Saturday, November 9, 2013

दरोड्यासाठी अमानुष हत्याकांड


दरोड्यासाठी अमानुष हत्याकांड

शमीम अख्तर, छत्तीसगढ मधील चेर (जिल्हा वैकुंठपूर) येथील एक भंगाराचा व्यापारी. दि.२६.११.२००४ रोजी तो रायपूरला भंगार विकायला गेला, भंगार विकून त्यापोटी नगदी रु.१,७०,०००/- घेवून त्याच्या घरी परतला आणि त्याने ती रक्कम त्याच्या बायकोला, रुखसानाबिबी हिच्या सुपूर्द केली. तिने ती रक्कम घरातच वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली. ती सर्व रक्कम दुसऱ्या दिवशी बँकेत जमा करायची होती.

त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास सोनू सरदार आणि अजय सिंग इतर तिघा इसमांबरोबर शमीमच्या भंगार दुकानात आले. त्यांनी त्यांच्या जवळच्या भंगार वस्तू शमीमला विकल्या, त्यापोटी ४८० रुपये शमीमकडून घेतले आणि निघून गेले. त्यानंतर ते सर्व पाचही इसम पुन्हा परत आले आणि दुकानाला लागूनच असलेल्या शमीमच्या घराचा दरवाजा ठोठावला. दार उघडले जाताच पाचही इसम घरात घुसले आणि शमीमला पैशांची मागणी केली, त्यांच्यापैकी एकाने आतून दाराची कडी लावली. दोघांनी शमीमचा ड्रायव्हर असगर अली याला धरून ठेवले. एकाने शमीमला पकडून ठेवले आणि त्याच्या गळ्याला चाकू लावून पैशांची मागणी केली. शमीमच्या खिशात असलेले पैसे काढायला लावले. शमीमची मुलगी शबाना जी फक्त दहा वर्षांची होती, तिने या लोकांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, घाबरून जावून ती मागच्या दाराने पळून जाण्यात यशस्वी झाली.

शबाना घरातून निघून थेट शमीमचा मित्र रामलालचे घरी (एक किलोमिटर अंतरावर) गेली. तिने रामलालला तिच्या घरी घडत असलेल्या घटनेबद्दल सांगितले. रामलाल लगेच तिच्या घरी जायला निघाला परंतु तिने ते लोक त्यालाही मारतील,असे सांगून त्याला जावू दिले नाही आणि ती सुद्धा रामलालच्याच घरी थांबली. दुसऱ्या दिवशी पहाटे चार-पाच वाजताचे सुमारास शबाना, रामलाल आणि त्याची पत्नी धनपतबाई यांच्याबरोबर तिच्या घरी पोहचली.

ते तिघेही घरी पोहचल्यावर दिसलेले दृश्य मन हेलावणारे, काळीज चिरून टाकणारे होते. शबानाचा लहान भाऊ याकूत (वय वर्षे ३) आणि लहान बहीण असना (वय वर्षे ५) आजूबाजूला पडलेल्या प्रेतांकडे बघत रडत होते. शमीम, रुखसानाबिबी. त्यांचा मुलगा याकुब (वय वर्षे ७), मुलगी राना (वय वर्षे ९) आणि ड्रायव्हर असगर यांचे मृतदेह अस्ताव्यस्त पडले होते. तब्बल पाच जणांचा निर्घृण खून करून पाचही हल्लेखोर पळून गेले होते. शबाना लगेच तिचे काका नसीम अख्तर (वैकुंठपूर) यांच्याकडे गेली आणि तिने झाला प्रकार सांगितला. नसीम अख्तर यांनी पोलीस ठाण्यात लगेचच तक्रार नोंदवली.

पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले, मृतदेह शव-विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आणि सर्व संबंधित लोकांचे बयाण नोंदवण्यात आले. सोनू सरदार, अजय सिंग, छोटी बाई या तिघा आरोपींना अटक करण्यात आली, दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले, फरार  झाले, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. प्रकरणात वापरण्यात आलेली हत्यारे आणि इतर वस्तू (रक्ताने माखलेले टी-शर्ट, कुऱ्हाड, रॉड, चाकू, इ.) जप्त करण्यात आलीत. आरोपींची ओळख परेड झाली. शबानाने आरोपींना ओळखले. जप्त साहित्य न्याय सहाय्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तिथला अहवाल आल्यानंतर आणि इतर तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम ३९६ अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान एकूण ३८ साक्षीदार तपासण्यात आले.

सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपींनी शमीम अख्तर च्या घरी दि.२६.११.२००४ आणि दि.२७.११.२००४ च्या दरम्यान दरोडा टाकून पाच जणांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप सरकारी पक्षाने सिद्ध केल्याचे मान्य करून आरोपी सोनू सरदारला दोषी ठरवले आणि मरेपर्यंत फाशीची सजा सुनावली.(इतर आरोपींबाबात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात उल्लेख नाही) उच्च न्यायालयानेही सोनू सरदारला दोषी ठरवीत फाशीची सजा कायम ठेवली. या निर्णयाविरुद्ध सोनू सरदार सर्वोच्च न्यायालयात गेला.

