Wednesday, July 23, 2014

माझा मामा

माझा मामा

त्याला सतत कार्यरत आणि कार्यमग्न बघून “सेवानिवृत्त” या शब्दाला शब्दकोशातून बाहेर पडावसं वाटावं, “निरुद्योगी” या शब्दाला लाज वाटावी, “काय करावं काही समजत नाही” असं म्हणणाऱ्या लोकांना एक आशेचा किरण दिसावा, यश-अपयशाची चिंता न करता सतत काम, काम आणि फक्त काम कसं करत रहावं हे दाखवणारा एक माणूस मी गेल्या अनेक वर्षांपासून अगदी जवळून बघतोय...............आणि हो, गर्व आहे मला तो माझा नातेवाईक असल्याचा, माझा मामा, दत्तामामा. “डॉ. दत्ता गणेश देशकर” मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आणि परदेशातही पाणी प्रश्नावर जनजागृती करणारा आणि नावलौकिक मिळवणारा असा हा माणूस.

समाजभान तसंही फार कमी लोकांना असतं, बहुसंख्य लोक काहीच न करणारे असतात. कोणी काही करत असेल, तर त्याला नावं ठेवणंच त्यांना जमतं, “मला काय त्याचं” अशी वृत्ती सगळीकडे आढळते. पण माझा मामा ‘आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो’ असा विचार करणारा आणि स्वत:च्या खिशाला खार लावून सतत फिरत राहणारा. लोकांना “जलसाक्षर” करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारं एक आदर्श व्यक्तिमत्व !!!!!

आयुष्याच्या सुरुवातीला नागपूरच्या रिझर्व बॅंकेत नोकरी करणारा हा माणूस काही दिवसांतच मराठवाड्यात प्राध्यापकी करायला गेला. औरंगाबादच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करून शेवटी प्राचार्य म्हणून निवृत्त झाला. नोकरी करता करता रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजसेवाही सुरु होती, गृहनिर्माण सहकारी संस्था काढून अनेक घरांचं बांधकाम केलं, शेती केली, निरनिराळ्या कंपन्या काढल्या, त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही तरी हार मानली नाही, एखादा असता तर हात-पाय गाळून बसला असता. पण हा नव्या उमेदीनं कामाला लागला. प्रचंड अनुभव, अफाट वाचन, विषय समजून घेण्याची आवड, समजावून सांगण्याची आवड, दांडगी स्मरणशक्ती, भाषण ठोकायची आवड........हा चूप बसता तरच नवल. नोकरीतून मोकळा झाल्यावर खेडोपाडी, गावोगावी जावून निरनिराळ्या शाळांमधे विद्यार्थ्यांना पाण्याचं महत्व पटवून देवू लागला. तेही प्रवासभाडं, इतर खर्च किंवा भाषणासाठी पैसे न घेता. त्यानं लाखो विद्यार्थ्यांना पाण्याचं महत्व पटवून दिलंय आणि ते काम अजूनही अव्याहत सुरु आहे.

त्याला लिखाणाचीही खूप आवड, अनेक पुस्तकं त्याच्या नावावर, वृत्तपत्रीय लिखाणही भरपूर. आपल्या या लेखनकलेचा पुरेपूर उपयोग पाणी प्रश्नाबाबत कारण्यासाठी त्यानं “जलसंवाद” मासिक काढलं. लेख लिहिणं, लोकांचे लेख मागवून प्रकाशित करणं, जाहिराती गोळा करणं, वर्गणीदार तयार करणं, छपाईकडे जातीनं लक्ष देणं, मासिकांचे गठ्ठे आणणं, वर्गणीदारांकडे पाठवण्याची व्यवस्था करणं, पाणी प्रश्नावर चर्चासत्र-कार्यशाळा आयोजित करणं, जलसाहित्य संमेलनाचं आयोजन-नियोजन करणं, एवढं सगळं हा ७५ वर्षांचा तरुण सतत करत असतो. हो तरुणच, तो वृद्ध वाटतच नाही, त्याची आतापर्यंतची वाटचाल बघता तो वृद्ध वाटणारही नाही कधी. ‘मला कंटाळा आलाय’ असं मी त्याच्या तोंडून कधी ऐकलं नाही. “जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकलजन” या उक्तीप्रमाणं सकलजनांना शहाणं करून सोडण्याचं व्रत घेतलेला हा माणूस आहे. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात आठ-दहा नातेवाईक एकमेकाकडं पहात बसले असतात तेव्हाही महाराज सुरु होतात. विषय सुरु करायचा, समोरच्याला बोलतं करायचं, आपल्या पाणी प्रश्नाच्या चळवळीत समोरचा काही कामी पडेल काय हे चाचपायचं, लेख, पुस्तकं, मासिकं असं प्रबोधनपर साहित्य वाचायला द्यायचं. कोणीही विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरं द्यायची. शेती, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कुठल्याही विषयावर चर्चा करायला मामाजी तयार.

दांडगी स्मरणशक्ती असल्यामुळे निरनिराळ्या लोकांशी (जात-पात-धर्म-पंथ न पाहता) संबंध जोडून टिकवून ठेवणं आणि खूप वर्षापूर्वी भेटलेल्या व्यक्तीलाही ओळखून तिच्याशी त्यावेळच्या किंवा आताच्याही विषयावर गप्पा मारणं आणि गप्पांच्या ओघात ती व्यक्ती पाणी प्रश्नावर काम करण्यास काही उपयोगी पडू शकते का याची चाचपणी करायला मामा विसरत नाही.

एवढा सगळा कामाचा व्याप असूनही प्रचंड मोठ्या कुटुंबातील कुठल्याही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहायला मामा सदैव तयार. मैत्रीला जागणं, कोणाला काही मदत लागली तर मदत करणं, अडल्यानडल्याला धावून जाणं, आपलं रडगाणं न गाता झेपेल तशी मदत करणं, सर्वांची विचारपूस करणं, पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं, किती किती गुण, गुणांची खाणच.......त्याच्या या सर्व व्यापात आणि धावपळीत वीणामामीचीही समर्थ साथ लाभली आहे आणि सोबतच मुलगा, मुलगी, सून, नातवंड सगळेच पाणी प्रश्न सोडवण्याच्या कामाला लागलेयत. आपल्याला या क्षेत्रात खूप काम करायचंय हे ओळखून स्वत:ची आणि कुटुंबीयांची प्रकृती जपणारा आणि जपायला प्रवृत्त करणारा माझा मामा या काळातील एक “कर्ता सुधारक” म्हणून नावारूपाला आलाय याचा सार्थ अभिमान वाटतो. मोठमोठे मंत्री, अधिकारी असोत की अगदी तळागाळातला सामान्य माणूस असो, मामा सारख्याच हिंमतीने आणि हिरिरीने, त्याला काय वाटेल किंवा तो काय म्हणेल याची चिंता न करता त्याला “जलसाक्षर” करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असतो.  

पुढली लढाई पाण्यासाठी लढली जाणार असं गेल्या अनेक वर्षांपासून ऐकतो आहे पण माझ्या मामासारखे आणखी काही लोक तयार झाले तर लढाई होणारच नाही हे मी खात्रीनं सांगू शकतो आणि पाणी प्रश्न कायमचा सुटल्याशिवाय हा जिद्दी पठ्ठा शेवटचा श्वासही घेणार नाही, याची मला खात्री आहे.

अ‍ॅड. अतुल सोनक
९८६०१११३००                 




           

No comments:

Post a Comment