Sunday, December 22, 2013

"तंदूर कांड"


"तंदूर कांड"

"तंदूर कांड" किंवा १९९५ साली झालेले "नैना साहनी हत्याकांड" बहुतेकांना आठवत असेल. त्यातील मुख्य आरोपी सुशील शर्मा याला ठोठावण्यात आलेली फाशीची सजा कमी करून सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची सजा सुनावली......

आरोपी सुशील शर्मा हा दिल्ली प्रदेश युवक कॉंग्रेस (ई) चा अध्यक्ष होता तर नैना साहनी ही दिल्ली प्रदेश महिला युवक काँग्रेस (ई) ची महासचिव होती. १९९२ साली नैना सुशीलला पक्षकार्यानिमित्य भेटायला युवक काँग्रेस च्या कार्यालयात नेहमी येत असे. त्यातच त्यांच्यातील प्रेम फुलले. त्याच कालावधीत नवी दिल्लीस्थित मंदिर मार्गावर एक फ्लॅट विकत घेतला. नैना सुशीलला त्या फ्लॅट वर ही भेटायला येवू लागली, कधी कधी रात्री सुद्धा ती त्या फ्लॅट वर राहू लागली. नैना आणि सुशील यांनी गुप्तरीत्या लग्नही करून टाकले आणि नैना त्या फ्लॅटवरच सुशीलची पत्नी म्हणून राहू लागली.

दिल्लीला अशोक रोडवर भारतीय पर्यटन विकास महामंडळाचे एक  "अशोक यात्री निवास" नावाचे हॉटेल आहे. सुशील आणि त्याच्या काही मित्रांनी भागीदारीत या हॉटेलसमोरील काही जागा रेस्टोरेंट चालू करण्यासाठी भाडेपट्टीवर घेतली आणि "बागीया बार-बे-क्यू" नावाचे एक रेस्टोरेंट सुरू केले. बांबूचे कुंपण असणाऱ्या या बागेत एक तंदूर भट्टी पण होती.

दि.२.०७.१९९५ च्या रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलीस शिपाई कुंजू आणि होमगार्ड चंदर पाल गस्तीवर असताना त्यांना "हॉटेल मी आग लग गयी" असा जोरजोरात आवाज ऐकू आला. ते तातडीने "बार-बे-क्यू" कडे धावले. धावपळीत कुंजूने पोलीस स्टेशनला माहिती देण्याचाही प्रयत्न केला. ते दोघे आत शिरल्यावर त्यांना स्वयंपाकघराकडून आग आणि धूर दिसून आला. आत केशव नावाचा एक इसम तंदूर भट्टीत लाकडाचे तुकडे टाकताना त्यांना दिसला. त्याला विचारल्यावर त्याने सांगितले की तो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असून पक्षाचे निकामी झालेले पोस्टर, फलक तसेच इतर साहित्य तो जाळत आहे.

ठाण्यात माहिती मिळाल्यामुळे गस्तीपथकातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले. ते आत शिरताना त्यांना प्रवेशद्वाराजवळच सुशील उभा असलेला दिसला. ते आत गेले तेव्हा तंदूर भट्टीतून घाणेरडा वास येत होता. आग वाढतच होती. त्यांनी संशयावरून केशवला ताब्यात घेतले. बाहेर येऊन पाहतात तोपर्यंत सुशील तिथून गायब झाला होता. हॉटेलमध्ये बाकी ठिकाणी पाहिले असता सर्व काही व्यवस्थित होते कुठेही आग लागली नव्हती. त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तंदूरची आग विझवली आणि पाहतात तो काय भट्टीत चक्क जळालेल्या अवस्थेतील मानवी देहाचे तुकडे आढळून आले. जवळून निरीक्षण केल्यावर तो मृत देह महिलेचा असल्याचे समजले. जळलेली हाडे, बाहेर आलेले आतडे, असे एकंदर भयंकर दृश्य होते. एक काळे पोलिथीनचे पोतेही जवळच पडले होते.