सर्वोच्च न्यायालयात न्या. ए.के. पटनाईक आणि न्या. स्वतंत्रकुमार यांच्या खंडपीठापुढे सोनू सरदारच्या अपिलाची सुनावणी झाली. त्याच्या वाकिलांनी फक्त लहानश्या शबानाच्या साक्षीवर विश्वास ठेवून आरोपीला दोषी धरायला नको होते, घटनेला कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, आरोपी सोनूचे नाव तक्रारीत (एफ.आय.आर.) नाही. अशी आणि काही इतर थातूरमातूर कारणे देत आरोपीच्या वकिलांनी सोनूला दोषी ठरवणे योग्य नाही असा युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी मात्र सोनुच्याच सांगण्यावरून त्याची पगडी, हत्यारे, टी-शर्ट, चाकू, इ. जप्त करण्यात आले होते तसेच घरातील १,७०,००० रुपयांपैकी बरीचशी रोख रक्कम गायब होती, न्याय सहाय्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जप्त साहित्यावरील आणि घटनास्थळावरील रक्ताचे डाग यांची संगती लागत होती, या सर्व कारणास्तव सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि शिक्षा अत्यंत योग्य होती. सर्वोच्च न्यायालयाने सर्व साक्षी पुराव्यांचा बारकाईने विचार करून आणि सत्र न्यायालयाने फाशीच्या शिक्षेसाठी दिलेली कारणे विशेषत्वाने विचारात घेवून सोनूच्या फाशीचा निर्णय योग्य ठरवला. सत्र न्यायालयाने दिलेली कारणे (ज्याचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात केला आहे) मुळातच वाचण्यासारखी आहेत........
(i)                The crime was pre-meditated. (ii) The crime has struck fear and terror in the public mind. (iii) Helpless and defenceless woman and two minor children aged eight and four years besides two adult men were murdered. (iv) Asgar Ali, the driver of Shamim, who had only stopped in the house for his food, was also not spared. (v) Taking advantage of earlier business relations with Shamim, the appellant made a friendly entry and committed the murders. (vi)The intention was to kill all members of the family though surprisingly a six month old baby and a four year old child remained alive. (vii) The five murders were brutal, grotesque, diabolical, revolting and dastardly, which indicated the criminality of the perpetrators of the crime. (viii) No physical or financial harm appears to have been caused by the deceased to the accused.
सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा योग्य ठरवताना नोंदवलेले मतही नमूद करावे लागेल.
“Five members of a family including two minor children and the driver were ruthlessly killed by the use of a knife, an axe and an iron rod and with the help of four others. The crime was obviously committed after pre-meditation with absolutely no consideration for human lives and for money. Even though the appellant was young, his criminal propensities are beyond reform and he is a menace to the society. The trial court and the High Court were therefore right in coming to the conclusion that this is one of those rarest of rare cases in which death sentence is the appropriate punishment.”
सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात कायम ठरवल्या गेली अशी उदाहरणे फार कमी आढळतात. या प्रकरणात जो काही घटनाक्रम घडला तो हृदय हेलावून टाकणारा होता यात संशय नाही पण कसल्याही ठोस पुराव्याशिवाय आरोपी पकडले जाणे, खटला उभा राहणे,एका दहा वर्षांच्या अज्ञान मुलीने तिच्यासमोर घडलेली घटना कथन करणे, तिच्या कथनाचा परिस्थितीजन्य पुराव्याशी मेळ लागणे,इ. बाबीमुळे सोनू सरदारला सजा ठोठावली जाणे शक्य झाले. पण प्रश्न हा पडतो की फक्त काही रुपयांसाठी माणूस माणसाचा वैरी कसा काय होवू शकतो. पाच पाच जणांचा जीव घेईपर्यंत त्याची मजल कशी काय जाते? अशी कृत्ये करतेवेळी आरोपीच्या डोक्यात काय चालत असेल?

२००४ साली घडलेल्या या हत्याकांडाबाबत अंतिम निकाल २३ फेब्रुवारी २०१२ रोजी लागला. उशीर जरी झाला तरी अंतिमत: न्याय मिळाला. एक दहा वर्षे वयाची अज्ञान मुलगीसुद्धा मनात आणले तर गुन्हेगारांना सजा ठोठावण्यास भाग पाडू शकते, पोलिसांनी योग्य रित्या तपास करून सर्व पुरावे गोळा करून खटला व्यवस्थितपणे उभा केला तर आरोपी सुटणे कठीण होईल, हे या खटल्याच्या निमित्ताने स्पष्ट होईल.

अ‍ॅड. अतुल सोनक,
भ्रमणध्वनी: ९८६०१११३००

No comments:

Post a Comment