Wednesday, April 13, 2022

बाबासाहेब, संविधान आणि आपण

 

बाबासाहेब, संविधान आणि आपण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांची अनेक भाषणे, वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी केलेले अभ्यासपूर्ण लेखन आणि मुख्य म्हणजे भारताचे संविधान, त्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी आपल्याला एक अनमोल ठेवा दिलेला आहे. आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या सरकारचा एकच धर्मग्रंथ आहे आणि तो म्हणजे भारतीय संविधान असे सार्वजनिकरित्या म्हटले आहे (त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायाचा की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे). आदरणीय बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्य आपण संविधानाबद्दल चर्चा करणे समयोचित ठरेल.

आदरणीय बाबासाहेब संविधान सभेत त्यांच्या शेवटच्या भाषणात म्हणाले होते, “माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही.” बाबासाहेब किती द्रष्टे होते हे या त्यांच्या या विधानावरून लक्षात येईल. जणू काही त्यांना पुढे काय वाढून ठेवले आहे याची पूर्वकल्पना संविधान निर्मितीचे वेळीच आली होती.

 

आपल्या देशातील सध्याची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती बघता आपले संविधान किती निष्प्रभ झालेले आहे ते स्पष्टपणे जाणवते. आपण स्वत:लाच संविधान अर्पण करताना ‘स्वातंत्र्य’, ‘समता’, ‘बंधुता’ ही मूल्ये अंगिकारायचे ठरवले. स्वातंत्र्यप्राप्ती आणि संविधान निर्मिती होऊन सात दशके उलटून गेल्यावरही सामाजिक विषमता आहेच. अजूनही बर्‍याच ठिकाणी दलितांवर, मुसलमानांवर या ना त्या कारणाने अत्याचार केले जातात. ‘सर्वांना समान न्याय’ हे तत्व अमलात येताना मुळीच दिसत नाही. राज्यकर्ते, न्यायपालिका, कार्यपालिका आणि एकूणच ज्यांच्यावर संविधानाच्या विविध तरतुदी किंवा निरनिराळ्या कायद्यांच्या तरतुदी अमलात आणायची, राबवायची संवैधानिक जबाबदारी आहे ती जबाबदारी कोणीही योग्य रीतीने पार पाडत असताना दिसत नाही. कोणाकडे दाद मागायची हा भला मोठा प्रश्न ज्यांना अन्याय अत्याचार सहन करावे लागतात त्यांना पडू लागला आहे. संविधानाला अपेक्षित भारत आपल्याला दिसतो आहे का? नागरिकांना (विशेषत: पीडित, वंचित नागरिकांना) दिलेले संविधानातील मूलभूत अधिकार जपण्यासाठी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांनी हस्तक्षेप केल्याची प्रकरणे आजकाल किती प्रमाणात दिसतात?

 

