Sunday, February 3, 2013

"भावना आणि अस्मिता मंत्रालय"


"भावना आणि अस्मिता मंत्रालय"

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली. सर्व मंत्री सुतकी चेहरे करून बसलेले होते. बैठक ज्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावली होती, तो विषय फारच गंभीर, गुंतागुंतीचा आणि गहन होता. विषय होता एक नवीन मंत्रालय स्थापन करण्याचा. हे मंत्रालय फक्त केंद्रीय स्तरावरच नव्हे तर राज्याराज्यातही स्थापन होणार होते, म्हणून तर प्रश्न फारच गुंतागुंतीचा होता. या मंत्रालयाचे नाव होते "भावना आणि अस्मिता मंत्रालय". अण्णा हजारेंनी जशी सक्षम लोकपालाची मागणी खूप दिवसांपासून लावून धरली आहे तशीच "भावना आणि अस्मिता मंत्रालय" केंद्र तसेच राज्याराज्यात स्थापन करण्यात यावं, या मागणीसाठी देशभरातील भावनाप्रधान तसेच निरनिराळ्या अस्मिता जोपासणाऱ्या नागरिकांनी आंदोलने केलीत. आता नागरिकांनी आंदोलने केल्यावर सरकारने तत्परतेने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीचा हा वृत्तांत. हो, या बैठकीत पंतप्रधान काहीच बोलले नाहीत. बाकीचे सर्व मंत्री बोलले. परंतु त्यांची नावे इथे देता येणार नाहीत कारण ही बैठक गुप्त होती. स्वामी अग्निवेश आणि कपिलमुनींचे संभाषण चोरून ध्वनिमुद्रीत करणाऱ्या महाभागाने या बैठकीत झालेली चर्चा ध्वनिमुद्रीत तसेच छायाचित्रीतही केली. उगाच कायद्याच्या कचाट्यात सापडू नये, किंवा कोणाच्या भावना तसेच अस्मिता दुखावल्या जावू नयेत म्हणून आपण मंत्र्यांना १,२,३,४ असे क्रमांक दिले आहेत. चर्चेचा वृत्तांत खालीलप्रमाणे..........

