अंतरिक्षची फरफट
"अंतरिक्ष" काय छान नाव ठेवले मुलाचे? फक्त ५ वर्षे वय असलेल्या या अंतरिक्ष नावाच्या मुलाच्या
वडिलांनी त्याच्या आईला मारून टाकल्याचा आरोप झाला तरीही अंतरिक्ष माझ्याच जवळ
रहावा म्हणून त्याच्या वडिलांनी मागणी केली. अंतरिक्षच्या आईच्या आईवडीलांनी
त्याला विरोध केला परंतु जिल्हा व सत्र न्यायालयाने आणि कलकत्ता उच्च न्यायालयाने
अंतरिक्ष त्याच्या वडिलांकडेच राहील असा आदेश दिला प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
गेल्यावर अंतरिक्षचे आजीआजोबाच त्याचे चांगले पालक होतील असा निर्णय झाला. बघा ही
हृदय पिळवटून टाकणारी कहाणी.........
कोलकात्याच्या मिठू कुंडूचे अभिजीत कुंडूशी दि.८.०८.१९९५
रोजी हिंदू विवाह पद्धतीनुसार लग्न झाले. लग्नात दागिने, गृहोपयोगी वस्तू आदिंच्या स्वरूपात भरपूर हुंडाही दिल्या
गेला. तरीसुद्धा अभिजीत आणि त्याची आई समाधानी नव्हते आणि माहेरून हे घेवून ये ते
घेवून ये अशा मागण्या करून सतत मिठूचा छळ केला जात असे. मिठू हा त्रास सहन करीत
असतानाच तिला दि.१८.११.१९९९ रोजी एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव
"अंतरिक्ष" ठेवल्या गेले. मुलगा झाल्यावर तरी अभिजीत आणि त्याच्या आईची
वागणूक सुधारेल ही मिठूची भाबडी आशा चुकीचीच ठरली. तिला त्रास देणे, मारहाण करणे, वाट्टेल ते बोलणे, हे सगळे सहन करता करता मिठू आजारी पडली. तिला तिचे आई वडील नील आणि कविता
त्यांच्या घरी घेवून आले, तिला दवाखान्यात भरती करून
तिच्यावर उपचार केले. तिला तंदुरुस्त करून सासरी परत पाठवले.
इकडे सासरी पुन्हा ये रे माझ्या मागल्या. छळ पुन्हा सुरू
झाला. मारहाण, शिवीगाळ नित्याचेच झाले.
दि.९.०४.२००४ च्या रात्री अशाच एका मारहाणीत मिठू जबर जखमी झाली. तिला इस्पितळात
आणल्या आणल्याच मृत घोषित करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी मिठूच्या वडिलांनी
अभिजीतविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अभिजीत आणि त्याच्या
आईविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम ४९८-अ आणि ३०४ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
दि.१८.०४.२००४ रोजी अभिजीतला अटक करण्यात आली. त्यावेळी आजारी असणाऱ्या अंतरिक्षला
त्याच्या आजी आजोबांकडे सोपवण्यात आले. आजी आजोबांनी त्याचे चांगले संगोपन केले,
त्याला कोलकात्याच्या सेंट झेविअर्स या प्रतिष्ठीत शाळेत घातले.
प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांनी ३१.०५.२००५ रोजी अभिजीत आणि त्याच्या आई
विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
अभिजीतने जमानतीवर तुरुंगातून बाहेर आल्यावर अंतरिक्षची
कस्टडी मिळावी म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयाकडे गार्डिअन्स ॲंड वार्डस ॲक्ट, १८९० च्या अंतर्गत अर्ज दाखल केला. त्या अर्जाला नील आणि
कविता या अंतरिक्षच्या आजी आजोबांनी विरोध केला. त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले की
ज्या व्यक्तीने त्यांच्या मुलिला मारून टाकले, त्याच्याकडे
अंतरिक्ष कधीच सुखात राहणार नाही. अंतरिक्ष आमच्याकडेच सुखात राहील आणि आम्ही
त्याचा सांभाळ व्यवस्थितरित्या करू. जिल्हा व सत्र न्यायालयाने पुरावे बघून आणि
युक्तिवाद ऐकून निर्णय दिला तो अभिजीतच्या बाजूने. अभिजीत हाच अंतरिक्षचा नैसर्गिक
पालक असल्यामुळे तो त्याचे पालन पोषण योग्यरित्या करू शकेल सबब अंतरिक्षची कस्टडी
अभिजीतला "ताबडतोब" देण्यात आली.
