Friday, July 4, 2014

खोट्या अस्मितेचे बळी

खोट्या अस्मितेचे बळी


जातीप्रथा नष्ट व्हायला पाहिजे, हे सुधारकांनी आणि विचारकांनी कितीही सांगितले असले तरी आपल्या देशात जातीचे महत्त्व किती आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. “जात नाही ती जात” असे म्हटले जाते ते यामुळेच.  कित्येक संत, महात्मे, समाज सुधारक, संघटना, संस्था, यांनी अनेक प्रयत्न करून पाहिले पण जाती प्रथा, हुंड्याची प्रथा, निरनिराळ्या अंधश्रद्धा, काही केल्या नष्ट होत नाहीत. सुधरायचेच नाही असे ठरवूनच आपण जन्माला येतो की काय कोण जाणे? जाती आणि धर्माची अस्मिता इतकी ताणली जाते की एकमेकाचे मुडदे पाडण्यासही लोक कमी करीत नाहीत. दिल्लीच्या एका प्रकरणात अशाच प्रेमप्रकरणातून एका २४ वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. त्या खुनाच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने आजच्या समाजातील वास्तवाकडे लक्ष वेधले आहे, कसे ते आपण बघू........

कुलदीप नावाचा एक युवक दिल्लीतील उत्तम नगरातील एका घरात (घर क्र. ७३, सेवक पार्क) आपली आई, बहिण यांनी एक भाऊ यांच्यासोबत राहत होता. जवळच (घर क्र.७१) सपना नावाची एक युवती तिचे वडील रविकुमार आणि इतर कुटुंबीयांसोबत राहत होती. कुलदीप आणि सपनाचे प्रेम जुळले. हा प्रकार रविकुमार यांना आवडला नाही.  त्यांचे प्रेमप्रकरण रंगात आलेले बघून दोन्ही कुटुंबात तणावाचे संबंध निर्माण झाले आणि एकमेकाचा राग केल्या जावू लागला. इतका की रविकुमार आणि त्याच्या तीन भावांनी कुलदीपचा खून करायचे ठरवले.

दि.१४.१०.२००६ रोजी रात्री ८.४५ वाजता कुलदीप त्याचा भाऊ सनी आणि चुलत भाऊ रुपेश वाल्मिकी मंदिरातून परत येत असताना श्याम खन्ना यांच्या घरासमोर आले असताना बाजूच्या गल्लीत दबा धरून बसलेले रविकुमार आणि त्याचे तीन भाऊ, करमवीर, राजकुमार आणि संजय त्यांचे समोर आले आणि रविकुमार इतरांना उद्देशून म्हणाला, “कुलदीपने आपली मुलगी सपनासोबत प्रेम करून आपली इज्जत घालवली आहे आणि आपल्या इभ्रतीला नुकसान पोहचवले आहे, आपण त्याला मारून टाकले पाहिजे.” त्याने असे म्हणता क्षणीच राजकुमारने कुलदीपचे हात धरले आणि करमवीरने पाय धरले. सनी आणि रुपेश कुलदीपला वाचवायला पुढे आले असता संजयने त्याच्या हातातील दंडा उगारला आणि त्यांना मध्ये न पडण्यास बजावले. तेवढ्यात रविकुमारने त्याच्या हातातील भल्या मोठ्या सुऱ्याने कुलदीपच्या पोटावर आणि छातीवर सपासप वार केले. कुलदीपवर वार केल्यानंतर तो गंभीर जखमी झाल्यावर चारही आरोपी त्यांच्या घरी पळून गेले.