झाल्या प्रकाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळावर आले. कुंजूचे बयाण नोंदवण्यात आले आणि तेच एफ.आय.आर. म्हणून नोंदवण्यात आले. केशव च्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. घटनास्थळावरील सर्व साहित्य जप्त करण्यात आले, केशवला अटक करण्यात आली. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळात पाठवण्यात आला. त्यानंतर सुशील आणि त्याच्या मारुती गाडीचा शोध सुरू झाला. तिसऱ्या दिवशी सुशीलची गाडी चाणक्यपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस स्थितीत आढळली. गाडीच्या डिकीत वाळलेल्या रक्ताचे डाग होते मागच्या सीटला केस चिकटलेले होते. सुशीलच्या फ्लॅटचा ही तपास करण्यात आला. त्यात काही बंदुकीच्या गोळ्या, एअर पिस्तोल, काडतुसे इ साहित्य सापडले. ते सर्व आणि इतरही काही साहित्य जप्त करण्यात आले. नैनाच्या आई वडीलांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पाचारण करण्यात आले पण ते फक्त ओक्साबोक्षी रडले त्यांनी ओळख पटवली नाही. ओळख पटवली ती मतलूब करीम नावाच्या एका काँग्रेस कार्यकर्त्याने. मतलूब नैनाचा जवळचा मित्र होता.

घटनेच्या रात्री सुशील नवी दिल्लीतील "गुजरात भवन" येथे डी.के.राव यांच्यासोबत मुक्कामास होता. दुसऱ्या दिवशीपासून अटक टाळण्याच्या उद्देशाने तो गावोगाव भटकत होता. दि.४.०७.१९९५ रोजी त्याने डी.के.राव ला मुंबईहून फोन करून सांगितले की त्याने त्याच्या बायकोचा खून केला आहे. पुढे तो मद्रासला गेला आणि तिथे त्याने सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला. दिल्ली पोलिसांनी मद्रास उच्च न्यायालयातून तो अटकपूर्व जामीन रद्द करवला. बंगलोरला दि.१०.०७.१९९५ रोजी बंगलोर पोलिसांनी सुशीलला संशयास्पद स्थितीत फिरताना पकडले आणि स्थानबद्ध केले. दिल्ली पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी बंगलोरला जावून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुशीलने पोलिसांना तो वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये नेले. तिथे त्याची ब्रीफकेस त्याने पोलिसांसमोर सादर केली त्यात परवानाप्राप्त ३२ बोअर रिव्हाल्वर, चार काडतुसे आणि इतर कागदपत्रे आढळली, ते सर्व साहित्य जप्त करण्यात आले.

त्यानंतर सुशीलला दिल्लीला आणण्यात आले. त्यानेच दिलेल्या माहितीवरून आणि ठिकाणावरून रक्ताने माखलेले कुर्तापायजामा जप्त करण्यात आला. शवविच्छेदन अहवालात डोक्यात बंदुकीची गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले तसेच. फोरेन्सिक लेबोरेटरीचे अहवालानुसार खुनासाठी वापरलेले रिव्हाल्वर आणि आरोपी सुशीलकडून जप्त केलेले रिव्हाल्वर एकच होते. काडतूस ही जुळत होते. डी.एन.ए टेस्ट मध्ये मृतक महिला तिचे आई वडिल श्रीमती जसवंत कौर आणि श्री हरभजन सिंग यांची मुलगी असल्याचे निष्पन्न झाले. संपूर्ण तपासांती पोलिसांनी असा निष्कर्ष काढला की आरोपी सुशीलनेच त्याची पत्नी नैनाचा खून केला होता आणि तिचे मतलूब करीम याचेसोबत असलेल्या संबंधाबाबत संशय असल्यामुळे तसेच नैना आणि सुशील चुपचाप झालेले लग्न जगजाहीर करण्याची नैनाची मागणी हीच तिचा खून करण्यामागची कारणे होती. नैनाची हत्या केल्यानंतर केशवाच्या मदतीने सुशीलने तिचा मृतदेह तंदूर भट्टीत जाळण्याचा प्रयत्न केला, तसेच जयप्रकाश, रिषीराज आणि रामप्रकाश यांनी सुशीलला पळण्यास, लपण्यास मदत केली, या आरोपांवरून या सर्वांविरुद्ध निरनिराळ्या कलमांखाली दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी पक्षातर्फे एकूण ८५ साक्षीदार तपासण्यात न्यायालयीन साक्षीदार म्हणून ७ साक्षीदार तपासण्यात आले. सत्र न्यायालयाने सुशील ला नैनाच्या खुनासाठी आणि पुरावे नष्ट केल्याचे दोषी ठरवीत फाशीची सजा सुनावली. केशवला पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवले. इतर आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडून देण्यात आले.  सत्र न्यायालयाने या प्रकरणात दि.३.११.२००३ रोजी निकाल दिला आणि फाशीची सजा कायम करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाकडे प्रकरण पाठवले. दिल्ली उच्च न्यायालयाने सुशील ला सुनावण्यात आलेली फाशीची सजा दि.१९.०२.२००७ रोजीच्या आदेशान्वये कायम केली. 

