Thursday, October 30, 2014

काय खरे? काय खोटे?

काय खरे? काय खोटे?

जीवनाच्या धकाधकीत प्रत्येक माणूस कधी ना कधी खोटे बोलत असतो पण निदान मरताना तरी तो खरेच बोलेल, या गृहितकावर आधारलेले एक पुराव्याच्या कायद्याचे तत्व आहे. त्यानुसार कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूपूर्व बयाणाला (Dying Declaration) महत्व दिले जाते आणि ते सत्यच असावे असे समजल्या जाते. एक तरुणी जळून मरण्यापूर्वीवेगवेगळी बयाणे देते आणि त्याचा खटल्यावर कसा परिणाम होतो, ते आता आपण बघू......

घटना आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या एका खेड्यातील. सूर्यकांत दादासाहेब बिटले यांचे लग्न अर्चना दिलीप काळे या तरुणीशी दि.६.०६.२००३ रोजी संपन्न झाले. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात दि.१४.०७.२००३ रोजी अर्चनाला ९० टक्के जळालेल्या अवस्थेत सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी तिथल्या विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याने तिचे मृत्यूपूर्व बयाण नोंदवले. १५ जुलैला अर्चनाच्या मामांना कळवण्यात आले, ते आपल्या पत्नीसह सरकारी इस्पितळात तिला भेटायला आले तेव्हा तिच्यावर उपचार सुरु होते. त्याच दिवशी अर्चनाचे वडील दिलीप काळे तिला भेटले आणि त्यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली की तिचा पती सूर्यकांत हिने तिचा हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे खूप छळ केला आणि त्यात ती जळाली. सूर्यकांतला भा.दं.वि. च्या कलम ४९८-अ आणि ३०७ अन्वये अटक करण्यात आली. पण १६ तारखेलाच तिचा मृत्यू झाल्याने नंतर ३०७ ऐवजी ३०२ कलम लावण्यात आले. १७ तारखेला अर्चनाच्या मृतदेहाचा पंचनामा आणि शव-विच्छेदन करण्यात आले. शव-विच्छेदन अहवालात ९० टक्के जळाल्याने तिचा मृत्यू झाला हे स्पष्ट झाले. तिच्या मृत्यूपूर्वी १६ तारखेला पुन्हा एकदा तिचे बयाण घेण्यात आले होते.

या दोन्ही बयाणातील ठळक मुद्दे असे......
दि.१४ जुलैचे बयाण........आज माझ्या पतीला मुंबईला जायचे असल्यामुळे मी स्वयंपाक करीत असताना माझ्या साडीचा पदर गॅसशेगडीवर पडला आणि साडीने पेट घेतला, माझे पती आणि शेजारी धावून आले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तरीही माझे दोन्ही हात-पाय, छाती, पोट, पाठ, गळा चांगलेच भाजले आणि खूप वेदना होत आहेत. मला जीपमध्ये टाकून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आणि तिथून साताऱ्याच्या सरकारी इस्पितळात उपचारासाठी आणण्यात आले. मी जळाले तेव्हा मि आणि माझे पती हे दोघेच घरी होतो, सासरे शेतात गेले होते, मला कोणी जाळले नाही. माझी कोणाविरुद्ध काहीच तक्रार नाही.
दि.१६ जुलैचे बयाण.........१४ तारखेला दुपारी दुसऱ्यांदा संभोगासाठी नकार दिल्यावर माझ्या पतीने माझ्या अंगावर केरोसिन टाकून मला पेटवून दिले. माझे सासरच्या कोणाशीही भांडण नव्हते, मला कोणीही हुंडा मागितला नाही. हे बयाण मी कोणीतरी सांगतले म्हणून दिलेले नाही. १४ तारखेचे बयाण मी प्रचंड मानसिक तणावात दिले होते परंतु आता माझ्या वेदना फार वाढल्यामुळे मी हे नवीन बयाण देत आहे. मला जाळल्यानंतर माझा पती पलंगावर पडून होता पण मला वाचवायला आला नाही, मी आरडाओरडा केल्यावर शेजारचा एक अनोळखी माणूस आला आणि त्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. माझे सासू-सासरे, दीर यांचेविरुद्ध माझी काहीही तक्रार नाही, माझ्या पतीला सजा व्हायला हवी. मी हे बयाण कोणाच्याही दबावाखाली देत नसून ते मला पूर्ण वाचून दाखवण्यात आले आहे आव त्यावर मी आंगठा ठसवीत आहे. 

