Wednesday, August 27, 2014

एका म्हशीचे महाभारत

एका म्हशीचे महाभारत

“म्हैस चोरल्याचा आरोप मागे घे, नाही तर संपवून टाकू” अशी धमकी देणाऱ्या आरोपींनी फिर्यादीचे अख्खे कुटुंब जाळून टाकले. म्हशीपासून फाशीपर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला त्याची ही चित्तथरारक कथा......................

एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यात नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली बघा. दि. ३१.१२.२००५ आणि दि.१.०१.२००६ दरम्यानच्या रात्री रोजी बिहार मधील राघोपूर (हाजीपूर) येथे फिर्यादी त्याच्या घराच्या छपरीत झोपलेला होता. त्याची बायको १२ आणि १० वर्षे वयाच्या दोन मुली आणि ८, ६ आणि ३ वर्षे वयाच्या मुलांसोबत घरातील एका खोलीत झोपली होती. रात्री १ वाजताच्या सुमारास त्याला काही लोकांच्या पायांचा आवाज ऐकू आल्यामुळे त्याला जाग आली. पाहतो तर काय वीस-बावीस लोकांचा जमाव त्याच्या घराजवळ जमलेला होता. नाईट बल्ब च्या मिणमिणत्या उजेडात आणि आवाजावरून त्यापैकी काही लोकांना त्याने ओळखले. दीपक राय, बच्चा राय, जगत राय आणि आणखी काही लोकांना त्याने ओळखले. ते आपल्या घरावर हल्ला करायला आल्याचे त्याने त्यांच्या हातातील शस्त्रांवरून ओळखले. तो तिथून पळून त्याच्या भाऊबंदांना आणि शेजारील लोकांना बोलवायच्या इराद्याने उठला पण दीपक राय आणि जगत राय यांनी त्याला पकडले. त्याला जमिनीवर पाडले आणि आणि आणखी तीन-चार लोकांनी त्याला पकडून ठेवले. नंतर फिर्यादी मुलांसह ज्या खोलीत झोपली होती ते दार आरोपींनी बाहेरून बंद केले आणि जगात रायने काही लोकांना संपूर्ण घरावर केरोसिन शिंपडायला सांगितले. केरोसिन शिंपडून झाल्यावर घराला आग लावल्या गेली.
घराला चांगलीच आग लागलेली बघितल्यावर काही आरोपींनी फिर्यादीच्या अंगावर केरोसिन टाकले आणि त्याच्या तोंडावर आगपेटीची जळती काडी टाकली. त्याचे शरीरानेही पेट घेतला. फिर्यादीला आणि घराला जळताना बघून सर्व आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना फिर्यादी सुद्धा धावपळ करीत आरडाओरडा करून शेजारच्या लोकांना हाका मारत होता तेव्हा दीपक रायने त्याच्या गावठी पिस्तुलातून त्याचेवर गोळी झाडली पण त्याचा नेम चुकला. फिर्यादीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूला राहणारे त्याचे चार भाऊ आणि इतर शेजारी धावून आले. त्यांनी आरोपींना पळताना पाहिले. एव्हाना फिर्यादीचे घर आणि घरातील त्याचे सर्व कुटुंबीय आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते, फिर्यादीची म्हैस आणि तिचा बछडाही जखमी झाले होते. फिर्यादीच्या भावांनी त्याला लगेच राघोपूर च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले.

सकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादीचे बयाण पोलिसांनी नोंदवले आणि त्यावरून उपरोक्त तीन आरोपी आणि इतर काही जणांविरुद्ध एफ.आय.आर. (भा.दं.वि. कलम १४७, १४८,१४९, ४५२, ३४२, ३२४, ३२६, ४२७, ४३६, ३०७ आणि ३०२ अन्वये)  नोंदवण्यात आला. फिर्यादीचे म्हणण्यानुसार आरोपी जगत राय, दीपक राय यांचे विरुद्ध त्याने त्याची म्हैस चोरल्याचा आरोप लावला होता आणि त्याच्या तक्रारीवरून त्यांचेविरुद्ध गुन्हा नोंद झालेला होता, दोन आरोपींना अटकही झाली होती. ती तक्रार मागे घे म्हणून ते लोक फिर्यादीला सारखे धमकावत होते. आरोपींच्या धमक्यांना न घाबरता फिर्यादीने तक्रार मागे घेतली नाही म्हणून आरोपींनी फिर्यादीच्या घराची त्याच्या कुटुंबीयांसह राखरांगोळी केली. सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा फिर्यादी बचावला.

पोलिसांनी तपास करून सर्व आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखला केले. त्यातील काही आरोपी फरार होते म्हणून जे अटक झालेले आरोपी होते त्यांचे आणि जे फरार होते त्यांचे खटले वेगळे करण्यात आले. फरार आरोपींपैकी काही जण सापडले तेव्हा पुन्हा खटले वेगळे करण्यात आले. या तांत्रिक बाबी बाजूला ठेवून  इथे महत्त्वाचे हे आहे की दि.१५.१२.२००६ रोजी हे खटले सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले.

