पालक, पाल्य आणि भलेबुरे........
आज काल दूरचित्रवाहिन्यांवरील धारावाहिकांमधील
प्रेमप्रसंगाच्या बटबटीत आणि उथळ प्रदर्शनामुळे म्हणा, चित्रपटातील पुरोगामी आणि
धाडसी कथानकांमुळे म्हणा किंवा प्रसार माध्यमातून सुरू झालेल्या मुक्त
जीवनाच्या चित्रणामुळे म्हणा, आपल्या मुलामुलींची प्रेम प्रकरणं फार मोठ्या प्रमाणात
सुरू झाली आहेत. अगदी सातव्या-आठव्या वर्गात शिकत असणारी मुलेमुली प्रेमात पडायला
लागली आहेत. शाळेला चाट मारून निरनिराळ्या बगीच्यात किंवा निर्मनुष्य रस्त्यांवर
हातात हात धरून किंवा गळ्यात गळे घालून ही तथाकथित प्रेमी युगुले काय बोलत असतात
ते त्यांचे त्यांनाच माहित. प्रेमभंग होतात, आत्महत्या होतात, लग्न होवून घटस्फोट
होतात, एकतर्फी प्रेमातून बलात्कार होतात, मारामाऱ्या होतात, खून होतात. कोवळ्या
वयात प्रेम केल्यावर पुढे आयुष्य सुखात जाईलच याची काही शाश्वती नसते. अशा
वातावरणात पालकांची त्यांच्या पाल्यांप्रती जबाबदारी निश्चितच वाढते. असेच एक
प्रेमप्रकरण केरळ उच्च न्यायालयासमोर नुकतेच येवून गेले. त्यावर निकाल देताना
पालक-पाल्य नात्यासंबंधी फार चांगले मार्गदर्शन करण्यात आले आहे. पालकाची
पाल्याप्रती जबाबदारी अधोरखित करण्यात आली आहे. ती कशी ते बघू या.............
केरळमधील वडक्कनचेरी येथील जिल्हा इस्पितळात डॉ.
लाल परमेश्वर हे एक वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे
म्हणण्याप्रमाणे ते एका इलाईट मिशन हॉस्पिटल मध्ये कार्यरत असताना तिथे काम करणारी
एक महिला निवासी वैद्यकीय अधिकारी, कु. ग्रीष्मा उल्लास त्यांच्या संपर्कात आली.
वारंवार येणाऱ्या संपर्कामुळे ते एकमेकाला आवडू लागले, त्यांच्यात प्रेम फुलू
लागले आणि प्रेम करता करता त्यांनी लग्न करायचे ठरवले. परंतु हा प्रकार
ग्रीष्माच्या वडिलांना पसंत नव्हता. डॉ. लाल म्हणतात की ग्रीष्माच्या वडिलांनी
ग्रीष्माला बेकायदेशीररित्या त्यांच्या घरी डांबून ठेवले. तिला नुसते घरात
स्थानबद्धच करून ठेवले नाही तर तिला ना हॉस्पिटलमध्ये जावू दिले ना तिला
पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या प्रवेश परीक्षेसाठी जावू दिले. शेवटी ग्रीष्माने डॉ.
लाल यांना एक पत्र लिहिले आणि त्यात तिला तिच्या वडिलांनी बेकायदेशीररीत्या डांबून
ठेवले असून ति प्रचंड तणावाखाली आणि दु:खात वावरत आहे असे नमूद केले. त्या
पत्राच्या आधारावर डॉ. लाल यांनी केरळ उच्च न्यायालयात ग्रीष्माच्या वडिलांविरुद्ध
दि.२७.०१.२०१४ रोजी “हेबियस कॉर्पस” याचिका दाखल केली.
उच्च न्यायालयाच्या न्या. ए. डॉमिनिक आणि न्या.
