जन्मठेप किती वर्षांची ?
गुन्हेगाराला
ठोठावण्यात आलेली जन्मठेपेची सजा नक्की किती वर्षांची असते, त्याला मरेपर्यंत
तुरुंगातच रहावे लागते की त्याला काही वर्षानंतर सोडता येते, त्याला कोण आणि
कोणत्या कारणास्तव सोडू शकते असे अनेक प्रश्न तुम्हा-आम्हाला नेहमी पडत असतात
त्याबाबत हा लेख..........
सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील
भगवान तुकाराम डोंगरे आणि त्याचे वडील दि. १८.१०.१९९८ चे संध्याकाळी सात वाजता
दारूच्या नशेत घरी आले. भगवानची बायको घरात होती. दारूच्या नशेत तर्र असलेले भगवान
आणि त्याचे वडील तिला दोनतीनशे रुपये मागू लागले. त्यांना आणखी दारू प्यायची असावी
किंवा आणखी काही काम असावे. भगवानच्या बायकोने पैसे देण्यास नकार दिल्यावर तिला
माहेरून पैसे आण म्हणून दरडावण्यात आले. ती बधत नसल्याचे बघून दोघांच्यातील पुरुषी
अहंकार जागा झाला आणि दोघांनीही तिला भरपूर मारझोड केली. त्यानंतर तुकारामने एका
प्लास्टिकच्या डब्यातील केरोसीन (मातीचे तेल) तिच्या अंगावर ओतले. त्याचवेळी भगवान
ने आगपेटीची एक काडी पेटवली आणि ती जळकी काडी तिच्या अंगावर टाकली. तिच्या
साडीवरील केरोसीनमुळे तिच्या साडीने लागलीच पेट घेतला. आगीचे चटके बसू लागल्यामुळे
ती मदतीसाठी ओरडू लागली पण शेजारी पाजारी कोणीही मदतीसाठी धावून आले नाही. मग तिने
स्वत:च आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. ती जमिनीवर गडाबडा लोळू लागली. ती कशीबशी
आग विझवण्यात यशस्वी झाली पण आग विझवेपर्यंत ती ८० टक्के जळाली. ती जळत असताना
तिचा आरडाओरडा ऐकून कोणीतरी तिच्या माहेरी निरोप दिला. तिचे आईवडील धावून आईल आणि
त्यांनी तिला जवळच्या मायणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. प्राथमिक
आरोग्य केंद्रात तिच्यावर जुजबी प्राथमिक उपचार करून तिला सातारा येथील सरकारी
रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले.
दि.१९.१०.१९९८ च्या पहाटे ३ वाजता तिला सातारा
येथील सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे डॉ. बर्गे यांनी तिच्यावर उपचार
सुरू केले आणि हेड कॉन्स्टेबल शेलार यांना अशा प्रकारची एक स्त्री जखमी (जळीत)
अवस्थेत उपचारासाठी भरती करण्यात आल्याचे कळवले. ती शुद्धीवर असून बोलू शकण्याच्या
मन:स्थितीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर शेलार आणि डॉ.बर्गे यांनी तिचे बयाण
नोंदवले. त्यानंतर एक विशेष न्यायदंडाधिकारी तिथे पोहचले. त्यांनीही तिचे बयाण
नोंदवले. ते बयाण एका लिफाफ्यात बंद करून सातारा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी
यांच्या न्यायालयात जमा करण्यात आले. तिचे वडील राजाराम महादू तुपे यांना सुद्धा
तिने जी काही घटना घडली ती जशीच्या तशी सांगितली. संबंधीत प्रकरणातील चौकशी
अधिकाऱ्याने घटनास्थळावर जावून पंचनामा तयार केला, केरोसीनचा प्लास्टिकचा डबा,
आगपेटी, काडी, अर्धवट जळालेले कपडे, इ. साहित्य जप्त केले. भगवानच्या बायकोने
मृत्यूशी झुंज देत देत अखेर दि.२१.१०.१९९८ रोजी प्राण सोडले. त्यानंतर भगवान आणि
तुकाराम या दोन्ही आरोपींविरुद्ध भा.दं.वि. च्या कलम ३०२, ४९८-अ आणि ३४ अन्वये
दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सातारा येथील सत्र न्यायालयात भगवान आणि तुकाराम
विरुद्ध खटला चालला. डॉ.बर्गे, डॉ. सुरेश पवार, हेड कॉन्स्टेबल शेलार, विशेष
न्यायदंडाधिकारी, राजाराम तुपे (मृतकाचे वडील), चौकशी अधिकारी, अशा सर्व
साक्षीदारांची बयाणे नोंदवण्यात आली. भगवानच्या बायकोने दिलेल्या मृत्यूपूर्व
बयानांवरून आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर सत्र न्यायालयाने भगवान आणि
तुकाराम या दोन्ही आरोपींना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवून जन्मठेपेची सजा
सुनावली.
