Saturday, February 1, 2014

आम्ही इतके घाणेरडे का आहोत?

आम्ही इतके घाणेरडे का आहोत?

मागे एकदा आपल्या आवडत्या “भारतरत्न” कलाम चाचांनी विचारलं होतं की, आपल्या देशातले नागरिक परदेशात जातात तेव्हा तिथले नियम, कायदे काटेकोरपणे पाळतात पण आपल्या देशात परत आल्यावर पुन्हा काहीही धरबंध नसल्यासारखे वागायला लागतात, असं का? घाणेरडेपणा, अव्यवस्थितपणा, अजागळपणा, अस्वच्छता, सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे, या आणि अशा अनेक बाबतीत आपण भारतीय इतर अनेक देशांच्या खूप खूप पुढे आहोत. “सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा.............” हे या बाबतीत अगदी खरे आहे.

रस्त्यावर ठिकठिकाणी कंपाऊंड भिंतींवर “देखो गधा मूत रहा है”, “यहा पेशाब करना मना है” असे लिहिलं असतं आणि तिथे आपले अनेक मित्र मूत्रविसर्जन करताना दिसत असतात. आपल्यालाही अनावर झाल्यावर आपण ही भिंतीच्या आडोशाला उभं राहून उरकूनच घेतो. महानगरपालिकेनं चौकाचौकात शौचालयं, मूत्रीघरं कितीही उभारली तरी ती इतकी अस्वच्छ आणि घाणेरडी असतात की तिथे आपण जावूच शकत नाही. त्यामुळं या शौचालयांच्या आणि मूत्रीघरांच्या आजूबाजूचा परिसर त्या कामासाठी आपण बिनादिक्कत वापरून घेतो. आणि असं करताना आपल्याला काही वावगं करतोय असं वाटत नाही पण हुश्श्.......मूत्रविसर्जनाचं समाधान मात्र चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं. रेल्वेतील शौचालयात वापरापूर्वी आणि वापरानंतर पाणी सोडावं असं स्पष्ट लिहिलेलं असतं परंतु आपल्यापैकी किती जण तसं करतात? पाणीही नसतं कधी कधी. किती घाणेरडी अवस्था असते तिथली? सरकारी, निमसरकारी कार्यालयांत, न्यायालयात शौचालये आणि मूत्रीघरांची परिस्थिती काय भीषण असते. कुठे मलमूत्र साचलेले असते, पाण्याचे नळांना तोटया नसतात, पाणी वाया जात असते, कुठे कुठे पाणीच नसते. दरवाजांना कड्याच नसतात, फ्लश बिघडलेले असतात, कुठे वरून अभिषेक होत असतो, ज्यांच्या कडे या सगळ्याची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी असते त्यांना हे सगळे सुधारावे असे कधी वाटत नाही. सार्वजनिक शौचालय किंवा मूत्रीघर घाणच असले पाहिजे का?      

शहराशहरात महानगरपालिकांनी कचरा गाड्या सुरू केलेल्या आहेत, रस्तोरस्ती फिरून कचरा गोळा केला जातो. सर्वांनी आपल्या घरचा कचरा त्या गाड्यांमध्ये टाकणे अपेक्षित आहे पण तरीही रस्त्यारस्त्यावर, चौकाचौकात कचरा दिसतोच. हा कचरा कोण करतं? आपणच ना? किंवा आपल्या पैकीच कोणी तरी ना? आपण कधी जाब विचारतो कचरा टाकणाऱ्याला? एखाद्या घराचं बांधकाम सुरू असतं, जुन्या पाडलेल्या घराचा मलबा, रेती, गिट्टी रस्त्यावर पडलेली असते, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, अपघात होतात. नळाची पाइपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदले जातात, बुजवले जात नाहीत. लग्न, मुंज, बारसं, वाढदिवस, असे कुठलेही कार्यक्रम घरासमोरील रस्त्यावर मांडव टाकून पार पाडले जातात. त्यामुळे इतरांना काही त्रास होतो किंवा होईल याचे काहीही सोयरसुतक तसं करणाऱ्याला नसतं. जणू काही आपल्या घरासमोरचा रस्ता वापरण्याचा आपला घटनादत्त मूलभूत अधिकारच आहे. नाही का?

सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गोत्सव, शारदोत्सव म्हणजे तर आपल्याला वाटेल तसा गोंधळ घालायचा परवानाच मिळाला असतो जणू. दिवसभर आणि रात्री सुद्धा चित्रपटातील त्या त्या वेळची हिट गाणी जोराजोरात वाजवायची आणि अभ्यास करणाऱ्या किंवा शांतताप्रिय नागरिकांना इच्छा नसताना ती ऐकायला लावायची. त्या त्या देवतेचे आगमन आणि विसर्जनाच्या वेळी संदलच्या तालावर मद्यधुंद तरुणांचा जो काही उन्माद उफाळून येतो ते बघून त्या तथाकथित देवतेलाही नक्कीच आश्चर्य वाटत असेल. रस्ते अडवून मांडव टाकणे तर आवश्यकच. सार्वजनिक उत्सव हे रस्त्यावरच का करायचे असतात? मैदानांवर का केल्या जात नाहीत? मोठमोठ्या मिरवणुकांनी रस्त्यावरची वाहतूक अडवली जाते. कुठल्या धर्मात मिरवणूक सांगितली आहे? अनेक लोक काम धंदा सोडून कशाला या फंदात पडतात? की ज्यांना काही कामच नसतं तेच हे काम करतात? सार्वजनिक उन्माद आपण वैयक्तिकरित्या कुठल्याही मार्गाने थांबवू शकत नाही. नाही ना?  समूहाची मानसिकता (mob psychology) कुठलाही कायदा बदलवू शकत नाही, रोकू शकत नाही. आम्ही सर्व एकत्र आलो की शहाण्यासारखे वागूच शकत नाही, मूर्खासारखे वागणे बंधनकारक आहे. कुठेही जिथे गर्दी जमते तिथे बघा, शिस्त दिसणारच नाही.