८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेली नोटबंदी कोणाला आठवत नाही. सगळे अर्थचक्र थांबले, बिघडले, उन्हातान्हात बँकेच्या रांगेत उभे असलेले अनेक लोक मरण पावले, नोटबंदीमुळे ना भ्रष्टाचार नष्ट झाला ना आतंकवाद-नक्षलवाद थांबला. आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी अचानक घेतलेला तो निर्णय संवैधानिक होता किंवा नाही हे तपासण्याची गरज अजून ही सर्वोच्च न्यायालयाला वाटलेली नाही. त्यावेळचे भारताचे सरन्यायाधीश न्या. टी. एस. ठाकूर, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दि. १६.१२.२०१६ रोजी झालेल्या सुनावणीत नोटबंदीबाबतच्या सर्व याचिका आणि अनेकांनी केलेले त्यासंबंधात केलेले विविध अर्ज पाच सदस्यीय संविधानपीठापुढे सुनावणीसाठी ठेवण्यात याव्यात असा आदेश दिला होता. त्या आदेशात तब्बल ९ प्रश्न विचारार्थ तयार करण्यात आले होते. आश्चर्याची बाब अशी की २०२२ साल उजाडले तरी या सुनावणीसाठी संविधानपीठ स्थापन झालेले नाही. सर्व याचिका आणि अर्ज प्रलंबित आहेत. एखादा शासन निर्णय संवैधानिक आहे किंवा नाही हे तपासायला इतका वेळ लागावा? सरन्यायाधीश खेहर, मिश्रा, गोगोई, बोबडे आणि आता रमणा यापैकी एकालाही या प्रकरणाचे गांभीर्य कळू नये? या प्रकरणासाठी संविधानपीठ स्थापन करण्यात कसली अडचण होती आणि अजूनही आहे? भारतातल्या सर्वशक्तिमान न्यायालयाला कोणाची भीती तर वाटत नसेल असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. तशीही संविधानपीठापुढे मुख्य ३५ आणि संबंधित अशी ५०० च्या वर प्रकरणे सुनावणीसाठी प्रलंबित आहेत. सर्वांना समान आणि जलद न्यायाचे तत्व आम्ही अशा तर्‍हेने आपल्या वातानुकूलित कार्यालयात/न्यायालयात गुंडाळून ठेवले आहे. ज्या शिताफीने लोया मृत्यू प्रकरण, राफेल प्रकरण किंवा अर्णब गोस्वामी प्रकरण हाताळल्या गेले, ती तडफ इतर अनेक महत्वाच्या प्रकरणात का दाखवली जात नाही?  काश्मीर प्रश्न (३७० कलम), नवे शेतकरी कायदे, कोरोना काळातील मजुरांचे स्थलांतर आणि कोरोनाग्रस्तांच्या उपचाराचे, लसीकरणाचे प्रश्न, सीएए, एनआरसी, इत्यादि अनेक प्रकरणात आपण ढिसाळ कारभार बघितला. पण शू...........कोणी बोलायचं नाही. हे सर्व विद्वान इतर कामात व्यस्त आहेत. आज आदरणीय बाबासाहेब हे असले प्रकार बघायला हवे होते. या देशाचे दुर्दैव असे की आज बाबासाहेबांच्या उंचीचे नेते कुठेही उपलब्ध नाहीत. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही त्यामुळे ‘बाबासाहेब परत या’ असेही म्हणता येत नाही.

 

बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे संविधान राबवण्याची जबाबदारी असणारे लोक अप्रामाणिक असतील तर संविधान कितीही चांगले असून उपयोग नाही याचा प्रत्यय आपण भारतीयांना आज पदोपदी येत आहे. संविधानपीठाने दिलेला साबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय अजूनही अमलात येऊ शकलेला नाही. देशात कायद्याचे राज्य असूनही शेकडो वर्षे जुनी मशीद बेकायदेशीररित्या आणि फौजदारी स्वरूपाचा कट करून पाडणारा समूह बाइज्जत बरी होतो आणि ज्याचे अस्तित्व किंवा जन्मस्थळ सुद्धा विवादित आहे त्याचे मंदिर उभारणीस तीच जागा दिली जाते हा कायद्याच्या कल्पनेचा आणि संविधानाचा पराभव नव्हे का? एखाद्या समूहाने, झुंडीने एखादी कृती करायचे ठरवले तर त्यांना रोखण्याची किंवा कृती घडल्यावर त्या समूहाला शासन केले जाण्याची कसलीही शाश्वती राहिलेली नाही. किंवा राज्यकर्ते आपल्या सोयीनुसार कोणावर कायदेशीर कारवाई करायची आणि कोणावर नाही हे जर ठरवत असतील आणि न्यायपालिका ही विशिष्ट पद्धतीने ‘न्यायदान’ करीत असेल तर सामान्यजनांनी कुठे दाद मागावी?

 

पूर्वी सायकलवर किंवा एखाद्या खटारा स्कूटर वर फिरणारी व्यक्ती काही वर्षांत मर्सिडिज किंवा तत्सम महागड्या गाड्यांतून फिरत असेल तर आणि त्याबाबत कोणीच काही करू शकत नसेल तर आपले संविधान आणि कायदे काय कामाचे? त्यातील तरतुदींचे पाहिजे तसे अर्थ काढून मोठमोठ्या शब्दांची आतिषबाजी करून न्यायनिर्णय दिले जात असतील आणि ‘सत्यमेव जयते’ च्या नावाखाली अन्यायग्रस्त लोकांवर आणखी अन्याय केला जात असेल तर संविधान हे सभा समारंभात मोठमोठी भाषणे देण्यासाठीच उरले आहे की काय असा प्रश्न पडतो.

