न करणे, कायदे, बंधने आणि नियम यांची गरज का निर्माण झाली ते बालवयापासून शिकवणे, नैतिक काय अनैतिक काय ते सांगणे............ असे सर्व प्रकार आपण म्हणजे पालकांनी सुरु केले तर आणि तरच बलात्कारासारखे गुन्हे कमी होतील अन्यथा आहे तसेच सुरु राहणार यात शंका नाही. 


अ‍ॅड. अतुल सोनक, 
९८६०१११३००                                                   

No comments:

Post a Comment