सत्र न्यायालयात खटले चालले. फिर्यादी आणि इतर साक्षीदारांनी जे जे पाहिले ते सर्व सांगितले, घटनेची तारीख आणि वेळ सर्व जुळून आले. साक्षीदारांनी आरोपींना पळून जाताना पाहिले होते. डॉक्टरांनी फिर्यादीच्या कुटुंबीयांचा जळाल्यामुळेच मृत्यू झाल्याचे सांगितले. सर्व साक्षी पुरावे तपासून सत्र न्यायालयाने दीपक राय, जगत राय आणि बच्चाबाबू राय यांना दोषी ठरवून फाशीची सजा सुनावली. आरोपींपैकी दीपक राय तर निवृत्त सैनिक होता. त्याच्याकडून अशा गुन्हेगारी कृत्याची अपेक्षा नव्हती. या तीन आरोपींव्यतिरिक्त इतर आरोपींना मात्र सोडून देण्यात आले कारण त्यांची नावे फिर्यादीच्या बयाणातही नव्हती आणि त्यांचेविरुद्ध पाहिजे तसा पुरावाही आलेला नव्हता त्यामुळे त्यांना संशयाचा फायदा देत सोडून देण्यात आले. सत्र न्यायालयाचा हा निकाल दि.१७.०९.२००९ रोजी लागला.   

प्रकरण पाटणा उच्च न्यायालयात गेले. तिन्ही आरोपींनी सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपील केले. दि.१९.०८.२०१० रोजी उच्च न्यायालयाने आरोपींच्या अपील फेटाळत त्यांना दोषी मानून फाशीची सजा कायम केली. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केल्या. या अपिलांची सुनावणी न्या. एच. एल. दत्तू , न्या. सुधांशू ज्योती मुखोपाध्याय आणि न्या. एम. वाय. इक्बाल यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर झाली. सर्वोच्च न्यायालयाने या अपील दि. १९.०९.२०१३ रोजी आदेश देवून फेटाळल्या फक्त बच्चाबाबू राय या आरोपीची फाशीची सजा जन्मठेपेत परावर्तीत केली कारण त्याने फक्त केरोसिनचे डब्बे धरण्यापलीकडे काहीच केले नव्हते असे पुराव्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद असा होता की आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत, ते गुंड नाहीत, त्यांचा इतिहास वाईट नाही, त्यांची तुरुंगातील वर्तणूक चांगली आहे, ते सुधारू शकत नाहीत असे राज्य सरकार सिद्ध करू शकलेले नाही, ते सात वर्षे तुरुंगात आहेत, सात वर्षे फाशीच्या शिक्षेच्या छायेखाली वावरलेले आहेत, अशा प्रकरणात जन्मठेप हा नियम आहे फाशी ही अपवादात्मक परिस्थितीतच देता येते, १३८ देशांनी फाशीची शिक्षा रद्द केली आहे तर फक्त ५९ देशांत ति अजून सुरू आहे, आरोपी हे म्हशीच्या चोरीच्या खटल्यामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली होते, हे प्रकरण “दुर्मिळातले दुर्मिळ” नाही, फाशीच्या शिक्षेची “विशेष कारणे” सत्र न्यायालयाने आपल्या निकालपत्रात दिलेली नाहीत

आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने योग्य कारणे देत आणि सर्वोच्च न्यायालयाच्याच अनेक निकालांचे दाखले देत फेटाळून लावला आणि सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची सजा (दोन आरोपींची) कायम केली.

अख्खे कुटुंबच्या कुटुंब जाळून टाकणाऱ्या किंवा जाळून टाकायला लावणाऱ्या या नराधमांना माफ केले नाही हे सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच केले. अशा प्रवृत्ती ठेचायलाच हव्यात. साधे एक म्हशीच्या चोरीचे प्रकरण, त्यावरून केवढे महाभारत घडले. चोरीच्या प्रकरणात आरोपींना फार तर फार वर्ष दोन वर्षे सजा झाली असती, सुटलेही असते कदाचित. पण त्यांना जो राग आला त्या रागाने त्यांचा घात केला. फिर्यादीचे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त केले आणि स्वत:ही फाशी ओढवून घेतली. का येत असेल एवढा राग लोकांना? आणि एखाद्याने म्हणावे आणि इतरांनी म्हणजे २०-२२ जणांनी घर पेटवायला तत्परतेने मदत करावी हे ही आश्चर्यजनकच नाही काय? एखाद्याने गैरकृत्य किंवा गुन्हा करायला सांगावा आणि दुसऱ्याने तो करावा ही कसली मानसिकता?

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात सजा का दिली जाते आणि का दिली जावी याबाबत लॉर्ड डेनिंग याचे एक वाक्य नमूद केले आहे ते जसेच्या तसे देतो.....“…the punishment is the way in which society expresses its denunciation of wrong doing; and, in order to maintain respect for the law, it is essential that the punishment inflicted for grave crimes should adequately reflect the revulsion felt by the great majority of citizens for them. It is a mistake to consider the objects of punishments as being a deterrent or reformative or preventive and nothing else... The truth is that some crimes are so outrageous that society insists on adequate punishment, because the wrong doer deserves it, irrespective of whether it is a deterrent or not.”

या प्रकरणात फाशीची शिक्षा देणे किती उचित होते हे यावरून लक्षात येईल. अख्ख्या कुटुंबाचा (फक्त बदला घेण्यासाठी) अत्यंत निर्दयीपणे व्यवस्थित कट रचून खून करणाऱ्या नराधमांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे आणि या प्रकरणात फाशीशिवाय दुसऱ्या शिक्षेचा विचार तरी मनात येतो का? तर असा झाला दीपक राय आणि जगत राय यांचा म्हशीपासून फाशीपर्यंतचा प्रवास.

अतुल सोनक
९८६०१११३००            



No comments:

Post a Comment