 

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय संबधितांकडून अमलात आणले जात नाहीत. त्यामुळे न्यायालयीन अवमाननेची कारवाई केली जाते. तसली हजारो अवमानना प्रकरणे प्रलंबित आहेत. संविधान आणि अनेक कायदे अस्तित्वात असताना काही लोक वाटेल ते करू शकत असतील आणि त्यातून सहीसलामत सुटत असतील तर या कर्तृत्ववान लोकांचे कौतुक करण्यापलिकडे सामान्य माणूस काय करू शकतो? संविधान सभेतील शेवटच्या भाषणात आदरणीय बाबासाहेब म्हणाले होते की आपल्याला आता संवैधानिक मार्ग उपलब्ध असल्यामुळे यापुढे कुठलाही असंवैधानिक मार्ग (कायदेभंग, असहकार, सत्याग्रह) वापरण्याची गरज नाही. परंतु आजची एकूणच परिस्थिती बघता संवैधानिक मार्ग कितपत परिणामकारक आहेत याबाबत प्रश्न निर्माण होतो. असंवैधानिक मार्ग दडपण्यास शासन यंत्रणा सक्षम आहेच पण संवैधानिक मार्गात देखिल कसे अडथळे निर्माण करता येतील याकडेही सत्ताधारी मंडळी लक्ष देऊन असतात. न्यायालयांची अपूरी संख्या, पायाभूत सुविधा न पुरविणे, न्यायमूर्तींच्या रिक्त जागा न भरणे, असे अनेक प्रकार करून संवैधानिक मार्गावर अडचणी निर्माण करण्याचे कार्य सत्ताधारी लोकांकडून केले जाते.

 

लोकशाही शासनव्यवस्थेत ज्यांच्यावर अनेक गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत असे हजारो आमदार-खासदार निवडून येत असतील आणि त्यांच्या हातात आपली शासन व्यवस्था असेल, तेच लोक मंत्री, मुख्यमंत्री म्हणून आपल्यावर राज्य करीत असतील तर आपले संविधान कितीही चांगले असले तरी काय कामाचे? तसाही या संविधानाबाबत बाबासाहेबांचा भ्रमनिरास तीन वर्षांतच झाला होता आणि ते जाळून टाकण्याची भाषा त्यांनी वापरली होती. आज सात दशकांनंतर परिस्थिती आणखीच हाताबाहेर गेलेली आहे. आपण अराजकाच्या उंबरठ्यावर आहोत. मूलभूत अधिकार पायदळी तुडवले जात आहेत. धार्मिक उन्माद प्रचंड वाढलेला आहे. कुणाच्या धार्मिक भावना दुखावतील म्हणून पुण्यातला ‘नास्तिक मेळावा’ रद्द केला जातो, कोणी भोंगे लावतो म्हणून आम्हीही लावतो अशी धमकी दिली जाते, रस्त्यावर धार्मिक कार्यक्रम केले जातात, शाकाहारी- मांसाहारी वाद सुरू होतात, तथाकथित गोरक्षकांचा उन्माद पचवला जातो, हिजाब, हलाला, तलाक, असे अनेक मुद्दे वारंवार पुढे आणले जातात. विरोधात बोलणार्‍याला मारले जाते, निरनिराळ्या खटल्यांत अडकवले जाते आणि हे सर्व प्रकार आपले संविधान देशभरातील अनेक कपाटांमधून हताशपणे बघत असते...........बाबासाहेबांना विनम्र अभिवादन!!!!!


अतुल सोनक

९८६०१११३००

               

 

    

 

 

 

 

Wednesday, February 9, 2022

अण्णा आणि वाईन

 

अण्णा आणि वाईन

“कोण आहे रे तिकडे?”, डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर वळत अण्णा म्हणाले. “अण्णा ते वाईनवालं आलंय वाईन विकायला दारावर......सतरा प्रकारच्या वाईन आहेत म्हणे.”, जवळच उभा असलेला जानबा बोलला.

“अरे पण ते वाईन तर किराणा दुकानात आणि मॉलमध्ये विकणार होते न?”. “अण्णा लगबगीत उठत म्हणाले. “मला काही कळत नाही बुवा, पण काल पारावार लोक बोलत होते की अण्णा उपोषण करणार असं कळल्याबरोब्बर शासनाने ताबडतोब नवा जी. आर. काढला. दारावर वाईन विक्रीला परवानगी दिली म्हणे.” इति जानबा. ‘अरे काय मूर्ख लोक आहेत. माझा किराणा दुकानात आणि मॉल मध्ये वाईन विक्रीला विरोध आहे म्हणून मी उपोषण करणार आहे असं जाहीर केलं ना. आणि यांनी सरळ दारावर वाईन विक्रीला परवानगी देऊन टाकावी? राम कृष्ण हरी......” अण्णा (त्यांच्या) डोक्याला हात लावत म्हणाले.

