Sunday, September 28, 2014

बोलणे पडले महागात

बोलणे पडले महागात

दोन आरोपींनी एक गुन्हा केला आणि सात-आठ वर्षे पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावण्यात अपयश आले, ते आरोपींना पकडूच शकले नाहीत. अशा परिस्थितीत आरोपींनी एका व्यक्तीजवळ त्यांनी केलेल्या गुन्ह्याची बढाई मारली आणि अडकले पोलिसांच्या जाळ्यात. चक्क जन्मठेपेची सजा भोगावी लागत आहे आता. काही कारण नसताना बोलणे कसे महागात पडले, त्याची ही कथा...............

पंजाब मधल्या फगवारा शहरातली ही घटना. दि. २५.०३.१९९९ रोजी संध्याकाळी पाच वाजता नवीन शर्मा त्याच्या स्कूटरने बँक ऑफ पंजाब च्या एका शाखेत गेला. त्याच्याबरोबर वरुण कुमार उर्फ काका (दुसऱ्या स्कूटरवर) होता, तोही बँकेत गेला. त्यांनी बँकेतून चार लाख रुपयांची रक्कम काढली, ते बाहेर आले. रक्कम असलेली पिशवी वरुण कुमार ने त्याच्या स्कूटरच्या समोरच्या भागात ठेवली आणि ते त्यांच्या गांधी चौक येथील कार्यालयात जायला निघाले. वरुण कुमार त्याच्या स्कूटरने निघाला, त्याच्या स्कूटरवर मागच्या सीटवर कमलजीत सिंग नावाचा मित्र होता, आणि त्याच्या मागोमाग नवीन शर्मा त्याच्या स्कूटरने निघाला. साडेपाचच्या सुमारास जेव्हा ते चढ्ढा मार्केटजवळ पोहचले तेव्हा मागून एका काळ्या स्कूटरवर असलेल्या दोन शीख युवकांनी त्यांना ओव्हरटेक केले आणि वरूण कुमारवर त्यांच्या पिस्तुलातून गोळीबार केला. गोळी लागल्यामुळे वरूण कुमार खाली पडला हल्लेखोरांपैकी मागे बसलेल्याने पैशाची पिशवी उचलली. कमलजीत सिंग याने त्यांना अडवून थांबवण्याचा प्रयत्न केला असता मागच्या हल्लेखोराने त्याच्या पिस्तुलातून कमलजीत सिंगला गोळी मारली. तोही जखमी होवून खाली पडला. दोघेही अनोळखी हल्लेखोर पैशाची पिशवी घेवून त्यांच्या स्कूटर वर निघून गेले. नवीन शर्मा आणि इतरांनी एका वाहनाची व्यवस्था करून वरुण कुमार आणि कमलजीत ला जवळच्या सरकारी इस्पितळात पाठवण्याची व्यवस्था केली. नवीन शर्मा पोलीस ठाण्यात तक्रार करायला निघाला. रस्त्यात त्याला पोलीस पार्टी भेटली. जमादार इकबाल सिंग यांनी त्याचे बयाण नोंदवले आणि त्यावरूनच एफ.आय.आर. नोंदवण्यात  आला. वरूण कुमार गोळीबारात गंभीर जखमी झाल्यामुळे लगेच मृत झाला होता, त्याचे पार्थिव शव-विच्छेदानासाठी पाठवण्यात आले. कमलजीतवर वैद्यकीय उपचार सुरू झाले. पोलिसांनी घटनास्थळी पडलेली स्कूटर, रक्ताने माखलेली माती आणि इतर वस्तू जप्त केल्या. घटना बघणाऱ्यांना हल्लेखोर अनोळखी असल्यामुळे त्यांचा तपास लागणे फार कठीण होते. आणि झालेही तसेच. तब्बल सात वर्षे हल्लेखोरांचा सुगावा काही लागला नाही.

हल्लेखोरांना पकडण्यासाठी दि.१८.०७.२००६ रोजी पोलिसांचे एक विशेष पथक स्थापना करण्यात आले. दि.२४.०७.२००६ रोजी हल्लेखोरांबाबत चौकशी अधिकारी इकबाल सिंग यांना एक गुप्त माहिती मिळाली. परगन सिंग आणि हरमिंदर सिंग हे दोन शीख तरुण हल्लेखोर आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी लगेच दोघांच्याही घरी छापे टाकले पण त्यांना अटक होवू शकली नाही. दि.२.०८.२००६ रोजी एक विश्वामित्र नावाचा व्यक्ती पोलिसांकडे आला आणि त्याने परगन सिंग आणि हरमिंदर सिंग यांनीच वरूण कुमारवर गोळीबार करून त्याचे पैसे लुटल्याचे त्याला सांगितले असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याचे बयाण नोंदवण्यात आले. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. नाकाबंदी करून दि.७.०८.२००६ रोजी आरोपींना अटक केली. आरोपींच्या ओळख परेडसाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला परंतु आरोपींनी नकार दिल्यामुळे ओळख परेड होवू शकली नाही. नंतर तपास पूर्ण करून दोन्ही आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. कपुरथळा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींविरुद्ध  भा.दं.वि. च्या कलम ३०२, ३०७, ३९७ आणि ३४ अन्वये आरोप निश्चित केले.

