जलदगती न्याय
बलात्काराच्या खटल्याचा
निकाल केवळ अडीच महिन्यात लागला आणि गुन्हेगाराला शिक्षा ही झाली. मध्य
प्रदेशातल्या मंडला जिल्ह्यातील ही घटना, कर्तव्यदक्ष पोलीस आणि न्याययंत्रणा असली
तर गुन्हेगारांना शिक्षा व्हायला काही विशेष वेळ लागत नाही हे या खटल्यात सिद्ध
झाले. सर्वोच्च न्यायालयानेही या तत्परतेची तारीफ केली. आता आपण या खटल्याचा
घटनाक्रम बघू...........
इकनीस जोजो त्याची बायको अल्बिसिया आणि त्यांची
चार मुलं, गौन्झी, सुषमा, संचित आणि अरिक यांच्या सोबत मंडला जिल्ह्यातील नैनपूर
पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुखासमाधानाने राहत होते. दोघेही नवरा बायको त्यांच्या शेतावर
रात्री पाणी ओलायला जायचे. असेच दि.२६.१२.२०१२ रोजी ते रात्री शेतावर गेले. चौदा
वर्षांची गौन्झी आणि तिची इतर भावंड घरी होते. रात्री त्यांच्या घराजवळ राहणारा
राजकुमार नावाचा माणूस (जो या सर्वांचा ओळखीचा होता आणि ज्याला मुलं मामा म्हणून
हाक मारायचे) यांच्या घरी झोपायला आला. तसा तो नेहमी यायचा. त्याने दारू ढोसली,
जेवण केलं आणि झोपण्यापूर्वी त्याने गौन्झीला इतर तिघांपासून जरा दूर झोपायला
सांगितले. मध्यरात्रीच्या सुमारास त्याने गौन्झीवर बलात्कार केला आणि त्याच्या
अत्याचारामुळे तिचा मृत्यू झाला. आपला कार्यभाग आटोपून राजकुमार निघून गेला. राजकुमारला
गौन्झीवर अत्याचार करताना दहा वर्षाचा संचित बघत होता पण भीतीपोटी तो काहीच करू
शकला नाही.
दुसऱ्या दिवाशी सकाळी इकनीस आणि अल्बिसिया घरी
परतले. पाहतात तर सगळी मुले शांत झोपली होती. त्यांनी तिघांना उठवले पण गौन्झी उठत
नव्हती रात्रीच तिचे प्राणपक्षी उडून गेले होते. संचितने त्यांना रात्रीचा प्रकार
सांगितला. इकनीसने लगेच पोलीस ठाण्यात जावून तक्रार नोंदवली. पोलिसांनी
भा.दं.वि.च्या कलम ३०२ आणि ४५० अन्वये गुन्हा नोंदवला. पोलीस निरीक्षक के.एस.ठाकूर
घटनास्थळी गेले. गौन्झीचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवला. घटनास्थळी
सापडलेल्या काही वस्तू जप्त करून पंचनामा तयार केला. तपासाची चक्रे फिरली. संबंधित
न्यायदंडाधिकाऱ्याच्या परवानगीने आरोपी राजकुमारच्या रक्ताची डीएनए चाचणी करण्यात आली. शव विच्छेदान
अहवाल, इतर वैद्यकीय पुरावे आणि संचितचे बयाण यावरून राजकुमार ने गौन्झीवर
बलात्कार केला आणि नंतर तिचा गळा आवळून खून केला असे तपासात निष्पन्न झाले.
त्यावरून भा.दं.वि. च्या ३७६ आणि ५११ ह्या कलमा ही जोडण्यात आल्या. तपास पूर्ण
करून सर्व पुराव्यांसह आरोपी राजकुमारवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सर्व साक्षीदारांची बयाणे आणि इतर सर्व पुरावे
तपासून मंडल्याच्या सत्र न्यायाधीशांनी राजकुमारवरील गौन्झीवर बलात्कार करून तिचा
खून करण्याचा आरोप सिद्ध झाल्याचा निर्णय देत त्याला वेगवेगळ्या कलमांखाली सजा
सुनावली. ३०२ कलमाखाली मरेपर्यंत फाशीची सजा आणि ३००० रु. दंड, दंड न भरल्यास एक
वर्ष तुरुंगवास, ३७६ कलमाखाली जन्मठेप आणि ३००० रु. दंड, दंड न भरल्यास
एका वर्ष तुरुंगवास आणि, ४५० कलमाखाली दहा वर्षे सक्त मजुरीची सजा आणि ३००० रु.
दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष तुरुंगवास. सर्व सजा एकत्रच भोगायच्या होत्या. सत्र
न्यायाधीशांनी हा निकाल दि. ५.०२.२०१३ रोजी दिला. कायद्याप्रमाणे फाशीची सजा कायम
करण्यासाठी प्रकरण म.प्र. उच्च न्यायालयात पाठवले, राजकुमारनेही त्याला ठोठावण्यात
आलेल्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केली. उच्च न्यायालयाने दि.२७.०६.२०१३
रोजी राजकुमारची अपील फेटाळली आणि फाशीची सजा कायम केली. बघा घटनेपासून फक्त अडीच
महिन्यात सत्र न्यायालयाचा निकाल आला आणि सहा महिन्यात उच्च न्यायालयाने फाशीची
सजा कायम केली.