“अहो अण्णा, सरकारला वाटलं असेल की अण्णांना दुकानात जाऊन वाईन घ्यायला त्रास होत असेल म्हणून ते उपोषण करणार असतील. केंद्र सरकारने जसे शेतकरी कायदे मागे घेतले तसा राज्य सरकारने वाईनबाबतचा निर्णय लोकहितार्थ (तुमच्या सारख्यांचा विचार करून) बदलला असेल अशी दाट शक्यता या ठिकाणी मला वाटते.” जानबाने आपलं मत मांडलं.

“अरे पण मी वाईन घेतो का?”, अण्णा रागारागात विचारते झाले.

“नाही अण्णा, तसं नाही हो...... तुमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक (म्हणजे तुम्ही नाही)..... ज्यांना दुकानात जाऊन वाईन घ्यायला त्रास होतो त्यांना घरपोच दिली तर काय हरकत आहे असा सरकारचा विचार असावा. लॉकडाऊनच्या काळात नाही का केवढी सोय केली होती सरकारनं. बरं ते जाऊ द्या अण्णा.......गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारचे अनेक निर्णय असे आले की ज्यांच्यासाठी तुम्ही आंदोलन करू शकला असता, उपोषण करू शकला असता. पण तुम्ही इतकी वर्षे शांत बसलात आणि वाईन च्या निर्णयाविरोधात उपोषण....असं का?”, आता जानबा पत्रकार झाल्यागत बोलू लागला होता.

अण्णा खूप खोलवर विचार करत असल्याचा देखावा करीत बोलू लागले, “ अरे मी देशभरातला भ्रष्टाचार संपवला. शेतकर्‍यांचे सर्व प्रश्न चुटकीसरशी सोडवले. शेतकरी आत्महत्या संपल्या. देशातला काळा पैसा नष्ट झाला. सर्व सरकारी कर्मचारी कायद्यानुसार वागू लागले. सगळं सगळं नीट सुरू असताना अचानक हे वाईन प्रकरण निघालं आणि माझ्यातला आंदोलक-उपोषणार्थी जागा झाला.”

एवढं सगळं ऐकल्यावरही चूप राहील तो जानबा कसला? तो म्हणाला, “पण अण्णा हा वाईन विषय तुमच्या लेव्हलचा नाही. तुम्ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयाला हात घाला.”

“अरे जानबा....हा विषय मोठ्ठाच आहे. दारूचे दुष्परिणाम माहीत नाहीत का तुला?, इति अण्णा.

“अहो अण्णा, किराणा दुकानात गेल्यावर वाईन घेणे कंपल्सरी आहे का? दुकानात ज्या ज्या वस्तू असतात त्या आपण घेतोच का? वाईन घेणारेच विकत घेतील ना.......तुम्ही मला किराणा आणायला पाठवलं तर मी वाईन घेऊन येईन का? सांगा सांगा. डॉक्टर अभय बंग किराणा दुकानात गेले तर ते वाईन घेतील का? जे घेतच नाहीत त्यांनी का घाबरावं? तसेही वाईन खूप कमी लोक पितात असं म्हणतात. उगीचच तुम्ही स्वत:च्या जीवाला त्रास करून घेताय.” जानबाही जिद्दीला पेटला होता. या चर्चेचा काही तार्किक शेवट होताना दिसत नव्हता. अण्णांना तेवढ्यात डुलकी लागली.