मंत्री-१: भावना आणि अस्मिता मंत्रालय स्थापन करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय सदस्यांनी आपापली मते मांडावीत तसेच त्यांच्या शंका उपस्थित कराव्यात. देशभरात सध्या वारंवार नागरिकांच्या भावना आणि अस्मिता दुखावल्या जात आहेत, त्यामुळे शासन म्हणून आपण काही करू शकतो का?, त्यांना काही मदत देता येईल का?, सध्याच्या कायद्यात काही बदल करता येतील का? याबाबत आपण सर्व महानुभवांनी आपापली मते मांडावीत.
मंत्री-२: हा काय विषय झाला का?, यात ना टेंडर, ना कॉन्ट्रॅक्टर, पैसे खायचे कसे आपण?
मंत्री-३: किती वर्षे झालीत तुम्ही मंत्रिमंडळात आहात? लोक चाऱ्यात, कोळश्यात, पाण्यात, खेळात, रस्त्यात, एवढंच नव्हे तर न दिसणाऱ्या स्पेक्ट्रममधे पैसे खातात, म्हणजे त्यांच्यावर तसा आरोप होतो, तर आपण भावना आणि अस्मितांमधे पैसे खावू शकत नाही?
मंत्री-२: कसे खायचे ते सांगा हो, मला काही आयडीया सुचत नाहीय.
मंत्री-३: हो सांगतो, कुठल्याही प्रश्नाला उत्तर असतंच. पहिले मंत्रालयाचं कामकाज, त्याचं स्वरूप, कार्यकक्षा, इत्यादी गोष्टी समजून घेवू. मग सांगतो. एकदा योजना समजली की कशी खायची तेही समजेल. सांगा हो एकूण स्वरूप.
मंत्री-१: वारंवार दुखावल्या जाणाऱ्या भावना आणि अस्मितांचं प्रमाण बघून याबाबत काही करता येईल का हे ठरवण्यासाठी शासनानं एक समिती नेमली होती. त्या समितीमधे भावना आणि अस्मिता जोपासणारे देशभरातील ५२६ ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते, सर्वधर्मीय, सर्वजातीय, सर्वपंथीय, सर्वभाषीय समाज सुधारक {?}, इ. सामिल होते. त्यांनी सुचवलेले उपाय खालीलप्रमाणे......
१. वारंवार दुखावल्या जाणाऱ्या भावना आणि अस्मितांचा विचार करता केंद्र शासनाने वार्षिक अर्थसंकल्पात किमान पन्नास हजार कोटी रुपयांची तरतूद करावी. (हे वाक्य ऐकताच पैसे कसे खावे हा प्रश्न पडलेले मंत्रिमहोदयांच्या चेहऱ्याची कळी खुल्ली आणि त्यांनी हळूच खिशातून गुटख्याची पुडी काढून तोंडात रिती केली).
२. हा निधी भावना आणि अस्मिता दुखावलेल्या पीडितांसाठी वापरावा.
३. या निधीचे वाटप सर्व राज्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात न करता जिथे भावना आणि अस्मिता दुखावण्याचे प्रमाण जास्त आहे त्या राज्यात जास्त निधी द्यावा, जिथे कमी आहे तिथे कमी निधी द्यावा. कमी जास्त प्रमाण ठरविण्यासाठी आणखी एक समिती नेमावी.
४. भावना किंवा अस्मिता दुखावली गेल्याची तक्रार एखाद्या नागरिकाने किंवा संघटनेने केली तर त्या तक्रारीची सुनावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर एक समिती नेमावी. त्या समितीत जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इ. जिल्हा स्तराचे सर्व अधिकारी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्वजातीय, सर्वपंथीय, सर्वधर्मीय विद्वान, यांचा समावेश असावा.
५. तक्रारीचे निवारण तक्रार मिळाल्यापासून तीन महिन्यांच्या आत करावे. कुठल्याही परिस्थितीत हा कालावधी वाढवता येणार नाही.
६. भावना किंवा अस्मिता दुखावलेल्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रकरणाचे गांभीर्य बघून किमान एक लाख ते कमाल एक कोटी रुपयांची रक्कम भावना किंवा अस्मिता दुखावणाऱ्याने द्यावी असा आदेश पारित करावा. (हे वाक्य ऐकताच मंत्री-४ म्हणाले......जर ही रक्कम भावना किंवा अस्मिता दुखावणाऱ्यानेच द्यायची असेल तर शासनाला निधीची तरतूद करायची गरज काय? त्यावर मंत्री-१ म्हणाले.....पूर्ण ऐकून घ्या हो, मग बोला काय बोलायचे ते. पुढची तरतूद तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल.
