Saturday, September 6, 2014

सासू, सून आणि सुपारी

सासू, सून आणि सुपारी

स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते असा प्रत्यय येणारी आणि स्त्रिया ही गुन्हा करण्यास कचरत नाहीत हे दर्शवणारी छत्तीसगढ मधील दुर्ग जिल्ह्यातील जेवरा गावची ही सूडकथा..........

डॉ. शारदाप्रसाद त्रिपाठी, त्यांची पत्नी शशी आणि मुले जितेंद्र आणि शिवेंद्र, असे चौकोनी कुटुंब. शशी ही जितेंद्रची सावत्र आई. शिवेंद्र हा कोलकाता येथे शिक्षण घेत होता तर जितेंद्र हा डॉक्टर असून खमारीया येथे व्यवसाय करीत होता. भावना ही जितेंद्रची पत्नी. जितेंद्रचे लग्न आपली मुलगी अभिलाषा हिच्याशी व्हावे अशी शशीची इच्छा होती त्यामुळे जितेंद्र आणि भावनाच्या लग्नात अडथळे निर्माण करीत होती परंतु डॉ. त्रिपाठी यांनी तिच्या विरोधाला न जुमानता जितेंद्र आणि भावनाचे लग्न जुलै २००३ मधे लावून दिले. घरोघरी होतात तसे सासूसुनेचे वाद त्रिपाठी कुटुंबात नित्याचेच होते.

दि.२५.११.२००३ रोजी डॉ. त्रिपाठी संध्याकाळी दवाखान्यातून घरी परत आले तर त्यांचा नोकर अनिलकुमार दाराशीच रडताना दिसला. घरात जावून बघितल्यावर त्यांची सून भावना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली आणि त्यांची पत्नी शशी जवळच बेशुद्धावस्थेत आढळली. भावनाच्या शरीरावर खूप जखमा (१४) होत्या. परंतु शशीच्या शरीरावर कुठल्याही जखमा नव्हत्या. घरात दरोडा पडलेला आहे आणि भावनाने विरोध केल्यामुळे दरोडेखोरांनी भावनाचा जीव घेतला असे प्रथमदर्शनी वाटत होते. डॉक्टर लगेच पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी त्यांच्या सुनेच्या खुनाची तक्रार नोंदवली.
पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि शशीनेच मारेकऱ्यांना सुपारी देवून भावनाचा खून करवला असे तपासात निष्पन्न झाले. दि.२९.११.२००३ रोजी शशी, महेश आणि बिनु उर्फ चंद्रप्रकाश यांना अटक करण्यात आली. रक्ताने माखलेला चाकू जप्त करण्यात आला. रक्ताने माखलेले कपडे, माती, फरशीचे तुकडे सुद्धा जप्त करण्यात आले. दि.२२.१२.२००३ रोजी राजू उर्फ देवेंद्र चौबे यास अटक कारण्यात आली. खुनाचे वेळी वापरण्यात आलेली सुझुकी मोटर-सायकल ही जप्त करण्यात आली.

शशीच्या सांगण्यावरून चारही आरोपींनी संगनमत करून भावनाच्या खुनाचा कट रचला आणि तिचा खून केला असा आरोप चौघांवरही ठेवून त्यांचेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अनिलकुमार या १३ वर्षे वयाच्या घरगड्याच्या साक्षीने सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. अनिलकुमारने सांगितले ते असे.......