लोकसंख्या सतत वाढत आहे, वाहनांची संख्या वाढत आहे......पण रस्ते तेवढेच आहेत. रस्त्यारस्त्यावर वाहन पार्किंग बघा. आडव्यातिडव्या गाड्या लावल्या जातात. फूटपाथवर वाहने उभी केली जातात. पोलीस दुचाकी गाड्या उचलून नेतात, चार चाकी गाड्यांना जामर लावतात, दंड वसूल करतात, तरीसुद्धा आपण बेशिस्तीत गाड्या उभ्या करतो. दुसऱ्याचा विचार कशाला करायचा? तो आपलं पाहील, ही आपली मानसिकता. गाड्या चालवता चालवता तंबाखू किंवा पानाची पिचकारी मारणं हे आणखी एक भूषणावह कार्य.......कोणाच्या अंगावर उडेल त्याला आम्ही काय करायचं, जाईल आपला घरी आणि धुवेल कपडे. पिचकारी मारतानाचा आनंद काय वर्णावा? तसेच धूम्रपानाचे. आपल्या सिगारेट-बिडी ओढण्यामुळे इतरांना त्रास होत असेल पण त्यासाठी आम्ही का आमचं मन मारायचं, आमची तलफ महत्त्वाची नाही का? आम्हाला आणि आमच्यामुळे दुसऱ्या लोकांना होईना का कर्करोग, जेव्हा होईल तेव्हा बघू. आवाजाचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, आणखी जितक्या गोष्टींचं प्रदूषण करता येत असेल ते ते करताना आम्हाला काहीही गुन्हा केल्यासारखं वाटत नाही.

रेल्वे स्टेशनवर आम्ही कचरा कचरापेटीत नाही टाकणार, रेल्वे रुळावरच टाकणार. तीच कचरा टाकण्याची योग्य जागा. खेडोपाडी “हागणदारीमुक्त गाव” म्हणून फलक लागलेला असतो आणि त्या फलकाखालीच किंवा आजूबाजूला शौच केलेलं असतं. सकाळी किंवा संध्याकाळी आपण गाडीने एखाद्या खेड्यातील रस्त्यावरून जात असतो तेव्हा बरेचशे स्त्रीपुरुष आपापल्या पुण्यकर्मास रस्त्याच्या दुतर्फा बसलेले आढळतात. मनोहरपंत जोशी मुख्यंमत्री झाले तेव्हा त्यांच्या माताभगिनी रस्त्यावर शौचाला बसतात याची त्यांना लाज वाटते असं म्हणाले होते, नंतर ते केंद्रात मंत्री झाले, लोकसभेचे सभापती झाले तरीही तीच परिस्थिती अजूनही आहे. त्यांनी किंवा कुठल्याही इतर नेत्यानं काहीही केलं नाही. आता सुविख्यात नटी विद्या बालन जाहिरात करते आहे बघू काही फरक पडतो का ते.

मुळात आपल्या देशात “सार्वजनिक नीतीमत्ता” नावाचं काही असतं का? असा प्रश्न पडावा इतकं खराब वातावरण आहे. जिकडं पहावं तिकडं अस्वच्छता, अव्यवस्था, अनिर्बंधता, अराजकीय परिस्थिती. कायदे पायलीचे पन्नास पण अंमलबजावणी शून्य. चौकाचौकात भीक मागणारी लहान लहान मुलं, महिला, पुरुष दिसतात ना तसा आपला देश दिसतो...... गलिच्छ. उंच इमारतींमधून दिसणाऱ्या झोपडपट्ट्या, तिथली घाण, त्या घाणीत राहणारे, चालणारे, फिरणारे आपले भाऊबंद आणि विदेशी वातानुकुलीत गाड्यांतून फिरणारे आपले भाऊबंद हे एकाच देशाचे नागरिक वाटतात का? सगळ्यांचे प्रश्न निरनिराळे पण किमान या देशाचे नागरिक समंजस नागरिक म्हणून किमान स्वच्छतेचे निकष तर पाळू शकतो ना आपण. की आपल्या गुणसूत्रांतच अस्वच्छता आहे? (Are we genetically dirty?) परदेशात आपण गेलो तर तिथे चांगले वागू, घाण करणार नाही पण भारतात परत आल्यावर मात्र आपली जात दाखवूच, नाही का? कलाम चाचांना विसरू, त्यांच्या दहा प्रतिज्ञा विसरू, लहान पणी शाळेत शिकवलेलं विसरू पण घाण करणं आणि करू देणं चालूच ठेवू. खरंच, आम्ही इतके घाणेरडे का आहोत?             

अ‍ॅड. अतुल सोनक,
भ्रमणध्वनी: ९८६०१११३००

   


    


         

No comments:

Post a Comment