उपोषण मंडपात भरपूर गर्दी होती. किराणा दुकान आणि मॉलमध्ये दारू विक्रीला न ठेवण्याचा राज्य सरकारने निर्णय नुकताच जाहीर केला होता. मधला मार्ग म्हणून त्या ऐवजी वाईन दुकानाचे वेगळे परवाने द्यायचे सरकारने ठरवले होते. आंदोलकांना परवाने वाटपात प्राधान्य द्यायचे की नाही, एका गावात किती परवाने द्यायचे, दोन दुकानांमध्ये अंतर किती असावे, वाईन विक्रीचा जास्तीत जास्त लाभ शेतकर्‍यांना कसा करून देता येईल, वाईन दारू नसल्यामुळे किंवा अल्कोहोलचे प्रमाण कमी असल्यामुळे ड्रंकन ड्राइव्ह बाबत नियम शिथिल करता येईल का, वाईन विकत घ्यायला परवान्याची आवश्यकता लागेल का, घरोघरी वाईन निर्मितीची परवानगी देता येईल का, इत्यादि प्रश्नांवर एक सार्वकालिक धोरण ठरवण्यासाठी या विषयतील तज्ज्ञ “बोबडे-बंग-गडकरी” समितीची स्थापना करण्याचे मंत्रिमंडळ बैठकीत ठरवण्यात आले होते. तसेच राळेगणसिद्धीत एक मोठी सरकारी वाईनरी सुरू करण्याचेही ठरले. तिथल्या वाईनला “अण्णा वाईन” हे नाव देता येईल किंवा कसे यावरही समितीने विचार करावा असेही ठरले.  अण्णांच्या उपोषणाची सांगता सरकारतर्फे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात करण्याचे ठरले. भीष्म पितामह पवार साहेब यांच्या हस्ते अण्णा वाईन-सॉरी-लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडतील असे ठरले. दरम्यान ‘वाईन’ ला मराठीत पर्यायी शब्द सुचवा अशी मागणी राज ठाकरे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेकडे केल्याचेही वृत्त आहे.

अण्णांना जाग आली. नुकत्याच पडलेल्या स्वप्नाची नशा त्यांच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होती. जानबा शेजारीच उभा होता. “आज कुठला ब्रॅंड आणलाय जानबा? म्हणजे भाजी कुठली आहे आज, जानबा?” असा प्रश्न विचारीत उत्तराची वाट न बघता अण्णा ईवनिंग वॉकला निघाले.

 

अतुल सोनक

९८६०१११३००

   

Sunday, November 7, 2021

पेगॅससपासून आपली सुटका होईल काय?


पेगॅससपासून आपली सुटका होईल काय?

 

पेगॅसस या सॉफ्टवेअरच्या वापरासंबधी किंवा गैरवापरासंबंधी बरेच वादविवाद झाल्यावर आणि भारत सरकारने आपले हात झटकल्यावर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात एक समिती नेमून संवैधानिक तरतुदी आजही महत्वाच्या आहेत हे नुकतेच दाखवून दिले. हा वाद मुळात काय होता, संबंधित लोकांना सर्वोच्च न्यायालयात का जावे लागले, भारत सरकारची भूमिका काय होती, न्यायालयाने काय भूमिका घेतली, वगैरे बाबींची चर्चा करणे या निमित्ताने महत्वाचे ठरेल.

 

 ‘पेगॅसस’ हे ‘एनएसओ ग्रुप’ या इस्त्रायली कंपनीने विकसित केलेले सॉफ्टवेअर आहे आणि एका साध्या एसएमएस किंवा ईमेलच्या माध्यमातून ते आपल्या लक्ष्याच्या मोबाइल वा संगणकात घुसवता येते. घुसखोरी झाली की सदर मोबाइल वा संगणक यांतील हवी ती माहिती या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोडता येते, असे सांगितले जाते. तसेच मोबाइल/ संगणकधारकाच्या नकळत या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोबाइल वा संगणक वाट्टेल तसे वापरता येते. . या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भारतातील विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्तींवर हेरगिरी झाल्याचे आरोप झाल्यानंतर बरेच वादळ उठले.. या व्यक्तींमध्ये काही पत्रकार, राजकारणी, न्यायालयीन  कर्मचारी  आणि  स्वयंसेवी संस्थांशी संबंधित कार्यकर्ते/ नेते आदी अनेकांचा समावेश आहे. हे सॉफ्टवेअर फक्त आणि फक्त सरकारलाच विकले जाते असे ‘एनएसओ ग्रुप’ने स्पष्ट केल्यानंतर संशयाची सुई भारत सरकारकडे वळली. अन्य कोणाही खासगी व्यक्तीस जे उपलब्ध नाही आणि जे फक्त सरकारलाच मिळू शकते अशा सॉफ्टवेअरचा वापर झाल्याने थेट सरकारवर संशय घेतला जाणे साहजिक होते.  तसा तो घेतला गेल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झडल्या. संसदेच्या अधिवेशनात गोंधळ झाला आणि प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयात गेले.

