अंतिम न्याय.........
“बलात्कार आणि खुनाच्या आरोपाखाली फाशीची सजा सुनावण्यात
आलेल्या तरुणाची सर्वोच्च न्यायालयात निर्दोष सुटका”
महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातील कारंजा
गावाच्या मारवाडीपुरा भागात राहणाऱ्या शंकरलाल दीक्षित या व्यक्तीस आपल्या पोलिस यंत्रणेचा
आणि न्यायपालिकेचा खूपच चांगला अनुभव आला. कुठल्याही निकालावर वरच्या न्यायालयात
अपील करणे का आवश्यक असते आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याशिवाय
"न्याय" मिळेलच याची कशी खात्री नसते, हे या दीक्षित महोदयांबाबत जे घडले
त्यावरून स्पष्ट होईल......
दि.१० डिसेंबर १९७८ ची घटना. सकाळचे १०.३०
वाजले होते. शंकरलालच्या घराजवळ असणाऱ्या गोपाल मंदिरालगतच्या विहिरीवर तिथून जवळच
राहणाऱ्या रामराव वाघ यांच्या पत्नी रेणुकाबाई आणि त्यांची पाच वर्षे वयाची मुलगी
सुनिता पाणी भरायला आल्या. पाणी घेवून रेणुकाबाई घरी परत आल्या. सुनिता विहिरीजवळच
लहान मुलामुलींसोबत खेळत होती. बराच वेळ झालायवरही सुनिता घरी परत न आल्यामुळे
रेणुकाबाई परत विहिरीजवळ आल्या पण त्यांना ती तिथे दिसली नाही. त्या परत घरी
गेल्या आणि शेजारच्या शीलाबाई देव आणि शोभाबाई वाघोडे यांना सुनिता दिसत नसल्याचे
सांगितले. सुनिता शंकरलालच्या घरात असेल असा संशय आल्याने त्यांनी शंकरलालच्या
घराचे दार ठोठावले. दाराला आतून कडी लावलेली होती. दार ठोठावून ही आतून कसलाही
आवाज आला नाही.
तिन्ही महिलांना काही सुचेना, म्हणून त्यांनी शेजारीच राहणाऱ्या
श्रीनारायण शर्मा (शिक्षक) याला बोलावले. श्रीनारायण त्याच्या घराच्या गच्चीवरून
शंकरलालच्या अंगणात उतरला आणि त्याने त्याच्या घराचे दार उघडले. त्या तिन्ही महिला
शंकरलालच्या घरात गेल्या. त्यांनी पाहिले की अंगणातच शंकरलाल एका पलंगावर तोंडावर
पांघरूण घेवून झोपलेला होता. सुनिता कुठलीही हालचाल न करता लगतच्याच बाथ रूम मध्ये
निपचित पडून होती. तिच्या शरीराभोवती ब्लॅंकेट गुंडाळलेले होते. रेणुकाबाई तिच्याजवळ
गेली ब्लॅंकेट फेकून दिले आणि तिला घेवून तडक घरी
निघून गेली. रामराव १२.४५ वाजताचे सुमारास बाजारतून घरी परत आले.त्यांना
रेणुकाबाईने सर्व प्रकार सांगितला. सुनीताच्या मृतदेहावर बऱ्याच जखमा होत्या.
गुप्तांग सुजलेले होते. चड्डी गायब होती. रामराव लगेच पोलिस ठाण्यात गेले आणि
त्यांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिसांना घेवून ते घरी
आले. आणि काही वेळाने परत ठाण्यात जावून त्यांनी एफ.आय.आर. दाखल केला.
सुनिताच्या मृतदेहाचे शव-विच्छेदन करण्यात आले.
त्यात तिच्यावर बलात्कार झाल्याचे आणि तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे
निष्पन्न झाले. सुनीतावर बलात्कार करून तिचा खून करण्याच्या आरोपाखाली
(भा.दं.वि.चे कलम ३७६ आणि ३०२) शंकरलालला अटक करण्यात आली. शंकरलालच्या घराच्या अंगणात असलेल्या
पलंगावर पडलेल्या उशीखाली एक चड्डी होती, रक्ताने
माखलेले ब्लॅंकेट, रक्ताळलेली एक फरशी, या सर्व वस्तू तसेच शंकरलालचे कपडे पण
जप्त करण्यात आले. एकंदर परिस्थितीवरून तरी सुनितावर बलात्कार झाला होता किंवा
बलात्काराचा प्रयत्न झाला होता आणि तिचा गळा आवळून खून करण्यात आला होता हे स्पष्ट
होते. परंतु हा प्रकार शंकरलालनेच केला का हा महत्त्वाचा प्रश्न होता.