दि.१५ जुलैला अर्चनाचे वडील दिलीप काळे तिला बघायला इस्पितळात आले तेव्हा तिने त्यांना सांगितले की सूर्यकांतने तिला जाळले पण पोलिसांना तक्रार देताना त्यांनी अर्चना आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात भाजली असे लिहिले होते. दिलीप काळे यांना अर्चनाने स्वत:हून दुसऱ्यांदा संभोगाला नकार दिल्यामुळे सूर्यकांतने तिला जाळले असे १५ तारखेलाच सांगितले होते पण १६ तारखेला पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी तसा काही उल्लेख केला नाही. त्यात त्यांनी आरोपीचा सततच्या छळण्यामुळे तिने स्वत:ला जाळून घेतले असे नमूद केले होते.

पोलिसांनी तपास करून आरोपी सूर्यकांत याचेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आणि सातारा येथील सत्र न्यायालयात खटला सुरु झाला. दोन्ही आरोप सिद्ध न झाल्यामुळे आरोपी सूर्यकांत याला सत्र न्यायालयाने दि. २९.०५.२००४ रोजी निर्दोष सोडले. या आदेशाविरुद्ध अर्चनाचे वडील दिलीप काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिव्हिजन दाखल केली. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयासमोर झालेल्या साक्षीपुराव्यांचे पुन्हा मूल्यमापन केले आणि सत्र न्यायालयाने मृत्यूपूर्व बयाणे आणि इतर पुराव्यांचा योग्य विचार केला नाही असे मत व्यक्त करीत प्रकरण पुन्हा सत्र न्यायालयाकडे परत विचारार्थ पाठवले. उच्च न्यायालयाने नोंदवलेली मते अशी.......१) अर्चनाने १४ तारखेला दिलेल्या बयाणात असे म्हटले होते की ती दुपारी ३.३० च्या सुमारास स्वयंपाक करीत असताना तिच्या साडीचा पदर गॅस च्या शेगडीवर पडला, साडीने पेट घेतला आणि ती जळायला लागली, शेजारच्या खोलीत असलेला तिचा नवरा सूर्यकांत धावून आला आणि त्याने चादरीच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात तोही भाजला. २) १६ तारखेच्या बयाणात अर्चनाने सांगितले की १४ तारखेचे बयाण तिने प्रचंड मानसिक तणावाखाली दिले होते. ती पुढे म्हणाली की तिने दुसऱ्यांदा संभोग करू देण्यास सूर्यकांतला विरोध केल्यामुळे रागाच्या भरात त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि आग लावली. आणि त्याने आग विझवण्याचा प्रयत्न देखिल केला नाही. सत्र न्यायालयाने दोन पैकी कोणते बयाण विश्वास ठेवण्याजोगे आहे हे तपासायला हवे होते आणि एका मृत्यूपूर्व बयाणावर विश्वास ठेवायला हवा होता तसेच त्याचे मूल्यमापन करायला हवे होते. किंवा सत्र न्यायालयाने दोन्ही बयाणे फेटाळायाला हवी होती. ३) घटनास्थळ पंचनाम्यानुसार गॅस सिलेंडर रिकामे होते. केमिकल अनालाय्झार अहवालानुसार सूर्यकांत आणि अर्चनाच्या कपड्यांवर केरोसिन/रॉकेलचे थेंब सापडले. घटनास्थळी जप्त करण्यात आलेल्या मातीतही केरोसिन/रॉकेल सापडले. सूर्यकांतही भाजल्यामुळे जखमी झाला होता. सबब सर्व बाबी बघता सत्र न्यायालयाने प्रकरणाचा फेरविचार करावा.

