Saturday, July 6, 2013

न्यायालयीन अवमानाचे तीन तेरा.....


न्यायालयीन अवमानाचे तीन तेरा.....
न्यायाधीशाला शिव्या देवूनही निर्दोष सुटणाऱ्या वकिलांची कहाणी............
हरियाणातील फरीदाबाद जिल्ह्यातील दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर आणि प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, श्री. राकेश सिंग यांच्या न्यायालयात दि. ११.०९.१९९९ रोजी एका सोरन नावाच्या आरोपीला पोलीस कस्टडी रिमांड मागण्यासाठी पोलीस घेवून येतात. पोलिसांतर्फे सहाय्यक सरकारी वकील आरोपी सोरनला पोलीस कोठडी देण्यात यावी म्हणून मागणी करतात. त्याला आरोपी सोरनचे वकील श्री. एल. एन. प्रशर जोरदार विरोध करतात. न्यायाधीश महोदय दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सोरनला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश पारित करतात. आदेश आपल्या विरोधात गेल्याचे कळताच प्रशर वकील चिडतात, त्यांना खूप राग येतो आणि ते रागाच्या भरात न्यायाधीश महोदयांना वाट्टेल तशी शिवीगाळ करतात. न्यायाधीश राकेश सिंग प्रशर वकीलांना शांत करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही आणि प्रशर वकील असभ्य, असांसदीय भाषेत न्यायाधीश महोदयांवर आपला भडिमार चालूच ठेवतात तसेच गंभीर परिणामांची धमकी सुद्धा देतात.

 हा अश्लाघ्य प्रकार सुरू असताना आरोपी सोरनला पुन्हा एका दुसऱ्या प्रकरणात न्यायालयात आणले जाते. सोरनला एकून चार प्रकरणात न्यायालयासमोर पेश करावयाचे असते. चारही प्रकरणात त्याचे वकील श्री. एल.एन.प्रशरच असतात. दुसऱ्या प्रकरणातील रिमांड पेपर न्यायाधीश महोदय वाचत असताना प्रशर वकिलांचे असभ्य भाषेत शिवीगाळ करणे आणि धमक्या देणे सुरूच असते एवढेच नव्हे तर प्रशर वकील आपल्या इतर सहकाऱ्यांना ( श्री. .पी. शर्मा, श्री. राजेंद्र शर्मा, श्री. सुरेंद्र शर्मा आणि इतर १५-२० वकील ) बोलावून आणतात. न्यायाधीश महोदय .पी. शर्मा या वरिष्ठ वकिलाला विनंती करतात की त्यांनी प्रशर वकिलांना समज द्यावी आणि न्यायालयात चांगले वागायला सांगावे. परंतु .पी.शर्मा न्यायाधीश महोदयांची विनंती धुडकावून प्रशर वकिलांचीच बाजू घेतात आणि ते सुद्धा इतर वकिलांबरोबर न्यायाधीशांना अश्लील शब्दात शिवीगाळ करण्यात आणि धमक्या देण्यात सामील होतात. हे सर्व वकील इतके आक्रमक झालेले असतात की त्यांना न्यायाधीश महोदयांना मारहाणच करायची असते. पुढे काहीही अघटित घडू नये म्हणून न्यायाधीश महोदय स्वत: उठून आपल्या चेंबरमध्ये चालले जातात.

झालेला सर्व प्रकार न्यायाधीश श्री. राकेश सिंग दि.१४.०९.१९९९ रोजी फरिदाबादच्या जिल्हा सत्र न्यायाधीशांना पत्र लिहून कळवतात. दि.२४.०९.१९९९ रोजी पुन्हा एक पत्र लिहून राकेश सिंग जिल्हा न्यायाधीशांना हेही कळवतात की प्रशर आणि .पी. शर्मा वकील हे गुन्हेगारी स्वरूपाचे व्यक्ती असून ते नेहमी न्यायाधीशांना धाक दपटशा दाखवून दबाव आणत असतात. न्यायालयात घडलेला हा सर्व प्रकार "मजदूर मोर्चा" या स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित होतो.