शशीनेच त्याला बिलासपूरहून त्यांच्या घरी कामासाठी आणले होते. घरची कामे करून तो शाळेत जायचा. त्यांच्याच घरी रहायचा. शशी आणि भावना यांच्यात वारंवार खटके उडायचे. घटनेच्या दिवशी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आरोपी देवेंद्रने भावनाला पकडून ठेवले आणि चंद्रप्रकाशने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. हा सर्व प्रकार अंगणात घडला, त्यावेळी शशी जवळच उभी होती आणि महेश बाहेर दाराशी उभा होता. हा सर्व प्रकार तो उघड्या डोळ्यांनी बघत होता. भावनाला मारल्यावर चंद्रप्रकाश टीव्ही असलेल्या खोलीत गेला तिथे एका टेबलवर शशीने काही पैसे रबरात गुंडाळून ठेवले होते ते त्याने उचलले आणि मग अनिलकुमारला धमकावले की त्याने जे काही पाहिले ते कोणालाही सांगितले तर परिणाम वाईट होतील. त्यानंतर तिघेही पळून गेले. ते गेल्यावर शशी त्याला वरच्या मजल्यावर (गच्चीवर) घेवून गेली आली आणि त्याला सांगितले की सत्य कोणालाही सांगायचे नाही, उलट कोणी विचारले तर सांगायचे की काही चोर घरात घुसले होते त्यांनीच हा प्रकार केला. त्यानंतर खाली उतरल्यावर शशीने आरडाओरडा केला आणि स्वत: भावनाच्या मृतदेहाशेजारी बेशुद्ध असल्यासारखी पडून राहिली.

डॉ. शारदाप्रसाद यांनीही आपल्या साक्षीत शशी आणि भावना यांच्यात वारंवार खटके उडायचे आणि जितेंद्र चे भावनाशी झालेले लग्न शशीला पसंत नव्हते कारण तिला तिची मुलगी अभिलाषा हिच्याशी जितेंद्रचे लग्न व्हावे अशी इच्छा होती असे सांगितले. जितेंद्र आणि भावनाच्या लग्नाच्या वेळी शशी चूप राहिली पण तिच्या मनात भावनाबद्दल कायम राग होता. प्रत्यक्ष खून करणाऱ्या आरोपींचा भावनाशी काहीही संबंध नव्हता, त्यांच्यात कसलाही वाद नव्हता, त्यामुळे हा प्रकार शशीनेच घडवून आणला असल्याची खात्री पटते.   

बेमतारा सब-जेलमधे झालेल्या ओळख परेड मधे अनिलकुमारने सर्व आरोपींना ओळखले. शव-विच्छेदन अहवालात भावनाचा मृत्यू चाकूने केलेल्या जखमांमुळे प्रचंड रक्तस्त्रावामुळे झाला असल्याचे निष्पन्न झाले. मृत्यूसमयी भावना दोन महिन्यांची गर्भवती होती. घटनेच्या वेळी भावना आणि शशी यांच्यात हातापायी झाल्याचेही दिसत होते कारण भावनाच्या बंद मुठीत शशीचे डोक्याचे केस सापडले होते. सत्र न्यायालयासमोर सरकार पक्षातर्फे एकूण ३२ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय पुरावे, तसेच परिस्थितीजन्य पुरावे आणि सर्व साक्षीदारांच्या साक्षी यावरून आरोपींना दोषी ठरवण्यात काहीच अडचण गेली नाही. बेमेतरा च्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवत (भा.दं.वि. चे कलम ३०२, १२०-ब  आणि ३४ अन्वये) जन्मठेपेची आणि एक हजार रुपये दंडाची सजा (दंड न भरल्यास तीन महिने सश्रम तुरुंगवास) सुनावली.

चौघाही आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या बिलासपूर खंडपीठासमोर अपील दाखल केल्या परंतु उच्च न्यायालयानेही सत्र न्यायालयाचाच निर्णय कायम ठेवला आणि चारही आरोपींच्या सजाही कायम ठेवल्या.

