Thursday, October 30, 2014

डॉ.प्रकाश बाबा आमटे, The Real Hero

डॉ.प्रकाश बाबा आमटे, The Real Hero

डॉ.प्रकाश बाबा आमटे, The Real Hero हा नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट बघून घरी आलो. आदर्श, महान लोकांबद्दल ऐकलेलं होतं, आज प्रत्यक्ष बघून आलो. खरं तर आदर्श, महान आणि चांगली माणसं प्रत्यक्षात असतात यावर विश्वासच उरला नव्हता. अशी व्यक्तिमत्व पुस्तकातूनच भेटायची. पण आज अॅड. समृद्धी पोरे निर्मित, दिग्दर्शित डॉ. आमटे यांच्या जीवनावरील चित्रपट पाहिला आणि प्रत्यक्षातही अशी महान माणसं असतात यावर विश्वास बसला. चित्रपटाच्या प्रीमियर शोला डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे आवर्जून हजर होते. त्यांना अभिवादन केल्यावर खूप बोलावसं वाटलं त्यांच्याशी पण एक तर भेटणाऱ्यांची खूप गर्दी होती आणि माझंच मन मला खात होतं. घरी आल्यावर आरशासमोर उभा होतो. माझंच प्रतिबिंब माझ्याकडे कीव करत पहात होतं, म्हणालं, “बघता काय? शिका काही........”

हो, लाजच वाटत होती मला माणूस म्हणवून घेण्याची. कुठे हे लोक आणि कुठे आपण? साधी वीज गेली थोडा वेळ, तर चिडचिड करणारे आपण, एखादं चॅनेल दिसत नसेल अस्वस्थ होणारे आपण, मोबाईलचे सिग्नल गेले तर असहाय होणारे आपण आणि कुठे आमटे लोक? धैर्य, जिद्द, चिकाटी, सेवाभाव, निर्णय घेण्याची कुवत, आत्मविश्वास, हे सगळे गुण घेवून हेमलकशाच्या जंगलात रहायला जावून आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत आणि आपल्याला काही अधिकार आहेत याचंही भान नसणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या आमटे दांपत्याला शतशः नमन. हल्ली ज्यांच्या पायावर डोकं ठेवावंसं वाटेल असे लोक फारसे दिसत नाहीत असं एक थोर मराठी साहित्यिक म्हणून गेले. आमटे दांपत्य आहे तसं. नुसतं डोकंच टेकवून नाही तर त्यांच्या कार्याची पावती म्हणून आपण ही काही तरी करायला हवं. तसे हे लोक पावती मिळावी म्हणून असलं काही जगावेगळं करत नसतात. पण माणूस म्हणून आपल्याला समजायला नको का? आपण खरंच माणूस म्हणण्याच्या लायकीचे आहोत का? आमटेंचे काम बघितल्यावर हा प्रश्न नक्की पडतो. असं जगावेगळं का वागतात हे लोक?

आपण शेजाऱ्यांना विचारत नाही, त्यांच्या सुख दु:खात वाटेकरी होतानाही दहादा विचार करतो, औपचारिकपणे वागतो. आणि हे आमटे लोक काहीही संबंध नसताना एका जंगलात जावून आदिवासींची सेवा करू लागतात. त्यांची भाषा समजत नसते, चालीरीती माहित नसतात, त्यांच्यात निरनिराळ्या अंधश्रद्धा असतात, त्यांना जीवघेणे आजार असतात, नक्षलवाद्यांची भीती असते, जंगली श्वापदे असतात, वैद्यकीय सेवेची कुठलीही सोय नसते, वीज नसते, रस्ते नसतात, बाहेरून, सरकारकडून कुठलीही मदत नसते, त्यातच कॉलराची साथ, अशा भयंकर परिस्थितीत एक नवदांपत्य आपला जीव धोक्यात घालून सेवा करायला धजावतंच कसं? कोणतं रसायन आहे यांच्यात जे आपल्यात नाही? खरं तर भारत स्वतंत्र झाल्यावर आणि आपलेच लोक आपण राज्य करायला धाडल्यावर इतकी दु:स्थिती असायचे काही कारण नाही पण लक्षात कोण घेतं? ज्यांना सरकारी अनागोंदीचा-अनास्थेचा अनुभव आहे त्यांना कळेल सरकारी योजना कशा कागदोपत्री राबवल्या जातात ते. सरकारकडे न बघता, खासदार-आमदार-मंत्र्यांची वाट न बघता, भूमिपूजन-उद्घाटन न करता (केवळ वडिलांनी म्हटलं म्हणून) स्वत:च सरकार बनून, आईबाप बनून सेवा करून आमटे दांपत्यानं कसलाही पाठींबा (जातीधर्माचा, पंथाचा, संघटनेचा) नसताना एक सामान्य माणूस काय करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. आपल्यामध्ये कुठेतरी चांगुलपणा असतो तो बाहेर का येत नाही हाच खरा कळीचा प्रश्न आहे. नाही का?