७. नुकसान भरपाई देण्यासंबंधीचा आदेश पारित झाल्यावर एक महिन्याच्या आत संबंधिताने नुकसान भरपाई न दिल्यास शासनाने आपल्या निधीतून नुकसान भरपाई द्यावी आणि ती रक्कम भावना किंवा अस्मिता दुखावणाऱ्याला कर्ज म्हणून दिली असल्याचे समजून मासिक हप्त्याने १२ टक्के द.सा.द.शे व्याजाने वसूल करावी. कुठल्याही कारणास्तव ही रक्कम वसूल करणे शक्य न झाल्यास भावना किंवा अस्मिता दुखावणाऱ्या व्यक्तीला ज्या व्यक्तीच्या भावना किंवा अस्मिता दुखावल्या गेल्या असतील तिच्या घरी किंवा कार्यालयात झाडूपोछा करणे, भांडी घासणे, कपडे धुणे, गाडी चालवणे, मुलं सांभाळणे, पडतील ती सर्व कामे करणे. आणि हे सर्व कर्ज व्याजासहित फिटेपर्यंत (रोजगार हमी योजनेच्या प्रति दिवस मजुरीच्या हिशेबाने) करत राहणे.
(हे ऐकल्याबरोबर मंत्री-५ म्हणाले....अरे बापरे अशाने तर कोणी कोणाच्या भावनाच दुखावणार नाही. इतकी कठोर तरतूद?. त्यावर मंत्री-६ म्हणाले..... त्यात काय मोठंसं, कोणी भावना दुखावल्या नाहीत तरी आपण बोगस केसेस बनवू. बोगस तक्रारकर्ता, बोगस आरोपी, शासनाचा पैसा वाटून खावू. सीएजीलाही मॅनेज करू. आमच्या राज्यात बलात्कारपीडित महिलेला तात्काळ मदत म्हणून वीस हजार रुपयांची मदत म्हणून प्रावधान आहे. एका गावात बलात्कारच होत नव्हते. निधी परत जावू नये म्हणून आम्ही एका महिलेला तयार केले. तिने एका महिन्यात ३६ वेळा बलात्कार झाला म्हणून तक्रारी केल्या. तिला आम्ही सात लाख वीस हजार मिळवून दिले. त्यापैकी तिला जास्त गरज नसल्यामुळे वीस हजार दिले. बाकी सात लाख आम्ही वाटून खाल्ले. आम्ही म्हणजे, पोलीस, कलेक्टर, संबंधित अधिकारी, इ. असाच प्रकार भावना आणि अस्मितांच्या बाबतीतही करता येईल. हे ऐकल्यावर पैसे कसे खाता येतील हा प्रश्न पडलेले मंत्रिमहोदय खूपच खुष झाले. त्यांनी पुन्हा दुसरी गुटख्याची पुडी काढली आणि आनंदातिरेकानं ती न फोडता तशीच तोंडात टाकली).
८. तक्रारीवर समितीने दिलेला निर्णय अंतिम राहील. समितीने दिलेल्या नुकसान भरपाईच्या आदेशाला कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही.
९. भावना आणि अस्मिता मंत्र्यांना पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना दिल्या जाणारी सुरक्षा प्रदान करण्यात यावी कारण त्यांच्या जिवाला बराच धोका राहील.
१०. या विभागाच्या मंत्र्यांना निधीचे योग्य प्रमाणात वाटप करण्याचे तसेच समितीवर नेमणूका करण्याचे अधिकार राहतील. तसेच राज्याराज्यातील भावना आणि अस्मिता वेगवेगळ्या असल्या आणि त्यात वाद उत्पन्न झाला तर त्यावर अंतिम निर्णय देण्याचाही अधिकार राहील.
११. हे मंत्रालय स्थापन झाल्यानंतर कुठल्याही पुस्तकावर, नाटकावर, सिनेमावर किंवा इतर कुठल्याही कला प्रकारावर शासनातर्फे किंवा न्यायालयाद्वारे बंदी आणल्या जाणार नाही. तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई मिळत असल्यामुळे बंदी आणण्याची गरज राहणार नाही.
१२. भावना आणि अस्मिता दुखावलेल्यांनी तक्रार न करता तोडफोड किंवा तत्सम गैर कायदेशीर कृत्य केल्यास समितीला त्यांचेविरुद्ध कारवाई करण्याचे आणि दंड ठोठावण्याचे अधिकार राहतील.
१३. भावना आणि अस्मिता दुखावलेल्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईवर कधीही कुठल्याही प्रकारचा कर आकारल्या जाणार नाही. ती रक्कम बॅंकेत ठेवली तरी त्यावरील व्याज करपात्र राहणार नाही.