अकोला येथील सत्र न्यायालयात शंकरलाल विरुद्ध
खटला चालला, साक्षी पुरावे आणि युक्तिवादानंतर
त्याला खुनाच्या आरोपाखाली फाशीची सजा आणि बलात्काराच्या आरोपाखाली सात वर्षे
सक्तमजुरीची सजा ठोठावण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने
ही सजा कायम केली. २८.०२.१९८० रोजीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला शंकरलालने
विशेष अनुमती याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तेच साक्षी
पुरावे, तेच युक्तिवाद, तीच परिस्थिती, पण.......सर्वोच्च न्यायालयाने बघा कसा
निकाल फिरवला.......
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती वाय.
व्ही. चंद्रचूड, न्या. ए.पी.सेन, न्या.बहारूल इस्लाम यांच्या
खंडपीठापुढे शंकरलालच्या अपिलाची सुनावणी झाली. दि.१७.१२.१९८० रोजी सर्वोच्च
न्यायालयाने निकाल दिला आणि शंकरलालची निर्दोष सुटका केली. "परिस्थितीजन्य पुरावा हा आणि हाच फक्त
जेव्हा एखाद्या प्रकरणाच्या निकालाचा आधार असतो तेव्हा तो पूर्ण पणे विश्वास
ठेवण्याजोगा असावा, त्यात कुठलाही किंतु, परंतु असू नये, कुठल्याही बाबतीत शंका घ्यायला जागा
असू नये." असे
मत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात व्यक्त केले. या खटल्यात नेमके हेच झाले.
खटल्यात दिल्या गेलेल्या साक्षीदारांच्या बयाणांवरून सर्वोच्च न्यायालायने असा निष्कर्ष
काढला की सुनिताचा मृतदेह ज्यावेळी शंकरलालच्या घरात मिळाला त्यावेळी शंकरलाल घरात
नव्हताच. तो पलंगावर तोंडावर पांघरूण घेवून झोपला होता, हे साक्षीदारांनी खोटेच सांगितले होते.
शिक्षक श्रीनारायण शर्मा याने न्यायालयात असे सांगितले की शंकरलालच्या अंगणात
गेल्यानंतर त्याने शंकरलालला दार उघड असे म्हटले पण त्याने नकार दिला. परंतु ही
बाब त्याने पोलिसांना दिलेल्या बयाणात सांगितली नव्हती.
ज्याच्या घरात एका पाच वर्षाच्या बालिकेचा
मृतदेह सापडतो त्याला कोणीही विचारेलच ना की ही काय भानगड आहे?, किंवा हे कसे घडले?, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?. परंतु यापैकी काहीही घरात किंवा अंगणात
गेलेल्या महिलांनी शंकरलालला विचारलेल नाही. शंकरलालला न विचारता महिला तिथून
निघून गेल्या हे शक्यच वाटत नाही. रेणुकाबाईनेही रामरावला सुनिताचा मृतदेह
शंकरलालकडे सापडला असे जेव्हा सांगितले तेव्हा तिथे शंकरलाल झोपलेला होता हे
सांगितलेच नाही. शंकरलालच्या उशीखाली सुनिताची चड्डी होती ती तो घराबाहेर जाताना
तिथेच ठेवून जाईल का? सुनिताचा मृतदेह घरातून घेवून गेल्यावर
शंकरलाल इतर पुरावे तिथे कशाला सोडून जाईल? असे
प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केले आहेत. शंकरलाल त्यावेळी घरी नव्हताच, त्याला जाणून बुजून अडकवण्यासाठी ही
कहाणी बनविण्यात आली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शंकरलालला निर्दोष
सोडताना दिलेल्या निकालात तो साक्षीदारांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळी घरी
नव्हताच हे स्पष्ट केले आहे तसेच त्याला काही हितसंबंधियांनी आणि पोलिसांनी त्याला
पद्धतशीरपणे अडकवले आहे हे सुद्धा आदेशात नमूद केले आहे. घटनेच्या काही
दिवसांपूर्वी त्याने त्याच्या आई आणि भावाला मारहाण केली होती, तो काहीच काम धंदा करीत नव्हता, त्याच्या भाडेकरी शीलाबाई यांचेशी
त्याचे त्याच दिवशी कडाक्याचे भांडण झाले होते. त्याची बायको आणि तीन मुले
त्याचेपासून वेगळी राहत होती. त्याला अटक करण्यात आली तेव्हा त्याने
दोन फुल पॅंट घातल्या होता. त्यातील एक बऱ्याच जागी
फाटली होती. शर्ट ही बऱ्याच ठिकाणी फाटलेला होता. त्याचा शेजाऱ्यांना, नातेवाइकांना, किरायेदारांना, आई, भाऊ, बायको, मुले अशा सर्वांनाच त्रास होता. तर अशा
या बिनकामाच्या पण उपद्रवी माणसाला खुनाच्या गुन्ह्यात अडकवले तर चांगलेच असे
ठरवून पोलिसांच्या मदतीने त्याला आरोपी करण्यात आले असे स्पष्ट मत सर्वोच्च
न्यायालयाने व्यक्त केले आहे. बलात्कार आणि खुनासंबंधीचे वैद्यकीय
पुरावे सुद्धा पूर्णपणे विश्वास ठेवण्याजोगे नाहीत, आरोपी शंकरलाल सुरुवातीपासूनच