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आजी आजोबांनी
कलकत्ता उच्च न्यायालयात अपील केली. परंतु उच्च न्यायालयानेही खालच्या न्यायलयाचा
निर्णय कायम ठेवून त्यांची अपील फेटाळून लावली. आजीआजोबांना अंतरिक्षला भेटण्याची
परवानगी/मुभा मात्र देण्यात आली. हाही निर्णय आजी आजोबांना पटला नाही आणि त्यांनी
अंतरिक्षच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च
न्यायालयाने मात्र आजीआजोबांच्या बाजूने निर्णय दिला.
न्या. सी.के. ठक्कर आणि न्या. डी.के जैन यांच्या
द्विसदस्यीय खंडपीठाने सर्व बाबींचा, कायद्याचा
(भारतीयच नव्हे तर इंग्लंड आणि अमेरिकेच्या सुद्धा) सांगोपांग विचार करून
अंतरिक्षचे भविष्य आजी आजोबांकडेच सुरक्षित राहील असा निर्णय दिला. निर्णयात
खालच्या न्यायालायांच्या निर्णयांचा भरपूर समाचार घेतला. जिल्हा न्यायालयाने
अंतरिक्षला ताबडतोब अभिजीत जवळ देण्याचे आदेश दिले होते तर त्या आदेशाला स्थगिती
देणाऱ्या उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देताना अंतरिक्षला २४ तासांत अभिजीतकडे
सोपवण्याचे आदेश दिले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने लहान मूल ही काही एखादी
वस्तू नाही असे मत प्रदर्शित केले. खालच्या न्यायालयाने अभिजीतवर फौजदारी खटला
चालू असल्यामुळे तो अंतरिक्षचे पालन पोषण करण्यास अपात्र ठरू शकत नाही तसेच त्याला
सजा झालीच तर त्या कारणावरून आजी आजोबा अंतरिक्षची कस्टडी परत मागू शकतात....अशी
जी मते व्यक्त केली होती त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने असहमती दर्शवली. तसेच
खालच्या न्यायालयांनी अंतरिक्षला कोणासोबत रहायला आवडेल हे विचारलेच नाही, त्याचीही इच्छा तपासणे गरजेचे होते असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त
केले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अंतरिक्षला चेंबरमधे बोलावून विचारणा
केली असता त्याने अभिजीतकडे जाण्यास साफ नकार दिला. त्याला आजी आजोबांकडेच रहायचे
होते. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिक्षची "कस्टडी" आजी आजोबांनाच
दिली.
एका पाच सहा वर्षाच्या अज्ञान-निष्पाप मुलाची किती ही फरफट.
अभिजीतची तर कीवच करावीशी वाटते. बायकोला छळायचे, मारून टाकायचे आणि तिच्या मुलाच्या कस्टडीसाठी कोर्टात जायचे. कशासाठी?
प्रकरणातील योगायोग बघा............दि. ८ऑगस्ट १९९५ रोजी मिठू आणि
अभिजीतचे लग्न झाले होते आणि सर्वोच्च न्यायाल्याचा निकाल ८ ऑगस्ट २००८ रोजी आला. लग्नाच्या वाढदिवशी
अभिजीतला आपल्या एकुलत्या एक मुलापासून दूर व्हावे लागले. या अशा हुंडाबळींच्या
प्रकारणांत निष्पाप मुलांची किती फरफट होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. समाजातली
खोटी प्रतिष्ठा, बडेजाव याला बळी पडूनच अभिजीत आणि त्याच्या
आईने मिठूचा छळ मांडला होता. शेवटी सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त झाला. नातवासाठी
आजी आजोबांना थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत खेटे घालावे लागलेत. असो. माझ्या मनात
शेवटी एकच प्रश्न उभा राहतो. सर्वोच्च न्यायालयानेही अंतरिक्षला अभिजीतकडेच सोपवले
असते तर.................................देशात आणखी एका गुन्हेगाराची भर पडली
असती का?
ॲड. अतुल सोनक
९८६०१११३००
No comments:
Post a Comment