समितीने सुचवलेल्या तेरा कलमी सूचना ऐकल्यावर सर्व मंत्री एकमेकाशी बोलायला लागले. ही मंत्रिमंडळाची बैठक नसून मच्छीबाजार असल्यासारखे वाटू लागले. आता पर्यंत पाच सहा मंत्रीच बोलत होते, आता सगळ्यांनाच कंठ फुटला होता. एक ज्येष्ठ मंत्री उठून उभे राहिले. म्हणाले....लवकरात लवकर ठराव पारित करायचाय, उद्या घोषणा, परवा मंत्र्यांची नियुक्ती आणि शपथविधी झाला पाहिजे. सर्व मंत्री एका सुरात बोलले. "आम्हाला मंजूर आहे, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात यावी".

दुसऱ्या दिवशी घोषणा झाली. आणि हे नवे मंत्रिपद मिळवण्यासाठी धावाधाव सुरू झाली. आमचा छुपा कॅमेरा सगळीकडे लक्ष ठेवूनच होता. मंत्री-२ ज्यांना पैसे कसे खावे हा प्रश्न पडला होता, त्यांनीच एक हजार कोटी रुपये पक्षनिधी आगावू जमा करून भावना आणि अस्मिता मंत्रिपद मिळवले.

त्यांचा शपथविधी झाल्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मंत्रिमहोदय म्हणाले.....माझ्यावर आजपर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप नव्हता, मी उच्चविद्याविभूषित ज्येष्ठ राजकारणी आहे, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, भावना भडकावणाऱ्या, अस्मिता दुखावणाऱ्या सर्व लोकांमधे माझी ऊठबस आहे. माझ्या अनुभवाचा फायदा शासनाला आणि भावना-अस्मिता पीडितांना व्हावा म्हणून मला पक्षातर्फे हे मंत्रिपद देण्यात आलंय. मी या पदावर काम करत असताना शासनातर्फे कुठल्याही प्रकारचे मानधन किंवा पगार-भत्ते घेणार नाही. या नविन मंत्रालयामुळे आतापर्यंत दबलेले भावना आणि अस्मिता दुखावण्याचे प्रकार जास्तीत जास्त प्रमाणात उघडकीस येतील अशी मला आशा आहे. जय हिंद, जय हिंद, जय हिंद.


अतुल सोनक,
३४९, शंकर नगर, नागपूर-४४००१०
भ्रमणध्वनी: ९८६०१११३००, ९४०४७०००५७   





Friday, May 25, 2012

जोशींना अग्निदिव्य करायला भाग पाडणाऱ्यांचे काय?


 गुरुवारी दिवसभर भाजपा, मुंबई येथील पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, नरेंद्र मोदी, संजय जोशी आणि नितीन गडकरी यांच्यासंबंधीच्या प्रसारमाध्यमातील बातम्या बघितल्यानंतर आणि दूरचित्रवाहिन्यांवरील त्याच संबंधीच्या चर्चा ऐकल्यानंतर "तरुण भारत" याबाबत काय भूमिका घेईल आणि त्या संबंधीचे संपादकीय कसे असेल याची माझ्या मनात प्रचंड उत्कंठा होती. गेली तीस-पस्तीस वर्षे मी न चुकता त.भा.चे संपादकीय वाचत आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक, प्रश्नांवरील त.भा.च्या भूमिकांची नेहमीच तारीफ करावीशी वाटते. वेळेअभावी प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही. परंतु या वेळच्या " समर्पित नेत्याचे अग्निदिव्य!" या संपादकीयावर प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहावले नाही.

त.भा.ने आपल्या
संपादकीयात  संजय जोशींची मुक्त कंठाने प्रशंसा केली तशी ती व्हायलाच पाहिजे परंतु त्यांच्या राजीनाम्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जबाबदार असणाऱ्या प्रत्येक नेत्याचा यथेच्छ समाचार संपादकियात घ्यायला हवा होता, असे माझे प्रांजळ मत आहे.

"व्यक्तिगत रागलोभापायी पक्षाला, देशहिताला आणि विचारांच्या चळवळीला वेठीस धरणाऱ्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन होत असताना संजय जोशी यांनी केलेली कृती झणझणीत अंजन घालणारी आहे". हे आणि यासारखी दोनचार वाक्ये टाकून संपादकीयात नरेंद्र मोदी किंवा तत्सम नेत्यांबद्दलची नाराजी दर्शविण्यात आली आहे. परंतु एखादी व्यक्ती (नरेंद्र मोदी) इतका आडमुठेपणा का करते? किंवा एखाद्या प्रकरणाबाबत किंवा एखाद्या व्यक्तीविरुद्ध इतकी टोकाची भूमिका का घेते? हे माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला किंवा राजकीय अभ्यासकाला समजायला नको काय? संजय जोशी यांनी मोदींचे असे काय घोडे मारले होते की त्यांनी त्यांचा एवढा दु:स्वास करावा? जोशींनी जे केले, ते उत्तमच केले, त्यांची स्तुती ही व्हायलाच पाहिजे आणि तशी त.भा.ने केलीही परंतु ज्यांनी त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले, आणि ते राजीनामा देत असताना जे नेते मुकाट्याने चूप बसले, मोदी बैठकीत भाग घेणार असे सांगताना जणू काही लोकसभेच्या निवडणुका जिंकल्यागत चेहरा खुलवणारे गडकरी, यांचा समाचार घेतला गेला असता तर संपादकीय अधिक चांगले आणि संतुलित झाले असते. उगाचाच कोणावर टीका करायची गरज नाही परंतु जे उघड उघड दिसते आहे त्याबद्दल लिहायला काय हरकत आहे?