"मला या प्रकरणातील काहीही माहिती नाही आणि मी काहीही केलेले नाही" असा
धोशा लावून होता. सर्वोच्च न्यायालयाने सत्र आणि उच्च न्यायालयाचा निकाल फिरवताना
दिलेल्या आदेशातील शेवटचा परिच्छेद मुळातच वाचण्याजोगा आहे………
Our judgment will raise a legitimate query: If the appellant
was not present in his house at the material time, why then did so many people
conspire to involve him falsely? The answer to such questions is not always
easy to give in criminal cases. Different motives operate on the minds of
different persons in the making of unfounded accusations. Besides, human nature
is too willing, when faced with brutal crimes, to spin stories out of strong
suspicions. In the instant case, the dead body of a tender girl, raped and
throttled, was found in the appellant's house and, instinctively, everyone drew
the inference that the appellant must have committed the crime. No one would
pause to consider why the appellant would throw the dead body in his own house,
why would he continue to sleep a few feet away from it and whether his house
was not easily accessible to all and sundry, as shown by the resourceful
Shrinarayan Sharma. No one would even care to consider why the appellant's name
was not mentioned to the police until quite late. These are questions for the
Court to consider.
The folks of Karanja had a grouse against the appellant. He
had made a nuisance of himself to his family and friends, neighbours and
tenants. The small world of Karanja was up in arms against him. He had
assaulted his mother and brother a few days before the incident. He had a quarrel
with Shilabai, his tenant, on the very day of the incident. He was an idler and
had no means of livelihood……
The Karanja community must have heaved a sigh of relief that a
person who was so good-for-nothing was ultimately in the hands of law. Such
people have no partisans. But that does not mean that justice can be denied to
them. We may mention in passing, though
in the view which we are taking it is not relevant, that while confirming the sentence
of death imposed on the appellant by the Sessions Court, the High Court even
took into consideration the appellant's relations with the members of his
family. After mentioning that he had beaten his mother and brother and that his
wife was living separately from him, the High Court concluded: “In our opinion,
such a person could neither be an asset to his wife and children nor entitled
to live in the society.”; Unfaithful husbands, unchaste wives and unruly
children are not for that reason to be sentenced to death if they commit murders
unconnected with the state of their equation with their family and friends. The
passing of the sentence of death must elicit the greatest concern and
solicitude of the Judge because, that is one sentence which cannot be recalled.
For reasons aforesaid, we allow the appeal and set aside the judgments of the
High Court and the Sessions Court. The sentence of death as also the sentence
of seven years' imprisonment imposed upon the appellant is set aside. We acquit
the appellant and direct that he shall be released.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने शंकरलालला
"न्याय" मिळाला पण सुनिताला, तिच्या
आईवडीलांना ? खरा आरोपी शोधायची जबाबदारी कोणाची? अशा अनेक "सुनिता " आजही
न्यायाच्या प्रतिक्षेत असतील ना?
ॲड.
अतुल सोनक
भ्रमणध्वनी
: ९८६०१११३००
No comments:
Post a Comment