सत्र न्यायालयासमोर एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. विश्वामित्र याने त्याचेसमोर आरोपींना गुन्ह्याच्या दिलेल्या कबुलीजबाबाबाबत सांगितले. हल्ल्यात जखमी झालेल्या कमलजीतने पूर्ण घटनाक्रम सांगितला. डॉक्टरांनी शव-विच्छेदानाबाबत आणि कमलजीतच्या  जखमांबद्दल साक्ष दिली. न्यायालयासमोर आलेला सर्व पुरावा आणि दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यावर सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत ३०२ कलमाखाली जन्मठेपेची सजा आणि पन्नास हजार रुपये दंडाची सजा (दंड न भरल्यास दोन वर्षे सश्रम तुरुंगवास) सुनावली. ३०७ आणि ३४ कलमाखाली दहा वर्षे सश्रम तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपये दंडाची सजा (दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम तुरुंगवास) तसेच ३९७ कलमाखाली दहा वर्षे सश्रम तुरुंगवासाची सजा ठोठावली. या सर्व सजा एकत्रितपणे भोगायच्या होत्या. दि.२५.०९.२००८ रोजी सत्र न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवण्याबाबतचा निकाल दिला आणि दि.२७.०९.२००८ रोजी सजा सुनावली.

सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला दोन्ही आरोपींनी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले. दि. १३.१२.२०१२ रोजी उच्च न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या अपील फेटाळल्या आणि सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध दोन्ही आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेद्वारे अपील दाखल करून आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात न्या. जे. चेलमेश्वर आणि न्या. ए.के. सिकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद असा होता की आरोपी सर्व साक्षीदारांसाठी अनोळखी असल्यामुळे तब्बल सात वर्षांनंतर त्यांना ओळखणे अशक्य गोष्ट आहे. गोळीबार आणि पैशाची पिशवी घेवून पळणे या घटना फक्त ९० सेकंदात घडल्या. इतक्या कमी वेळात ज्यांना कधी पूर्वी पाहिलेले नाही त्यांना साडेसात वर्षांनी पुन्हा पाहिल्यावर ओळखणे अशक्य आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने “स्मृती” बद्दल वैज्ञानिक स्पष्टीकरणे देत साक्षीदाराला ९० सेकंदात घडली असली तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हा करणाऱ्यांचे चेहरे आयुष्यभर लक्षात राहू शकतात असे मत व्यक्त केले. यावर विख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन याची एक गोष्ट ही निकालपत्रात नमूद केली आहे. “ Once a friend of Einstein, the renowned scientist who invented the theory of relativity, asked him to explain that theory. Mr. Einstein explained it in a simple manner for common man's understanding as under: If a boy is sitting with his girlfriend/lover, he would feel the time fly away and 60 minutes would seem as 60 seconds. On the other hand, if a person puts his finger in hot boiling water, 60 seconds would feel like 60 minutes. This is the theory of relativity.” आपल्या डोळ्यासमोर सोबतच्या व्यक्तीवर गोळीबार करणाऱ्या आणि त्याच्यावरही गोळीबार करून जखमी करणाऱ्या आरोपींना एखादी व्यक्ती कशी काय विसरू शकते? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने “स्मृती” बद्दल जेफरी लॉफ्टस आणि नायसर या दोन वैज्ञानिकांचे मत ही निकालपत्रात दिले आहे. ते मत एका अमेरिकेतील न्यायनिर्णयातून घेतलेले आहे. “First, memory does not work like a video recorder. Instead, when a person witnesses some complex event, such as a crime, or an accident, or a wedding, or a basketball game, he or she acquires fragments of information from the environment. These fragments are then integrated with other information from other sources. Examples of such sources are: information previously stored in memory that leads to prior expectations about what will happen, and information-both information from external sources, and information generated internally in the form of inferences- that is acquired after the event has occurred. The result of this amalgamation of information is the person's memory for the event.

सर्वोच्च न्यायालय म्हणते नवीन शर्मा आणि कमलजीत या दोघांनीही प्रत्यक्ष घटना घडताना पाहिली, त्यांनी हल्लेखोरांना जवळून पाहिले. असे असताना आणि त्यांची आरोपींची कसलीही दुष्मनी नसताना ते उगाच आरोपींना फसवण्यासाठी खोटे का बोलतील? तसेच विश्वामित्र हा मोहल्ल्याचा प्रधान. त्याच्या समोर आरोपींनी दिलेला कबुलीजबाब (extra-judicial confession) महत्त्वाचा आहे. तो ही खोटे बोलण्याचे काहीही कारण नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हेही आरोपींनी हल्ला केल्याचेच सांगत आहेत. त्यांनी घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली. त्यात कुठलीही तफावत नावःती. अशा परिस्थितीत कोणाच्याही साक्षीवर अविश्वास दाखवण्याचे काहीही कारण नाही. या सर्व कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दि. ५.०९.२०१४ रोजी दोन्ही अपिलांवर निकाल देत सत्र आणि उच्च न्यायालयाचे निकाल कायम ठेवले आणि अपील फेटाळल्या.

तब्बल सात-आठ वर्षे खून आणि दरोड्यासारख्या गुन्ह्याचा तपास लागला नाही. पण आरोपी स्वत:च विश्वामित्राजवळ बोलल्यामुळे तपासाला दिशा आणि गती मिळाली. कधी कधी बोलणे कसे महागात पडू शकते याचे हे उत्तम उदाहरण. ते बोलले नसते तर.................कदाचित कधीही सापडले नसते. अनेक गुन्ह्यांचे रहस्य कधीच उलगडत नाही तसेच या प्रकरणाचेही झाले असते. असो. अशा प्रकारेही एखादे धूळ खात पडलेले प्रकरण किंवा आरोपींचा तपास न लागलेले प्रकरण अचानक काही वर्षांनी पुन्हा सुरु होवू शकते आणि “कानून के हाथ बहुत लंबे होते है ”चा प्रत्यय येवू शकतो. नरेंद्र दाभोलकर आणि सतीश शेट्टी यांचे मारेकरी ही असेच सापडतील अशी आशा करू या.

अतुल सोनक
९८६०१११३०

     

  

       

    

No comments:

Post a Comment