Sunday, September 28, 2014

बंटी और बबली

बंटी और बबली

आपल्या देशात जसजसा विकास होवू लागला, खेडी ओस पडू लागली आणि शहरांची लोकसंख्या वाढू लागली, शहरातील आजूबाजूच्या शेतजमिनी घेवून रहिवासी अभिन्यास (residential layout) पाडले जावू लागले आणि लोक खरेदी करू लागले. कागदोपत्री प्लॉट विकले जावू लागले. प्रत्यक्षात प्लॉट अस्तित्वात नसतानाही विक्रीपत्र होवू लागले किंवा एकच प्लॉट चार चार लोकांना विकल्या जावू लागला. शहराशहरात भूखंड माफिया तयार होवू लागले. रियल इस्टेट च्या धंद्यात भरपूर काळा पैसा नांदू लागला. भरघोस नफा कमावला जावू लागला तर काही महाभाग तोट्यातही गेले. नागपुरात मिहान प्रकल्पाच्या नावावर अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले.  तर गुंतवणूक म्हणून घेतलेला प्लॉट कसल्यातरी भानगडीत अडकल्यामुळे आपली आयुष्यभराची कमाई पाण्यात गेली असे सांगून रडणारेही अनेक आहेत. दिल्लीजवळच्या ग्रेटर नोईडा भागातील एका भूखंड प्रकरणात एका अनिवासी भारतीयाला (NRI) कसे फसवण्यात आले आणि त्याला कसे न्यायालयाचे खेटे मारावे लागले याची ही कथा.............

अरुण भंडारी, जर्मनीत वास्तव्यास असणारा एक अनिवासी भारतीय नागरिक, दिल्ली जवळच्या ग्रेटर नोईडा भागात त्याला एक प्लॉट विकत घ्यायचा होता. प्लॉट शोधता असताना त्याची भेट रघुविंदर सिंग आणि सविता सिंग या जोडप्याशी झाली. रघुविंदरच्या मालकीचा एक प्लॉट दोघांनी त्याला दाखवला. ग्रेटर नोईडा प्राधिकरणाने तो प्लॉट वंदना भारद्वाज यांना आवंटीत केला होता. मूळ प्लॉट धारक वंदना भारद्वाज यांनी तो प्लॉट रघुविंदरला विकण्याचा सौदा केला होता त्याबाबत नोंदणीकृत करारनामा केला होता. प्लॉट आवडल्यामुळे अरुण ने सदर प्लॉट खरेदी करायचे ठरवले. २,४३,९७,८८०/- रुपयांत सौदा ठरला आणि दि.२४.०३.२००८ रोजी अरुणने त्यांना १,०५,००,०००/- रुपये अनामत रक्कम म्हणून दिले. तसेच त्या दिवसापासून ४५ दिवसात ग्रेटर नोईडा प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र/परवानगी आणून देवून विक्रीपत्र नोंदणी करून देण्याचे ठरले. रघुविंदरने तसा करारनामा अरुणला करून दिला.

क्साधारण एक महिन्यानंतर अरुण ने रघुविंदरला वंदना कडून प्लॉटचा ताबा मिळाला का आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळाले का याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे अरुण च्या मनात संशय निर्माण झाला आणि त्याने ग्रेटर नोईडा प्राधिकरणात चौकशी केली, तेव्हा त्याला जो प्रकार कळला तो अचंबित करणारा होता. मूळ प्लॉट धारक वंदनाने त्या प्लॉट चे सर्व अधिकार सविता सिंग च्या नावाने मुखत्यारपत्र करून दिले होते आणि एवढेच नव्हे तर वंदना भारद्वाज यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सदर प्लॉट रघुविंदरला मिळावा असे मृत्यूपत्र देखील करून दिले होते. सविताने तिला वंदनाने दिलेल्या मुखत्यारपत्राच्या आधारे सदर प्लॉट मोनिका गोयल नावाच्या महिलेला दि.२८.०७.२००८ (त्याच दिवशी सविता ला सदर प्लॉट चा ताबाही मिळाला होता) रोजी विकलेला होता आणि तो मोनिकाच्या नावाने मालक म्हणून प्राधिकरणात नोंदलेला होता. हे कळल्याबरोबर अरुण त्या दोघांकडे गेला आणि त्याने आपले पैसे परत मागितले पण दोघांनीही टाळाटाळ केली आणि पैसे परत करण्यास नकार दिला.