अनिल के. नरेंद्रन यांच्या खंडपीठासमोर याचिका सुनावणीस आल्यावर त्यांनी याचिका
दाखल करून घेतली आणि ग्रीष्माच्या वडिलांविरुद्ध नोटीस काढली तसेच त्यांना
ग्रीष्माला न्यायालयासमोर उपस्थित करण्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयाचे
आदेशानुसार ग्रीष्माच्या वडिलांनी तिला दि.३१.०१.२०१४ रोजी उच्च न्यायालयासमोर हजर
केले. उच्च न्यायालयाने ग्रीष्माला विचारल्यावर तिने सांगितले की तिचे डॉ. लाल
परमेश्वर यांच्यावर प्रेम आहे आणि ते दोघे लग्न ही करणार आहेत.तिने न्यायालयाला
हेही सांगितले की तिने डॉ. लाल यांच्याशी संबंध ठेवू नये यासाठी तिला मागील तीन
महिन्यांपासून तिच्या वडिलांनी घरीच बेकायदेशीररित्या डांबून (स्थानबद्ध करून)
ठेवले आहे. तिला हॉस्पिटलला जावू दिले जात नाही, तिचा मोबाईल फोन तिला दिला जात
नाही, वापरू दिला जात नाही. तिने त्यांच्या आवडीच्या/पसंतीच्या मुलाशी लग्नाला
होकार दिला तरच तिला घराबाहेर जावू दिले जाईल आणि बाकीच्या सवलती दिल्या जातील असे
तिचे वडील म्हणतात असे तिने न्यायालयाला सांगितले.
तिचे म्हणणे ऐकून घेतल्यावर उच्च न्यायालयाने
तिची रवानगी एका वसतिगृहात (होस्टेल) मध्ये केली, डॉ.लाल आणि तिला विशेष विवाह
कायद्याच्या तरतुदीनुसार लग्नाची नोटीस देण्याची परवानगी दिली. हा सर्व प्रकार
झाल्यावर ग्रीष्माच्या वडिलांनी उच्च न्यायालयासमोर एक प्रतिज्ञापत्र दाखल केले
त्यात त्यांनी ग्रीष्माला बेकायदेशीररित्या डांबून ठेवले नसून तिच्या भल्यासाठीच
तिला घरी ठेवले असून एक पिता/पालक म्हणून त्यांची जी कर्तव्ये आहेत त्याचेच पालन
ते करीत आहेत. त्यांनी कुठलेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही. तिचे कल्याण आणि भले
पाहणे हेच त्यांचे कर्तव्य आहे आणि पित्याच्या अधिकारात त्यांनी जे काही केले आहे
ते मुलीच्या भल्यासाठीच केले आहे.
ग्रीष्माच्या वडिलांनी त्यांच्या
प्रतिज्ञापत्रात पुढे असेही सांगितले की तिच्याजवळ तीन मोबाईल फोन होते त्यापैकी
एकच त्यांना सापडला, त्यातील तिने याचिकाकर्त्या डॉ. लाल यांना दि.१९.११.२०१३ रोजी
पाठवलेले संदेश/मेसेजेस वाचून तिच्या जीवाला धोका आहे याबद्दल त्यांच्या मनात
कुठलीही शंका नाही. तिने याचिकाकर्त्याला पाठवलेले संदेश त्यांच्या उत्तरात
त्यांनी पाठवलेले संदेश बघितले असता डॉ. लाल यांचे खुशालचेंडू चारित्र्य आणि त्यांचे
इतर मुलींशी असलेले संबंध स्पष्ट होतात. ग्रीष्माला अशा माणसाच्या ताब्यात देणे
म्हणजे तिचा जीव धोक्यात घालणे होईल. त्यांनी एकेमेकाला पाठवलेले संदेश असे
होते........too तुझे पूर्वायुष्य जसे जगलास तसाच आनंदात जग, मजा कर, माझ्याशी
इतकी जवळीक निर्माण झाली असताना तू इतर मुलींशी संबंध का ठेवतो?, आपल्या संबंधाची