रात्री ९.१५ वाजताचे सुमारास जवळच्या पोलीस ठाण्यात सूचना मिळताच तिथले पोलीस घटनास्थळावर पोहचले. घटनास्थळावर एक दंडा, कुलदीपच्या हवाई चपला पडलेल्या होत्या. बरेच रक्त सांडलेलेही दिसत होते. तिथे पोलिसांना कळले की कुलदीपला पंचशील हॉस्पिटलमधे नेण्यात आले आहे. पोलीस तिथे गेल्यावर त्यांना कळले की त्याला दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटलमधे हलवण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सुरेश चंद तिथे पोहचले तेव्हा त्यांना कुलदीपला मृत घोषित केल्याचे समजले. सनी तिथेच होता. सनीचे बयाण लागलीच नोंदवण्यात आले. त्यावरून भा.दं.वि.च्या कलम ३०२, ३४ अन्वये चारही आरोपींविरुद्ध एफ.आय.आर. नोंदवण्यात आला. आरोपींच्या घराजवळ खूप गर्दी जमली होती. “मारो मारो’ असे लोक ओरडत होते. चारही आरोपी घरात लपून बसले होते. पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली. रविकुमारच्या सांगण्यावरून त्याने वापरलेला सुरा देवघराजवळील पाण्याच्या टाकीखालून जप्त करण्यात आला. तपास पूर्ण करून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध  दोषारोपपत्र दाखल केले.
सत्र न्यायालयात एकूण २८ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींनी घटनेच्या वेळी घरीच कालीमातेच्या पूजेत व्यस्त होते आणि त्यांना जाणून बुजून फसवण्यात आले आहे असे सांगितले. रोहिणी, दिल्ली                    येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी सर्व साक्षी पुरावे तपासून आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून दि. २१.०५.२०११ रोजी निकाल दिला आणि चारही आरोपींना कुलदीपच्या खुनासाठी दोषी ठरवले. दि.६.०६.२०११ रोजी सजा सुनावली. चारही आरोपींना जन्मठेपेची सजा सुनावण्यात आली. रविकुमारला ५०,००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद, तर इतर तिघा आरोपींना २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ आठवड्यांची साधी कैद अशी सजा सुनावण्यात आली.

सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध चारही आरोपींनी दिल्ली उच्च न्यायालयात अपील दाखल केली. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. कैलाश गंभीर आणि न्या. सुनीता गुप्ता यांच्या खंडपीठासमोर अपिलाची सुनावणी झाली. आरोपींच्या वकिलांनी तपासातील आणि साक्षीपुराव्यांतील त्रुटी दाखवीत आरोपी निर्दोष असल्याचे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. कुलदीपने मोहल्ल्यात सपनाची भरपूर बदनामी केली होती, तिचे फोटो वाटले होते, यामुळे रविकुमार चिडून गेला होता घटनेच्या वेळी त्याचे आणि कुलदीपचे जोरात भांडण झाले आणि रागाच्या भरात त्याने कुलदीपला मारले. चौघांनी त्याला मारण्याचा कट रचून त्याला मारले असे काही घडले नाही असा आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तर सरकारी वकिलांनी हा “ऑनर किलिंग” चा प्रकार असून कुलदीपच्या कृत्यांमुळे रविकुमार आणि कुटुंबातील इतरांची बदनामी झाल्याकारणाने त्याचा व्यवस्थित कट रचून खून करण्यात आला, असे सांगितले. रविकुमारने काही दिवसांपूर्वीच सपनाला तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल खडसावले होते, मारले होते आणि तिच्या मामाकडे पाठवून दिले होते. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हे मृतकाचे जवळचे नातेवाईक (भाऊ) असल्यामुळे त्यांच्या साक्षीवर विश्वास ठेवण्यात येवू नये या आरोपींच्या वकिलांच्या युक्तिवादाचा त्यांनी जोरदार प्रतिवाद केला. असो. शेवटी सर्व साक्षी पुरावे तपासूनच सत्र न्यायालयाने निकाल दिला होता आणि उच्च न्यायालयानेही तो कायम ठेवला. दि. ३०.०५.२०१४ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला आणि तो जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रात चर्चिला गेला. “लिव्ह-इन संबधांतील अपयश हे वाढत्या बलात्कारांचे एक कारण आहे” असे मत या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले आणि त्याची बातमी झाली. या प्रकरणात “ऑनर किलिंग” च झालेले असल्याचे सिद्ध झाले आणि एका २४ वर्षीय युवकाचा अशा तऱ्हेने खून केला जातो या पार्श्वभूमीवर आजच्या समाजातील वास्तवावर लक्ष वेधले. आता त्यातील काही महत्त्वाची मते बघू...........
“एका २४ वर्षीय युवकाचा प्रेमप्रकरणातून निर्घृण खून केला जातो याबद्दल आम्ही दु:ख व्यक्त करतो. दोघेही सज्ञान होते. प्रेम करणारे जात पात, धर्म, पंथ, रंग, आर्थिक पत बघत नाहीत. तरीसुद्धा भारतातील मूल्य व्यवस्था आणि पारंपारिक व्यवस्था अजून बराच प्रभाव समाजावर टिकवून आहेत. खास करून लग्न आणि इतर सामाजिक कार्यांमधे. समाजात इतर अनेक बदल झालेले असले तरी पालकांचे लक्ष आपल्या पाल्यांच्या वागण्याकडे, त्यांचे शिक्षण, व्यवसाय, नोकरी आणि खासकरून लग्नाचे बाबतीत असतेच. अजूनही अशी अनेक कुटुंबे आहेत जिथे मुलेमुली आपल्या पालकांच्या इच्छेचा मान ठेवतात किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध जात नाहीत. आपण गेल्या दोन दशकांत युवक युवतींमधे खूप बदल झाले आहेत. अनेकांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावलेला आहे. हे वाढत्या लिव्ह-इन संबंधांमुळे लक्षात येईल कारण लग्न हा प्रकार एक प्रकारचे ओझेच असतो हे वाढत्या घटस्फोटांच्या प्रमाणामुळे त्यांना वाटू लागले आहे. लिव्ह-इन संबंधांना आता कायदेशीर मान्यताही मिळाली आहे. शाळा-महाविद्यालयातून आता मुलामुलींचे संबंध वाढीस लागले आहेत. त्यामुळे यापुढे मुलांनी विशेषत: मुलींनी लग्न किंवा लिव्ह-इन बाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवा. वाढत्या बलात्कारांचे तुटलेले-फसलेले (विशेषत: शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर) लिव्ह-इन संबध हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे अशा संबंधात असणाऱ्यांनी जबाबदारीने आणि प्रगल्भतेने वागण्याची आवश्यकता आहे. अशा लोकांच्या पालकांनी किंवा कुटुंबीयांनीही संयमाने, प्रगल्भ बुद्धीने, समजदारीने वागण्याची आवश्यकता आहे. मुलामुलींच्या भावनाही लक्षात घेणे गरजेचे आहे, आपले निर्णय जबरदस्तीने लादणे योग्य नाही. कुठलाही निर्णय विवेकबुद्धीने घ्यायला हवा. सपनाचे कुटुंबीय सामंजस्याने, संयमाने, धीराने वागले असते आणि कायदा हातात घेतला नसता तर ना कुलदीपचा खून झाला असता ना या चौघांना जन्मठेप भोगावी लागली असती आणि एका अर्थाने दोन्ही कुटुंबांची झालेली वाताहात टळली असती.”

