Saturday, December 6, 2014

स्त्री जन्मा......

स्त्री जन्मा.......

स्त्री जन्माला येण्यापूर्वीच तिला मारून टाकण्याचा प्रयत्न केला जातो, जन्माला आल्यावर तिला काही ना काही कारणाने छळले जाते. सासुरवास, हुंड्यासाठी छळ, विनयभंग, बलात्कार, एक ना अनेक कारणे........आपला समाज यासाठी दोषी आहे. स्त्री-पुरुष नातेसंबंध कसे असावे, कसे असू नये याबाबत हजारो वर्षे मार्गदर्शन सुरू आहे, कालानुरूप बदलही होत असतो. पण असे काय होते की स्त्रीला शतकानुशतके अन्यायच सहन करावा लागत आहे. फक्त पुरुषांच्याच हातून नाही तर स्त्रियांच्या सुद्धा. स्त्रियांनीच कसा एका स्त्रीचा जीव घेतला बघा...............

वंदनाचे लग्न महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खिरवाड गावाच्या रघुनाथ पुना तायडे याचेशी दि.२८.०२.२००० रोजी झाले. लग्नानंतर वंदना तिच्या सासरी संयुक्त कुटुंबात राहू लागली. पती, सासू केशरबाई, सासरे, आशाबाई आणि कविता या नणंदा असे सर्व एकत्र नांदत होते. वंदनाला मूल होत नव्हते, हा एक विषय ठिणगी पडायला पुरेसा होता. तेवढ्या एका कारणासाठी केशरबाई, आशाबाई आणि कविता यांनी वंदनाला छळायाला सुरुवात केली.

नुसत्या छळाने या तिघींचे समाधान झाले नाही. त्यांनी वंदनाला चक्क केरोसीन टाकून जाळून टाकले. दि.५.०३.२००३ रोजी दुपारी ४.४५ च्या सुमारास केशरबाईने वंदनाच्या अंगावर केरोसीन ओतले आणि पेटवून दिले. आशाबाई आणि कविता सोबत होत्याच, त्यांची या प्रकाराला फूसही होती. जळत असताना वंदनाने आरडाओरडा करीत केशरबाईला घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे केशरबाईही जळाली. दोघींनाही भुसावळ च्या रेल्वे इस्पितळात भरती करण्यात आले. ५ आणि ६ तारखेला वंदनाने चारवेळा मृत्युपूर्व बयाण नोंदवले. शेवटी तिची झुंज कमी पडली आणि तिने दि. १८.०४.२००३ रोजी प्राण सोडला. त्याच दिवशी शव-विच्छेदन करण्यात आले.

इतर चौकशी आणि तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. केशरबाई, आशाबाई पुना तायडे, कविता अजय मेंढे, पुना मीठाराम तायडे, शोभा सीताराम तायडे आणि सीताराम रामाजी तायडे असे ते सहा आरोपी. जळगावच्या सत्र न्यायालयात या सहाही आरोपींविरुद्ध निरनिराळ्या कलमांखाली खटला चालला. दि.३०.३.२००५ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी निकाल दिला. केशरबाई, आशाबाई आणि कविता या तिघींना सत्र न्यायाधीशांनी भा.दं.वि.च्या कलम ४९८-अ आणि ३४ अन्वये दोषी ठरवले आणि एक वर्ष सश्रम कारावास आणि १००० रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी सजा ठोठावली. तर  भा.दं.वि.च्या कलम ३०२ आणि ३४ अन्वये दोषी ठरवून आजन्म कारावास आणि २००० रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास अशी सजा ठोठावली. इतर आरोपींना निर्दोष सोडण्यात आले.