वैधता काय? तू माझ्या एकटीसोबत संपूर्ण आयुष्य घालवू शकशील? तू आयुष्यभर एका स्त्री सोबत राहूच शकत नाही,
नाही ना? या प्रश्नाचे उत्तर तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसाकडून घेण्यात काही अर्थ
नाही. तू माणूस नाहीसच, तुला फक्त माझ्यासारखी बायको पाहिजे पण इतरही मुलींसोबत तू
संबंध ठेवतोच, तू रोगट मनाचा आहेस, तू भामटा आहेस, तू माझ्याप्रमाणेच इतरांनाही
एवढेच नव्हे तर देवांनाही फसवतोस, तुझी वागणूक शुद्ध आणि चांगली झाल्याशिवाय आपले
मिलन शक्य नाही. खोटी आश्वासने देवून तू माझ्याशी लग्न करशील आणि पुन्हा तसाच
रंगेलपणे वागशील तुझा काहीही भरवसा नाही. तू एकपत्नीव्रती राहू शकशील? तू क्रूर
आहेस, भामटा आहेस, स्वार्थाने बरबटलेला आहेस.........यावर डॉ. लाल म्हणतात,
ग्रीष्मा तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यासाठी सगळं सोडायला तयार आहे, आजवर जे
केलं ते सगळं बंद करीन, एकपत्नीव्रती म्हणून आयुष्य घालवीन, तुझ्याशी निष्ठावान
राहीन, माझ्यावर विश्वास ठेव. मी जास्तीत जास्त शुद्ध राहण्याचा प्रयत्न करीन.
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काही अर्थ नाही. मी तुझी निराशा होवू देणार नाही.
आयुष्यभर एकनिष्ठ राहीन. (निकालपत्रात बरेचसे संदेश केरळी भाषेत असल्यामुळे ते
भाषांतरित करता आले नाहीत, जे इंग्रजीत होते तेच फक्त भाषांतरित करता आले.)
ग्रीष्माचे वडील प्रतिज्ञापत्रात पुढे म्हणतात
की वरील संदेश वाचल्यानंतर त्यांनी मुलामार्फत चौकशी केली असता त्यातील मजकूर
बरोबर आणि खरा असल्याची माहिती मिळाली. याचिकाकर्त्याचे तब्बल सहा मुलींशी संबंध
असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तिला बेकायादेशीररित्या डांबून ठेवलेले नसून ति
घरात मोकळ्या रीतीने हिंडू फिरू शकते, तिला खोलीला कुलूप लावून बंद करून ठेवले
नव्हते. तसेच तिला हॉस्पिटल ला जाण्यापासून आणि परीक्षेला बसण्यापासून कधीही रोकले
नव्हते. त्यांच्या एकुलत्या एक मुलीसाठी एक पिता या नात्याने त्यांनी जे केल तो योग्यच
होते आणि कुठल्याही परिस्थितीत बेकायदेशीर नव्हते. डॉ. लाल यांनी स्वत:ला तसेच
ग्रीष्माला न्यायालयाच्या आवारातच मारण्याचा प्रयत्न ही केला.
या सर्व आरोपांना डॉ. लाल यांनी प्रतिज्ञापत्र
दाखल करून उत्तर दिले, त्यात सर्व आरोप फेटाळले, ते दोघेही लग्न करून आयुष्यभर
सुखात राहू शकतात, ते वेगवेगळ्या जातीचे आहेत हे एकमेव कारण वगळता ग्रीष्माच्या
वडिलांना त्यांच्या लग्नाला विरोध करण्याचे काहीही कारण नाही. त्यांचे तिच्यावर
प्रेम आहे आणि लग्न करून तिला सुखात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.
दि.१७.०२.२०१४ रोजी दोन्ही बाजू ऐकून उच्च
न्यायालयाने प्रकरण आदेशाकरिता बंद केले आणि दि.२८.०२.२०१४ रोजी अंतिम निकाल दिला.