संपूर्ण देशाच्या तुलनेत एका छ्टाकभर राज्याचा मुख्यमंत्री संपूर्ण पक्षाला वेठीस धरतो, जोशी गेल्याशिवाय कार्यकारिणीत येणार नाही म्हणतो, विधानसभांच्या निवडणुकीच्या प्रचाराला दांडी मारतो, ही कसली पक्षशिस्त? एवढीच मग्रुरी असेल तर आपला स्वत:चा प्रादेशिक पक्षच स्थापन करावा की त्यांनी. बरे मोदींचे कृत्य समर्थनीय तर नाहीच पण जे त्यांच्या दबावतंत्राला बळी पडले त्या ताकदवान, सामर्थ्यवान तथाकथित हायकमांड आणि हेवीवेट नेत्यांचे काय? मोदींना इतके डोक्यावर चढवायची खरोखरच गरज होती काय? एक चांगला राजकीय पक्ष, "पार्टी विथ अ डिफरन्स", शिस्तबद्ध राजकीय संघटना, दर्जेदार, अभ्यासू, प्रतिभावान नेत्यांचा पक्ष, या सगळ्या भ्रामक कल्पना ठराव्यात अशा काही घडामोडी गेल्या काही दिवसांत--वर्षांत घडत आहेत. दहा टक्के जनाधार वाढवण्याची इच्छा पक्षाध्यक्ष गडकरींनी बोलून दाखवली पण असेच जर चालत राहिले तर जनाधार दहा टक्के कमी होण्याचीच जास्त शक्यता आहे, असे वाटते. "व्यक्तीपेक्षा पक्ष आणि पक्षापेक्षा देश मोठा" असे मानणाऱ्या पक्षात ’इंडीया इस मोदी अ‍ेंड मोदी इस इंडीया’ अशा इंदिराजीच्या धर्तीवर घोषणा सुरु व्हायला वेळ लागणार नाही. लोकाभिमुख, सांघिक राजकारण करणाऱ्या भाजपाला असा व्यक्तीकेंद्री बदल चालतो का, पचनी पडतो का आणि असा बदल जनतेला चालतो का हे पुढे दिसेलच. भारतीय राजकारणातील उत्तुंग नेत्यांपैकी एक असलेल्या अटलजींच्या पक्षात उण्यापुऱ्या तीन दशकातच असले घाणेरडे राजकारण सुरु होईल असे पक्षस्थापनेच्या वेळी कोणालाच वाटले नव्हते. पक्षनेतृत्वाने असे व्यक्तीकेंद्री राजकारण खपवून घेणे बंद केले नाही तर पक्षाची वाताहात व्हायला वेळ लागणार नाही. संजय जोशींच्या कृतीची जाणीव भाजपाच्या नेत्यांना झाली तर त्यातूनच भविष्यातील उज्ज्वल यशाची वाट कोरली जाईल, हे त.भा.चे मत योग्यच आहे पण नेते-कार्यकर्ते जोशींच्या कृतीचे अनुकरण करण्याची शक्यता कमी आहे कारण तसे करणे कठीण आहे. चांगल्याचे अनुकरण कमी होते वाईटाचे जास्त. मॅकियाव्हेली मॉडेलने चाललेल्या भारतीय राजकारणात जोशींचे अनुकरण कठीणच. उलट, जोशींसारख्यांचे खच्चीकरण होण्याचीच जास्त शक्यता आहे. मोदी-जोशी-गडकरी प्रकरणाचा हाच अन्वयार्थ आहे.

धन्यवाद,

अ‍ॅड. अतुल सोनक,
३४९, शंकर नगर, नागपूर-१०
९८६०१११३००, ९४०४७०००५७