तिघींनी सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर अपील दाखल करून आव्हान दिले. परंतु उच्च न्यायालयाने दि.११.०४.२००७ च्या आदेशान्वये त्यांचे अपील फेटाळले. त्यानंतर केशरबाईने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. परंतु दि.१०.२.२०१२ रोजी केशरबाईचे निधन झाले. त्यामुळे दि. १३.१२.२०१२ रोजी तिचे अपील खारीज करण्यात आले.
आता सर्वोच्च न्यायालयापुढे आशाबाई आणि कविताचे अपील (जे त्यांनी वेगळे दाखल केले होते) प्रलंबित होते. न्या. पी. सदाशिवम आणि न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या अपिलाची सुनावणी झाली. आशाबाई आणि कविता यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की वंदनाने चारवेळा मृत्यूपूर्व बयाण दिले आणि त्यात बरीच तफावत आहे. तिने काही बयाणात या तिघींव्यतिरिक्त इतरांनाही गोवले होते त्यामुळे तिच्या बयाणांवर विश्वास ठेवता येत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळला. सर्वोच्च न्यायालयाच्या मते तिने प्रत्येक बयाणात या तिघींचे नाव घेतले आहे त्यामुळे वंदनाला छळ्ण्यात- जाळण्यात या तिघींचा हात आहेच आहे. बयाणांतील तफावतीचा लाभ या आरोपींना देता येणार नाही. इतर आरोप सत्र न्यायालयाने पूर्वीच सोडले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने वंदनाच्या मृत्यूपूर्व बयाणांव्यतिरिक्त इतर साक्षीदारांची बयाणेही तपासली. वंदनाच्या आईने (मालताबाई) तिच्या बयाणात सांगितले होते की या तिघीही वंदनाला नेहमी घालून पाडून बोलत होत्या, निरनिराळ्या कारणावरून त्रास देत होत्या, वाद घालत होत्या, भांडत होत्या. वंदनाचा भाऊ (संजय) आपल्या बयाणात म्हणाला की या तिघींनी दि.४.०१.२००३ रोजी वंदनाला त्यांच्यासमोर बेदम मारहाण केली होती. त्याने मधे पडायचा प्रयत्न केला असता त्याला सुद्धा मारले होते. वंदनाच्या मामानेही आपल्या बयाणात सांगितले की तो वंदनाला इस्पितळात भेटायला गेला होता तेव्हा तिने त्याला सांगितले होते की तिला केशरबाई, आशाबाई  आणि कविताने जाळले होते. ती जवळपास दीड महिना मृत्यूशी झुंज देत होती. वंदनाने आपल्या मृत्यूपूर्व बयाणात सांगितले होते की घट्नेच्या दिवशी ती आणि तिचा पती रघुनाथ (रेल्वेत स्टेशन मास्तर) सकाळीच मुंबईहून भुसावळ ला आले होते. आल्याबरोबर या तिघीही वंदनाशी भांडल्या. रघुनाथला म्हणाल्या की या वांझबाईला आपल्या घरातून हाकल, ती आपल्या घरात राहण्याच्या लायकीची नाही. त्यांना कसं तरी समजावून रघुनाथ कामावर निघून गेला. नंतर या तिघींनी डाव साधला. केशरबाईने वंदनाच्या अंगावर केरोसीन ओतले आणि आशाबाई तसेच कविताने तिला पेटवायला उद्युक्त केले. क्षणाचाही विलंब न करता आशाबाईने आग लावली. थोडक्यात काय तर आशाबाई आणि कविताचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग होता.

सर्वोच्च न्यायालयाने सर्व साक्षीपुरावे तपासून आनि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून आशाबाई आणि कविताचे अपील दि.४.०१.२०१३ रोजी फेटाळले. सत्र न्यायालयाचा आणि उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.  स्त्रियांसाठी  इतके कडक कायदे असताना असे प्रकार घडत आहेत, नव्हे वाढत आहेत, त्यामुळे गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्याच शब्दात:“ 18) In spite of stringent legislations in order to curb the deteriorating condition of women across the country, the cases related to bride burning, cruelty, suicide, sexual harassment, rape, suicide by married women etc. have increased and are taking place day by day. A complete overhaul of the system is a must in the form of deterrent punishment for the offenders so that we can effectively deal with the problem. In the case on hand, Vandana died within 3 years of her marriage at the instance of her mother- in-law and sisters-in-law due to the harassment meted out to her because of the inability to conceive a child and she was poured kerosene and burnt to death. Even though, the mother-in-law, who also filed a separate appeal, died on 10.02.2012, in view of clinching evidence led in by the prosecution, there cannot be any leniency in favour of the appellants, who are sisters-in-law of the deceased and at whose instance the deceased was burnt at the hands of her mother-in-law.”

स्त्रियांनीच एका स्त्रीला जिवंत जाळावे, केवढे हे क्रौर्य? तेही एका क्षुल्लक कारणासाठी. काय तर म्हणे मूल होत नाही. मूल झालंच पाहिजे का? आजकाल विज्ञान-तंत्रज्ञान किती पुढे गेलेले आहे. अनेक उपाय, औषधोपचार असतात, एवढे करुनही नाहीच झाले तर मूल दत्तक घेता येते. यापैकी काहीच न करता तिलाच दोषी मानून चक्क पेटवून द्यायचे.............त्यांचा इतका राग अनावर व्हावा की त्यांच्यातील स्त्रीत्वाची, मातृत्वाची, ममतेची भावना किंवा आपण असे गैरकृत्य केल्यास आपल्याला शिक्षा होवू शकते-अशी भीतीची भावना, या सर्व भावनांवर रागाने/सूडाने मात करावी. स्त्रियांचा छळ फक्त पुरुषच करीत नाहीत, त्यात स्त्रियाही सामील असतात हे आपल्याला अनेक हुंडाबळी प्रकरणांत दिसतेच. गुन्हेगार हा शेवटी गुन्हेगारच असतो. लिंग-जात-धर्म-पंथ निरपेक्ष......त्यामुळेच या प्रकरणातील महिला आरोपींना/गुन्हेगारांना योग्य अशीच शिक्षा मिळाली. जुनाट विचारांचा पगडा अजूनही आपल्या तथाकथित पुरोगामी समाजावर आहे, हे या वंदनाजळित प्रकरणावरून दिसते. पुराव्यांचा नीट अभ्यास करुन, कायद्याचा अर्थ लावून सत्र न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवीत योग्य अशी कठोर सजा सुनावली आणि उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय आणि ती सजा कायम ठेवली, हे तरी बरे झाले अन्यथा इतके करुनही आपल्याला काहीच होणार नाही, ही भावना वाढीस लागते आणि गुन्ह्यांची संख्या वाढते. एक संवेदनशील नागरिक म्हणून आपण आपल्या नातेवाईकांत, परिसरात, गावात अशा केशरबाई, आशाबाई किंवा कविताशोधून त्यांचे प्रबोधन करुन अनेक वंदनांचाजीव वाचवायला हवा, नाही का?


अतुल सोनक

९८६०१११३००             

No comments:

Post a Comment