सुशील शर्मा आता सर्वोच्च न्यायालयात पोहचले. खालच्या न्यायालयांच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. पी.सदाशिवम, न्या.रंजना प्रकाश देसाई आणि न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आणि दि. ८.१०.२०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुशील ची फाशीची सजा कमी करून त्याला जन्मठेपेची सजा सुनावली. सुशीलने केलेला गुन्हा अत्यंत पाशवी आणि नृशंस असल्याचे मान्य करीत सर्वोच्च न्यायालयाने फाशीची सजा सुनावण्यासाठी ते पुरेसे नाही असे आपल्या आदेशात नमूद केले. सुशीलने केलेला खून हा त्याच्या आणि नैनातील ताणलेल्या वैयक्तिक संबंधाचा परिणाम होता आणि तशा अर्थाने तो समाजाविरोधातील गुन्हा नव्हता. सुशील ची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तसेच तो भविष्यात असले काही गुन्हेगारी कृत्य करेल याबाबत सरकारी पक्षाने कुठलाही पुरावा न्यायालयासमोर सादर केलेला नाही. त्यामुळेच सुशील पुढे कधीही सुधारण्याची कसलीही चिन्हे नाहीत असे म्हणता येणार नाही. तसेच म्हाताऱ्या आईवडीलांचा तो एकुलता एक मुलगा आहे. दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी त्याने फाशीच्या शिक्षेच्या सावटाखाली तुरुंगात घालवलेला आहे. या सर्व बाबी विचारात घेता सर्वोच्च न्यायालयाने सुशील ला सुनावण्यात आलेला फाशीची सजा रद्द करून जन्मठेपेची सजा सुनावली. आता सुशीलला आयुष्यभर (संबंधित सरकारने त्याची सजा फौजदारी प्रक्रिया संहितेतील अधिकाराचा वापर करून कमी न केल्यास)तुरुंगात रहावे लागेल .

एक तरूण-तरूणी  राजकारण-समाजकारण करता करता एकत्र येतात काय, लग्न करतात काय, त्यांच्यात "मतलूब" वरून मतभेद होतात काय आणि मतभेद, भांडणाचे पर्यावसान नैनाच्या निर्घृण हत्येत होते काय आणि एके काळी जिच्यावर प्रेम केले तिच्या मृतदेहाला चक्क तंदूर भट्टीत जाळून टाकण्यापर्यंत एका तरुण राजकीय कार्यकर्त्याची मजल जावी? सारेच कसे अनाकलनीय.....रागाच्या भरात त्याने केलेले हे कृत्य काय भाव पडले? एका होतकरू राजकीय कार्यकर्तीचा अकाली मृत्यू, एका भावी नेत्याचा उर्वरित काळ तुरुंगाच्या चार भिंतींमधे बंदिस्त.............इतका राग का येतो लोकांना?

फाशीची सजा का सुनावण्यात यावी आणि का येवू नये यासंबंधी कुठलेही निश्चित निकष ठरवता येणार नाहीत, प्रत्येक प्रकरणात वेगवेगळी परिस्थिती असते, आरोपी किंवा गुन्हेगार सुद्धा वेगवेगळ्या धाटणीचे असतात. त्याचे सामाजिक स्थान, पूर्वेतिहास, गुन्हेगारी पार्श्वभूमी, भविष्यात सुधारण्याची किंवा न सुधारण्याची शक्यता, समाजाला त्यांचेपासून भविष्यात धोका निर्माण होईल किंवा नाही, या सर्व बाबींचा विचार करून फाशीच्या शिक्षेसंबंधी निर्णय द्यावा लागतो. अशा प्रकारे अनेक प्रकरणात योग्य ते निर्णय दिल्या गेले आहेत. याही प्रकरणातील निर्णय योग्यच वाटतो. एखाद्याने (न्यायमूर्ती) त्याला वाटले म्हणून एखाद्याच्या जीवाचाच फैसला करावा तेही भ्रष्टाचार, भाईभतिजावाद, लालफीतशाही, दिरंगाई, अशा आणि या सारख्या अनेक अन्याय्य बाबींची लागण झालेल्या वातावरणात? कायदेशीर खूनच नाही का तो? ...........
अ‍ॅड. अतुल सोनक,
भ्रमणध्वनी: ९८६०१११३००

No comments:

Post a Comment