उच्च न्यायालयाचा उपरोक्त निकाल दि.१८.१०.२००७ रोजी पारित करण्यात आला. या आदेशाला सूर्यकांतने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात न्या. सुधांशू ज्योती मुखोपाध्याय आणि न्या. आर. के. अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने दि. २.०७.२०१४ रोजी या प्रकरणात निकाल देवून सूर्यकांतचे अपील मंजूर केले. उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला आणि सत्र न्यायालयाचा सूर्यकांतला निर्दोष सोडण्याचा निर्णय योग्य ठरवत कायम ठेवला. सर्वोच्च न्यायालय या निर्णयाप्रत का आले, ते आता आपण बघू........

सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तिवाद करताना सूर्यकांतच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला रिव्हिजनमधे साक्षीपुराव्यांची पुनर्तपासणी किंवा पुनर्मूल्यांकन करण्याचा अधिकारच नाही, जर सरकार पक्षाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील केले असते तर उच्च न्यायालय तसे करू शकले असते, असे प्रतिपादन केले. तसेच सत्र न्यायालयाने सर्व मृत्यूपूर्व बयाणे अगदी योग्य प्रकारे विचारात घेतली होती आणि त्यांचे मूल्यमापनही नीट केले होते, सबब जेव्हा एखाद्या प्रकरणात दोन निष्कर्ष निघू शकतात तेव्हा सत्र न्यायालयाच्या आरोपी सूर्यकांतला निर्दोष ठरवण्याच्या निर्णयात ढवळाढवळ करण्याची आणि तो निर्णय चुकीचा ठरवण्याची उच्च न्यायालयाला काही गरज नव्हती.

सर्वोच्च न्यायालयाने सर्व साक्षीपुरावे तपासल्यावर लक्षात आले की सर्वांच्याच बयाणात भरपूर तफावत आहे. त्या आधारावर आरोपीने गुन्हा केलाय या निष्कर्षाप्रत कुठलेही न्यायालय येवू शकत नाही सबब सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय योग्यच होता. सरकार पक्ष सुद्धा दोन शक्यता (अर्चना स्वत:हून जळाल्याची आणि सूर्यकांतने जाळल्याची) न्यायालयासमोर मांडत असताना तर आरोपीला निर्दोष सोडण्याचाच निर्णय योग्य होता. मृत्यूपूर्व बयाणातील प्रचंड तफावत तर संशयास्पदच आहे. अर्चना जिवंत नसल्यामुळे काय खरे? आणि काय खोटे? हेही कोणी सांगू शकत नाही. अशा प्रकारे एक वैवाहिक जीवन दीड महिन्यातच संपुष्टात आले मागे असंख्य प्रश्न ठेवून............

काय खरे? आणि काय खोटे? हे ज्याने केले आणि ज्याच्या बाबतीत झाले तेच सांगू शकतील. कायद्याचे कितीही विद्वान बसवले तरी सत्य समोर येणे फार कठीण असते. असो. अशा अनेक घटना असतात, अनेक गुन्हे घडतात. घटना वेगळीच असते, तक्रार भलतीच दिली जाते, नोंदवली आणखीनच वेगळी जाते, न्यायालयात खटला दाखल होईपर्यंत अनेक बदल होतात. चुका केल्या जातात. पोलीसच सांगतात कधीकधी अशी तक्रार लिहा म्हणून, अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित लोक ही कशीही तक्रार लिहितात कोणाच्याही सांगण्यावरून, पोलीस खटला उभा करताना आरोपीला सजा होण्याची खात्री राहील इतकी मेहनत घेत नाहीत, निव्वळ खानापूर्ती आणि खिसापूर्तीचा प्रकार करतात. अशा कितीतरी अर्चना बळी जातात आणि खरे काय आणि खोटे काय हे कळायला काही मार्गच उरत नाही. डोक्यात असंख्य प्रश्न उभे राहतात, उत्तरांचा मात्र पत्ता नसतो.......

अॅड. अतुल सोनक

९८६०१११३००

No comments:

Post a Comment