जिल्हा  सत्र न्यायाधीश झालेला सर्व प्रकार राकेश सिंग यांच्या पत्रासह पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांना पत्र लिहून कळवतात. जिल्हा  सत्र न्यायाधीश  यांचे दि.१६.०९.१९९९ चे पत्र मिळाल्यावर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय या प्रकरणाची गंभीर  दखल घेते आणि न्यायालयीन आवमाननेबाबत कारवाई सुरू करते. उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे प्रशर आणि इतर वकील हजार होतात आणि झाल्या प्रकाराबद्दल प्रतिज्ञापत्र दाखल करून बिनशर्त  दिलगिरी व्यक्त करतात. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे सर्व अवमान करणारे वकील न्यायाधीश राकेश सिंग यांच्यासमोर हजर होवून त्यांची ही बिनशर्त माफी मागतात. वकिलांनी केलेले कृत्य चुकीचे होते याची उपरती झालेली असली आणि त्यांनी माफीही मागितलेली असली तरी प्रकरणाचे गांभीर्य बघता उच्च न्यायालय या अवमान करणाऱ्या वकिलांना सहा महिने/तीन महिने अशा साध्या तुरुंगवासाची तसेच रु.,०००/-, रु.,०००/- अशा दंडाची सजा सुनावते. हा निकाल लागायला २००४ साल उजाडते. झालेला प्रकार प्रकाशित करणाऱ्या वृत्तपत्राचे संपादक श्री. सतीश कुमार यांना सुद्धा न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल सजा झाली.

उच्च न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेविरुद्ध सर्व वकील सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून दाद मागतात. सर्वोच्च न्यायालयात ही अपील प्रकरणे २०११ साली सुनावणीस आली असताना या वकिलांची बाजू प्रख्यात ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी मांडतात.  त्यांच्या मते घटना घडून बराच कालावधी उलटून गेलेला आहे. वकिलांना त्यांनी केलेल्या चुकीची लगेच जाणीव झाली होती आणि त्यांनी लगेच बिनशर्त माफी सुद्धा मागितली आहे सबब त्यांना दया दाखवून त्यांना निर्दोष सोडण्यात यावे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. पी. सदाशिवम आणि न्या. डॉ. बी.एस. चौहान यांनी वकिलांनी तसेच संपादकांनी मागितलेली बिनशर्त माफी तसेच भविष्यात असा प्रकार करणार नाही याची हमी देणारी प्रतिज्ञापत्रे ग्राह्य धरून सर्व अवमानकर्त्यांची उच्च न्यायालयाने ठोठावलेली सजा माफ केली आणि त्यांना दोषमुक्त केले. न्यायमूर्ती महोदयांनी आदेशात एवढे मात्र नमूद केले की अशा प्रकारे माफी मागितल्याने प्रत्येक वेळी सुटका होईलच असे नाही.

इतका अश्लाघ्य आणि घाणेरडा प्रकार भर न्यायालयात (जे न्यायदेवतेचे पवित्र मंदिर समजले जाते) करूनही अवमानकर्ते वकील निर्दोष  सुटतात तर.......... झालेला सर्व प्रकार, त्यानंतर मागण्यात आलेली माफी, चांगल्या वागणुकीची हमी, त्यावर दिल्या गेलेला निकाल, . सर्व स्वयंस्पष्ट असल्यामुळे त्यावर मी अधिक भाष्य करणे गरजेचे नाही. सुज्ञ  वाचक जे झाले ते योग्य झाले कि अयोग्य ते समजतीलच.

 अवमान कसा झाला?.............
प्रशर वकील न्यायाधीश राकेश सिंग यांना उद्देशून....
तुम्ही लाच घेता, तुम्ही सर्व कामे लाच घेवूनच करता, तुम्ही गटबाजी करता. तुम्ही माझं काय बिघडवू शकता? तुम्ही माझ्यावर न्यायालयीन अवमाननेची कारवाई करू शकता, मी तुमचं रक्त पीईन, मी तुम्हाला उच्च न्यायालयापर्यंत सोडणार नाही. बहनचोद, तुम्ही न्यायालयाला खानावळ समजता. तुम्ही माझ्याविरुद्ध आदेश देवूच कसे शकता? तुम्ही बाहेर या मी तुम्हाला धडा शिकवतो.माझ्यावर अनेक फौजदारी केसेस सुरू आहेत, अजून एक केस लागली तर मला काही फरक पडत नाही. हिम्मत असेल तर बाहेर या.
न्या. राकेश सिंग यांनी बाबूला सांगून मुख्य न्यायदंडाधिकारी यांना बोलावण्यास सांगितले असता प्रशर म्हणाले मी त्यांनाही पाहून घेईन. राकेश सिंग यांनी .पी. शर्मा या ज्येष्ठ वकिलांना प्रशर यांना समजावण्याची विनंती केली असता ते सुद्धा आम्ही असेच करू, न्यायालयाचे दरवाजे बंद करा आणि राकेश सिंग विरुद्ध नारेबाजी करा असे इतर वकिलांना म्हणाले. "राकेश  सिंग मुर्दाबाद" असे नारे तिथे लावले गेले.
ॅड. अतुल सोनक,
९८६०१११३००, ९४०४७०००५७



No comments:

Post a Comment