त्यानंतर राजकुमार
सर्वोच्च न्यायालयात पोहचले. सर्वोच्च न्यायालयात न्या. बी.एस.चौहान आणि न्या. एम.वाय.इक्बाल
यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने दि. २५.०२.२०१४ रोजी
निकाल दिला. फक्त दीड वर्षात तीन न्यायालयांसमोर सुनावणी पूर्ण होवून अंतिम निकाल
सुद्धा लागला. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राजकुमारची फाशीची सजा रद्द करून
त्याला जन्मठेपेची सजा सुनावली. राजकुमारने कमीत कमी ३५ वर्षांची सजा भोगावी.
तथ्य, पुरावे आणि एकंदर परिस्थिती बघता सर्वोच्च न्यायालयाला राजकुमारने केलेला
गुन्हा “दुर्मिळातला दुर्मिळ” वाटला नाही म्हणून त्याला ठोठावण्यात आलेली फाशीची
सजा जन्मठेपेत परावर्तीत करण्यात आली. या पूर्वीही आपण अनेक प्रकरणांत असे प्रकार
घडल्याचे पाहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाला तो अधिकारच आहे. योग्य कि अयोग्य याचे
मापदंड प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. प्रस्तुत प्रकरणात सजा काय सुनावण्यात आली
किंवा निकाल काय दिला गेला, हे महत्त्वाचे नसून सर्व प्रक्रिया किती लवकर पूर्ण
झाली ते महत्त्वाचे आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल देताना
ज्या जलदगतीने एकूण सर्व प्रक्रिया पार पडली त्याचे कौतुक केले आहे. बघा.....
“21. Thus, taking into consideration the aforesaid judgments,
we are of the view that in spite of the fact that the appellant had committed a
heinous crime and raped an innocent, helpless and defenceless minor girl who
was in his custody, he is liable to be punished severely but it is not a case
which falls within a category of rarest of rare cases. Hence, we set aside the
death sentence and award life imprisonment. The appellant must serve a minimum
of 35 years in jail without remission, before consideration of his case for
pre-mature release. However, it would be subject to clemency power of the
Executive.
The appeals stand disposed of.
Before we part, we would like to note with appreciation that
in the instant case investigation and all judicial proceedings upto this Court
stood concluded in less than 8 months from the date of incidence. Thus, it is
an exemplar of expeditious justice in country of chronic delay by smooth
functioning of investigating agency, courts and the members of legal
fraternity. We expect such prompt disposal of cases specifically in cases of
such grave nature.”
पुरावे, युक्तिवाद, निकाल फिरवल्याची, बदलल्याची
कारणे, किंवा आरोपींना सोडल्याची कारणे आपण यापूर्वी अनेक खटल्यांमध्ये बघितली
आहेत. या खटल्यावर लेख लिहिण्याचा हेतू खटला कसा लवकर निकाली निघू शकतो हेच
दाखवण्याचा आहे. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये
तपास, चौकशी, सुनावणी आणि निकाल या सर्व पायऱ्या अशाच लवकरात लवकर पूर्ण
व्हाव्यात, पुढे अपिलातही जास्त वेळ लागू नये (प्रस्तुत प्रकरणात जसे दोन्ही अपील
लवकर निकाली निघाले) अशी अपेक्षा करायला हरकत नाही. विशेषत: दिवसेंदिवस प्रगती
करीत असलेले विज्ञान, तंत्रज्ञान, नवनव्या पद्धतींचा वापर, न्यायप्रक्रियेतील आणि
पोलीस तसेच इतर सरकारी कार्यालयांतील संगणकांचा वापर, यामुळे न्यायदानाला खूप
विलंब होण्याची तशी काही गरज नाही. मनात आणले तर सर्व काही योग्य वेळेत पार पडू
शकते. हे दाखवणारा हा निकाल आहे. सक्षम, सुसंस्कृत आणि अभ्यासू पोलीस तसेच
कायद्याचे आणि पुराव्याचे योग्य मूल्यमापन करणारे विद्वान न्यायाधीश पुरेशा
संख्येने असल्यास या देशात सुद्धा जलदगतीने न्याय मिळू शकतो, हे या खटल्याच्या
निकालावरून सिद्ध होते. आपल्या मरगळलेल्या व्यवस्थेत, “कसं होणार या देशाचं” याची
घरबसल्या चिंता वाहणाऱ्या तमाम तथाकथित देशप्रेमी नागरिकांसाठी हा खटला आशेचे किरण
निर्माण करू शकतो. नाही का?
अॅड. अतुल सोनक,
भ्रमणध्वनी:
९८६०१११३००
No comments:
Post a Comment