उच्च न्यायालयाच्या आदेशाला चारही आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या अपील दाखल करीत आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दिपक मिश्रा आणि न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अनिलकुमार या बाल साक्षीदाराच्या साक्षीबद्दल संशय व्यक्त करीत त्याच्यावर विश्वास ठेवण्यात येवू नये अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांची साक्ष नाकारण्याजोगी मुळीच वाटत नाही, विश्वासार्ह वाटते, असे मत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने  सर्व साक्षीपुरावे, परिस्थितीजन्यपुरावे, वैद्यकीय पुरावे, सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून आणि सर्वोच्च न्यायालयाच्याच जुन्या निर्णयाचे दाखले देत आरोपी क्र.३ महेश वगळता इतर तीन आरोपी, शशी, देवेंद्रप्रसाद आणि चंद्रप्रकाश यांना दोषी मानत त्यांची सजा कायम ठेवली. महेशला मात्र त्याचेविरुद्ध काहीही पुरावा नसल्याचे कारण देत सर्वोच्च न्यायलयाने निर्दोष सोडले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे मत असे........”संगनमत करणे किंवा फौजदारी स्वरूपाचा कट रचणे हे अनुमानावरूनच ठरवता येते परंतु प्रस्तुत प्रकरणात अनुमान काढत असताना एखाद्या आरोपीच्या सहभागाबाबत संशय निर्माण होत असेल तर त्या संशयाचा फायदा त्या आरोपीला मिळायला हवा. सरकार पक्ष महेशवरील आरोप नि:संशयपणे सिद्ध करू शकलेला नाही. गुन्ह्यात त्याचा सहभाग कुठेही दिसला नाही. अनिलकुमारने त्याला फक्त घराबाहेर उभा असलेला पाहिले. त्याने घटनेच्या वेळी अनिलकुमारला घरात जाण्यापासून अडवले सुद्धा नाही. त्याचा एफ.आय.आर.मधे उल्लेख नाही. त्याने आरोपींना कसलीही मदत केल्याचा कुठलाही पुरावा नाही. तो इतर आरोपींसोबत आल्याचा किंवा परत गेल्याचा कसलाही पुरावा नाही. चाकू किंवा गुन्ह्यादरम्यान वापरलेली इतर कुठलीही वस्तू महेशकडून जप्त करण्यात आली नाही. त्याने काहीही केलेले नसताना आणि त्याचा कशात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग नसताना त्याला दोषी ठरवणे चुकीचे आहे.”

सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल दि. २१.०८.२०१४ रोजी आला. काहीही पुरावा नसताना तब्बल अकरा वर्षे (२००३-२०१४) महेश आरोपी होता, दोषीही मानल्या गेला, त्याला जन्मठेपेची सजाही ठोठावली गेली, उच्च न्यायालयात त्याची सजा कायमही केल्या गेली आणि सर्वोच्च न्यायालयात पुराव्याअभावी निर्दोष सुटला !!!!!! याला आपल्या न्यायपालिकेचे यश म्हणायचे की अपयश ? सर्वोच्च न्यायालयात का होईना पण निर्दोष सुटला, पुरावे बारकाईने बघण्यात आले. हे ही नसे थोडके. पण सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय यांना पुरावे नसताना, त्याचा कुठेही सहभाग नसताना महेशला दोषी ठरवून जन्मठेपेची सजा सुनावताना काहीच कसे वाटले नाही?

एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा चक्क सुपारी देवून खून घडवून आणू शकते, हे ही किती अनाकलनीय आहे. स्वार्थापोटी स्त्री इतकी बेभान होवू शकते? सुनेला हुंड्यासाठी किंवा अन्य कारणासाठी मारणाऱ्या, जाळणाऱ्या अनेक स्त्रिया असतात, तेही पतीच्या किंवा मुलाच्या साथीने पण प्रस्तुत प्रकरणात तर फक्त तिच्या मुलीशी जितेंद्र चे लग्न झाले नाही याचा वचपा काढण्यासाठी चक्क सुपारी देवून खून करायची हिंमत एकट्या स्त्रीने दाखवली. यात आर्थिक व्यवहार कितीचा झाला त्याचा कुठेही उल्लेख नाही पण अशा पद्धतीने जर थोड्याफार पैशासाठी कोणी कोणाच्या जीवावर उठणार असेल तर झालेच. फक्त सूड उगवण्यासाठी सासूने आपल्या सुनेच्या खुनाची सुपारी दिली आणि लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यात सुनेचा खून करण्यात आला. तेच जर झाले गेले विसरून, तडजोड करून दोघीही सुखाने नांदल्या असत्या तर काही बिघडले असते? शेवटी झाले काय? एक कायमची संपली, एक कायम तुरुंगात. सामंजस्य, सामोपचार, सारासार विचार करून निर्णय घेणे, त्यानुसार योग्य कृती करणे किती महत्त्वाचे असते, हे यावरून कळेल, नाही का?

अतुल सोनक

९८६०१११३००                                           

No comments:

Post a Comment