दोन्ही आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध
मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे अपील दि.
९.०२.२००४ रोजी फेटाळले. दरम्यान तुकारामचा मृत्यू झाला. उच्च न्यायालयाच्या
आदेशाविरुद्ध भगवानने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. सर्वोच्च न्यायालयात या
अपिलाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाचे मित्र (amicus curie) श्री. रंजन मुखर्जी
या वकिलांनी कुठलाही प्रत्यक्ष पुरावा नसताना अप्रत्यक्ष पुराव्यांच्या आणि अनेक
त्रुटी असणाऱ्या मृत्यूपूर्व बयाणाच्या आधारावर आरोपींना खुनाच्या आरोपाखाली दोषी
मानून सजा ठोठावणे योग्य आणि कायदेशीर नाही. ते असेही म्हणाले की दोन्ही आरोपी
दारूच्या नशेत असल्यामुळे ते काय करीत आहेत याची त्यांना जाणीव नव्हती तसेच भगवान
च्या बायकोचा जीव घेण्याचा त्यांचा हेतू नव्हता. सबब आरोपींना खुनाच्या आरोपाखाली
दोषी मानता येणार नाही फार तर फार त्यांना भा.दं.वि.च्या कलम ३०४-भाग १ किंवा
३०४-भाग २ अन्वये दोषी मानता येईल. तर महाराष्ट्र सरकारतर्फे युक्तिवाद करताना
श्री. शंकर चीलार्गे यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की दोन्ही मृत्यूपूर्व
बयाणे व्यवस्थित आणि विश्वास ठेवण्याजोगी होती आणि परिस्थितीजन्य पुरावा सुद्धा
आरोपींना खुनाच्या गुन्ह्यासाठी दोषी मानण्यास पुरेसा आहे. तिचे बयाण नोंदवण्यात
आले तेव्हा ती पूर्णत: शुद्धीवर आणि बयाण देण्याच्या मन:स्थितीत होती.
सर्वोच्च न्यायालयात न्या. के.एस.राधाकृष्णन आणि
न्या. विक्रमजीत सेन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होवून दि. १३.०३.२०१४ रोजी आदेश
पारित करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने सत्र आणि उच्च न्यायालयाचे निर्णय कायम
ठेवले. भगवान च्या बायकोच्या अंगावर तुकारामने केरोसीन टाकल्यावर भगवान आग
लावण्याचे दृष्टीने जळकी काडी टाकणे याचा अर्थ असा की दोघांचाही तिला जाळून
मारण्याचाच हेतू होता आणि आपण केलेल्या कृतीमुळे काय होवू शकते याची त्यांना
पूरेपूर जाणीव होती हे स्पष्ट आहे. ते नशेत असल्यामुळे याबाबत अनभिज्ञ होते असा
निष्कर्ष चुकीचा होईल. खुनाच्या गंभीर आरोपाबाबत दारुच्या नशेत असणे हा काही
बचावाचा मुद्दा होवू शकत नाही. त्यामुळे आरोपींनी खुनाचाच गुन्हा केला असल्याचे
सिद्ध होते आणि त्यांना ठोठावण्यात आलेली शिक्षाही योग्यच आहे. “12. We find it
difficult to accept the contention of the counsel that since the
accused-Appellant was under the influence of liquor, the offence will fall
under Section 304 Part I or Section 304 Part II. A-1 was presumed to
know the consequences of his action, of having lit the match stick and set fire
on the saree of deceased, after A-2 sprinkled
kerosene on her body. In our view, the accused was correctly charge-sheeted
under Section 302 IPC and we find no reason to interfere
with the conviction and sentence awarded by the trial court and affirmed by the
High Court.”