आमटे कुटुंबाबद्दल जगाला कळावं, यासाठी तीन-चार वर्षं मेहनत करून एक सुंदर कलाकृती अॅड. समृद्धी पोरे यांनी तयार केली त्याबद्दल त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन !!!!! कुठलाही वरदहस्त नसताना, कसलीही चित्रपटीय पार्श्वभूमी नसताना हे धाडस करणं सोपं नाही. आणि एखाद्या नक्षलवादग्रस्त दुर्गम अरण्यात जावून चित्रीकरण करणं तर मुळीच सोपं काम नाही. मोहन आगाशे, नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी अशा दिग्गज कलाकारांना घेवून काम करणं आणि त्यांना दिग्दर्शित करणं हे ही कठीणच. पण हे शिवधनुष्य पेललं त्यांनी. पुण्या-मुंबईच्या एखाद्या कसलेल्या दिग्दर्शकानं इतकं महान काम लोकांसमोर आजपर्यंत का आणलं नाही हा मला प्रश्न पडतोय पण जाऊ द्या, ते काम आपल्या वैदर्भीय कन्येच्याच हातून व्हायचं असावं.

चित्रपटाच्या दर्जाबद्दल मला काही सांगता येणार नाही कारण मी काही समीक्षक नाही आणि त्या दृष्टीनं मी पाहिलाही नाही. सात आठ वेळा रडू आलं मात्र चित्रपट बघताना. याचा अर्थ मन हेलावून टाकणं जमलंय पोरे बाईंना. छोट्या छोट्या प्रसंगातून योग्य तो परिणाम साधण्यात त्या नक्कीच यशस्वी झाल्या आहेत. मुळात चित्रपटाच्या खऱ्या नायक नायिकेचं (आमटे दांपत्य) कामच इतकं उत्तुंग आहे आणि नाना-सोनालीनं ते इतकं उत्तम वठवलं आहे की ते बघताना खरोखरच आपण हेमलकशात पोहचतो. असं वाटतं परमेश्वराला न मानणारे प्रकाश आमटे असं परमेश्वरानं वागायला पाहिजे तसं का वागतात?

बाहेर कोणीतरी कौतुक केलं की मग आपल्याला कळतं आपल्या बाजूचा माणूस किती मोठा आहे ते, असं का? सरकारी अधिकारी कांबळे यांच्यावरील प्रसंगातून आपलं सरकार कसं चालतं याची प्रचिती येते. सामान्य ज्ञान सामान्यत: आढळतच नाही हेच खरं. नक्षलवाद्यांच्या तावडीतून वाचवलेल्या पुरूला डॉक्टर करणं, जुर्बिला तिच्या हक्काचे पैसे मिळवून देणं, नरबळी रोकण्यासाठी स्वत:ला मांत्रिकाच्या हवाली करणं, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया येत नसताना ती करण्याची हिंमत करणं, तब्बल दोन वर्ष रुग्ण उपचारासाठी येईल याची वाट पाहणं,  आदिवासींच्या मुलांसाठी शाळा काढणं, पोलीसांच्या जाचातून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करणं, काय काय नाही केलं त्यांनी..........गर्भवती स्त्रीचा जीव वाचवण्यासाठी तिच्या बाळाचे तुकडे करावे लागतानाचा प्रसंग तर अगदी हमखास रडायला लावतोच . असो. चित्रपटाला गुण किती द्यायचे? हा खूप महत्वाचा प्रश्न असतो का? शंभर पैकी शंभरच द्यायला हवेत. कारण त्या चित्रपटाची परिणामकारकता. कुठलाही खान नाही, आयटम सॉंग नाही, अर्धनग्न नट्या नाहीत, मारधाड नाही, खलनायक नाही, लफडी नाहीत, तरी सुद्धा चित्रपट गर्दी खेचतोय. गेल्या अनेक वर्षांत मराठी चित्रपट हाऊसफुल बघितला नाही. चांगली स्टारकास्ट असणाऱ्या बिग बजेट चित्रपटाला सुद्धा दाद न देणारा आपला मराठी माणूस या चरित्रपटाला मात्र गर्दी करतोय.

आपण काय करू शकतो?, मला काय त्याचं?, सरकार आहे ना- बघेल काय करायचं ते, सगळं सालं सडलंय, कोणाकोणाला सुधरंवायचं? या देशाचं काही खरं नाही, सगळे साले चोर,........असं म्हणून उसासे टाकत हातावर हात धरून बसणाऱ्या तमाम आबालवृद्ध स्त्रीपुरुषांसाठी आमटे दांपत्याचं जीवन आणि त्यावरील हा चित्रपट म्हणजे एक चपराक डाव्या गालावर आणि एक चपराक उजव्या गालावर आहे हे नक्की. पुनश्च एकदा आमटे दांपत्याने केलेल्या अजोड कार्याबद्दल शतश: नमन आणि त्यांच्या कार्याला प्रसिद्धी दिल्याबद्दल समृद्धी पोरेंचे विशेष कौतुक !!!!!!

अॅड. अतुल सोनक

९८६०१११३००

No comments:

Post a Comment