एकंदरीत पाहता उच्च न्यायालयाने व्यक्त केलेली मते योग्यच आहेत. सगळ्यांनीच समजदारीने वागायला हवे. अस्मितांचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही. नाही तर असे उगाचच बळी जातात. पण वाढत्या बलात्कारांचा संबंध तुटलेल्या लिव्ह-इन संबंधांशी जोडलेला योग्य वाटला नाही. अशी आकडेवारी कुठेही उपलब्ध नसावी. (आणि नेमक्या याच मताची बातमी व्हावी, हे ही चमत्कारिकच म्हणायला हवे) जिथे लिव्ह-इन हा प्रकार ही माहित नाही अशा अनेक खेड्यांमधे वारंवार बलात्कार होत असतात. बरेचदा संबंध उघड झाल्यावर बलात्काराची तक्रार केली जाते. असो. उच्च न्यायालयाचे ते एक मत सोडले तर बाकी दिलेला सल्ला जनमानसाने आत्मसात करायलाच हवा. २१व्या शतकात जातीधर्माच्या अस्मिता कुरवाळून मुडदे पाडणे योग्य नाही. खुनासारखे गुन्हे करण्यात कसली आली अस्मिता? अशाने आपण मागे जावू, पुढे नाही. नाही का? “ऑनर” खरेच इतका महत्त्वाचा असतो का? आपली आणि आपल्या कुटुंबाची वाताहात करण्याइतका? करा विचार............ कमीत कमी आपण आणि आपले सगेसोयरे विवेकाने वागतील असे प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो, नाही का?

(या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अपील झाल्यास कदाचित वेगळा निर्णय लागू शकतो, पण घडलेली घटना आणि त्यावर व्यक्त केलेली मते बदलणार नाहीत.)

अ‍ॅड. अतुल सोनक

९८६०१११३००                  

No comments:

Post a Comment