 

अनेक लोकांनी या प्रकरणी सर्वोच्च  न्यायालयात याचिका दाखल केल्या. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, श्याम दिवाण, राकेश द्विवेदी, दिनेश द्विवेदी, कॉलिन गोन्साल्विस, मीनाक्षी अरोरा, मनोहरलाल शर्मा अशा दिग्गज वकिलांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. भारत सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी भरपूर वेळ घेत, टाळाटाळ करत शेवटी मोघम नकार देण्याचेच काम केले. सरकारने पेगॅसस आरोप स्पष्टपणे नाकारलेलेच नाहीत, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.  ‘या प्रश्नावर अन्य देशांची सरकारे स्पष्ट भूमिका घेत असताना आपण केवळ तटस्थ बघे राहू शकत नाही’ असे नमूद करत सरकारच्या संशयास्पद नाकर्तेपणावर सर्वोच्च न्यायालयाने अंगुलीनिर्देश केला आणि  या ‘हेरगिरी प्रकारामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर निश्चित अतिक्रमण झाले आहे. असे असताना सर्वोच्च न्यायालय हातावर हात ठेवून निष्क्रिय राहू शकत नाही,’ असेही स्पष्ट केले. ‘‘आरोप खरे की खोटे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सरकारला पुरेशी संधी दिली गेली. पण मोघम, संदिग्ध नकाराव्यतिरिक्त सरकारने काहीही स्पष्ट केले नाही. तेव्हा आम्हास चौकशीचा निर्णय घेण्याखेरीज पर्याय राहिला नाही,’’ हे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच सरकारने स्वतः या प्रकरणी समिती स्थापन करण्याची तयारी दर्शवली असताना त्यावर विश्वास न ठेवत सर्वोच्च  न्यायालयाने स्वतः  एक समिती स्थापन करून दोन महिन्यात अहवाल देण्यात यावा असे आदेश दिलेत.

सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्या. सूर्यकांत व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आर. व्ही. रवींद्रन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून त्यात श्री. आलोक जोशी, डॉ. संदीप ओबेरॉय, डॉ. नवीन कुमार चौधरी, डॉ. प्रबाहरन पी. आणि डॉ. अश्विन अनिल गुमास्ते यांचा समावेश केला. सर्वोच्च न्यायालयाने या समितीला पेगॅसस हेरगिरीप्रकरणात चौकशी करून सत्य शोधून त्यावर उपाययोजना सुचविण्यास सांगतिले आहे. 

गेल्या काही वर्षांत विशेषतः २०१४ नंतर सर्वोच्च  न्यायालयाने अनेक प्रकरणात घेतलेल्या बोटचेप्या भूमिका बघता, विशेषतः लोया आणि  राफेल प्रकारणांनंतर  या प्रकरणातील भूमिका खूपच प्रभावी आणि दीर्घ परिणाम करणारी ठरेल अशी चिन्हे आहेत. परंतु ही समिती कितपत निष्पक्ष काम करेल किंवा तिला करू दिले जाईल, समितीच्या अहवालानंतर सर्वोच्च न्यायालय काय आदेश देईल आणि त्यानंतर भारत सरकार किंवा ते सरकार चालवणारे मूठभर लोक सर्वोच्च न्यायालयाचे कितपत ऐकतील, हे काळच ठरवेल. बेकायदेशीररित्या बाबरी मस्जिद जमीनदोस्त करणाऱ्यांचे आपण काहीही बिघडवू शकलेलो नाही हा इतिहास जुना नाही. आपल्या विरोधात बोलणाऱ्या, विरोधात जाणाऱ्या किंवा जाऊ पाहणाऱ्या लोकांचे मोदी-शाह काय करतात हे आपण गेली काही वर्षे बघतोच आहोत. कायदे, नियम, त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि न्यायालये यांचा वापर कसा करायचा यात ही मंडळी फार वाकबगार आहेत. त्यामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणा, आपला खाजगी आयुष्य जगण्याचा अधिकार म्हणा.....यांचा विजय झाला असे आपल्याला सध्या वाटत असेल तर काही महिन्यात त्याबाबत भ्रमनिरास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, समितीने सुचवलेल्या उपायांनंतर तरी पेगॅससपासून आपली सुटका होईल काय? हा खरा प्रश्न आहे. परंतु आपण आशावादी असायलाही हरकत नाही.  यातून काही चांगलेही बाहेर निघू शकेल, अशी आशा करू या.

 

अतुल सोनक

९८६०१११३००