आपला विश्वासघात आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अरुण ने कसना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार केली, पोलिसांनी एफ.आय.आर. नोंदवला. परंतु तपासांती पोलिसांनी असा अंतिम अहवाल सादर केला की सदर चे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्यामुळे (आणि अरुणनेच कराराच्या अति पाळल्या नसल्यामुळे) कुठलाही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा घडलेला नाही सबब हे प्रकरण बंद करण्यात येत आहे. सदर अहवालाला विरोध करण्यासाठी अरुण ने संबंधित न्यायालयात निषेध अर्ज (protest petition) किंवा आक्षेप अर्ज दाखल केला. त्यात त्याने कथन केले की आरोपी रघुविंदर आणि सविता सिंग ने चौकशी अधिकाऱ्याला फितवून त्याच्याशी संगनमत करून प्रकरण बंद करवले आहे. वास्तविक आरोपींनी चौकशी अधिकाऱ्यासोबत साठगाठ केल्याचे लक्षात आल्याबरोबर अरुण ने वरिष्ठांकडे तशी तक्रार केल्यानंतर तपास अधिकारी बदलवण्यात आला होता, त्याने सर्व संबंधितांचे (फिर्यादी, दुय्यम निबंधक, प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी, मुखत्यारपत्रावरील साक्षीदार) बयाण नोंदवले, केस डायरीत नोंदी केल्या त्यात आरोपींविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८ आणि ४७९ अन्वये गुन्हा नोंदवावा अशीही नोंद केली होती परंतु पुन्हा आरोपींनी चक्रे फिरवली आणि तपास पुन्हा जुन्याच अधिकाऱ्याकडे दिल्या गेला. हे समजताच अरुण ने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली परंतु त्यांनी प्रकरणाची दखल घेण्यापूर्वीच तपास अधिकाऱ्याने प्रकरण बंद करण्याचा अहवाल (closure report) दाखल केला. अरुण ने निषेध अर्जात मागणी केली तो अहवाल फेटाळून आरोपींविरुद्ध फसवणुकीचा खटला चालवावा.

दि.५.०६.२०१० रोजी संबंधित मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी प्रकरणातील तक्रार, सर्व बयाणे, केस डायरी अवलोकन करून असे मत व्यक्त केले की अरुण दिवाणी न्यायालयात दाद मागू शकत असला तरीही आरोपींनी त्याचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे असे प्रथमदर्शनी सिद्ध होता असल्यामुळे त्यांचेविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम ४०६ आणि ४२० अन्वये खटला चालवण्यात यावा. झाले. अरुण ला न्याय मिळाला. खटला सुरु झाला असा गैरसमज करून घेऊ नका. इतकी सोपी नसते न्यायालयीन लढाई. आरोपींनी या निर्णयाला सत्र न्यायालयात रिव्हिजन दाखल करून आव्हान दिले. तिथेही आरोपींनी प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याचीच पुंगी वाजवली. पण सत्र न्यायालयाने सर्व कागदपत्रे तपासल्यावर खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध आरोपी रघुविंदर आणि सविता अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले. त्यांनी एक रिट याचिका दाखल करून त्यांचेविरुद्ध चा एफ.आय.आर. आणि फौजदारी खटला रद्द करण्याची मागणी केली. उच्च न्यायालयात प्रकारणाची सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने सर्व कागदपत्रे तपासून प्रकरण अगदीच दिवाणी स्वरूपाचे आहे, हा आरोपींचा युक्तिवाद फेटाळला पण आरोपी रघुविंदर हाच प्रथमदर्शनी विश्वासघात आणि फसवणुकीला जबाबदार असल्याचे दिसत असून त्याची पत्नी सविता सिंग हिचा गुन्ह्यात सहभाग दिसत नाही असा आदेश देत याचिका दि. २९.०१.२०११ रोजी अंशत: मंजूर केली. उच्च न्यायालयाने असे मत व्यक्त केले की सविता ने अरुण शी कुठलाही करार केला नव्हता तसेच त्याने तिला काहीही रक्कम किंवा मालमत्ता दिली/सोपवली नव्हती त्यामुळे तिने त्याची फसवणूक आणि विश्वासघात केला असे म्हणता येणार नाही. सबब उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा तिचेविरुद्ध गुन्ह्याची दाखल घेण्याचा आणि समन्स पाठवण्याचा आदेश रद्द केला. बघा २००८ साली घडलेला गुन्हा, गुन्हा आहे की नाही ते ठरवण्यातच तीन वर्षे गेली. आता अरुण सर्वोच्च न्यायालयात गेला.

सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेद्वारे अपील दाखल करून अरुण ने उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात न्या. के.एस.राधाकृष्णन आणि न्या. दिपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. प्रकरणातील सर्व दस्तावेज, साक्षीदारांची पोलिसांनी नोंदवलेली बयाणे, केस डायरी, सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारणात यापूर्वी दिलेले निकाल तपासून सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. दि.१०.१.२०१३ रोजी दिलेल्या आदेशात उच्च न्यायालयाने सविता सिंग चा गुन्ह्यात सहभाग नसल्याचे जे मत व्यक्त केले होते त्याच्याशी असहमती व्यक्त केली. अरुणने तक्रार आणि बयाणात सौद्याच्या चर्चेदरम्यान ती हजर असल्याचे स्पष्ट म्हटले होते आणि त्या दोघांना नगदी आणि धनादेश स्वरूपात रक्कम दिल्याचे स्पष्ट म्हटले होते. सौद्याच्या बैठकीचे वेळी मूळ प्लॉटधारक वंदनाने सविताच्या नावे मुखत्यारपत्र करून दिल्याची बाब आणि मृत्युपत्राची बाब तिने लपवून ठेवली होती. तसेच अरुण सोबत सौदा/व्यवहार झालेला असताना आणि त्याच्याकडून पैसे घेतलेले असताना तिने तोच प्लॉट मोनिकाला विकणे हे सरव संशयास्पद आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे ती निर्दोष वाटत नाही. सर्वोच्च न्यायालय म्हणते “ Therefore, we are disposed to think that the High Court, while exercising the extraordinary jurisdiction, had not proceeded on the sound principles of law for quashment of order taking cognizance. The High Court has been guided by the non-existence of privity of contract and without appreciating the factual scenario has observed that the wife was merely present. Be it noted, if the wife had nothing to do with any of the transactions with the original owner and was not aware of the things, possibly the view of the High Court could have gained acceptation, but when the wife had the Power of Attorney in her favour and was aware of execution of the will, had accepted the money along with her husband from the complainant, it is extremely difficult to say that an innocent person is dragged to face a vexatious litigation or humiliation.” बघा उच्च न्यायालय ही कसे कायद्याच्या तत्वांविरुद्ध जात असते. एकूण प्रकार बघता सुरुवातीपासूनच रघुविंदर आणि सविता सिंग यांनी ठरवून अरुणची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे आणि विश्वासघात केल्याचे दिसत असल्यामुळे खालच्या न्यायालयाने दोन्ही आरोपींविरुद्ध खटला पुढे चालवावा असा आदेश दिला. तब्बल पाच वर्षांनी का होईना, आता खटला चालेल, साक्षीपुरावे, युक्तिवाद होतील, निकाल लागेल, मग अपील, अपील......किती वर्षे जातील कोण जाणे. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि प्लॉट चा सौदा केला असे झाले असेल अरुण ला. आपल्यापैकी अनेक जण फसतातच ना असे. 

काही वर्षांपूर्वी “बंटी और बबली” नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता. हा खटला वाचल्यावर त्याचीच आठवण झाली. अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी त्यात अशीच फसवणूक करीत असतात. सर्वसाधारणपणे नवरा-बायकोचे पटत नसते किंवा फारच कमी पटते असा एक सार्वत्रिक समज आहे पण एखाद्याला फसवण्यासाठी/लुबाडण्यासाठी नवरा-बायको एकत्र येतात हे आश्चर्यजनक आहे. रघुविंदर आणि सविता सिंगच्या  कुंडलीत ३६ गुण जुळले की काय?     

अ‍ॅड. अतुल सोनक
९८६०१११३००                         
            



No comments:

Post a Comment