सर्वोच्च न्यायालय भगवानची जन्मठेपेची सजा कायम
ठेवत असल्याचे लक्षात येताच त्याच्या वकिलांनी तो सोळा वर्षांपासून तुरुंगात
असल्याचे न्यायालयाचे निदर्शानास आणून दिले. तसेच त्याने सोळा वर्षे
विनासवलत/सुटका सजा भोगली असल्यामुळे त्याला सोडून देण्यात यावे, अशी मागणी केली.
दि.१८.१२.१९७८ नंतर महाराष्ट्रात जन्मठेपेची सजा भोगत असणाऱ्या कैद्यांसाठी असणाऱ्या
शासन निर्णयाची (दि.११.०४.२००८) प्रत सर्वोच्च न्यायालयाला दाखवण्यात आली.
गुन्ह्यांची प्रतवारी, ठोठावण्यात आलेली सजा, सजा भोगत असणाऱ्या कैद्याची चांगली
वर्तणूक आणि किमान भोगावी लागणारी सजा याबाबत या शासन निर्णयात मार्गदर्शक तत्वे
निश्चित केलेली आहेत. सर्वोच्च
न्यायालयाने हा शासन निर्णय तपासल्यावर असे लक्षात आले की प्रस्तुत प्रकरणात
(महिला आणि अज्ञान बालकांबाबतचे गुन्हे) भगवानला कमीत कमी २० वर्षे (सवलत/सुटकेसह)
सजा (तुरुंगवास) भोगणे आवश्यक आहे. परंतु भगवानने सवलती/सुटकेविना सलग सोळा वर्षे
सजा भोगल्यामुळे तो आता मुदतपूर्व सुटकेस पात्र आहे किंवा नाही हे उपरोक्त शासन
निर्णयाच्या (G.R.) आधारे महाराष्ट्र शासनानेच तपासावे आणि त्यात नमूद मार्गदर्शक
तत्त्वांमध्ये भगवानचे प्रकरण बसत असेल तर त्याला सोडण्यात यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
“15. Resolution, referred to above read with Annexure I, would
indicate that the appellant has to serve a period of minimum 20 years with
remission. Since the appellant has already suffered 16 years of
sentence without remission, the State Government is directed to consider as to
whether he has satisfied the requirement of Resolution dated 11.04.2008 read with
Annexure I and, if that be so, he may be set free if the period undergone by
him without remission would satisfy the above-mentioned requirement.”
सजा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांना किती सवलती
द्यायच्या, नाही द्यायच्या याबाबत त्या त्या राज्य शासनाचे कायदे/नियम आहेत,
त्यानुसार सर्व कारभार चालतो. संजय दत्तला वारंवार मिळणार लाभ (आजारी बायकोची सेवा
करण्यासाठी घरी जाण्याची सुट्टी) याच नियमांच्या अधीन आहे. प्रस्तुत प्रकरणात
तब्बल सोळा वर्षे अंतिम निकाल लागण्यात गेली. सजा कायम करण्यात आली त्यामुळे काही
प्रश्न नाही पण जर भगवान निर्दोष सुटला असता तर? त्याच्या आयुष्याची बहुमूल्य सोळा
वर्षे कोणी भरून दिली असती? म्हणून जलदगती न्याय आवश्यक आहे. प्रभावी आणि सक्षम
पोलीस आणि न्याययंत्रणेचे एक उदाहरण आपण मागच्याच लेखात बघितले यावेळी आरोपीला
तब्बल सोळा वर्षे अंतिम न्यायासाठी वाट बघावी लागली, हे दिसले. न्यायप्रक्रियेत
सुधारणा, न्यायाधीशांच्या आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ, प्रगत
तंत्रज्ञानाचा न्यायदानात वापर, या सर्व बाबी आवश्यक झाल्या आहेत तरच आपली
न्याययंत्रणा सक्षम आणि सुदृढ होईल.
अॅड. अतुल सोनक,
भ्रमणध्वनी:
९८६०१११३००
No comments:
Post a Comment