उच्च न्यायालयाने डॉ.लाल यांची याचिका फेटाळली. या विस्तृत निकालात कायदेशीर
बाबींबरोबरच प्रकरणातील वस्तुस्थिती बऱ्याच प्रमाणात कारणीभूत होती. “हेबियस
कॉर्पस” याचिका फक्त बेकायदेशीररित्या डांबलेले असेल तरच यशस्वी होवू शकते अन्यथा
नाही. प्रस्तुत प्रकरणात ग्रीष्माच्या वडिलांनी तिला बेकायदेशीररित्या कोंडून
ठेवले होते असे म्हणता येणार नाही तिच्यावरील प्रेमापोटी, पित्याचे कर्तव्य आणि
जबाबदारीच्या नात्याने त्यांनी जे केले ते योग्यच होते. विशेषत: डॉ.लाल आणि
ग्रीष्माच्या संदेशांची देवाणघेवाण बघता त्यांना आपल्या मुलीची काळजी वाटणे
साहजिकच होते. डॉ.लाल यांनी त्यांचे इतर मुलींशी असलेले संबंध कधीही नाकारले
नाहीत, त्याबाबत माफी मागितली, पुढे असे करणार नाही म्हटले. मुलगी सज्ञान असली तरी
तिचेह भलेबुरे पाहणे हे तिच्या पित्याचे कर्तव्यच आहे आणि ते त्यांनी निभावले
याबद्दल आमच्या मनात शंका नाही. काही निर्णयांचे दाखले देत, उच्च न्यायालयाने
पित्याने ग्रीष्माचे बाबतीत जे केल ते योग्यच होते आणि कुठल्याही दृष्टीने
बेकायदेशीर नव्हते असे प्रतिपादित केले. पालक हे कधी ही आपल्या पाल्यांचे भलेच
चाहतील. कायद्याने सज्ञान झाल्यामुळे पालकाचा पाल्यावरील अधिकार नष्ट होतो असे
नाही, त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा पालकांना अधिकारच
असतो. ज्या ज्या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने, गरज नसताना, कारण नसताना, बेकायदेशीररित्या
मुलींना पालकांनी डांबून ठेवलेले असते त्या प्रकरणात आम्ही त्यांच्या सुटकेचे
किंवा योग्य आदेश देतोच परंतु प्रस्तुत प्रकरणात ग्रीष्माच्या पित्याने काहीही
चुकीचे केले नाही असे आमचे मत आहे सबब डॉ.लाल यांची याचिका फेटाळण्यात येते.
याचिकेवर आदेश देताना उच्च न्यायालयाने बदललेले जग, लोकांच्या भावना, विचार,
जगण्याच्या पद्धती, यांचा विचार करता एखाद्या व्यक्तीच्या हालचालीवर निर्बंध आणणे
चुकीचेच आहे पण प्रस्तुत प्रकरणातील गांभीर्य बघता ग्रीष्माच्या पित्याने काही
चुकीचे केले असे आम्हाला वाटत नाही.
हा आदेश योग्य की अयोग्य यावर बरीच चर्चा करता
येईल, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले तर वेगळाही निकाल लागू शकतो. पण आज तरी
आपल्या मुलामुलींना आपले पालक हे आपले हितचिंतकच असतात शत्रू नसतात हे पटावे
यासाठी हा निकाल चांगला आहे. कोणताच पालक आपल्या पाल्याचे वाईट चिंतणार नाही हे
अधोरेखित करणारा हा निर्णय आहे. हो, जातीपातीच्या आणि इतर संकुचित विचारांसाठी जर
कोणी पाल्यांना त्रास देत असेल, छळत असेल तर हा निर्णय लागू होणार नाही. या
प्रकरणात ग्रीष्माच्या भल्याची कळकळ तिच्या पित्याच्या वागणुकीतून आणि संदेशांच्या
पार्श्वभूमीवर स्पष्ट दिसत होती म्हणून असा निकाल दिला गेला. यातून पाल्यांना
पालकांचे बंधक किंवा गुलाम म्हणूनच राहावे लागते असा निष्कर्ष मात्र कोणी काढू
नये.
अॅड. अतुल सोनक
९८६०१११३००
No comments:
Post a Comment